
काल परवा जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या…
एका पडक्या,जीर्ण झालेल्या शाळेसमोरून जात होतो. तेवढ्यात शहरातून नव्या कोऱ्या चारचाकीतून,टापटीप सुटाबुटात गुरुजी आले.ते दृश्य पाहिलं आणि मन अस्वस्थ झालं.सहजपणे वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची आठवण झाली. तेव्हा गुरुजीही गरीब होते आणि शाळाही गरीब होती. पगार कमी असल्यामुळे गुरुजी गावातच राहायचे. गावाच्या प्रत्येक घराशी त्यांचं नातं होतं. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांशी संवाद होता.मुलगा शाळेत आला नाही तर गुरुजी थेट घरी जायचे.त्या कौलारू,मातीच्या भिंती असलेल्या शाळांनी या देशाला आयएएस दिले,डॉक्टर दिले,अभियंते दिले,सैनिक दिले,शास्त्रज्ञ दिले,उद्योगपती दिले.त्या शाळांनी देश घडवला.त्या काळी घरात बापाचा जितका दरारा होता, तितकाच गुरुजींचाही होता. काही ठिकाणी तर देवापेक्षाही गुरुजींचा मान मोठा होता.
मग काळ बदलला…
गुरुजींचे दिवस पालटले. मोठे पगार झाले. शहरात घरे झाली. गाड्या आल्या. सुखसोयी आल्या. हे सगळं योग्यच आहे, त्याचा आनंदच आहे.पण एक प्रश्न मनाला सतावत राहतो.गुरुजींचं दारिद्र्य संपलं.मग शाळेचं दारिद्र्य का संपलं नाही?. शाळेचं छप्पर अजूनही गळतंय.भिंती अजूनही पडतायत.पटसंख्या कमी होत चालली आहे. आणि तब्बल १७ हजार जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद पडल्या.ही केवळ शाळा बंद झाली नाहीत.ही गरीबांच्या स्वप्नांची दारं बंद झाली.ही हजारो गावांच्या भविष्याची हत्या झाली.ही लाखो मुलांच्या संधींची गळचेपी झाली.आज परिस्थिती इतकी दयनीय झाली आहे की शाळेला फुगे लावून, रॅली काढून, गुलाबाचं फूल देऊन पालकांना विनंती करावी लागते.”कृपया आपल्या मुलाला आमच्या जि प शाळेत प्रवेश द्या.” गरीब बाप आजही कर्ज काढून मुलाला खाजगी शाळेत पाठवतो. कारण त्याला विश्वास राहिलेला नाही. त्याला वाटतं, “मी गरीब आहे, पण माझं मूल तरी गरीब राहू नये.” ही वेळ का आली?. फक्त सरकार जबाबदार आहे का?
माझा प्रश्न माझ्या सर्व शिक्षक मित्रांना आहे.सरकारची वाट किती दिवस पाहणार?. तुमच्या पगारातील एक टक्का रक्कम वर्षातून एकदा आपल्या शाळेसाठी खर्च केली तर काय बिघडेल?. गावातील माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणा. गावातून वर्गणी गोळा करा.शाळेच्या रंगरंगोटीपासून ग्रंथालयापर्यंत एखादा उपक्रम स्वतः उभा करा.निवृत्त शिक्षकांनाही माझी नम्र विनंती.तुम्ही प्रथम भारतीय बना. भारत माझ्या देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत हे अंमलात आणा. विद्यार्थाची जात धर्म विसरणारे गुरुजी नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत. म्हणूनच गुरुजीनी घरी बसून वेळ घालवण्यापेक्षा आठवड्यातून एक-दोन दिवस आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेत जा. दोन तास मुलांना शिकवा. तुमचा अनुभव ही त्या मुलांची मोठी संपत्ती आहे.लक्षात ठेवा.तुमची ओळख, तुमचा सन्मान,तुमचा पगार,तुमचं घर,तुमची गाडी.या सगळ्याचा पाया त्या जिल्हा परिषद शाळेनेच घातला आहे.आज त्या शाळेला तुमची गरज आहे.सरकार बदलतील.धोरण बदलतील.अधिकारी बदलतील.पण गावातील शाळा वाचवायची असेल, तर शिक्षकांनी पुन्हा एकदा फक्त “नोकरी करणारे कर्मचारी” न राहता “गुरुजी” व्हावं लागेल. कारण.शाळा वाचली तर गाव वाचेल.गाव वाचलं तर समाज वाचेल.आणि समाज वाचला तरच देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल राहील.ही सर्वच विद्यार्थी गुरुजी आणि पालकानंची जबाबदारी आहे.विदर्भातील अनेक मित्र जिल्हा परिषद शाळा बंद होतात. त्या विरोधात गावागावात जन जागृती करीत आहेत. आपण शहरात राहत असला तरी गावातील जिल्हा परिषदची शाळा विसरू नका. तिथेच तुम्ही प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे गेला आहात. आज शहरात सुरक्षित नोकरी करत असला तरी उद्याचे भविष्य तुमच्या हाती असणार आहे.हे प्रत्येकांनी लक्षात ठेवावे.
जय संविधान, जय भारत, जय भिम.
संकलन :- सागर रामभाऊ तायडे -9920403859,भांडुप,मुंबई.

