
जगातील बौध्द धम्मीयांचे जागतिक विश्वासस्थळ (मी येथे श्रध्दास्थान हा शब्द इतक्यासाठीच वापरत नाही की श्रध्दाला पुरावा नावाचा प्रकार नसतो पण विश्वासाला पुरावे असतात. एखाद्या व्यक्तीवर विश्वास असेल तर त्या व्यक्तीचा मनोभावे आदर केल जातो. उदा.भ.बुध्द,सम्राट अशोक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी व अशी कित्येक. आजही हयात असणार्या एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जातो.कारण ती व्यक्ती विश्वासाला पात्र असते.पण श्रध्देला पुरावे नसतात.आजही नालायक मधला नालायक असलेल्या राजकारणी असो अथवा अन्य कोणी किंवा दगडाची मुर्ती असो त्यांच्यावर श्रध्दा व्यक्त करणारे लोक आहेत. ही श्रध्दा पुढे अंधश्रध्दात परिवर्तीत होते. पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवरचा विश्वास उडतो तेव्हा लोक त्या व्यक्तीपासून दूर होतात.) असलेले मगध राज्यातील सद्या बिहार राज्य (विहार शब्दाचा अपभ्रंश) गया येथील महाबोधी महाविहारात घुसखोरी झालेली आहे. ब्राम्हणी तथा सनातन वैदिक धर्मियांनी महाविहार आपल्या ताब्यात ठेवले आहे. याबाबत खाली पाहूच. दोन हजार वर्षापुर्वी मगध राज्यात सम्राट अशोक राजा यानी बौध्द स्वराज्याची निर्मिती केल्यानंतर सम्राट अशोकांनी बौध्दांच्या स्वराज्याचा झेंडा अटकेपार रोवला.आफगाणिस्तानापर्यंत स्वराज्याचा विस्तार केला.आजही आफगाणिस्तान हे जंक्शन आहे.तेथून चारी दिशेला जाण्यासाठी वाटा मिळतात.कदाचित म्हणूनच धम्म प्रसाराच्या दृृष्टीने सम्राट अशोक राजा यानी आफगाणिस्तानला आपली उपराजधानी बनवले असावे.तेथे मोठ्या प्रमाणात विहार बांधली असावीत. आफगाणिस्तानमधील बामियान प्रांतामधील डोंगर उतार्यावरील सुळ्या दगडात कोरलेली 150 फूट बुध्द मुर्तीं (चंगेझ खान,औरंगाजेब व तालिबान्यांनी मुर्ती तोडली) आजही भग्न अवस्थेत आहे. ह्यू-एन-त्सँग (चीन) हे बुध्दांची, धम्माची व धम्म संस्कृतीची माहिती जाणून घेण्यास इ.स. 629 ते 645 या दरम्यान भारत भेटीवर आले असता त्यानी 150 फूट मुर्ती पाहिली होती. त्यावेळी मुर्तीला साधा तडा गेला नव्हता. तेथेच त्यानी एका संघारामात एक हजार फूट लांबीची महानिर्वाण मुद्रेतील भ.बुध्दांची मुर्तीसुध्दा पाहिली होती. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की त्या काळी मगध राज्यापासून ते आफगाणिस्तानापर्यंत बौध्द धम्माचे उपासिका व उपासक वास्तवाला होते.
सम्राट अशोक राजा यानी 84 हजार बौध्द स्तूप बांधले. त्यातील एक बौध्द स्तूप म्हणजे महाबोधी महाविहार होय. बुध्दांच्या जीवनात जी चार ठिकाणं अविस्मरणीय ठरली ती चार ठिकाणं म्हणजेच 1.बुध्दांचे जन्म ठिकाण 2.बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले. 3.बुध्दांनी ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन केले. म्हणजेच एक प्रकारे बौध्द धम्म स्थापनचे ठिकाण व 4.बुध्दांना महानिर्वाण प्राप्त झाले ते ठिकाण. या चारी अविस्मरणीय ठिकाणांवर सम्राट अशोक राजा यानी बौध्द स्तूप बांधली. त्यापैकीच बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले त्या गयातील महाबोधी महाविहार एक होय. सम्राट अशोक राजा हे कोणी ब्राम्हण किंवा ब्राम्हण्यवादी किंवा ब्राम्हणी धर्मातील सदस्य नव्हते. ते बौध्द होते. त्यानी बौध्द धम्माची दीक्षा घेतल्याचे भक्कम पुरावे आहेत. जगाने मान्य केले आहे की, महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक वंदनास्थळ आहे. म्हणूनच जगातील बौध्द तथागतांच्या मुर्तीला पंचाग प्रणाम करायला येतात.जगात कुठेही बौध्द जन्माला येवो तो म्हणतो मला एकदा का असेना बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले तेथे सम्राट अशोक राजा यानी उभारलेल्या महाबोधी महाविहारात जावून वंदना व महाविहारातील बुध्द मुर्तीसमोर पंचाग प्रणाम करण्यास गेलेच पाहिजे.
