माणसाचे जीवन आणि जगण्यासाठी संघर्ष एक वैचारिक लेखसंग्रह.

बातमी शेअर करा.

अविनाश टिपले हे नाव जे वाचक आहेत त्यांना नक्कीच परिचित आहे.महाराष्ट्रातील अनेक दैनिकांमधून ते सतत लिहीत असतात.चंद्रपूर हे शहर कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की,कोळशाच्या खाणीत हिरा जन्माला येतो.या अर्थाने अविनाश टिपले या खाणीतील एक हिरा आहेत.या हिऱ्याला त्याची स्वतःची चमक आहे. त्याची स्वतःची ओळख आहे.कवी लेखक आणि वक्ता म्हणूनही ते ओळखले जातात.अनेक दैनिकातील वेगवेगळ्या विषयावरील त्यांचे लेख ,” माणसांचे जीवन आणि जगण्यासाठी संघर्ष ” या शीर्षकात पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहेत.लेखक कवी म्हणून जी दृष्टी असावी लागते ती अविनाश टिपले यांच्याकडे आहे.असं लेख संग्रह वाचताना क्षणोक्षणी जाणवतं.एखाद साहित्य जन्माला येण्यासाठी काय असावं लागतं? या प्रश्नाचं उत्तर देतांना मला वाटतं,माणसाकडे संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे हे संवेदनशील मन आहे तो आपल्या लेखणीत सारा घटनाक्रम लेखणीबद्ध करू शकतो.लेखक कवी किंवा एकूणच साहित्यिक होण्यासाठी त्याने जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं. खूप वाचावं लागतं. अगदी पु.ल.देशपांडेंच्या शब्दात सांगायचं झालं तर दैनिकातील ‘हम दो हमारे दो’ एवढी छोटी जाहिरात असेल ती ही वाचावी लागते.आणि ते खरं आहे. समजा कुटुंब नियोजनाचं महत्त्व,छोट्या कुटुंबाचं महत्त्व सांगायचं असेल तर, ‘हम दो हमारे दो’  ही छोटी जाहिरात ही बरंच काही सांगून जाते. एकूण काय तर समाजातील विसंगती,विकृती आणि कृती ज्याला अलगद टिपता येतात तो साहित्यिक लेखक आणि कवी असतो. 

     अविनाश टिपलेंनी “माणसाचे जीवन आणि जगण्याचा संघर्ष” हे अनेक लेख असलेले पुस्तक प्रकाशित केलं.पुस्तकात एकूण 23 लेखांचा समावेश आहे.त्यातील प्रत्येक लेख वेगवेगळ्या विषयावर आहे .आणि प्रत्येक विषयाला त्यांच्या लेखणीतून त्यांनी न्याय दिला आहे. एक संवेदनशील माणूस म्हणून आणि साहित्यिक म्हणून ते यशस्वी झालेतअसं मला वाटतं.लेखक अविनाश टिपले यांनी प्रेम या अतिशय कोमल भावनेला स्पर्श केला. प्रेमातील जात,धर्म,गरीब, श्रीमंत अशा भेदभावातून होणाऱ्या हत्या,आत्महत्या यावर छान लेखन केलं. प्रत्येक मुलांनी आणि आई-वडिलांनी अगदी शांत डोकं ठेवून विचार करावा असाच संदेश त्यातून जातो.याशिवाय पाणी, निसर्ग पती-पत्नीतील संबंध ,नाती ,प्राणी प्रेम, विश्वास, सुख,दुःख अशा अनेक संकल्पनां त्यांनी वेगवेगळ्या लेखातून विस्तारल्या आहेत. “माणसाचे जीवन आणि जगण्यासाठी संघर्ष” हे पुस्तक अनेक समस्या,सुख,दुःख आणि मानवी मनाच्या भावनांचे, स्वभावांचे प्रतिनिधित्व करते. खरे तर ज्याला आरंभ आहे त्याला अंत आहे.हाच निसर्ग नियम आहे. पण आरंभ आणि अंत यातील जी पोकळी आहे ती पोकळी म्हणजे जीवन आहे. जन्मापासूनच माणसाच्या आयुष्याला संघर्ष लागलेला असतो.सुख,दुःख चांगले,वाईट.हे असे अनेक शब्द या जीवा जीवनप्रवाहात,प्रवासात माणसाचे नातेवाईक असतात.जीवनप्रवास नेहमी सुखकर असतोच असे नाही.त्या प्रवासात अनेक खाच खडगे,चढ उतार असतात.वाटा नेहमीच सरळ नसतात.त्यामुळे वळणदार वाटांनी ही प्रवास करावा लागतो.त्याचीही सवय करून घ्यावी लागते.अशा वाटाही चालाव्या लागतात.म्हणजे नेहमी सुख आपल्या सोबत नसतं तेव्हा दुःखालाही मित्र म्हणून त्याच्या सोबतीने जगावं लागतं.आणि हे जगणं प्रत्येकाच्या वाट्याला येतं.यातून बाहेर पडण्यासाठी जी धडपड असते ती सुखाकडे घेऊन जाण्यासाठी असते.साहित्यिक त्यांची,कविता,कादंबरी नाटक,लेख …अशा अनेक साहित्यकृतीतून जन्माला घालतो.अशा लेखनातून तो समाजाची जडणघडण करीत असतो.त्याच्या लेखणीतून प्रतिकूल परिस्थितीत तो जगण्याचे बळ देतो.

     एक नाटककार नाटकात चांगलं आणि वाईट याचं मिश्रण ठेवतो.त्यात नायक आणि नालायक,खलनायक असे मध्यवर्ती पात्र असतात.नायक म्हणजे चांगला आणि खलनायक म्हणजे वाईट असा सरळ अर्थ घेतला तर नाटकाच्या शेवटी नायकाचा विजय होतो. आणि खलनायकाचा पराभव होतो. म्हणजे चांगल्याचा विजय होतो आणि वाईटाचा पराभव होतो.लेखक समाजाच्या जडणघडणीत या कारणाने महत्त्वाची भूमिका बजावतो.तो समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लिहितो.तो धर्मवाद,जातीवाद संपवून माणूस म्हणून जगण्यास शिकविण्यासाठी लिहितो.तो माणसातील वाईट विचार मारण्यासाठी लिहितो.माणूस म्हणून दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवण्यासाठी लिहितो .त्याला राग,द्वेष समाजातून हद्दपार करायचा असतो.त्यासाठीच लेखणी झीजवतो.तो अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी लिहितो.तो चांगलं आणि वाईट यांची वर्गवारी करायला शिकविण्यासाठी लिहितो. एकूणच साहित्यिक डोळसपणा देतो. तो अंधारातून उजेड्याकडे जाण्याचा मार्ग त्याच्या शब्दातून दाखवतो.लेखक अविनाश टिपले यांनी,”माणसाचे जीवन आणि जगण्यासाठी संघर्ष” हा विविध विषयावरील लेख संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित केला. साहित्यिकांसाठी जी काही आवश्यक सामग्री असावी लागते ती अविनाश टिपले यांच्याकडे पाहायला मिळते. त्यांच्या अनेक लेखांमधून त्यांच्या विचारांचं दर्शन होतं. पुस्तकात एकूण 23 लेखांचा समावेश आहे.  पुस्तकाला शत्रुघ्न लोणारे साहित्यिक तथा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी महाराष्ट्र शासन यांची प्रस्तावना आहे हा लेखसंग्रह संग्रह करून ठेवण्यासारखा आहे.लेखक, कवि टिपले यांना तसेच या लेखसंग्रहाला अनंत शुभेच्छा.

 “माणसाचे जीवन आणि जगण्यासाठी संघर्ष” लेखक : अविनाश टिपले संपर्क: ९९७०९१७३८९,रेणुका प्रकाशन बजाज नगर नागपूर,एकूण पृष्ठ: १११राजू बोरकर ७५०७०२५४६७मु.पो.ता.लाखांदूर,जिल्हा भंडारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *