
नवी मुंबई विमानतळास ओबीसी नेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे.ही मागणी घेऊन कोकणातले आगरी कोळी कराडी बौद्ध बांधव आंदोलन करीत आहेत.अर्थात त्यात बारा बलुतेदार एससी एसटी बांधव सोबत आहेत.मुंबई ठाणे रायगड पालघर येथे मोठ्या प्रमाणात ओबीसी सागरपुत्र बंधू भगिनी राहतात.स्वातंत्र्या नंतर एखाद्या नेत्यावर एवढे प्रेम किंवा त्यांच्या नावाची अशी मोठी मागणी पुढे आली नव्हती.हिंदू अध्यात्म, राजकारण,अर्थकारण यातून स्वतःस विसर्जित ,समर्पित करून उच्चवर्णीय वैदिक हिंदुत्व वैभवाला नेणारे ओबीसी लोक आहेत. त्यात ते शिवसेनेचे हिंदुत्व असो किंवा भाजपाचे. त्यात मिसळून गेलेला हा ओबीसी समाज पूर्वी होता.आज आहे.आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री म्हणून सिडको मध्ये एकतर्फी ठराव घेतला. मुंबई विमानतळास शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे.अर्थात हिंदुत्ववादी आगरी कोळी कराडी यास कशाला विरोध करतील? असे अनेक राजकारणी लोकांना वाटले.परंतु लोकांनी हिंदुत्व झिडकारले.सिडकोच्या अत्याचारात भूमिपुत्रांनी अन्याय सहन करू नये.अशा आशयाची प्रबोधनपर भाषणे करणारे नेते दि बा पाटील होते.त्यांच्या खऱ्या खुऱ्या विचारांचे लिखित पुरावे फार कमी आहेत.जे आहेत ते छापून प्रसिद्ध करावेत.अशी इच्छा असणारे लेखक, पत्रकार दुर्मिळ आहेत. ज्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार पुस्तके,लेख,भाषणे लिहून आजच्या पिढीसाठी वैचारिक वारसा म्हणून जपून ठेवले.तशी चळवळ ओबीसी समाजात निर्माण झाली नाही.

त्यामुळे आज दि बा पाटील यांनी आपल्या जासई उरण पनवेल गावात महात्मा जोतिबा फुले,सावित्री माई फुले,राजर्षी शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बांधले.याचा अर्थ कुणी सांगत नाही.फुले शाहू आंबेडकर विचार हा वैदिक हिंदुत्वाच्या विरोधी विचार आहे.किंबहुना संविधान समता विरुद्ध मनुस्मृतीची विषमता असा हा वैचारिक भेद. समोर आणण्याचे धाडस ओबीसी समाजात कुणी करत नाही.हे मात्र सत्य आहे .दि बा पाटील यांनी कधीच लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर,डॉ हेडगेवार यांचे पुतळे किंवा प्रतिमा आपल्या आजुबाजूला कधीच लावल्या नाहीत.
नव्या आगरी कोळी ओबीसी तरुणांना हिंदुत्व समजते.परंतु फुले शाहू आंबेडकरी विचार समजत नाहीत.त्यामुळे आज दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास हवे.या मागणी मागे विचार.हिंदू विषमतेचा? की सामाजिक न्यायाचा? याची कोणतीच चर्चा या नामकरण आंदोलनात दिसत नाही.दि बा पाटील हे सिडको विरोधी लढ्यातून आगरी कोळी कराडी शेतकऱ्यांना साडे बारा टक्के पुनर्वसित सिडको भूखंड, सरकारी नोकऱ्या,वाढीव भाव देऊन विकास कामात वाटा देऊन, नवे उद्योजक निर्माण करणारे नेते .असा अल्प परिचय कोकणात आहे.परंतु ते दोन वेळा खासदार,पाच वेळा आमदार,महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते असा राष्ट्रीय राजकीय प्रवास करणारे नेते असले. तरीही ते ओबीसी विचारवंत ,मंडल आयोगाचे नेतृत्व करून देशात मोठे परिवर्तन करून आणणारे नेते होते.राष्ट्रीय पातळीवर प्रवास करून देशातील ओबीसींना आणि महाराष्ट्रातील ओबीसींना त्यांनी संघटित करून मोठा दबदबा राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी निर्माण केला होता.ते हिंदू.धर्म चिकित्सक होते.केवळ खूप पैसे आहेत म्हणून ,असे कार्य कुणाला शक्य नसते. हे आज सिद्ध झालेले सत्य आहे.

