
23 सप्टेंबर संकल्प दिवस. ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या संघर्षमय जीवनाचा संकल्प करतात आणि पुढील संपूर्ण आयुष्य दबल्या पिचल्या अस्पृश्य समाजासाठी अर्पण करतात त्याच ठिकाणी काल जाण्याचा मी संकल्प केला…
तसा दरवर्षी जाण्याचा निश्चय करतो पण काही ना काही अडचणी येत होत्या आणि ते राहून जायचं. पण यावर्षी मात्र जाण्याचा संकल्प केला. आणि कुठलीही अडचण आली तरी जायचं असं ठरवलं. मी माझ्या काही सहकाऱ्यांना विचारणा केली असता जे येतील त्यांच्या सोबत आणि कोणीच आले नाही तरी ट्रेन ने एकटं जायचं असं ठरवलं…
पण बघता बघता सर्व कार्यकर्ते येण्यास तयार झाले.त्यामध्ये संगिती फाउंडेशनचे सचिव प्रशांत रणपिसे, BRSP मुंबई अध्यक्ष दीपक चौगुले, प्रबुध्द परिवाराचे लहू कदम,राजेंद्र कसबे, सीमा कसबे, संविधान कसबे, आणि आमची आधुनिक मुक्ता साळवे कु.सृष्टी कसबे आणि ड्रायव्हिंगसाठी ओमकार असे सर्वजण कसबे परिवाराच्या ईरटिगा गाडीने 22 सप्टेंबर रात्री 12.30 वाजता मुंबई चेंबूर इथून निघालो. गेल्या सतरा अठरा वर्षात आंबेडकरी चळवळीमुळे महाराष्ट्रभर दौरा करण्याचा योग येत असतो.परंतु प्रथमच गुजरात राज्याच्या वडोदरा शहरात संकल्प भूमी पाहण्याचा पहिलाच दौरा 23 सप्टेंबर सकाळी 8.00 वाजता आम्ही सयाजी गार्डन वडोदरा अर्थात सर्वांचा परिचित बडोदा शहरात पोहोचलो… आणि एका वेगळ्याच अनुभवाची सुरुवात झाली. ती मुंबईला येईपर्यंत आणि आताही तो क्षण काही डोळ्या समोरून जात नाही.
ज्या ठिकाणी विद्वत्तेचा महामेरू जगातील सर्वात मोठ्या संविधानाचा प्रमुख शिल्पकार,ज्याच्या नावा शिवाय या देशात एक दिवसही उजाडत नाही.ज्याच्या तत्त्वज्ञानाच्या जोरावर अनेक जण आपले पोट भरत आहेत. असा शोषित पिढीत समाजाचा आधारस्तंभ आमचा मायबाप डॉ.बाबासाहेब आंबेडकर या बडोदा शहरात 11 दिवस त्यांनी वास्तव्य केलं. त्या बडोदा शहराचा जातीयवाद इतक्या उच्च टोकाला गेला होता त्या सयाजी बागेत 23 सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ढसा ढसा रडले त्यांच्या अश्रूंनी पावन झालेली भूमी ऊर्जा भूमी म्हणून उदयास आली… जो कार्यकर्त्या या शोषणकारी व्यवस्थेच्या विरोधात उभा राहतो त्या क्रांतिकारी कार्यकर्त्याची ती संकल्प भूमी झाली…कारण जो संकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो पूर्णत्वास नेला. पण त्यासाठी त्या महामानवास आपल्या वैयक्तिक आयुष्याची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागली. स्वतः सोबत संपूर्ण कुटुंबाची राख रांगोळी झाली… तिथे पोहोचताच गुजरात मधील भीमसैनिक डॉ. बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा देत त्या सयाजी बागेत प्रवेश करत होता.

वयोवृद्ध स्त्रिया कार्यकर्ते तरुण तरुणी लहान बाळं सर्व सकाळी आठ वाजल्यापासून येत होते. बंजारा समाज, आदिवासी समाज. काठेवाडी समाज, तत्सम बहुजनवाद स्वीकारणारा समाज तिथे आपल्या पारंपारिक वेशभूषात येत होता… बघता बघता लोकांची गर्दी वाढतच गेली…सयाजी बागेच्या समोरील एका बाजूचा हायवे संपूर्ण बंद करण्यात आला होता. त्या हायवे मध्येच अनेक संघटनांचे स्टेज लागले होते.भीम आर्मी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, गुजरात मधील अनेक सामाजिक संघटना,धार्मिक संघटना,प्रशासनातील SC.ST. संघटना, कामगार संघटना, या सर्वांनी आपापल्या परीने येणाऱ्या भीम सैनिकाची चहा नाष्टा छास जेवन पाण्याच्या बॉटल्स या सर्वांची उत्तम व्यवस्था केली होती. एका संस्थेच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करत असताना त्यांच्या संस्थेच्या वतीने जी जेवणाची व्यवस्था केली गेली होती ती पाहून थक्क झालो शंभर दोनशे पाचशे हजार दहा हजार नव्हे तब्बल 15,000 हजार भीम सैनिकांचे जेवण त्यांच्या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिलं जात. त्याचा व्हिडिओ जाणीव पूर्वक काढून ठेवला आहे. एका कार्यकर्त्याच्या निष्ठेसमोर आम्ही शांत झालो. आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. चालता येत नव्हतं पण वॉकरच्या साह्याने तो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आला होता… 85 वर्षाच्या आजीबाई चंद्रपूर वरून त्या ठिकाणी आली होती तीच्या सोबत फोटो काढण्याचा आणि आशीर्वाद घेण्याचा मोह आवरला नाही. महाराष्ट्रातून अकोला औरंगाबाद जालना महाड इथून आपला हातावर कमावणारा समाज गुजरात मध्ये केवळ बापाला वंदन करण्यासाठी आला होता. आम्ही ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे अश्रू ढाळले गेले त्या ठिकाणी गेलो… तिथे डॉ.बाबासाहेबांचा चिंतन करत असतानाचा सुंदर पुतळा बसवला गेला आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करत असतानाचा अंगावरचा शहरा काही जात नव्हता. तो क्षण डोळ्यासमोर येत होता. ज्यावेळेस बाबासाहेब अपमानित होऊन या सयाजी बागेत बसले होते.कीती वेदना झाल्या असतील संपूर्ण त्या रात्रीचा तो प्रसंग डोळ्यासमोर येत होता. बडोद्याच्या भीम सैनिकांनी 109 वर्षाची हि ऐतिहासिक संकल्प दिनाची परंपरा जपली आहे…आंबेडकरी विचाराच्या प्रत्येक व्यक्तीने संकल्प भूमी पाहिली पाहिजे. ती केवळ भूमी नाही, ती ऊर्जा आहे समाजासाठी काम करण्याची. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी संकल्प केला आहे समाजासाठी आनखी वेगाने काम करण्यासाठी… पुढच्या वर्षी संकल्प दिवसाला 110 वर्ष पूर्ण होत आहे. ही भूमी अनेकांना दाखवण्याचा मीही संकल्प केला आहे. हा अनुभव चळवळीतल्या अठरा वर्षाच्या प्रवासाला फार चेतना वेदना आणि ऊर्जा देणारा ठरला आहे. हा अनुभव हा प्रवास शब्दबद्ध करून कधी एकदा समाजा समोर ठेवून मन मोकळं करावं असं झालं होतं… आपण नक्कीच ही संकल्प भूमी पहावी.आणि इतरांनाही ती पाहण्यास प्रवृत्त करावे अशीच विनंती….
काही टिपलेले महत्त्वाचे क्षण…………..जय भीम
सदधम्माच्या सेवेत
वैभव सोनवणे-८५९१५९४०३३,मानखुर्द मुंबई.
(धम्म सेवक – संगिती फाउंडेशन)

