“सिंहासनाला तेज नसते; त्यावर बसलेल्या व्यक्तीच्या चारित्र्यानेच ते तेजस्वी होते.”

देश स्वतंत्र झाला, संविधान मिळाले, लोकशाहीची स्थापना झाली, निवडणुका सुरू झाल्या, सरकारे बदलली, चेहरे बदलले, पक्ष बदलले; पण सामान्य माणसाच्या नशिबी आलेले प्रश्न मात्र फारसे बदलले नाहीत. भ्रष्टाचाराची वेल अधिक फोफावली, दलालशाही अधिक मजबूत झाली, लालफितशाहीचे जाळे अधिक घट्ट झाले आणि जनतेच्या आशा आकांक्षांचा बाजार मांडला गेला.प्रत्येक निवडणुकीत परिवर्तनाची भाषा बोलली जाते. सत्तेत येण्यापूर्वी क्रांतीच्या आरोळ्या दिल्या जातात. “भ्रष्टाचार संपवू”, “व्यवस्था बदलू”, “जनतेला न्याय देऊ” अशा घोषणा केल्या जातात. पण सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर अनेकांच्या भाषेचा सूर बदलतो. विरोधी पक्षात असताना जे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, तेच सत्तेत गेल्यावर गौण ठरतात.आणि मग प्रश्न पडतो.राजकीय लोकांनी बांगड्या भरल्या आहेत का?.जर एक तुकाराम मुंढे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला शिस्त लावू शकतो, भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कामाला लावू शकतो, नियमांची अंमलबजावणी करू शकतो, तर राज्याची संपूर्ण सत्ता हातात असलेल्या राजकीय नेत्यांना हे का जमू नये?की त्यांची इच्छाशक्तीच संपली आहे?की भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे नैतिक धैर्य त्यांनी गहाण ठेवले आहे?की खुर्ची वाचविण्यासाठी तत्त्वांना तिलांजली देणे हाच राजकारणाचा नवा धर्म झाला आहे?सत्तेचा बाजार आणि लोकशाहीचा लिलाव आज अनेक ठिकाणी राजकारण हे विचारांचे व्यासपीठ राहिलेले नाही; ते व्यवहारांचे बाजारपेठ बनले आहे.एकेकाळी राजकारणात त्याग होता, विचार होते, तत्त्वे होती, संघर्ष होता. आज अनेक ठिकाणी राजकारणात गटबाजी आहे, संधीसाधूपणा आहे, पैशाचे साम्राज्य आहे आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे.ज्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच सत्तेसाठी गळाभेट घेताना दिसतात. जनतेसमोर शत्रुत्वाचे नाटक आणि सत्तेच्या दालनात मैत्रीचे व्यवहार, हा लोकशाहीचा शोकांत विनोद ठरत आहे.