दि बा पाटील यांना कोकणातील खोत सावकार यांच्या विरोधी लढ्याचा वैचारिक वारसा आहे.कोकणातील आगरी ,कोळी, कराडी ,कुणबी ,भंडारी या शूद्र ओबीसी भूमिहीन शेतकऱ्यांना जागे करण्याचे कठीण काम डॉ बाबासाहेब आबेडकर,आगरी नेते नारायण नागू पाटील यांनी केले होते.अगोदरच भंडारी नेते सी के बोले यांनी या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केली होती.शूद्र ओबीसी कुळ कायद्याची लढाई हिंदू धर्मातील शक्तिशाली जमीनदार सावकार जातीतील ब्राह्मण मराठा वैश्य जातीतील उच्चवर्णीय लोकांसोबत होती.हिंदू धर्माने पूजनीय ठरविलेल्या या मनुस्मृतीच्या समर्थकाविषयी बोलणे, लिहिणे ,पूर्वी अशक्य होते.आजही अवघड आहे.मी फेसबुक वर याचा अत्यंत कटू अनुभव घेत आहे.या छोट्याशा लेखात अख्खे पुस्तक छापता येत नाही.परंतु आजच्या विषमतावादी हिंदुत्वाची प्रथम चिकित्सा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आगरी कोळी भंडारी कराडी कुणबी यांच्यासाठी केली होती.आज विषमता म्हणजे काय ?असा प्रश्न एखाद्या आगरी कोळी तरुणास केला.तर त्यास उत्तर देणे कठीण आहे.परंतु वैदिक हिंदुत्व किंवा मनुस्मृती यातून त्यांच्या मागच्या पिढ्यावर ब्राह्मण मराठा जमीनदार यांच्या शेतात गुलाम म्हणून राबविणारी ही विचारसरणी होती.
कुळ कायद्याने ओबीसी शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या म्हणजे दैवी चमत्कार नव्हता.त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.याच काळात कोकणातल्या शूद्र अतिशूद्र यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळे आंदोलन .पाणी हक्क मिळविला तोही माणुसकीचे कट्टर शत्रू हेच आजचे हिंदू ब्राह्मण मराठा वैश्य जमीनदार यांच्या कडून.चिरनेर जंगल हक्कांसाठी प्राण देणारे इथले आगरी, न्हावी, आदिवासी, कातकरी, कराडी ,कोळी होते .त्यांच्या कोर्ट केसेस डॉ.बाबासाहेब आंबेडकरच लढले.कुणी हिंदुत्ववादी नव्हता.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेम ज्या दिवशी ओबीसींना कळेल ? त्या दिवशी क्रांती घडेल.स्वातंत्र्यानंतर पूर्वीचे पेशवे कालीन सावकार ब्राह्मण मराठा पुन्हा सिडको ,सेझ प्रकल्पाच्या आडून सरकारी भूसंपादनातून बंदुका घेऊन आले.वसंत दादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्याने जासई रायगड येथे आमचे पाच शेतकरी मारून जबरदस्तीने जमिनी घेतल्या.शेतकऱ्यांना वाचवायला कुणी देव आले नाहीत. वैचारिक पातळीवर दि बा पाटील यांनी देव नाकारला होता.यामुळे पुढे दि बा पाटील यांच्या मृत्यूनंतर दैनिक लोकमतने बातमी छापली.”देव नाकारणारा देव माणूस गेला”.एका ओळीत दि बा पाटील यांचे वैचारिक चरित्र लोकमतने छापले. वाचायची क्षमता असलेले आगरी कोळी कराडी ओबीसी तरुण आज दिसत नाहीत.
बुद्ध,चार्वाक यांना मानणारे दि बा पाटील महाराष्ट्रातील विचारवंतांना माहिती आहेत.त्यांनी पुढे येऊन ही गोष्ट आजच्या वाईट काळात देशाला समजावली पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज यांना आदर्श मानणाऱ्या कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे.विषमतेच्या हिंदुत्ववादी बजबजपुरीत, त्यात रामाच्या मंदिरात चोरी करणारेच ,”जय श्रीराम” म्हणून परकीय आक्रमकां सारखाच आपलाच देश लुटत असतील? तर खरे देशप्रेमी कोण ?हे नव्या पिढीला सांगावे लागेल.ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांच्या जमीन हक्कांचे लढे चालविणारे दि बा पाटील हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा साविधानिक राष्ट्रवाद घेऊन निघाले होते.तो आजच्या लुटारू शोषक हिंदुत्वादास खरे उत्तर होते.त्यांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनास, सर्व स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांचा पाठिंबा मिळावा .ही नम्र विनंती मी करीत आहे.
राजाराम पाटील– ८२८६०४१४६३.उरण रायगड.

