
११ जुलै १९९७ रोजी माता रमाई आंबेडकर नगर, घाटकोपर, मुंबई येथे प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळा विटंबनेनंतर आंबेडकरी अनुयायांच्या जमावावर राज्य राखीव पोलीस दलाचे मनोहर कदम या अधिकाऱ्याने बेछूट गोळीबार केला त्यात लहान लहान मुलांसह आणि महिलेसह ११ निष्पाप जीवांचा बळी घेतला.वास्तविकता कुठल्याही जमावावर कधी बेछूट गोळीबार करण्याचे स्मरत नाही. जमलेल्या जमावावर त्यांना पांगवण्यासाठी प्रथम लाठीमार केला जातो. अश्रूधुर सोडला जातो. मात्र रमाई नगरात आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार का करण्यात आला? वास्तविकता सदर जमाव शांततेच्या मार्गाने आपला संताप आक्रोश व्यक्त करत होता. त्याच्यावर लाठीमार,अश्रूधुर सोडण्याची गरज नसताना अंधाधुंद गोळीबार केला जणू भारत पाकिस्तानच्या सीमेवर सदर गोळीबार सुरू होता काय? रमाई नगरात गोळीबारात बळी गेलेले पाकिस्तानी होते काय?
आज ११ जुलै २०२६ साल उजाडले २९ वर्षे झाली. मात्र हे सतत जाणवत राहिले. शासन आणि प्रशासन दलितांना मारणाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे असते. मग ते सरकार शिवसेना बी.जे.पी. असो अथवा काँग्रेस, राष्ट्रवादीचे असो. कारण जेव्हा सदर घटना घडली तेव्हा शिवसेनेचे बी.जे.पी.चे सरकार होते. तेव्हा ही शासन प्रशासन मनोहर कदमला वाचवण्यासाठी सतर्क होते. नंतर झालेल्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मते दिली. काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले. मात्र सदर सरकारही मनोहर कदमच्या बाजूने होते आणि आहे हे सुद्धा आम्ही अनुभवले आणि आज तर खुले आम जातीयता धर्मांधता द्वेष पसरविणारे सरकार सत्तेवर आले आहे. त्यांच्याकडून तर अपेक्षाच ठेवता येत नाही.मात्र आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) च्या माध्यमातून सतत मोर्चे- धरणे आंदोलने केली अद्यापही त्यासाठी संघर्ष करतो,लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले सरकार – लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलनांची दखल घेते असं कधी जाणवतचं नाही आणि आजही तसं जाणवत नाही. दलितांना मारा, झोडा – अन्याय – अत्याचार करा – महिलांवर बलात्कार करा – त्यांची नग्न धिंड काढा – सरकार ढिम्म असतं. कारण दलितांकडून मोठ्या प्रमाणावर उद्रेक होणार नाही, याची सरकारला खात्री असते असे उद्रेक झालेच तर कोम्बिंग ऑपरेशन करून तरुणांना हकनाक आरोपी केले जाते. त्यांना अटक केली जाते. जामिन मिळणार नाही अशी कलमे लावली जातात. त्यांचे जीवनच सरकारी पोलीस यंत्रणा उध्वस्त करते आणि ही कोम्बिंग ऑपरेशन होतात ती ही फक्त बौद्धांच्या बाबतीतच. अनेकदा अनेक ठिकाणी भयानक उद्रेक झालेले पाहिले. मात्र त्या ठिकाणी पोलिस यंत्रणा शेपूट घालून असते आणि दलितांच्या बाबतीतचं पोलिसांना स्वतः: मर्द असल्याची जाणीव होते. दलितांना मारताना त्यांची ५६ इंचाची छाती ११२ इंच ही होते. किती भयानक हा जातीवाद ! आणि तो फक्त आमच्याच बाबतीत असतो.

कोम्बींग ऑपरेशन दहशतवाद्यांना हुडकण्यासाठी केले जाते. भारताच्या सीमा परिसरात अशी कोम्बींग ऑपरेशन केली जातात. मात्र येथील पोलीस यंत्रणा नागरिवस्तीत आणि त्याही दलितांच्या वस्तीत कोम्बींग ऑपरेशन करतील. इतर ठिकाणी त्यांची हिम्मत होणार नाही याची वारंवार प्रचिती येते जाणीव होते. हा भारत देश आमचा आहे याची प्रचंड मोठी जाणीव घेतल्या बौद्ध समाजात आहे, देशाचं . नुकसान व्हावं असं कधीही येथील बौद्ध समाजाला वाटणार नाही. अनेक बौद्ध तरुण मिलिटरी भरती होऊन देशाच्या रक्षणाचं काम करतात. शत्रूशी लढता लढता शहीद होतात. मात्र त्याच शहीदांच्या माय भगिनीची नग्नधिंड काढली जात असेल, त्याच माय भगिनीवर बलात्कार होत असतील. त्यांच्यावर सामुदायिक बहिष्कार टाकला जात असेल, त्यांना ठार मारलं जात असेल आणि जर असाच अन्याय अत्याचार होत राहिला तर तो सहन करतीलच असे वाटत नाही. बॉम्बस्फोट घडवून निरपराध्यांना मारावं एवढा निर्दयीपणा आमच्या ठायी नाही. मात्र संघर्ष अटळ असेल. आम्ही जाती धर्मापेक्षा भारत देश मोठा समजतो. आम्हीच खरे भारतीय आहोत आणि अखेरपर्यंत भारतीयच असणार आहोत.जगात सैतान आहे की नाही माहिती नाही. मात्र जातीवादी सैतान आम्ही सतत जवळून पहात आहोत आणि जातीवादी प्रशासनातील सैतानच मनोहर कदम नावाच्या सैतानाला जाणीवपूर्वक वाचवित आहेत. माणसांमध्ये दडलेली ही सैतानं, उद्या देशाचा घात ही करतील. तसे इतिहासात अनेक दाखले मिळतातच.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) चे कार्यकर्ते सतत न्यायालयीन लढाईत सुद्धा सतत अग्रेसर राहिले आहेत. खरं तर मनोहर कदमला सरकारने अटक करणे गरजेचे होते मात्र ॲड. शकिल अहमद यांना कोर्टात केस दाखल करावी लागली. त्यासाठी ॲड. संधराजe रूपवते सतत कोर्टाच्या लढाईत अग्रेसर राहिले. ॲड.गजानन लासुरे, ॲड.अनिकेत देशकर,ॲड. मनोज जाधव सतत या संघर्षात अग्रभागी राहिले. म्हणून किमान सदर खटला चालू तरी राहिला व कोर्टाला दखल घेऊन मनोहर कदमला अटक करण्यात आली. मात्र ती अटक फक्त कागदोपत्री झाली आणि विना विलंब कोर्टातून मनोहर कदमची जामिनावर मुक्तताही झाली. एवढी चपळाई पोलीस यंत्रणेने केलीच.तरीही लोकशाही,कोर्टाच्या माध्यमातून सदर लढाई सुरू ठेवली. एवढेच नव्हे तर जलदगतीने न्यायालयात खटला चालविण्यासाठी आम्ही ॲड. विजय प्रधान यांची नियुक्ती करावी तसेच ॲड. बी.जी. बनसोडे यांची नियुक्ती करावी म्हणून त्या वेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना निवेदन दिली मात्र सतत टाळाटाळ यंत्रणेकडून होत असल्याचे लक्षात आले.मात्र आम्ही सतत पाठपुरावा केल्यामुळे त्या वेळचे गृहमंत्री मा.आर. पाटील यांनी आम्ही केलेली वकिलांची मागणी मान्य केली. तरी ही पोलिस यंत्रणेकडून सदर खटल्याची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे लक्षात येत होते.तरीही कोर्टाची लढाई ॲड. संधराज रूपवतेच्या माध्यमातून सुरूच होती. आम्ही ही सतत रस्त्यावरची लढाई लढत होतो. ही लढाई तशी विषमच. प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करणे किती अवघड असते याची जाणीव सतत येत होती. एका पोलीस अधिकारी मनोहर कदमला वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा किती कार्य तत्पर होती हेही दिसत होते.
मध्यंतरी ऑस्ट्रेलियामध्ये एका माथेफिरूने गोळीबार केला. त्यात पुण्याचा एक विद्यार्थी मरण पावला. ऑस्ट्रेलियाचे पोलिस पुण्यापर्यंत आले. त्या विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांची भेट घेतली. त्यांना आश्वस्त केले की तुमच्या मुलाच्या मारेकऱ्यांना सजा देऊ आणि खरोखर अवघ्या सहा महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या पोलीस यंत्रणेने कोर्टामार्फत मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा दिलीच मात्र आपल्या देशात सगळा आनंदी आनंद आहे. न्यायाच्या नावाने बोंबचं आहे.आज मनोहर कदम नावाचा सैतान सनातन धर्मांध दहशतवाद्यांना बंदूक चालविण्याचं प्रशिक्षण देतोय असं अनेक वृत्तपत्रात छापून आलंय. ज्यानं ११ माणसं मारली तो अधिक माणसं मारण्यासाठी सनातन्यांना प्रशिक्षण देतोय हे फक्त आपल्याच देशात घडू शकतं.दुर्दैवानं महाराष्ट्राला आपण पुरोगामी म्हणतो ते सत्य आहे. मात्र निवडणुकीच्या राजकारणात बाळ ठाकरे नावाच्या इसमाने दलितांविरुद्ध सतत द्वेष ओकत होता. त्याचा त्याला राजकिय, आर्थिक लाभ झालाच पण थोडाफार पुरोगामी असणारा महाराष्ट्र जात्याध आणि धर्मांध करण्याचं श्रेय नक्कीच बाळ ठाकरेला द्यावे लागेल आणि त्यामुळे पेरले तसं उगवलं. महाराष्ट्राच्या भूमीत धर्माध जात्यांध, दहशतवादी गावोगाव तयार झाले आणि त्याचं राजकियकरण होत, मनोहर कदम नावाच्या सैतानाला जन्म दिला आणि त्याने आमची निरपराध ११ माणसं मारली.खरं तर त्यावेळी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद भूषविणारे मा.ना.छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या मनोहर कदमला फाशीपर्यंत नेतील असं वाटत होत कारण रमाई नगरात झालेल्या गोळीबारानंतर विरोधी पक्षात असताना अत्यंत आक्रमकपणे सेना बी.जे.पी. सरकारच्या विरोधात पवित्रा घेणारे व शहिदांना न्याय देण्याची भाषा करणारे भुजबळ जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनीही मनोहर कदमची पाठराखण केल्याचे जाणवते.
मा.ना. छगन भुजबळांच्या मलबारहिल येथील बंगल्यावर ॲड.संधराज रूपवते,ॲड. शकिल अहमद आणि मी स्वतः: राजाराम खरात त्यांची भेट घेतली आणि मनोहर कदमला ३०२ कलम लावण्याची मागणी केली असता हाताच्या मुठी एकमेकांवर आपटून अत्यंत नाटकी भाषेत त्यांनी ३०४ कलम कसे योग्य आहे असे सांगितले आणि ताबडतोब प्रतिवाद करण्याची आम्हास संधी न देता भुजबळ आतल्या दालनात निघून गेले. राजकारणी माणसे किती भयानकपणे बदलतात याचा अनुभव आला.पुन्हा सत्तांतर झाले मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आले. त्यांना ही अनेकदा निवेदने दिली. मात्र सनातन्यांना पाठीशी घालणारे मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तर अपेक्षा करणे ही गैर आहे होते. ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेक दलितांचे निर्दयी खून करण्यात आले. अनेकदा दलितांवर अन्याय अत्याचार झाले. एवढेच नव्हे तर १ जानेवारी २०१८ ला भिमा कोरेगांव येथे विजयी स्तंभाला वंदन करण्यासाठी हजारोच्या संख्येने आंबेडकरी जनता आली होती. तीन किलोमीटर अंतरावर आंबेडकरी अनुयायांच्या गाड्या थांबवण्यात आल्या आणि अद्यापही गुडयात अक्कल असलेल्या भिडेच्या मराठी धारकरी दहशतवाद्यांनी अनेकांवर जीवघेणे हल्ले केले. त्यांच्या गाड्या तोडल्या. एवढेच नव्हे तर पोलिसांशी संगमत करून आलेल्या आंबेडकरी जनतेला अन्नचं काय पाणीसुद्धा मिळणार नाही याची तजवीज केली. संपूर्ण भिमा कोरेगांव मधील हॉटेल, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हे सगळं माहित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोहर उर्फ संभाजी भिडेला आणि त्यांच्या पिलावलीला शासन करू शकले नाहीत मात्र त्यांनी पाठराखण स्वतः: त्यांवेळचे मुख्यमंत्री करतात त्या मुख्यमंत्र्याकडून मनोहर उर्फ संभाजी भिडेला व मनोहर कदमला ह्या दोन्ही मनोहरना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा ठेवणे सुद्धा गैर नाही का?
अमेरिकन काळ्या इसमाला द्वेषबुद्धीने पोलीस अधिकाऱ्याने ठार मारले. मात्र तेथील सजग पोलिस यंत्रणेने त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली. एवढे नव्हे तर देशाचे प्रमुख असलेले अध्यक्ष बायडेन सुद्धा गुडघे टेकून त्यांच्या कुटुंबियांची माफी मागतात. आपल्या देशातील पोलिस प्रशासनातून जातीवाद हद्दपार होईल? उलट लाखे नावाच्या महिला पोलीस अधिकारी गर्वाने बोलतात दलित लोक तक्रार करायला आले की, मी त्यांना झोडपून काढते. किती जातीवाद आहे पोलिस खात्यात.खैरलांजी प्रकरणी जेव्हा आंबेडकरी महिला भोतमांगे कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी घेऊन मंत्रालयात जातात तेव्हा एक पोलीस अधिकारी महिलांसोबत द्वेषपूर्वक वागणूक करतो आणि अरेरावीने म्हणतो ५ लाख रुपया दिल्या ना अभी जाव, क्या है इथर? किती उद्दटपणा, ज्या देशातील पोलीस यंत्रणा एवढी पराकोटीची सडलेली असेल त्या देशात गोरगरिबांना दलितांना न्याय मिळणे शक्यच नाही.रोगाने जर्जर झालेला हालचाल करू न शकणारा ८४ वर्षांचा वयोवृद्ध स्टेन स्वामीला हालहाल होऊन मृत्यूच होतो. त्याला शेवटपर्यंत जामिन मिळत नाही. मात्र बॉम्बस्फोट घडवून आणणारे, शस्त्र धारण करणारे, बॉम्ब बनविणारे सनातनी मात्र मोकाट हयाच देशात असू शकतात.मध्यंतरी महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असं महाआघाडीच सरकार सत्तेवर आले. उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री होते. काही अंशी त्यांच्या बाबतीत आपुलकी असू शकते पण दलित विरोधी गुन्हेगारांवर ते कारवाई करतील अशी अजिबात शक्यता वाटत नव्हतीचं.
आज पुन्हा नव्याने सत्तांतर झाले. उद्धवराव ठाकरे सरकार पाडून फुटीर शिवसेना नेते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांना ही निवेदन दिले. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवेदन दिले. मनोहर कदमला शिक्षा होण्याची सुतराम शक्यता नाही. फोडाफोडीच्या राजकारणात सारेच सत्ताधीश मग्न आहेत. नव्याने त्यांना राष्ट्रवादीचा फुटीर गट मिळाला. सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्या. आजचे सत्ताधीश सतत सत्तेत असूनही रमाई आंबेडकर नगरात गोळीबार करणाऱ्या सैतान मनोहर कदमला गेल्या २९ वर्षात शिक्षा देऊ शकले नाहीत. उलट सदर सत्ताधाऱ्यांनी सतत मनोहर कदमची पाठराखण केली. ज्यांना जनाची नाही.तर मनाची लाज लज्जा वाटेल असंही वाटत नाही. जातीयतेचा उतमात ज्यांच्या नसानसात भिनलाय त्यांना कसली आली लाज? निर्लज्ज.आता पून्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी आहेत त्यांच्या कडून न्याय मिळणे शक्यच नाही,प्रस्थापित रिपाइं नेत्यांनी अन्य पक्षांशी युती करताना एक दिलाने मनोहर कदमच्या फाशीची मागणी केली असती आणि सतत गदारोळ केला असता तर कदाचित मनोहर कदमला फाशीही झाली असती. मात्र सत्तेच्या डावपेचात सदर विषय रिपाइं नेतृत्वाकडून अदखलपात्र करण्यात आला. एवढेच नव्हे तर रमाई नगरातील गोळीबारानंतर चार खासदार निवडून गेले. त्यांनी संसदेमध्ये यावर एक शब्द ही उच्चारला नाही. असे एकीवात ही नाही अशी बोथट अन् बेपर्वा असणाऱ्या नेतृत्वाच्या नादी आम्ही लागावं हे अत्यंत घातकच नव्हे काय? ११ जुलै १९९७ रोजी गोळीबारात शहीद झालेल्या भिमसैनिकांना दरवर्षाप्रमाणे विनम्र अभिवादन.
पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेला पुण्याचा विद्यार्थी
सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळेल? पोलिसांना सजा होईल?
मा. राजाराम खरात,९८९२५१६१०३
पक्षाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.

