
आज आषाढी एकादशी ! या निमित्ताने पंढरपुरची वारी आठवते. ही वारी करणाऱ्यांना आपल्या माय मराठीत वारकरी म्हणतात. “गुलामगिरी,अंधश्रद्धा, जातीभेद यांवर वार करणारे ते वारकरी” अशा आशयाची व्याख्या इतिहासाचार्य कालवश मा म देशमुख यांनी केली आहे.वारकरी व पंचशील पालनाचा असलेला परस्परसंबंध,सर्वजातीय संतांनी तत्कालिन ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध केलेले बंड व खुद्द विठ्ठलाचा चीवर साधर्म्य पितांबर धारक निःशस्त्र अवतार पाहता इतिहासाचार्य मा म देशमुख यांची व्याख्या सत्यान्वेषी असल्याचे जाणवते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील विठ्ठल हा बुद्ध असल्याचे म्हटले आहे, हे जाणकारांना माहित आहे. हे सारे विश्लेषण वारीचे नाते हे श्रमण परंपरेशी असल्याचे सांगते. ब्राह्मण परंपरेशी तुलना करता ही श्रमण परंपरा सापेक्षतः समतावादी असल्याचे दिसून येते.
श्रमण – ब्राह्मण हा समास प्राचीन भारतात आढळतो. श्रमण परंपरेत जैन,बौद्ध हे प्रमुख धाराप्रवाह आहेत. ही परंपरा ब्राह्मण परंपरेची विरोधक समजली जाते.या ऐतिहासिक समतावादी श्रमण सृष्टीला नाकारणारी विषमतावादी ब्राह्मण परंपरा आहे. कालवश गीतकार ग दि माडगुळकर रचित ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भक्तीगीत ब्राह्मण परंपरा उलगडून दाखवते. या गीतात जातीने ब्राह्मण असलेले माडगुळकर, विठ्ठलाला नाम्याची खीर चाखायला लावतात व चोख्याची गुरे राखायला सांगतात ! संत नामदेव हे सगळ्या संतांचे अर्ध्वयू ! आध्यात्मिक क्षेत्रांत त्यांचा अधिकार संत ज्ञानेश्वरांपेक्षा मोठा आहे. संत ज्ञानेश्वरांनी देखील हे मोठेपण मोकळ्या मनाने मान्य केले. तर असे हे संतशिरोमणि नामदेव स्वामी हे शिंपी समाजाचे ! ब्राह्मणी धर्मशास्त्राने शिंपी,धोबी,न्हावी,कुंभार,माळी,कुणबी,या सगळ्या गावकुसाच्या आत राहणाऱ्या सेवाकर्मी जातींना शूद्र संबोधले आहे ! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आज या शूद्रांना “ओबीसी” म्हटले जाते.
कळीचा मुद्दा असा कि,पंढरपूरची वारी करणाऱ्या सर्वजातीय विशेषतः शूद्र संतांचा तत्कालिन ब्राह्मणी धर्माच्या नियंत्यांनी अमानुष छळ केला.हे सर्व संत आध्यात्मिक मुक्तीचे मुमुक्षू होते.ते शूद्र असल्यामुळे आध्यात्मिक मुक्तीसाठी काबील नाहीत,असे तत्कालिन ब्राह्मणी धर्माचे मुखत्यार असलेले ब्राह्मण सांगत होते.त्यामुळे आध्यात्मिक मुक्ती मागणाऱ्या संतांवर तत्कालिन मनुवादी ब्राह्मणांनी सर्वनाशक ब्रह्मास्त्र उगारले. महत्त्वाचे म्हणजे या सर्व संतांनी आपल्या आध्यात्मिक बळाच्या जीवावर या ब्रह्मास्त्राला पराभूत केले.त्यासाठी संत नामदेव यांनी उत्तर भारत भ्रमणयात्रा केली.शीखांच्या धर्मग्रंथात अभंग समाविष्ट झालेला हा एकमेव मराठी संत ! या यात्रेने शूद्रादिअतिशूद्रांचे आध्यात्मिक बंड उभ्या उत्तर भारतात पसरले व वारकऱ्यांचा संबंध देशाच्या उत्तर भागातील संत चळवळींशी जोडण्याचा प्रयत्न केला. या आध्यात्मिक बंडाचा प्रभाव वाढल्यावर चोखा मेळा – तुकाराम यांना तर प्राणार्पण करावे लागले.अगदी संत ज्ञानेश्वरांची समाधी देखील वरवर दिसते तशी साधी नाही.ही समाधी होती कि,तत्कालिन ब्रह्ममार्तंडांनी दिलेली शिक्षा होती ? यांवर संशोधन होणे गरजेचे आहे.

संत चळवळीने पराभूत केलेल्या ब्रह्मास्त्राला पुन्हा प्रतिष्ठित कसे करायचे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ब्राह्मण परंपरेने विठ्ठलाचे व संत परंपरेचे ब्राह्मणीकरण केले. ‘नाम्याची खीर चाखणारा व चोख्याची गुरे राखणारा विठ्ठल’ त्यांतून जन्माला आला. या ब्राह्मणी विठ्ठलाने चोख्याची खीर खाल्ली असती तर तो बाटला असता ! म्हणून त्याला चोख्याची गुरे राखण्याची जबाबदारी दिली. नामदेव जातीने शिंपी म्हणजे शूद्र असला तरी तो गावकुसातील रहिवासी आहे. म्हणून विठ्ठल त्याची खीर चाखू शकतो ! अर्थात, ग दि माडगुळकर या ब्राह्मणी कवीच्या विठ्ठलाने शूद्र नामदेवाची खीर चाखणे हा देखील चमत्कारच म्हणायला हवा. भारतीय संविधानात या शूद्र ओबीसींसाठी अनुच्छेद 340 आहे. त्यानुसार विसाव्या शतकातील थोर गांधीवादी आचार्य काका कालेलकर यांच्यावर स्वतंत्र भारतातील पहिल्या मागासवर्ग आयोगाची जबाबदारी टाकण्यात आली. जातीने ब्राह्मण असलेल्या कालेलकरांनी ती जबाबदारी स्वीकारली खरी परंतु आपले ब्राह्मण्य शाबूत ठेवून ! पहिल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी तत्कालिन सातारा जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ सांगून संशोधक हरी नरके सांगतात कि,आयोगाच्या कामासाठी साताऱ्याला भेट देताना कालेलकर यांनी स्वतःसाठी ब्राह्मण आचाऱ्याची मागणी केली होती ! ब्राह्मण्यवाद गांधीवादाच्या आडून कसे विषारी फुत्कार टाकीत होता,हे यांवरून दिसून येते.
मतितार्थ असा कि, ‘कानडा राजा पंढरीचा’ लिहिणारे ग दि माडगुळकर,या गीताला स्वरसाज चढवणारे सुधीर फडके,जातीने ब्राह्मण असणारे व गांधीवादी होऊनही आपले ब्राह्मण्य शाबूत ठेवणारे काका कालेलकर यांच्या ब्राह्मण परंपरेने शूद्रांना रूढी – परंपरांच्या जोखडांत जख्ख बांधून ठेवले आहे. या शूद्रांनी जातीव्यवस्था पाळावी,नोकऱ्या – शिक्षणांत जाऊन आपली भौतिक प्रगती करू नये,‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ यांसाठी तर विठ्ठल नाम्याची खीर चाखतो ! दोष विठ्ठलाचा नाही, नाम्या- चोख्याचा तर अजिबात नाही. दोष असलाच तर बहुजन समाजाला “ब्राह्मणी दृष्टी” देणाऱ्या माडगुळकर – फडके – कालेलकर यांच्यात वसलेल्या ब्राह्मणी प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे नाम्याची खीर चाखणारा विठ्ठल आज अनुसूचित जातीच्या जागृत जनतेला नकोसा वाटतो. नाम्याने चोख्याची खीर खाल्ली असती किंवा निदान चटणी – भाकर जरी खाल्ली असती तर चालले नसते का ? नक्कीच चालले असते ! पण मग शूद्र नामदेव व अतिशूद्र चोखा यांच्या समाजात भांडणे कशी लावता येतील ?
बहुजन समाजावर कृत्रिमरित्या चढवलेली ही ब्राह्मणी झापडे उतरवण्यासाठी भन्ते ज्ञानज्योती हे विद्वान बौद्ध भिक्खू मागील काही वर्षांपासून पंढरपूरची वारी करीत आहेत. त्यामुळे पंचशील पाळणाऱ्या व भगवान बुद्धांच्या चीवराच्या भगव्या रंगाचा झेंडा मिरवणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांमध्ये आधुनिक पंचशील व आंबेडकरवादी निळे ध्वज डौलाने फडकू लागले. परिणामी पंढरपूरच्या वारीत घुसखोरी केलेला अशुद्ध ब्राह्मणी प्रवाह शुद्ध होऊ लागला. वारकरी देखील भीमगीते म्हणू लागले. एकाच समतावादी श्रमण परंपरेचे पाईक असलेले दोन समाजघटक एकमेकांना प्रेमाने उराउरी भेटू लागले,गळ्यात गळे घालू लागले.ब्राह्मणी खडकांत लुप्त झालेले मैत्री प्रेम आपुलकीचे निर्मळ झरे जिवंत होऊ लागले.
अर्थात,हे सगळे पाहून सैतानपुत्री ब्राह्मणी परंपरा बेचैन झाली,संतापली. समाजासमाजात ऐक्य निर्माण झाले तर “फोडा,झोडा व राज्य करा” हा मनुवाद जिवंत कसा राहणार? म्हणून मनुवादाने याविरोधात थयथयाट चालू केला आहे.वारीत समाजघातक तत्त्वे शिरली आहेत,अशी आवई उठवण्याचे प्रयत्न चालले आहेत.या आवईला उत्तर देण्यासाठी काही बहुजन सरसावले आहेत,ही आनंदाची गोष्ट आहे.
मराठी संत परंपरा ही मध्ययुगीन असली तरी शिवबांच्या महाराष्ट्राला अजिंठा – वेरुळ – भाजे – कार्ले अशा बौद्ध लेण्यांची किमान 2200 वर्षांची प्राचीन काळातील ऐतिहासिक परंपरा आहे. शिवरायांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी हे ऐतिहासिक स्थळ देखील लेण्यांनी गजबजलेले आहे.पंढरपूरची वारी आकाशातून एकाएकी पडत नसते, तिचा जन्म अशा श्रमण परंपरेत होत असतो ! सर्वजातीय संत- संतिणी यांचे कर्तृत्व पाहून बौद्ध भिक्खू – भिक्खूणी संघाची आठवण येते. या सर्वजातीय संत – संतिणी यांना शिरोधार्य मानणाऱ्या वारकऱ्यांची “वारी” ही श्रमण परंपरेचा भाग आहे.हे सत्य या सह्याद्रीने गर्जून गर्जून उभ्या देशाला सांगावे,यापेक्षा वेगळी अशी तुमची – माझी अपेक्षा ती काय असणार ?
शुद्धोदन आहेर-
(6 जुलै 2025, आषाढी एकादशी)