लोकशाहीचा उत्सव आता अनेक ठिकाणी पैशांचा उत्सव बनू लागला आहे.प्रामाणिक अधिकारी नकोत, मर्जीतील अधिकारी हवेत!व्यवस्थेतील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती असेल तर ती म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना बदली!.जो अधिकारी नियमांचे पालन करतो, त्याला त्रास दिला जातो. जो भ्रष्टाचाराला विरोध करतो, त्याच्या पंखात कात्री लावली जाते. जो जनतेच्या हितासाठी काम करतो, त्याला राजकीय रोषाला सामोरे जावे लागते.प्रश्न असा आहे.प्रामाणिक अधिकारी सत्ताधाऱ्यांना इतके खटकतात का?भ्रष्टाचाराविरुद्ध उभा राहणारा अधिकारी हा शत्रू का मानला जातो?कारण एक प्रामाणिक अधिकारी हा भ्रष्ट व्यवस्थेच्या काळोखात पेटलेला दिवा असतो आणि अंधाराला प्रकाशाचीच भीती असते.छत्रपतींचे स्वराज्य आणि आजचे सत्ताराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता ही प्रजेच्या सुखासाठी आहे, हा आदर्श घालून दिला.महात्मा फुलेंनी समाजजागृती केली.राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची मशाल पेटवली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला संविधानाचा पाया दिला.पण आज त्यांच्या विचारांची मिरवणूक निघते; विचारांचे पालन मात्र क्वचितच दिसते.महापुरुषांचे फोटो भिंतींवर आहेत; पण त्यांचे विचार राजकारणातून हरवत चालले आहेत.भाषणांचा पाऊस, कृतीचा दुष्काळ.आज देशात भाषणांची कमतरता नाही.घोषणांची कमतरता नाही.जाहिरातींची कमतरता नाही.पोस्टरबाजी कमतरता नाही.कमतरता आहे ती फक्त इच्छाशक्तीची!कारण विकास फलकांवर होत नाही.विकास जाहिरातींमध्ये होत नाही.विकास भाषणांतून होत नाही.विकास घडतो तो प्रामाणिक प्रशासनातून, पारदर्शक कारभारातून आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेतून.जनताही तितकीच जबाबदार फक्त राजकारण्यांनाच दोष देऊन चालणार नाही.कारण जशी जनता, तसे राज्यकर्ते!जात, धर्म, पैसा, प्रलोभने, दारू आणि खोट्या आश्वासनांच्या आधारावर मतदान करणारा समाज जर चारित्र्यवान नेतृत्वाची अपेक्षा करत असेल, तर तो स्वतःचीच फसवणूक करत असतो.
लोकशाही म्हणजे पाच वर्षांतून एकदा मतदान करणे एवढेच नाही.लोकशाही म्हणजे सत्तेला प्रश्न विचारणे.लोकशाही म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे.लोकशाही म्हणजे व्यक्तिपूजेपेक्षा तत्त्वपूजा करणे. लोकशाही म्हणजे जागृत नागरिकत्व! देशाला शेकडो तुकाराम मुंढे हवेत.आज देशाला केवळ राजकीय योद्धे नकोत; तर चारित्र्यवान योद्धे हवेत. देशाला घोषणा करणारे नेते नकोत; तर निर्णय घेणारे नेतृत्व हवे आहे.देशाला तडजोडी करणारे सत्ताधारी नकोत; तर भ्रष्टाचाराशी दोन हात करणारे धैर्यवान लोक हवे आहेत.कारण राष्ट्रे घोषणांनी उभी राहत नाहीत.राष्ट्रे महान होतात ती त्यागाने,प्रामाणिकपणाने,निडरतेने आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेने!आज जर एक तुकाराम मुंढे व्यवस्था हलवू शकतो,तर जागृत जनता संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच हादरा देऊ शकते.कारण क्रांती तलवारीत नसते, ती विचारात असते.सत्ता खुर्चीत नसते, ती चारित्र्यात असते.आणि इतिहास हा राजवाड्यांची नोंद ठेवत नाही; तो जनतेसाठी झटणाऱ्या माणसांच्या त्यागाची नोंद ठेवतो.म्हणूनच राजकीय लोकांनी बांगड्या भरल्या आहेत का, हा प्रश्न जनतेने विचारण्याची वेळ आता आली आहे.आणि त्या प्रश्नाचे उत्तर जर सत्ताधाऱ्यांकडे नसेल, तर लोकशाहीतील अंतिम न्यायाधीश असलेली जनतेने उत्तर मतदानपेटीतून नक्कीच द्यावे ही नम्र विनंती.
गजानन कुसुम ओंकार हरणे-मो. ९८२२९४२६२३.जिल्हा परिषद नगर, खडकी, अकोला.
लेखक | साहित्यिक | समाजसेवक | समाजसुधारक | कवी | वक्ते | विश्लेषक | प्रबोधनकार | आंदोलक | प्रचारक | वारकरी | योगशिक्षक | गुरुदेवभक्त

