त्याग,संघर्ष आणि करुणेची मूर्ती माता रमाई यांना अभिवादन

बातमी शेअर करा.

लुंबिनी बुद्धविहार तपोवन परिसरात स्मृतीदिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

अमरावती – मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त २७ मे २०२६ रोजी लुंबिनी बुद्धविहार तपोवन परिसर येथे अत्यंत भावपूर्ण, प्रबोधनात्मक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.समाज परिवर्तनाच्या महान प्रवासात स्वतःचे संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण करत उपस्थितांनी कृतज्ञ अभिवादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला संघ यांच्या अध्यक्षा शिवकलाबाई गवई या विराजमान होत्या.प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.रेखा पर्वतकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणातून माता रमाई यांच्या जीवनसंघर्षाचा वेध घेतला. त्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील पाली आणि बुद्धिझम विभागाच्या समन्वयक तसेच तक्षशिला महाविद्यालय अमरावती पाली विभाग यांच्या विभागप्रमुख आहेत.डॉ.पर्वतकर म्हणाल्या की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्यामागे एक शांत,सहनशील आणि त्यागमयी शक्ती उभी होती, ती म्हणजे माता रमाई. दारिद्र्य, उपासमार,सामाजिक वेदना आणि असंख्य संकटे सहन करूनही त्यांनी बाबासाहेबांच्या ध्येयमार्गात कधी अडथळा येऊ दिला नाही.रमाई म्हणजे केवळ एका महान व्यक्तीची पत्नी नव्हे,तर समतेच्या संघर्षातील निःशब्द दीपस्तंभ होय.”
त्यांच्या भाषणाने सभागृहातील वातावरण भावनांनी दाटून आले.उपस्थित उपासक-उपासिकांनी माता रमाई यांच्या जीवनातील करुणा,संयम, संघर्ष आणि समर्पण यांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांनुसार जीवन जगण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना आणि माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. परिसरातील महिला,युवक,ज्येष्ठ उपासक आणि धम्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमात प्रबोधन,कृतज्ञता आणि सामाजिक जाणीवेचा संदेश अधोरेखित झाला.आजच्या भौतिकवादी आणि स्वार्थप्रधान युगात माता रमाई यांचे जीवन समाजाला संयम,त्याग आणि मानवतेची शिकवण देणारे दीपस्तंभ ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी समतामूलक,प्रज्ञावान आणि करुणामय समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला संघ व लुंबिनी बुद्धविहार तपोवन परिसर येथील धम्मप्रेमी उपासक-उपासिकांच्या वतीने करण्यात आले होते.

भंते सीलावांसालंकार ७५०७८९४२०३ अमरावती.यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *