महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा ५ सप्टेंबर २०२६ पासून नाशिक येथे बेमुदत आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई – महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी कालिका माता मंदिर सभागृह,नाशिक येथे आयोजित बैठकीत आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वस्तीगृहांतील विद्यार्थी,अधीक्षक,गृहपाल, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
महासंघाच्या निदर्शनास आले आहे की,संबंधित घटकांच्या न्याय्य व रास्त मागण्यांकडे शासनाने वारंवार निवेदने, पाठपुरावा व आंदोलने करूनही अपेक्षित गांभीर्याने दखल घेतलेली नाही. परिणामी कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ सप्टेंबर २०२६ पासून गोल्ड क्लब, ईदगाह मैदान, नाशिक येथे बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.बेमुदत आंदोलनामध्ये शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील अधिक्षक,शिक्षक,मुख्याध्यापक,गृहपाल,वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी, शासकीय वस्तीगृहांतील कर्मचारी,क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध घटकांतील कर्मचारी व प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाच्या वतीने महासचिव सुशिल तायडे आणि राजरत्न पवार यांनी दिली.
शासनाने तातडीने संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलनाची वेळ येऊ न देण्याची जबाबदारी स्वीकारावी,अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन स्वतः जबाबदार राहील, असा इशाराही महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याणमहासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
चंद्रशेखर हेडवे 9930903664,यांस कडून

