हाडामासाचे शिक्षक महादेव बोरकर यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात २५/१/१९३९ ला आसोला येथे झाला.आसोला हे गाव अतिशय लहान.अवतीभवती कुठेही औद्योगिक वसाहती किंवा कारखानदारी नसल्याने कामासाठी प्रचंड भटकंती करावी लागायची. त्यातही त्यांची दलित म्हणूनच ओळख होती. एका दलित कुटुंबातून देशाच्या त्यावेळी जन्माला आलेल्या माणसांना काय काय सहन करावं लागायचं ते त्यांच्या तोंडून ऐकल्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही!. त्यांचे आई-वडील पडेल ते काम करायचे.महादेव बोरकर यांना शिक्षणाची खूप आवड होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली.ती परिस्थितीत बदलण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन आहे हे महादेव बोरकरांना कळून चुकलं. म्हणून काहीही झालं तरी शिक्षण घ्यायचं हा विचार त्यांनी पक्का केला.काही झालं तरी शिक्षण घ्यायचं आपलं आयुष्य शिक्षणाशिवाय बदलू शकत नाही हे कळल्यामुळेच त्यांनी आई-वडिलांना कामात मदत करून शिक्षण घेतलं.ते घेण्यासाठी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही फार मोठी साथ मिळाली.
महादेव बोरकर यांना भजन कीर्तनाचा भारी नाद असल्याने त्यांची तुकडोजी महाराजांशी भेट झाली. महाराजांनीही महादेव बोरकर यांची आवड लक्षात घेतली. आणि त्यांना शिक्षणासाठी मदत केली.महादेव बोरकर आणि त्यांचे कुटुंबीय तुकडोजींच्या विचारांनी प्रभावित झाले आहेत असं अनेकदा लक्षात येतं. महादेव बोरकर अशा प्रकारे सातव्या वर्गाची परीक्षा पास झालेत. त्यांना शिक्षकाची नोकरी नोकरी मिळाली.पण शिक्षक एवढ्याच साच्यात ते राहिले नाही.त्यांना भजन किर्तना सोबतच अभिनयातही आवड होती.ते चांगले मूर्तिकार ही होते. तसेच ते चांगले चित्रकारही होते. त्यांनी निर्माण केलेल्या अनेक मूर्ती आजही आहेत.घरी प्रचंड आर्थिक अडचण सहन केल्याने त्यांना पैशाचं मोल बऱ्यापैकी कळलं.पैसा कुठे आणि कसा वापरावा,खर्च करावा हे ते नेहमी सांगत असत.
संगतीचा परिणाम काय असतो हे महादेव बोरकरांकडून शिकण्यासारखं आहे.कारण ते राष्ट्रसंतांच्या सहवासात राहिले त्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि राहण्यात कायम जाणवला.त्यांना कुठलेही वाईट छंद, व्यसन वगैरे नव्हते.दारू वगैरे पासून ते नेहमीच अंतर राखून राहिले.तरी त्यांच्या अभिनयात जिवंत दारुड्या त्यांनी उभा केला.एकच प्याला मधील सुधाकर झाडीपट्टीतील अनेक प्रेक्षक रसिकांच्या लक्षात राहील असा महादेव बोरकर यांनी सहज आणि सुंदर अभिनयात साकार केला.त्यांच्या अनेक नाटकातील पात्र त्यांनी जिवंतपणे साकारले.ते आजरा मर केले.हे करताना त्यांनी त्यांच्या नोकरीत कोणतीही उणीव ठेवलेली नाही.ते कर्तव्यदक्ष शिक्षक होते.
आपल्या कामात हयगय कोणीही करू नये कारण आपल्याला त्यासाठीच महिन्याला पगार मिळतो म्हणून प्रत्येकाने आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.त्यांचा कामावर प्रगाड विश्वास होता.म्हणूनच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांनी अधिक लक्ष घातलं.फक्त सांगून जे जमलं नाही ते छडी हातात घेऊनही केलं. विद्यार्थ्यांना मारलं तसंच त्यांच्यावर प्रेमही केलं.विद्यार्थ्यांना वेळी अवेळी शैक्षणिक अडचणीत मदत केली.एक आदर्श शिक्षक म्हणून जे करायला पाहिजे ते सारं काही महादेव बोरकर यांनी केलं.त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत केली. नागपूर येथील मधुकर मेश्राम नावाचे त्यांचे एक विद्यार्थी सांगतात की माझा बीएडला नागपूर येथे नंबर लागला तेव्हा दर महिन्याला त्यांचं एक पत्र यायचं आणि आणि पत्रातून ते अभ्यास आणि अडचणी विषय विचारायचे.खास करून आर्थिक अडचण असल्यास कळव असे महादेव बोरकर आवर्जून लिहायचे.ते म्हणतात महादेव बोरकर यांनी माझ्या शैक्षणिक काळात मोलाची मदत केली.म्हणूनच मलाही शिक्षक होता आलं.बीएड पर्यंत सतत दर महिन्याला न चुकता लाखांदूर तालुक्यातील पारडी येथून पत्र लिहिणारा आदर्श शिक्षक मी पाहिला असं ते अगदी भावनिक होऊन सांगतात. अगदीच काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या शेजारील मुलाला पैसे देऊन स्पर्धा परीक्षेला पाठविले आणि तो बँकेत मॅनेजर झाला.
महादेव बोरकर एक व्यक्तीच नव्हते तर जिवंत भावाकुल माणुसकी जपणारे हाडामासाचे शिक्षक होते. दुसऱ्यांचे दुःख आपले माणून त्यातून मुक्त करण्यासाठी इतरांना सतत मदत करणारे परोपकारी व्यक्तिमत्व म्हणजे महादेव बोरकर.स्वतः भोगलेल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीची त्यांना अखेरपर्यंत जाणीव होती.म्हणूनच सतत दुसऱ्यांची विचारपूस करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांना चांगलं जमलं. बाबासाहेबांचा विचार ते नेहमीच सांगत असत,की स्वतःची परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.त्यांनी शिक्षणात मोलाची प्रगती केली.त्यांचं संपूर्ण कुटुंब आज नोकरीत रमलंय.पण प्रत्येकाने माणुसकी सांभाळली आहे.हे महादेव बोरकर यांच्या संस्कारातून मिळालं आहे. आज कुटुंबात चांगले संस्कार रुजले आहेत.पण हे विचार देणारा माणूस मात्र हरवला आहे. ११ / ९/२०२४ ला त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेत अथांग जन सागर उसळला तो जनसागर म्हणजे त्यांनी कमावलेली माणसं होती तीच त्यांच्या त्यांची संपत्ती होती….. त्यांना विनम्र अभिवादन…!
राजू बोरकर-७५०७०२५४६७. मु.पो.ता.लाखांदूर जिल्हा भंडारा