धर्मांतराच्या शतक महोत्सव वर्षी २०५६ साली बुध्द विहारे हिंदुत्ववादी विचारांची केंद्रे बनतील!

बातमी शेअर करा.

दिनांक २० ऑक्टोबर, २०२६ धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ७० वे वर्ष पूर्ण झाले आहे. म्हणुन एक पत्रप्रपंच काही अतिशहाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन तारखेनुसार १४ ऑक्टोबरला साजरा करतात तर अनेकजण धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोक विजया दशमीला साजरा करतात. धम्मदेसना सुरू झाल्यानंतर भंते,भदंत, लामा,थेरो, महाथेरो यांना चांगले दिवस आलेले आहेत.त्यांची संख्याही रिपब्लिक पक्षांच्या गटांपेक्षा अधिक झालेली आहे.दरवर्षी अब्राह्मण समाजातील लोक हजारोंनी बौध्द धम्माची दीक्षा घेत आहेत.मात्र शासकीय अभिलेखावर बौध्दजनांची लोकसंख्येचे प्रमाण वाढत नाही.आता तर केंद्रीय शैक्षणिक व शासकीय सेवा प्राप्त करून घेण्यासाठी पालकच स्वत:हून अनुसूचित जातीची महार प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत.


  धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा गोंधळ झाला आहे, हा दिन इंग्रजी तारखे नुसार व अशोक विजयादिनी असा दोनदा साजरा करण्यात येत आहे. हे कमी काय म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिनांचे नवीन प्रकार सुरू झालेले आहेत, धम्मचक्र अनुवर्तन दिन, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन,धम्मचक्र परिवर्तन दिन….
हत्ती आणि आंधळे ही गोष्ट तर साऱ्यांनाच माहित असेल…..
ते आंधळे जसे आपआपल्या परीने त्या हत्तीच वर्णन करतात की……

हत्ती सुपासारखा,
हत्ती खांबा सारखा,
हत्ती सापां सारखा ,,
वगैरे वगैरे…….

महानुभावी रूपक कथेतील हत्ती तपासणारे लोक खरोखरच अंध होते त्यामुळे त्यांचे आकलन डोळस लोकांसारखे नसणे अगदी स्वाभाविक आहे.पण, बुध्दीनेच अंध असणारे आणि आपली बुध्दी इतर लोकांकडे गहाण टाकणारे लोक आजही समाजात भरपूर प्रमाणात आहेत. बाबासाहेबांच्या पश्चात धर्मांतरीत हिंदू महारांची अवस्था हत्ती आणि आंधळे ह्या गोष्टीतील आंधळ्यांसारखी झालेली आहे.कोणी म्हणत १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करा, तर कोणी म्हणतो धम्मचक्र अनुवर्तन,धम्मचक्र अनुप्रवर्तन म्हणा, तर अनेकजण त्यांच्या सम्यक ज्ञानानुसार तथागत भगवान भगवान गौतम बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,राजश्री शाहू महाराज यांच्या तसबिरी लावून बौध्द धम्माचा प्रसार व प्रचार जणूकाही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनीच केलेला आहे. असा मूर्खपणाचा संदेश देत असतात.अशा जन्मजात आंधळ्यांकडे सुजाण व डोळस आंबेडकरी जनतेने दुर्लक्ष केले पाहिजे.
    सवर्ण हिंदुची आत्मशुध्दी आणि हृदयपरिवर्तन होईल आणि त्यांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना कायमची नष्ट होईल आणि ते अस्पृश्य समाजाबरोबर भ्रातुभावनेने वागतील असा दृढविश्वास व्यक्त करुन गांधींजींना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतर न करण्याचा सल्ला दिला होता.आतापर्यंत सवर्णांच खरोखरच हृदयपरिवर्तन व आत्मशुध्दी झालेली आहे काय? सवर्ण समाज अस्पृश्य समाजाशी सत्तेने ममतेने वागत आहे का?
    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ साली आपल्या अनुयायांसह बौध्द धम्माची दीक्षा घेतली. धर्मांतरापूर्वी गांधीजींनी डाॅ.आंबेडकर यांचे धर्मांतर करणार नाहीत.धर्म हा घर किंवा पोशाखासारखा बदलता येत नाही.असं भाकीत केले होते. आंबेडकरी जनतेचे शासकीय अभिलेख आणि धर्माचरण तपासून पाहिले तर आंबेडकरवादी समाजाने आंबेडकरी विचारांशी प्रतारणा करून गांधीवादी विचारांचाच पुरस्कार केल्याचे आढळून येते. गांधीजी भाकीत चुकीचे नव्हते. कारण, ५९ अनुसूचित जातीपैकी केवळ महार समाजानेच प्रामुख्याने धर्मांतर केलेले आहे. उपवर्गीकरणाचा वाद निर्माण झाल्यानंतर चांभार व मातंग हे कधीच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत नव्हते हे सिध्द झालेले आहे.असते तर किमान हजार पाचशेंनी तरी बाबासाहेबांसोबत धर्मांतर केले असते!
    आंबेडकरवादी मंडळांनी व मंडळींनी बुध्द विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. बुध्द विहाराच्या भिंती अठरापगड जातीतील थोर व्यक्ती ज्यांचा जन्म हिंदू धर्मात झाला व ज्यांचे मरणही हिंदू धर्मातच झाले त्यांच्या तसबीरींनी सजवलेल्या आहेत. ह्याबद्दल भारतीय बौध्द महासभा चकार शब्द बोलत नाहीत.हे बहुजनप्रेमी बिहारमधील बुध्द विहार आमच्या ताब्यात अशी मागणी करीत आहेत.म्हणजे धर्मांतरीत महार लोक बुध्द विहारात हिंदू धर्मातील अब्राह्मण थोर व्यक्तींचे तसबिरी बुध्द विहारात लावून त्यांचे जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम बिहारमधील महाबुध्दविहारात साजरे करतील.ह्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही का?????
  मूर्ख धर्मांतरीत महारांच्या मनात कधीही असा विचार येत नाही की, भगवान बुध्दांना विष्णूचा नववा अवतार समजणारे हिंदू भगवान बुध्दांची मूर्ती हिंदू दैवतांच्या मंदिरांत का ठेवत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील ‘हिंदवी स्वराज्य’ आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा पुतळा हिंदू दैवतांच्या मंदिरांत का नसतो?
माझे असे मत आहे की, आंबेडकरी बौध्दजन फक्त बाबासाहेबांचेच अनुयायी आहोत. बाबासाहेबांनी आपल्या पूर्वजांना दिलेल्या तथागत भगवान बुध्दांचे उपासक नाही आहेत. म्हणूनच बुध्द विहाराचे हिंदुत्वकरण होत आहे. हिंदू देव पुजू नका; हिंदू थोर व्यक्तींचे पूजन करा अशी अभियान चालविणारे धर्मांतरीत महारांनी जगात आस्तित्वात नसलेला भारतीय बौध्द महासभेचा नवा हिंदुत्ववादी बौध्द धम्माचा प्रचार प्रसार करीत आहे.त्यांनी बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय महासेभेचे उद्देश किमान महासभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि धर्मकारणात राजकारण व समाजकारण यांची भेसळ होणार नाही. ह्याची दक्षता घेतली पाहिजे…
वाचा भारतीय बौध्द महासभेची उद्दिष्टे
The Buddhist Society of India
CONSTITUTION THE BUDDHIST SOCIETY OF INDIA

Rules and regulations governing the Constitution of the society :
I. The name of the Society shall be THE BUDDHIST SOCIETY OF INDIA.
II. The registered office of the Society shall be situated in Bombay.
III. The objects of the Society shall be :
(1) To promote the spread of Buddhism in India.
(2) To establish temples for Buddhist worship.
(3) To establish schools and colleges for religious and scientific subject.
(4) To establish orphanages, hospitals and relief centers.
(5) To start Buddhist Seminaries for the preparation of workers for the spread of Buddhism.
(6) To promote comparative study of all religions.
(7) To undertake publication of Buddhist literature and to issue leaflets and pamphlets for giving a true understanding of the Buddhist religion to the common mass.
(8) To create new order of priests, if it becomes necessary to do so.
(9) To establish a press or presses for the purpose of carrying on the work of publication.
(10) To hold gatherings and conferences of the Buddhists of India for common action and to establish fellowship.

भारतीय बौध्द महासभेच्या उद्दिष्टांमध्ये बावीस प्रतिज्ञांचा उल्लेख नाही तसेच अठरापगड जातीतील थोर व्यक्तींचे तसबिरी बुध्द विहारात लावाव्यात त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करा अथवा त्यांच्या विचारांचा प्रसार करा. ह्याचाही उल्लेख नाही. मग,भारतीय बौध्द महासभा बावीस प्रतिज्ञा अभियान का चालवतात,अब्राह्मण थोर व्यक्तींच्या तसबिरी बुध्द विहारात का लावतात व त्यांचे गौरवीकरण का करण्यात येत आहे.हा एक संशोधनाचा विषय आहे.
सरणत्तय गाथेचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
नत्थि मे सरणं अञ्ञं,
बुद्धो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन,
होतु में जयमङगलं ।।
अर्थ: भगवान बुध्दाशिवाय अनुसरण्यास सर्वोत्तम काहीही नाही,म्हणून मी भगवान बुध्दाला अनुसरतो.
ह्या सत्यवचनाने माझे जयमंगल हो.ह्या सत्यवचनाने माझे कल्याण होवो.
प्रश्न असा पडतो की,धर्मांतराला सत्तर वर्षे होत असताना राजकारणाची भूतबाधा झालेले तथाकथित आंबेडकरवादी बुध्द विहारात होणारे हिंदुत्ववादी अतिक्रमण थांबवणार आहेत की नाही? आंबेडकरवादी खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुध्दांचे उपासक कधी होणार आहेत की नाही..? धर्मांतरीत महार सामाजिक परिवर्तन घडवत असताना धर्मांतराच्या शतक महोत्सव वर्षी २०५६ साली बुध्द विहारे हिंदुत्ववादी विचारांची केंद्रे बनवून स्वत:हुनच बौध्द शिकवणूक नामशेष करतील. अशी साधार भीती वाटते….!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शरद आढाव – ९८३३१७५६६९,भांडूप,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *