
उध्दवसेनेतून शिंदेसेनेत फुटुन गेलेल्या खासदार व इतर फुटीरांना भरचौकात ‘धरुन तुडवा’ हा देण्यात आलेला ईशारा किंवा १९ जून रोजी उध्दवसेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात दंगलकार कवि नितिन चंदनशिवे यांनी उपस्थित प्रेक्षकांसमोर ‘आमचा कांबळे.. त्याला मास्तरांनी तुडव तुडव तुडवला, प्रेयसीने तुडवला, त्याच्याच लोकांनी तुडवला’ या प्रकारची जी कविता सादर केली ‘त्या तसल्या प्रकारच्या तुडवण्याशी’ या लेखाचा दूरदूरुन संबंध नाही, दिसलाच तर तो केवळ योगायोग समजावा, हे पयलेछुट सांगून ठेवलेले बरे. आमची तुडवातुडवी ही कुणालाही हवीहवीशी वाटणारी आहे, तिचा राग येण्याचे, तिरस्कार वाटण्याचे काहीच कारण नाही.
दोन आठवड्यापूर्वी न्हाणीघरात (म्हणजे आपल्या मायमराठीत बाथरुममध्ये हो!) स्नानाचा आनंद घेताना हातातला पिअर्स साबण सटकून खाली लादीवर पडला. तो उचलायला खाली वाकलो तर पाठीच्या मणवयातून जी काही सणक गेली नि जीवघेणी कळ आली की काही विचारु नका. याला मराठीत ‘क्रॅम्प येणे’ असे नाव आहे. घरच्या भाषेत तिला चमक भरणे, लचक भरणे वगैरे नावांनी ओळखले जाते. पुढची उर्वरीत आंघोळ कशीबशी उरकून बाहेर आलो तर चालण्यात अडचण भासू लागली. कमरेत वाकून चालावे लागले. यावर मग बाम लाव, स्प्रे मार, गरम पाण्याच्या पिशवीने शेकव असले उपाय करुन झाले व तासाभराने बरे वाटायला लागले. तरी दिवसभर अंगात कणकण होतीच. पूर्णपणे परिस्थिती पूर्ववत होण्यास दोन दिवस गेलेच. तोवर एखाद्या दंगलग्रस्त भागात कशी ‘परिस्थिती तणावपूर्ण..पण नियंत्रणाखाली’ असे म्हटले जाते..जणू त्याचाच अनुभव घेतला. पाठीत, कमरेत चमक आली, खांदे दुखु लागले, पाय दुखु लागले की आमच्या लहानपणी त्यावेळची मोठी माणसे…जसे आजोबा, मोठे काका, मोठे आते-मामे-मावसबंधू अशी तत्कालिन मोठी मंडळी पोटावर झोपत आणि आम्हाला त्यांच्या पाठीवर उभे करुन तुडवायचा आदेश देत असे. एरवी काही चूका झाल्यावर आपल्याला बुकलुन काढणारे हे लोक चक्क तुडवायला सांगताहेत याचा सुरुवातीला अचंबा वाटे. मग बदला घ्यायची संधी चांगली चालून आली आहे असे समजून मी त्यांच्या पाठीवर स्वार होत असे. मग ते खालच्या तोंडानेच वर आदेश देत ‘वर..आणखी वर, खांद्याच्या बाजूकडे चाल, आता खाली कमरेच्या दिशेने चाल, मग पायांच्या दिशेने चाल.’ त्याबरहुकुम मी करीत असे. कधी कधी तर तुडवण्याऐवजी उड्याच मारीत असे. मग ‘अरे बाबा… बास बास!’ अशी त्यांनी शरणागती पत्करली की खाली उतरत असे. त्यावर ही मागची पिढी मग माझा गालगुच्चा घेऊन मला उचलून घेत असे.

ही ‘माणसं अडवा.. वरुन तुडवा’ योजना अशा प्रकारच्या पाठीच्या, कंबरेच्या दुखण्यातून किती वेदनामुक्ती देते हे समजायला मला मोठे व्हावे लागले. मग खेळताना, गाडीत चढताना, उतरताना पाठीत चमक आली, कंबर दुखु लागली की मी माझे भाचे, शेजारपाजारचे लहान मुल यांना माझ्या पाठीवर चढून मला तुडवण्याचा मान देऊ लागलो. एकदा एका लहानग्या लाडक्या भाच्याला मी तुडवायचा मान दिला. त्याने मला पायांपासून खांद्यांपर्यंत यथेच्छ तुडवले खरे; पण मीच त्याला जरा जास्तच वेळ पाठीवर चालते ठेवत तुंबवल्याने त्याने ‘परिस्थिती नियंत्रणाबाहेर’ गेल्यावर माझी पाठ आणि त्याची चड्डी एकाच वेळी ओली केल्याचे मला स्मरते. यामुळे मला नाहक पुन्हा आंघोळीचा एकाच दिवसात दोनदा अनुभव घ्यावा लागला असेही घडले आहे. घरगुती, गावठी उपचार, झाडपाला, जडीबुटी, आजीबाईचा बटवा, घरचा वैद्य या नावाने अनेक घटक आपल्या अवतीभवती वावरत असतात. मला आठवते…माझ्या लहानपणी माझे एक शेजारी कुणाच्या पायाला..म्हणजे तळव्याला लचक आली, चालताना अडचण निर्माण झाली, लंगडत चालायची वेळ आली, त्या पायाचा तळवा सुजला तर काय करत माहीत आहे ? ते त्या बाधित व्यक्तीला छोट्या स्टुलावर बसवीत. त्याला एका चटईवर तो दुखरा तळवा ठेवायला सांगत. त्या पायाच्या तळव्यावर एक चादरीची किंवा बारदानाची घडी ठेवत आणि पीठ दळायच्या जात्याचे एक चाक त्या पायावरुन रगडून फिरवीत. कधी कधी ती बाधित व्यक्ती असह्य वेदनांनी विव्हळत असे; पण थोड्या वेळाने ‘बरे वाटते’ म्हणून तेथून हसऱ्या चेहऱ्याने ‘वेदना कमी झाल्या’ म्हणत निघत असे. ‘पायातली नस एकावर एक चढल्याने असे होते..त्यावर जात्याचे चाक फिरवल्याने नसा मोकळ्या होतात व बरे वाटते असे’ ते सद्गृहस्थ मला सांगत. अनेक गावा-खेड्यांमधून डॉवटर्स, दवाखाने, आधुनिक पेनकिलर्स पुरवणारी मेडिकल स्टोअर्स नसलेल्या ठिकाणी या व अशा प्रकारचे उपचार आजही केले जात असतील. काही ठिकाणी त्यांना कदाचित अघोरी, अवैज्ञानिक, मागास, कालबाह्य वगैरे म्हणत त्यांची संभावनाही केली जात असेल. आज मुंबई, नवी मुंबईसारख्या महानगरात, आधुनिक शहरांत एकापेक्षा एक कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत आणि त्याचवेळी मोडलेले हाड सांधून देतो असा दावा करणारे हाडवैद्यही आहेत. कॅन्सर, किडनीविकार, हृदयरोग, मष्तिष्कविकार या आणि अशा विविध गुंतागुंतीच्या दूखण्यांवर इलाज करणारे डॉवटर्स, दवाखाने आहेत…आणि त्याचवेळी उरण तालुक्यातील धुतुमसारख्या ठिकाणी आजही काविळीसारख्या विकारावर गावठी उपाय करुन त्यापासून बरे करणारे उपचारकर्ते आणि ते उपचार करवून घेणारे शेकडोंनी आहेत, हेही आपण पाहु शकतो.
एक गंमतीशीर प्रसंग सांगतो. जम्मू राज्यामधील वैष्णौदेवी देवस्थान हे खूप उंचावर आहे. घोडा करुन, डोली-पालखी भाड्याने करुन किंवा आता रोप वे ने जाण्याची सोय तिथे उपलब्ध आहे. पण तरीही तो रम्य प्रवास पायी चालत करण्यातली मौज काही वेगळीच. कारण अवतीभवती छान डोंगर, खाली दिसणारे कटरा शहर, सुंदर झाडे हे सारे डोळ्यांना सुखावणारे असते. चालत जाताना दमायला होते खरे. पण शेवटी देवस्थानाजवळ पोहचल्यावर छान वाटते. परतीचा प्रवास उतरणीवरुन करताना तेवढाच थरारक असतो. बऱ्याचदा पाय लटपटतात. (असाच प्रकार गुजरात मधील जुनागढ येथील गिरनारचा डोंगर चढून जाताना-येताना होतो.) आपण मुवकामी पोहचतो तेंव्हा पाय चांगलेच दुखत असतात. जम्मूत आपण थांबलेल्या निवारा केंद्रे, हॉटेल्स, रेस्ट रुम्सजवळ विविध रंगीत तेलांच्या बाटल्या हातात घेऊन ‘मालिश, मालिश’ म्हणून हाकारे देणारे मालिशवाले स्त्री-पुरुष पाहायला मिळतात. त्यांची सेवा घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. ठराविक वेळ ते मालिश करतात. ही सेवा करवून घेणारा ‘और तेल लगाव, और मालिश करो’ असे सांगू लागला तर हे मालिशवाले मग त्याच्या पायावरचे केस मालिशच्या नावाखाली खेचून त्याला पिडतात. मग तो ‘बस करो..बस करो’ म्हणून यांना थांबायला सांगतो.
नवी मुंबईत मला स्वतःचे घर घेऊन कायमचा रहिवासी म्हणून या महानगरामधील वास्तव्यास आता तीस वर्षांहुन अधिक काळ लोटला आहे. नेरुळ येथील लंडन पिल्सनर कंपनीत काम करताना मी तेथील अनेक कामगारांच्या मनगटाजवळ एक चट्टा उमटल्याचे पाहात असे. यावर विचारणा केली असता काविळीवर उपचार म्हणून हा लहानपणी गरम पट्टीने हा चटका दिल्याची माहिती अनेकांनी दिली. नागिण हेही एका रोगाचे नाव आहे म्हणे. काखमांजऱ्या असाही एक रोग असतो. म्हणजे रोगांना प्राण्यांच्या नावाने ओळखले जाण्यालाही पुरेसा काळ लोटला आहे. नवजात बालकांना आंघोळ घालण्यापूर्वी तेलाने मालिश केले जाते. काही ठिकाणी त्याला ‘मळण-चोळण’ असेही म्हणतात. अनेक ठिकाणी त्या बालकाची आजी, आई, मावशी, काकी, मामी हे काम मोठ्या आवडीने करत असल्याचे मी पाहिले आहे. तर काही घरांतून हे ‘मळण-चोळण’ करणाऱ्या तज्ञ महिलांना नवजात बालकांच्या आंघोळीसाठी दरमहा विशिष्ट रवकम देऊन पाचारण केले जात असल्याची माझी माहिती आहे. काही डॉक्टर्स सांगतात की मुळातच निसर्गाने अशी व्यवस्था केली आहे की नवजातांच्या त्वचेतून एक द्रव स्त्रवतो जो त्यांच्या त्वचेचे रक्षण करत असल्याने वेगळ्या तेलाची गरज नाही. तर काही ठिकाणी स्वतः डॉक्टरच त्यांच्या मुलांच्या मालिशसाठी ‘मालिशवाली मावशी’ बोलावीत असल्याचाही प्रकार घडतो, असेही दिसून येते. आता बोला!
कशाने नशिब बदलते, कशाने बरकत येते, कशाने बरे वाटते, रोगमुवती होते, भरभराटीचे जीवन जगता येते याबद्दल ज्याचे त्याचे ठोकताळे असतात, विश्वास असतात, श्रध्दा असते. साधे घराचेच घ्या. दरवाजा कुठे हवा, स्वयंपाकघर कोणत्या दिशेला हवे, शयनगृह (म्हणजे मायमराठीत बेडरुम!) कोणत्या बाजूला हवे याचे सल्ले देणारे व ते मनापासून मानणारे व त्यानुसार वागणारे अनेक परिवार आहेत. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यांना शास्त्र म्हणावे का, येथून काहींच्या आक्षेपांना सुरुवात होते. पण तरीही ते मानणारे व वास्तुशास्त्र्याने सुचवल्यावरुन लाखो करोडो खर्चून बनवलेल्या घरात मोडतोड करुन पुन्हा नव्या रचना करणारेही ठिकठिकाणी पाहायला मिळतात. मनी प्लान्ट, लाफिंग बुध्दा, पितळेचे कासव, शुभ-लाभ लिहिलेल्या पाट्या, स्टीकर्स यांना बाजारात चांगली मागणी असल्याचे दिसून येईल. त्याचवेळी हेही पाहता येईल की चांगल्या ज्योतिषाकडे मुहुर्त काढून केलेले लग्नही कधीकधी फसते, त्यांचा घटस्फोट होतो. तर जात-पात, धर्म-भाषा-प्रांत हे कसलेच हिशेब न ठेवता एखाद्याचा हात धरुन पळून गेलेली मुलगी जोडीदारा सोबत आयुष्यभर सुखाने नांदते. मुहुर्त पाहुन बांधकाम सुरु केलेले, शुभमुहुर्तावर उद्घाटन केलेले एखादे दुकान अजिबातच चालत नाही…आणि कसलेच वास्तुशास्त्र, मुहुर्त, भविष्य यांचा विचार न करता चालू केलेले, कुठेही, कसेही बांधलेले दारुचे दुकान मात्र धो धो चालते. कशाची कशाशी सांगड तरी कशी घालावी?
(मुशाफिरी) राजेंद्र गोपीनाथ घरत,९८२०२७६४६२ उपसंपादक, दै.आपलं नवे शहर,नवी मुंबई
