राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या शिफारशी नंतर विधवा प्रथा निर्मूलन चळवळीला मोठे यश.
अनिष्ट रुढी-परंपरांना छेद देत नवरात्र उत्सवात स्त्रीशक्तीचा खरा सन्मान करण्याचे आवाहन.

करमाळा / प्रतिनिधी: नवरात्रोत्सव हा आदिमाता, आदिमाया स्त्रीशक्तीच्या जागरणाचा आणि आदराचा उत्सव आहे. या पवित्र उत्सवाचे औचित्य साधून समाजातील जुन्या अनिष्ट रूढी-परंपरांना बाजूला सारत, सार्वजनिक पंडाल, घरगुती पूजा आणि दसऱ्याच्या कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना मुख्य आरती व पूजेचा मान देऊन त्यांचा सन्मान करावा, असे जाहीर आवाहन विधवा प्रथा निर्मूलन अभियानाचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद झिंजाडे (करमाळा) यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने जनतेला केले आहे.प्रमोद झिंजाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सुरू असलेल्या विधवा प्रथा निर्मूलन अभियानाला सुरुवातीपासूनच सर्व प्रसारमाध्यमांनी (प्रिंट आणि डिजिटल मीडिया) मोलाचे सहकार्य केले आहे. वैयक्तिक पातळीवर ₹१०० च्या स्टॅम्प पेपरपासून सुरू झालेल्या या चळवळीची दखल आता थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) घेतली आहे. आयोगाने केंद्र व राज्य सरकारांना ‘विधवा प्रथा निर्मूलन कायदा’ करण्याची आणि विधवा महिलांच्या विकासासाठी विशेष कल्याणकारी योजना आखण्याची अधिकृत शिफारस केली आहे. याचे सकारात्मक परिणाम आता प्रशासकीय पातळीवर दिसू लागले आहेत.
‘वात्सल्य मिशन’ आणि ‘उमेद अभियाना’चे कौतुकास्पद कार्य
गाव आणि शहरी भागांत ‘वात्सल्य मिशन कमिटी’ व ‘उमेद अभियान’ अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. एखाद्या कुटुंबातील पुरुषाचे निधन झाल्यास, ही कमिटी तात्काळ त्या घरी जाऊन पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करते. त्यांना मानसिक आधार देण्यासोबतच सर्व शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी गावपातळीवर प्रत्यक्षात मदत करते. तसेच तरुण विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी त्यांच्या कुटुंबाचे मनपरिवर्तन करण्याचे मोठे कार्य या कमिट्या करत आहेत. विदर्भातील बुलढाणा येथील प्रा. दत्तात्रय लहाने आणि त्यांच्या ‘मानस’ संस्थेने आतापर्यंत १५० पेक्षा जास्त एकल महिलांचे यशस्वी पुनर्विवाह लावून आदर्श निर्माण केला आहे.
देशात ‘हेरवाड पॅटर्न’ची अंमलबजावणी
२३ जून रोजी असणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे’ औचित्य साधून देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘हेरवाड पॅटर्न’ प्रमाणे विधवा प्रथा मुक्तीचे ठराव पास करावेत, अशी विनंती झिंजाडे यांनी केंद्र सरकारला केली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हा दिवस ‘एकल महिला दिन’ म्हणून साजरा करून महिलांचे प्रबोधन, हळदी-कुंकू कार्यक्रम आणि शासकीय योजनांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत हिमाचल प्रदेश सरकारने तर डिझेल व पेट्रोलवर ६० पैसे उपकर (Cess) लागू करून, गोळा होणारा निधी विधवा महिला आणि अनाथ मुलांच्या विकासासाठी खर्च करण्याचा ऐतिहासिक कायदा केला आहे.स्त्रीशक्तीच्या उत्सवात सन्मानाची संधी द्या. “आज शेकडो गावे १००% विधवा प्रथा मुक्त झाली आहेत. हाच बदल आता सण-उत्सवांमध्येही दिसला पाहिजे,” असे आवाहन झिंजाडे यांनी केले आहे. चालू असलेल्या नवरात्र महोत्सवात गावातील किंवा घरातील विधवा भगिनींना कोणत्याही मंगल कार्यातून किंवा पूजेतून बाजूला न ठेवता, त्यांना मुख्य आरती आणि पूजेचा मान देऊन समाजाने एक पाऊल पुढे टाकावे. ही बातमी आणि आवाहन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून सर्व पत्रकार व संपादकांनी या सामाजिक चळवळीला नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, अशी विनंतीही प्रमोद झिंजाडे यांनी केली आहे.
संपर्कासाठी:
प्रमोद झिंजाडे
महात्मा फुले समाजसेवा मंडळ, करमाळा (सोलापूर)
मोबाईल नंबर: 7775903052

