मार्ग काढायचाच असल्यास…

बातमी शेअर करा.

वैवाहिक जीवनाला बाधा निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. पण त्यावर इलाज नाही असे अजिबात नाही. जिथे अडचण आहे तिथे त्यावर मार्गही असतो. मात्र तो शोधून काढण्याची सकारात्मक मानसिकता असली पाहिजे. या जगात परिपूर्ण असे काहीच नसते. त्यामुळे कोणतेही जोडपे त्याला कुणीही कितीही ‘लक्ष्मी-नारायणा’ची वगैरे उपमा देऊ द्या, त्यांच्यात कधी ना कधी मतभेद, वादविवाद, भांडण झालेले असतेच असते. कुणी ते कबूल करते किंवा कुणी ते दडपून मनाच्या अडगळीत टाकून देते. शहाणपण याच्यात आहे की जुळवून घेता आले पाहिजे.

  अलिकडे मी अनेक लेख, उतारे, अहवाल वाचतो, बातम्या पाहतो, लोकांच्या चर्चेतून ऐकतो ते बऱ्याचदा वेदना देणारे, मनस्ताप वाढवणारे, चिंताग्रस्त करणारे असते. मी पावसाच्या विलंबाबद्दल किंवा गॅसटंचाई, महागाई, युक्रेन-रशिया लांबलेले युध्द, अमेरिका-इराण-इस्त्रायल यांच्या तिढ्यामुळे होर्मुझमध्ये झालेली काेंडी व तिचे दुष्परिणाम याविषयी सांगत नाही. त्याची झळ लागायला वेळ लागतो. त्यावर मार्ग निघतो. ..आणि सारे पूर्वपदावर येऊ शकते. माझ्यासमोर वैवाहिक संबंध, त्यांच्यात येत चाललेला कडवटपणा, त्या संबंधांना एकतर्फी किंवा दुतर्फी संपवण्याच्या घोषणा, विवाहविच्छेद, त्या त्या जोडप्याच्या अशा चमत्कारिक निर्णयामुळे त्यांच्या मुलांचे होणारे हाल, त्यामुळे बदलणाऱ्या सामाजिक नजरा, यातून मग काही मुला-मुलींनी एकटे राहण्याचा घेतलेला निर्णय, त्यानंतर पुढे त्यांच्या उतारवयात त्यांच्या देखभालीचे-सांभाळण्याचे निर्माण होणारे प्रश्न अशा विविध बाबींचा पट माझ्या नजरेपुढून सरकून जात आहे.

काही तथाकथित पुढारलेल्या देशात म्हणे मुले मोठी झाली की ती त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून जातात. आईवडीलांवर अवलंबून राहात नाहीत. त्यांचे जोडीदार निवडतात. (कुणाला निवडतात तेही म्हणे आईवडीलांना सांगत नाहीत!) इकडे त्यांचे (म्हणजे या तथाकथित पुढारलेल्या देशातल्या मुलामुलींचे!) आईवडीलही काही कमी नसतात. तेही आपापले जोडीदार कोणत्याही वयात बदलतात. ‘माझा नवरा तुझी बायको’ या व अशा चालीचे अनेक प्रकार होणे त्यांच्याकडे ‘नॉर्मल’ समजले जाते. हे आताच नव्हे तर तिकडे सुमारे पन्नास-पंच्याहत्तर वर्षांपूर्वीपासून सुरु झाले होते. विख्यात मूक चित्रपट अभिनेता चार्ली चॅप्लिन याने चार वेळा विवाह केला होता व या चार बायकांपासून त्याने अकरा मुले जन्माला घातली होती. त्यांच्याकडे म्हणे आपल्यासारखे अंत्यविधीला खूप लोकांची गर्दी होणे, घरात भरपूर रडारड होणे, खांद्यावर तिरडी घेऊन लांब असलेल्या स्मशानापर्यंत ‘जयराम श्रीराम, राम बोलो भाई राम बोलो’ घोषणा देत पायी जाणे, मग तिथे पुन्हा भाषणे, प्रेताच्या मुखात पाणी पाजणे, मग अग्निसंस्कार, त्यानंतर राख सावडणे, दशक्रिया, अस्थि विसर्जन, तेरावे विधी (दिवस कार्य), वर्षश्राध्द असली भानगड नसते. काही सन्माननीय अपवाद वगळता व्यक्ती मेली की स्थानिक स्वराज्य संस्थेला फोन केला जातो. ते शववाहिनी पाठवतात आणि बॉडी क्रिमेशनसाठी नेली जाते. विषय संपला. मग कुणी सवडीने ती बॉडी दफन केलेल्या जागेच्या थडग्यावर जाऊन फुले वगैरे अर्पण करतात. कदाचित आपण अजून तेवढे रुक्ष, व्यवहारी, कठोर बनलो नसू.

पण हे एकदम नाही.. पण हळूहळू आपल्याकडेही सरकत आहे की काय, याची साधार भिती वाटते. किशोरकुमार या विख्यात गायकाने चार्ली चॅप्लिनला ‘फॉलो’ केले होते की काय मला माहित नाही. पण किशोरकुमारची लग्नाची पहिली बायको रुमा घोष. (तिच्यापासून झालेला मुलगा अमितकुमार). त्यानंतर त्याने मधुबालाशी विवाह केला. तिला कॅन्सर झाल्यावर तिची सेवा करता येत नव्हती म्हणून तिला त्याने तिच्या माहेरी पाठवली म्हणे! तिच्या निधनानंतर त्याने योगिता बालीसोबत तिसरा विवाह केला. तोही फारकाळ टिकला नाही. त्याने चौथा विवाह लीना चंदावरकर सोबत केला. त्यानंतर मात्र दुदैवाने किशोरकुमारलाही फारसे आयुष्य लाभले नाही. या चौथ्या विवाहानंतर केवळ सातच वर्षांनी किशोरकुमारने या जगाचाच निरोप घ्ोतला. याही गोष्टीला आता त्रेचाळीस वर्षे होऊन गेली. वलयांकित, पैसेवाल्या लोकांच्या वर्तनाचे हे लोण हळुहळु..पण निश्चितपणे आता समाजाच्या अन्य थरांतही पसरु लागले आहे या समजाला पुष्टी देणाऱ्या घटना अवतीभवती घडताहेत. खरेतर विभिन्न सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीतून आलेल्या दोन भिन्नलिंगी व्यवतींचे आयुष्यभर एकमेकांशी जमेलच अशी अपेक्षा करणे तितकेसे योग्य नव्हे. पण सामाजिक दडपण, पारंपारिकता, घरातील थोरामोठ्यांचा दबाव, बहुवैवाहिकतेला मज्जाव, महिलेने पडती बाजू घेणे या व अशा अनेक कारणांमुळे अनेक जोडपी मनाविरुध्द एकमेकांसोबत आयुष्य कंठताना दिसत होती; यापुढे तशी दिसतीलच याची काही ग्यारंटी नाही. यावर हसत खेळत प्रकाश टाकणारे ‘आमने सामने’ हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर चांगली गर्दी खेचत आहे.

याला काय कारणे असावीत, याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला. अनेकांशी चर्चा केली, प्रश्न विचारुन उत्तरे मिळवली. तेंव्हा असे समजले की कोणतीही स्थिती कायम नसते. म्हणूनच वैवाहिक स्थैर्य-विवाह टिकून राहणे हेही आता कायमचे राहिले नाही. प्रसारमाध्यमे, प्रसिध्दीमाध्यमे, उच्चशिक्षण, सुधारलेली आर्थिक स्थिती, आम्ही दोघं आमची दोन (किंवा एकच!) या परिस्थितीमुळे घरात आता तसे ज्येष्ठ कुणी उरलेले नसणे, त्यामुळे आजोबा-आजी, मोठे काका-काकी यांचा दबाव, लक्ष नसणे, शेजारपाजाऱ्यांशी फारसे संबंध उरलेले नसणे, आई-वडीलच आपल्या काम-धंद्यामुळे दीर्घकाळ घरात नसणे अशा अनेक कारणांमुळे मुला-मुलींवर बंधन असे उरलेले नाही. त्यामुळे ती त्यांना हवे ते निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे, कुणाचाही आधार, मार्गदर्शन न मागता घेऊ लागली आहेत व त्यात प्रसंगी चूकूही लागली आहेत. आर्थिक स्वातंत्र्य हे या मागचे एक प्रमुख कारण असावे. आपण मतभेद दाखवले, नवऱ्याच्या मनासारखे वागलो नाही, त्याच्या घरच्यांच्या इशाऱ्यावर नाचलो नाही तर होऊन होऊन काय होईल? नवरा आपल्याला सोडुन देईल एवढेच ना, मग आपण कमावत्या असल्याने काही उपाशी मरणार नाही की बाप अथवा भावाच्या दारात जाऊन पुढचे आयुष्य काढायची वेळ येणार नाही हे हल्लीच्या मुलींना पक्के ठाऊक असल्याने संसार मोडण्याच्या निर्णयाप्रत येणाऱ्या अशा मुलींची संख्या वाढती आहे. अनेक ठिकाणी मी पाहिले आहे की ‘रांधा, वाढा, खरकटी काढा’ हा प्रकारच आम्हाला नको आणि सासरच्यांच्या इशाऱ्यावर डोलणे आम्हाला आवडणारच नाही हा विचार करुन अनेक मुली अविवाहित राहणे पसंद करताहेत. तर दुसरीकडे मुलग्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास काही मुलगे ‘मम्माज बॉय’ असतात. काही मुलगे आई-वडीलांच्या बाबतीत खूप हळवे असतात. सध्या अनेक ठिकाणी मुली ‘ॲग्रेसिव्ह’ बनत चालल्याचे ते पहात असतात. काही मुली तर मुलाच्या आईवडीलांचे वर्णन ‘डस्ट बिन’ असे करुन ‘आपल्या संसारात हे दोन डस्ट बिन्स नाही पाहिजे’ अशा अटी शर्ती घालत असल्याचे हे मुलगे ऐकून असतात, त्यामुळे लग्नाच्या या जुगारात आपण फसलो आणि आपल्या आईवडीलांची हेळसांड करणारी पत्नी मिळाली तर? या भितीपोटी असे मुलगे लग्नच करायला तयार होत नाहीत.

करोनाच्या महामारीने २०१९ नंतर जगाला ग्रासले व अनेक समीकरणे बिघडली. याही आधी प्लेग, एड्‌स, कॅन्सर, टीबी या व अशा गंभीर रोगांनी अनेकांना सतावले व अनेकांचे प्राण ओढून नेले. त्याच्यासोबतच हल्ली रवतदाब, हृदयविकार, मुत्रपिंडांचे विकार, कर्करोग, अस्थमा असे विविध रोग शहरी आणि ग्रामीण नागरिकांना त्रस्त करत आहेत. यातून अशा काही आजारांनी जोडीदाराचे निधन विवाहानंतर अल्पावधीतच झालेले असल्यास उरलेल्याला एकाकीपणे आयुष्य व्यतीत करण्याची वेळ येणे हीसुध्दा एक समस्या निर्माण झाली आहे. पारंपारिकतेचा, समाजाचा दबाव असेल यातील दुर्दैवी महिलेला दुसरा विवाहही करण्याची अडचण असणे हेही दिसून आले आहे. जोडीदार (तो किंवा ती! लग्नानंतर) गुन्हेगार, बदफैली, भ्रष्ट, समाजकंटक असल्याचे लक्षात आल्यास मात्र त्याच्यापासून विलंब न लावता विभवत होणे हा पर्याय योग्य होय.

या झाल्या अनंत अडचणी, ज्या वैवाहिक जीवनाला बाधा निर्माण करतात. पण यावर काहीच इलाज नाही का? तर तसे अजिबात नाही. जिथे अडचण आहे तिथे त्यावर मार्गही असतो. मात्र तो शोधून काढण्याची सकारात्मक मानसिकता असली पाहिजे. या जगात परिपूर्ण असे काहीच नसते. त्यामुळे कोणतेही जोडपे त्याला कुणीही कितीही ‘लक्ष्मी-नारायणा’ची वगैरे उपमा देऊ द्या, त्यांच्यात कधी ना कधी मतभेद, वादविवाद, भांडण झालेले असतेच असते. कुणी ते कबूल करते किंवा कुणी ते दडपून मनाच्या अडगळीत टाकून देते. शहाणपण याच्यात आहे की जुळवून घेता आले पाहिजे. ‘डिझास्टर’ आपल्या आयुष्यात येण्यापूर्वीच आपली ‘डिझास्टर मॅनेजमेण्ट’ यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे. या निसर्गात तुम्ही कुठेही नजर टाका तेथील विविध सजीवांमध्ये ही ‘जुळवून घेण्याची’ उपजत कला असते. काही साप, सरडे, पाली व काही तत्सम जीव जंगलात झाडाच्या खोडाप्रमाणे, पानांप्रमाणे, मातीप्रमाणे, वाळूप्रमाणे रंग धारण करुन असतात व आपले रक्षण शत्रुपासून करतात. इथे तर अनेकांच्या साक्षीने झालेल्या विवाहानंतर जोडीदारासोबत आयुष्य व्यतीत करण्याचा प्रश्न आहे, मग तो तर आणखी संवेदनशीलपणे हाताळता यायला हवा. वैचारिक दृष्टीकोनात फरक, आर्थिक स्थितीत तफावत, आवडीनिवडीत वेगळेपण हे असणारच! त्यावर वितंडवाद, भांडणतंटा, झगडे, मारामाऱ्या, कोर्टबाजी करुन नव्हे, तर हळुवारपणे विचार करुन मार्ग काढला पाहिजे. मुलींमध्ये ही क्षमता असते. दुदैवाने मनोरंजन मालिकांच्या नादी लागलेल्या त्यांच्या माता मुलींच्या मनात नको नको ते विचार भरवून देतात व काही अविचारी मुली त्यात अडकून आपल्या संसाराचे वाटोळे करुन घेतात असेही घडत आहे. वाचन-चिंतनाचा अभाव, मागील पिढीतील निकटवर्तीयांपासून तुटलेपण आणि आपल्या मातापित्यांपासून कळत-नकळत बाळगलेला दुरावा असेल तर मात्र नवविवाहितांच्या वैवाहिक जीवनातील अडचणींमध्ये वाढ होण्याचे प्रकार होत राहतात. आता तर यावर उपाय म्हणून गुगल व अन्य समाजमाध्यमांवर मार्गदर्शन मिळते, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ हेही पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा सकारात्मक उपयोग करायची मानसिकता आणि अंगी नम्रता, सर्वसमावेशकता, ‘मीही चूकू शकतो/चूकू शकते’ ही वृत्ती बाणलेली असेल तर शुभलग्नापासून दूर पळण्याची, एकटं पडण्याची वेळ येणार नाही.  

(मुशाफिरी) राजेंद्र गोपीनाथ घरत,९८२०२७६४६२ उपसंपादक, दै.आपलं नवे शहर, नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *