नोंदणी प्रक्रिया सुलभ करा; सेतू सुविधा केंद्र बंद करण्याची वडार समाज संघाची मागणी.

लातूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि रोजगाराच्या अभावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, तसेच कामगारांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणातील विलंब दूर करून प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करावी. तसेच सेतू सुविधा केंद्रांमार्फत होणारी नोंदणी बंद करून थेट नोंदणी व्यवस्था सुरू करावी, तसेच (RPL) कौशल्य वृद्धी विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
मागील वर्षी शासनाने बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली, मात्र अंमलबजावणी करण्यात आली नाही म्हणून “घोषणा नकोत, कामगारांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा!” कामगारांच्या नावाने योजना जाहीर करण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. पात्र कामगारांना विनाकारण कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. नोंदणीतील अडथळे दूर करून कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, अशी भूमिका श्रीकांत मुद्दे यांनी मांडली.
शासनाने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वडार समाज संघाच्या वतीने देण्यात आला आहे. या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी रमाकांत मुद्दे, राम आलाकुंटे, कृष्णा धोत्रे, बाबासाहेब भांडेकर, सचिन वाडीकर, आकाश मुद्दे, रवी भांडेकर, लखन वाडीकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकांत मुद्दे, लातूर- मो.9823360226


