सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि बंधू राजसाहेब ठाकरे एकत्र येणे ही आनंदाची घटना आहे.

बातमी शेअर करा.

दोन धर्मात,दोन जातीत,दोन राजकीय पक्षात,दोन भावात,दोन बहिणी,अगदी पती पत्नीत,फूट पाडून स्वतःस विजय प्राप्त करणे,यात कोणते राजकारण आहे?.  “राजनीती” तर नाहीच.ही तर नीतीही नाही.तरीही असे भेदाभेद करून आपले हेतू साध्य करण्याचा हा अत्यंत वाईट राजकीय काळ आहे.हिदू विरुद्ध मुसलमान,भारत विरुद्ध पाकिस्तान,उच्चवर्णीय विरुद्ध मागास वर्गीय असे भेद निर्माण करून काही लोक आपला सर्व प्रकारचा फायदा पहात आहेत.एक मानवतावादी समाज,एक पुरोगामी महाराष्ट्र,आधुनिक भारत निर्माण करणे. हे आम्हा सर्वांचे ध्येय असू शकत नाही का?.सत्तेसाठी वाट्टेल ते करणे म्हणजे यशस्वी राजकारणी होणे आहे का? चोरांना कडी लावून पकडणे,किंवा ईडी लाऊन पकडणे ही न्यायोचित बाब आहे.आपली सत्ता,आपला पक्ष मजबुत करण्यासाठी दुसऱ्याच्या घराचे खांब चोरणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.या मनुवादी देशात संविधानाची,सामाजिक,आर्थिक समतेची मूल्ये रुजली नाहीत. तर केवळ  राजकीय यशाने देश प्रगतीपथावर नेता येणार नाही.असे राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.

   नैतिकता राहिली कुठे? फक्त निवडून या,कसेही या,मग निवडणुकीतील पंच म्हणजे निवडणूक आयोग गुंडाळून,ईव्हीएम मशीन हाय जॅक करून या.पण निवडून या.ही देशातली आजची गंभीर अनैतिकताच आहे.आपला समाज साधू संत,शिक्षक, समाजातील मोठी यशस्वी माणसे,लेखक साहित्यिक,कवी आणि राजकीय व्यक्ती यांच्याकडे जीवनाचे आदर्श म्हणूनही पाहतो.नैतिकतेचा विसर समाजाला पडतोय का? अशी भीती सामान्य माणसाला वाटू लागली आहे.पाशवी सत्ता लोकांची घरे,जमिनी,व्यवसाय,हक्क अधिकारी यांच्यासाठी लढणाऱ्या माझ्यासारख्या रस्त्यावरच्या छोट्या कार्यकर्त्यांचा पराभव करून सिडको, सेझ,अदानी अंबानी बिल्डर लॉबी यांना विजयी करते.तेव्हा तो आमचाच नाही लोकशाहीचा पराभव असतो.छुप्या हुकूमशाहीचा विजय असतो.या पार्श्वभूमीवर मा उद्धवजी ठाकरे आणि बंधू राज ठाकरे एकत्र येतात याचे काहीही अर्थ लोकांनी काढू द्या.परंतु दोन भाऊ एक होणे.हा महाराष्ट्राला बंधुतेचा आदर्शच आहे.तो राष्ट्रीय आदर्श आहे.कारण आपल्या संविधानाने देश एकसंघ ठेवण्यासाठी “बंधुता” हे जीवन मूल्य स्वीकारले आहे.

   एकवीरापुत्र आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी या मुंबईच्या सात बेटावरील सागरपुत्रांनी बंधुतेने प्रथम मुंबई जोडली होती.याच बंधुतेने महाराष्ट्र,भारत, आणि जगाला जोडले.म्हणूनच भारताचीच नाही तर समुद्र मार्गे श्रीलंका,इजिप्त, रोम,जपान हे देश सागरी व्यापारी मार्गाने जोडण्याचे ऐतिहासिक काम २००० वर्षापासून मूळ मातृसत्ताक मुंबईकरांनी केले आहे.त्यांच्या जाती धर्म पंथ विरहित प्रेमाने मुंबई “महामुंबई “होतेय.वरळीकर बांधवांच्या कोळीगीतांच्या,जागतिक कीर्तीच्या बँड ठेक्यावर ही एकी झाली.तीही वरळी मध्येच.यास मोठा सांस्कृतिक अर्थ आहे.आमच्याकडे मनुस्मृतीचे भटजी लोक मुहूर्त काढून जी लग्ने लावतात.ती सिडकोच्या घरा येवढीही टिकत नाहीत.कारण नवरा नवरीच्या मिळणाऱ्या दक्षिणे पलिकड भटजींना काही देणे घेणे नसते.आगरी कोळी शूद्र अतिशूद्र यांना हे कटू सत्य समजावे, म्हणून महात्मा जोतिबा फुले यांनी ब्राह्मण भटजींना पर्याय म्हणून सत्यशोधक विवाह पद्धत,पर्याय म्हणून देशाला दिली होती.म्हणूनच मांडवी कोळीवाड्यात आगरी कोळी भंडारी लोकांनी जोतीराव फुले यांना “महात्मा “ही पदवी दिली होती.

     समाज प्रबोधनासाठी जीवनभर संघर्ष करणारे विचारवंत केशव सीताराम ठाकरे हे महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रमाणेच विषमतेच्या विरोधातले धर्मचिकित्स्क महापुरुष होते. “ठाकरे ब्रँड” हा आधुनिक विचारांसाठी,अमोघ वक्तृत्वासाठी देशात प्रसिद्ध केला.प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे यांनी.आज संघटन कौशल्य आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तर वक्तृत्व हे राज ठाकरे यांच्याकडे आलेले आहे.हे दोन्ही गुण समाज देश यांच्या हितासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणूनच हे दोन भाऊ एक असणे हीच शिवसेना संघटना आहे.दोन भावात जेथे एकी नाही.तेथे सामान्य शिवसैनिक किंवा मनसैनिकांत एकी कशी येणार? अर्थात महाराष्ट्र एक होणार कसा?. मला आठवते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा लढाऊ विचार,जीवनाचा आदर्श मानून आगरी कोळी भंडारी ओबीसी बांधव शाखाप्रमुख,विभागप्रमुख म्हणून रस्त्यावरच्या राजकीय संघर्षात आपले हात,पाय आणि जीवही गमावून बसले होते.रायगड अलिबाग येथील माझ्या चिंचोटी गावातील माझे काका दिना पाटील( शिवसेना शाखाप्रमुख) असेच एका राजकीय वादात ठार झाले.अर्थात भोळ्या रांगड्या दिनकर नामदेव पाटील यांना महाराष्ट्राचे सरंजामी उच्चवर्णीय राजकारण माहित नव्हते.त्यांचा परिवार आणि आमचा चिंचोटी गाव,अलिबाग तालुका त्यांच्या जाण्याने अनाथ झाला.कारण ही व्यक्ती लोकांसाठी लढणारी होती.संघर्ष करणारी होती.ज्या दिवशी राज साहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे वेगळे झाले.तेव्हा मला प्रश्न पडला हे दोन भावांचे भांडण कशासाठी? सत्तेसाठी की लोकांनी घडविलेल्या शिवसेनेसाठी? ती काय वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे का? राजकीय पक्ष हे सामान्यांचे आहेत.निवडून आलेल्या लोकांचे किंवा पक्ष प्रमुखांचे असतील तर त्यासाठी लोकांनी का झिजावे?कशासाठी मरावे?.अनेकांच्या रक्तातून त्यागातून तयार झालेल्या शिवसेनेसाठी भावांमध्ये भांडण असेल ?.तर ती शिवसेना फक्त दोन ठाकरे भावांचीच का? शिवसेनेसाठी मेलेल्या आगरी,कोळी,भंडारी तरुण त्यांची अनाथ मुले मुली,विधवा पत्नी,आया, बहिणीसाठी नाही का?

  शिवसेनेने सत्ता येताच मनोहर जोशी (ब्राह्मण),नारायण राणे (मराठा), स्वतः उद्धवजी सीकेपी हे सारे उच्चजातीय मुख्यमंत्री का दिले? आजचे मंत्री गणेश नाईक (आगरी), अनंत तरे (कोळी) छगन भुजबळ (माळी) यातला एखादा ओबीसी एससी एसटी स्त्री मुख्यमंत्री का दिला नाही?.महाराष्ट्रातले सारे राजकीय पक्ष स्त्रीशुद्राती शूद्र यांच्या विरोधात आजहीअसतील?.तर फुले शाहू आंबेडकरांचा समतावादी महाराष्ट्र कुठे आहे?. कोणत्या राजकीय पक्षात आहे?. शिवसेनेच्या सत्ताकाळात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (मराठा )यांनी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले.हिंदुत्वाची ही क्षत्रिय मराठा आवृत्ती बेधडक रक्त सांडणाऱ्या तिखट आगरी कोळी तरुणांना समजली.जे हिंदुत्व इथल्या भूमिपुत्रांना मान सन्मान नाकारते.ते हिंदुत्व कितीही ज्वलंत असले तरीही नाकारायचे?.ही नवी चिकित्सक ओबीसी चळवळ उरण पनवेल मध्ये लोकनेते दि बा पाटील यांनी रुजविली.

   मराठा वसंत दादा पाटील यांच्या अत्याचारी गोळीबारा समोर पाच हुतात्मे आणि हजारो स्त्री पुरुषांच्या रक्ताच्या त्यागातून सिडको पुनर्वसन कायदा करून कमावली होती.म्हणूनच ते राष्ट्रीय नेते आहेत.शिवसेना फोडून गुजरात ते गुहावाटी असा प्रवास करून कुणीही राष्ट्रीय नेता होत नाही.शिवसेना प्रमुख त्यास गद्दारच म्हणाले असते. सत्तेसाठी उच्चवर्णीय नेते काहीही करतात.तर ओबीसी एससी एसटी यांना राजकीय गुलामी करावी लागते.मनुवादी सत्तेविरोधात बंड तर मागासवर्गीय नेतृत्वाने केले पाहिजे.उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत एक चांगली आठवण मी येथे सांगतो.लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नवी मुंबई विमानतळ आंदोलनात आगरी कोळी मुंबईच्या भूमिपुत्रांचे लाखोंचे मोर्चे ही सर्व पक्षीय लोकांसाठी डोकेदुखी होती.मा.उद्धवजी मुख्यमंत्री असताना शेवटच्या क्षणी सध्याचे शिवसेना उपनेते बबनदादा पाटील हे मला मातोश्रीवर घेऊन गेले.मी तेथे आगरी कोळी कराडी भंडारी यांच्या शिवसेना पक्षासाठी केलेल्या असीम त्यागाचे उदाहरण देऊन सागितले.आता आपण आपले वडील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मागे घेऊन,लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळास द्यावे.

  मी शिवसैनिक नसताना,आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतून खासदारकी लढलेला सामान्य आगरी कार्यकर्ता असताना.आम्हा सर्व जमलेल्या ओबीसी सागरपुत्रांची विनंती मान्य करून त्यांनी लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा ठराव घेतला.आता सत्ता भाजपची आहे राज्यात आणि केंद्रातही ते लोकसभा विधानसभा निवडणुका होऊनही नाव देत नाहीत.आम्ही आणखी किती मोठा संघर्ष करायचा? असाच प्रसंग मुंबईच्या आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी गावठाणाना सीमांकन करून जमीन मालकी हक्क मिळावा. अशी विनंती मनसेचे कोळी नेते जयेश आकरे (माहीम कोळीवाडा) यांच्या माध्यमातून आम्ही कृष्णकुंज येथे राजसाहेब ठाकरे यांना केली.त्यांनीही ती मान्य केली.हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे.कारण कोळीवाडे एस आर ये माध्यमातून बिल्डर लुटत आहेत.सायन कोळीवाडा तोडला आहे.मोठया प्रमाणात जमिनी आणि समुद्र खाजगी बिल्डर,महानगर पालिका, एसआरए अलीकडे धारावी उध्वस्त करणारा अदानी लुटतोय.हे थांबविण्यासाठी हे दोन भाऊ एक असणे आणि त्यांनी मूळच्या आगरी कोळी भंडारी भावांची कृतज्ञता जागी ठेवणे ही मुंबईच्या अस्तित्वासाठी मोठी गोष्ट आहे.मराठी माणसाच्या व्याख्येत मुंबईचे आगरी कोळी भंडारी येत नाहीत का?

  राम आणि भरताच्या बंधू प्रेमाची पौराणिक कथा सांगणाऱ्या भाजपाच्या दोन सख्ख्या बंधूनि गोळ्या झाडून मोठ्या भावाचा  प्रमोद महाजन या पंतप्रधान होऊ पाहणाऱ्या मराठी माणसाचा वरळीत खून पाडला.तेव्हा मला खूप दुःख झाले.राजकारण सोडा.बंधुतेचा आदर्श मोठा आहे.याच विकृतीमुळे शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष फोडले गेले.मी या विकृतीकडे केवळ राजकारण म्हणून पाहत नाही.जे सामान्य पक्ष कार्यकर्ते यांच्या त्यागाचा विचार न करता.केवळ निवडून आलेल्या लोकांना म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष मालकीने देताना. सर्व सामान्य कार्यकर्त्याचा न्यायावरील,मेहनत,कष्ट त्याग या जीवन मूल्यावरील विश्वास संपवण्याचे काम निवडणूक आयोग,न्यायव्यवस्था,लोकशाही  संस्था येथे होत असेल? तर ती अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे.डोळ्यांना,मानवी इंद्रियांना दिसणारे,अनुभवास उतरणारे सत्य नाकारले जाते.तेव्हा अस्तित्वहीन कल्पना लोकांच्या माथ्यावर मारल्या जातात.तोच आभासी देव,स्वर्ग,नर्क,चमत्कार,आत्मा वगैरे तत्वद्न्यान आहे.जे चार्वाक,बुद्ध,महावीर यांनी २५०० वर्षापूर्वी नाकारले आहे.

  भारतीय राजकारणाला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय करुणा या जीवन मूल्यांची साविधानिक परंपरा आहे.ती संपत असेल?.तर राजकारण कशासाठी?म्हणूनच मी शिवसैनिक नाही तरीही शिवसेनेच्या उभारणीत माझ्या चिंचोटी गावातल्या तरुणांचे रक्त  सांडले आहे.ती संघटना केवळ राजकीय पक्ष नाही.एक बंधुतेने जोडलेला परिवार आहे. कुटुंब आहे.आगरी कोळी भंडारी या छत्रपती शिवरायांच्या आरमारी ओबीसी तरुणाईचा विचार झाला नाही.तर हिंदुत्व किंवा मराठी भाषेच्या अस्मितेवर महाराष्ट्र आणि भारत एक ठेवणे अवघड आहे.हजारो वर्षे शोषित स्त्री शूद्र अतिशूद्र यांचे राजकीय प्रतिनिधित्व देणे.आता अटल झाले आहे.मंडल आयोगाच्या निर्मितीनंतर ८५टक्के मागास शूद्र अतिशूद्र भारत जागत आहे.महाराष्ट्र त्याला अपवाद नाही.समता,सामाजिक न्याय याशिवाय भारत एक बलदंड राष्ट्र कधीच होऊ शकत नाही.हाच छत्रपती शिवराय यांच्या रयतेचा स्वराज्याच्या सामाजिक रचनेचा संघटनेचा विचार आहे.तोच फुले शाहू आंबेडकर आणि लोकनेते दि बा पाटील यांचा विचार आहे.विषमता वादी हिंदुत्वाचा पराभव करून शेमजुर भूमिहीन ओबीसी एससी एसटी यांच्या न्याय बंधुतेचा विचार आहे.सन्माननीय उद्धवजी,राजसाहेब ठाकरे तुमच्या पक्षात नसलो तरी मी भावाप्रमाणे आपल्या सोबत आहे.आगरी कोळ्यांची बंधुता, निस्सिम प्रेम समजून घ्या.

नम्र विनंती आहे.

आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा.

एकमेकांची साथ कधीच सोडू नका.

राजाराम पाटील -८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *