
मुंबई मधील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर, येथे दिनांक ११ जुलै १९९७ रोजीच्या भल्या पहाटे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली. बाबासाहेबांचा पुतळा हा भर चौकामध्ये होता.पुतळ्याच्या पाठीमागे अगदी हाकेच्या अंतरावर व नजरे समोर फक्त २० ते २५ फुट मागे पोलीस चौकी होती चौकीमध्ये पोलीस हजर असताना देखील एकाही पोलिसाने पुतळ्याची विटंबना कोणी केली हे पाहिले नाही? पुतळा विटंबनेची बातमी संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. बातमी कळताच वस्ती मधील व परिसरातील लोक पुतळ्याभोवती जमा झाले महामानवाप्रती प्रेम व. आदर असणाऱ्या जनतेत त्यांच्या पुतळा विटंबनेनंतर दुखः, चीड, आक्रोश निर्माण होऊन भावनांचा उद्रेक होणे साहजिक होते. पोलीस अधिकारी कर्मचारी घटना स्थळी हजर झालेले होते. विटंबना करणाऱ्या समाजकंटक कुत्र्यांचा शोध घेन्यासाठी डॉग स्कॉड मागवण्यात यावे, विटंबना करणाऱ्याला ताबडतोब अटक करण्यात यावी. अशा मागण्या जमलेल्या संतप्त जनतेमधुन होऊ लागल्या. पुतळ्या समोरील महामार्गावर प्रचंड लोक पुतळा विटंबना निषेधार्थ रस्त्यावरच ठाण मांडून बसले. संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. सगळीकडे आक्रोश,घोषणा,निषेध,चिड, गोंगाट होता इतक्यात धाड़ धाड़ असा गोळीबाराचा आवाज झाला. आणि सर्व काही शांत झाले. निमलष्करी सशस्त्र असणारे जवान खाडखाड बूट वाजवीत आले. त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला घेराव घातला व एका पोलीस अधिकाऱ्याने काठीने पुतळ्याच्या गळ्यातील चपलांचा हार काढुन घेतला. त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर वस्तीमध्ये एकच आक्रोश व आकांत पहायला मिळत होता.फौजदार मनोहर कदमच्या आदेशावरून लोकशाही मार्गाने व शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर अचानक गोळीबार करण्यात आला.त्या गोळीबारात निरपराध असणाऱ्या दहा जणांचे मुडदे जागच्या जागी पाडण्यात आले. या घटनेत अनेक जन जखमी झाले होते. वस्तीतील जनतेला मोठा धक्का बसला होता. रमाबाई आंबेडकरनगरची संपूर्ण वस्ती रक्ताने लालेलाल झाली होती. या राजकीय षडयंत्राने रचलेल्या हत्याकांडाने उभ्या महाराष्ट्रात असंतोषाचा आगडोंब उफाळून बाहेर आला होता. निरपराध असणाऱ्या दलितांच्या अमांनुष हत्याकांडानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातीयवादी फौजदार मनोहर कदमची जाहीरपणे प्रशंसा करून त्याला पाठबळ दिले, या हत्याकांडाचे सारे पुरावे नष्ट करण्याचा खुप प्रयत्न सुरु होता.

डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांचा आदर करणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा स्थापन केला होता त्याच लोकांना पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात गोउन आरोपी करण्यात आले. त्यांच्यावर दंगलीचे आरोप करून गुन्हे दाखल केले गेले. गोळीबारात जे वाचले त्यांच्यावरच पोलिसांवर हल्ला केल्याच्या केसेस दाखल केल्या गेल्या. मुंबईतील एका लढाऊ वस्तीला अद्दल घडवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करून पाताळयंत्रीपणाचे सारे प्रयोग केले. परंतु आंबेडकरी जनतेने या अत्याचाराचा, दडपशाहीचा प्रतिकार करण्याचे ठरवले. त्यावेळी एक लंढाऊ व्यक्तिमत्व असणारे मा. श्यामदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली.
श्याम दादांच्या नेतृत्वाखाली या समितीने सातत्याने केलेल्या सरकार ते न्यायालया पर्यंतच्या पाठपुराव्यामुळे व जनतेच्या जनरेट्यामुळे न्या. गुंडेवार चौकशी आयोग सरकारतर्फे नेमला गेला. एकीकडे न्यायालयीन लढा तर दुसरीकडे रस्त्यावर न्यायासाठी आंदोलने सुरु होती. जोशी मुंडे दोनो गुंडे, जातीयवादी शासन चले जाओ, जयभीम के नाम पे खून बहे तो बहणे दो अशा घोषणांनी साऱ्या मुंबई महानगरासह संपूर्ण महाराष्ट्र दणाणून गेला होता त्यावेळी समाजातील निष्क्रिय नेत्यांना रमाबाई आंबेडकर नगर मधील स्वाभिमानी जनतेने मजबूत व जोरदार चोप देऊन वस्तीतुन बाहेर हाकलून दिले होते. त्यानंतर गुंडेवार आयोगातर्फे चौकशी करण्यात आली परंतु अहवाल समोर येत नव्हता. किंबहुना तो येऊ दिला जात नसावा.

गुंडेवार आयोगाचा अहवाल विधानपटलावर आणण्यासाठी पुन्हा जनांदोलन झाली. न्यायालयीन लढाई लढण्यात आली आणि त्या नंतर अहवाल पटलावर घेण्यात आला व प्रसिद्ध करण्यात आला. न्या. गुंडेवारांनी रमाबाई आंबेडकर नगर मधील गोळीबार हा निशस्त्र व शांत असणाऱ्या जनतेवर गरज नसताना करण्यात आला असल्याचा स्पष्ट असा अभिप्राय नोंदवला. आंबेडकरी जनतेने आंदोलनात सातत्य ठेवले म्हणून युती सरकार गडगडले आणि नंतर आघाडी सरकार आले. आघाडी सरकारच्या काळात फौजदार मनोहर कंदम वर भा.द.वी. ३०२ ऐवजी ३०४ हे कलम लाऊन तब्बल ८ वर्षांच्या विलंबानंतर फिर्याद नोंदवली व त्याचाच फायदा मनोहर कदमला झाला कार्यकर्त्यांवरील केसेसच्या सुनावण्या सुरु झाल्या. या प्रकरणाचा पाठपुरावा करनाऱ्या श्याम दादा गायकवाडांचा व रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. श्यामदादा गायकवाड व त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता समाजाला न्याय देण्यासाठी व जातीयवादाला गाडण्यासाठी अथक परिश्रम केले त्याला तोड नाही. फौजदार मनोहर कदमला सत्र न्यायालयाने मे २००९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. परंतु तो आज जामिनावर मुक्त आहे. त्याने शिक्षे विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल ‘केलेले असुन ते मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याने व श्याम दादा गायकवाडांच्या पाठपुराव्यामुळे तेथील कार्यकर्ते खोट्या केसेस मधून निर्दोष सुटलेले आहेत विटंबनेच्या आरोपातून व दंगलीच्या आरोपातून कार्यकर्ते निरपराध शाबित झाले असले तरी अजूनही देशात रमाबाई आंबेडकर नगर सारख्या हत्याकांडाची कृत्यं सुरूच आहेत म्हणूनच रमाबाई आंबेडकर नगरची लढाई अजुन संपलेली नाही… रमाबाई आंबेडकर नगरच्या सर्व शूर वीर शहिदांना क्रांतिकारी अभिवादन… व जय भीम …!!!
अमर रहे,,, अमर रहे,,, रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर के शहीद अमर रहे..!!!
ॲड.समीर पठाण मो.न. ९९२१८८९१६५,बीड