महाविहार उभारल्यापासून ते आजवर तेथे जगातील बौध्द हे वंदनासाठी येत आहेत. त्यात खंड नाही. जगात प्रामुख्याने तीनच धर्माचे जागतिक धार्मिक स्थळ आहेत. 1.ख्रिश्चन धर्मियांचे व्हॅटकिन सिटी (रोम, इटली) 2. मुस्लीमांचे मक्का मदिना (सौदी अरेबिया) व तिसरे बौध्द धम्मीयांचे बुध्दगया (बिहार राज्य, भारत). या तीन धर्मिंयांचीच लोकसंख्या सर्वाधिक आहे. पृथ्वीच्या चारी बाजूला या तीन धर्माचेच अनुयायी, उपासक दिसतात. इ स.399 ते 414 या काळात बौध्द धम्माचा अभ्यास करण्यासाठी भारत भेटीवर आलेले फा हियान (चीन) यानी बुध्दगयाला भेट दिली. तेथील काही आठवणी त्यानी आपल्या प्रवास वर्णनात करताना ते लिहितात, ‘ज्या ठिकाणी बुध्दांना बुध्दत्व प्राप्त झाले, त्या ठिकाणी तीन संघाराम आहेत. त्या सर्वांत भिक्खू राहतात. त्या भिक्खूंना स्थानिक लोक आश्रय देतात आणि त्याना काहीही उणे पडू नये अशारितीने सढळ हाताने दान करतात. तेथे धम्मातील विनयाच्या नियमाचे कडकरित्या पालन केले जाते आणि बुध्दांच्या काळी जसे आदरणीय भिक्खू शिष्टाचार पाळीत त्याचप्रमाणे बसण्या-उठण्यात आणि सभेत पाळावयाचे शिष्टाचार हे भिक्खू पाळतात.’ याच भिक्खूंकडे महाबोधी विहाराच्या देखभालाची जबाबदारी असावी. तसेच तेथील लोक हे भिक्खूना सढळ हाताने मदत करतात याचा अर्थ ते बौध्द अनुयायी असले पाहिजेत. चौथ्या शतकात गया हा परिसर बौध्दमय होता. मग आता तेथे ब्राम्हणी धर्माचे वर्चस्व कसे? महाबोधी महाविहार ब्राम्हणांच्या ताब्यात कसे? हे प्रश्न सहाजिकच पडणार.
सम्राट अशोक राजा यांच्या महानिर्वाणानंतर पुढे त्यांच्या मौर्य घराण्यातील सात राजानी मगधचे सिंहासन सांभाळले. शेवटचा राजा बृहद्रथ मौर्य हे फारच दयाळू, मायाळू व धम्माबाबत संवेधनशील होते. कदाचित त्यामुळे व ब्राम्हणांचा राग हा सम्राट अशोकांवर असावा. दि. 6 जून 1950 रोजी श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथील कार्यक्रमात बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सम्राट अशोकाच्या काळात कुलदेवतापूजेची निंदा करण्यात आली. अशोक म्हणतो, मी बौध्द धर्माच्या मार्गाचे अनुकरण करीत असल्यामुळे मला दुसर्या कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही आणि त्याने आपल्या प्रशासनाधिकार्यांना आदेश देवून कुलदेवतांच्या मुर्ती काढून टाकल्या. हा ब्राम्हणांवर फार मोठा प्रहार होता. कारण यामुळे त्यांच्या उपजिविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिध्द झाले.’ दिडशे वर्षापुर्वी ब्रिटीशांनी ब्राम्हणी धर्मातील रूढी परंपरा विरोधात कायदे करण्यास सुरूवात केली, प्रबोधनासाठी शैक्षणिक संस्था उघडल्या, प्रसार माध्यमांना चालना दिली तेव्हा ब्राम्हण्यवाद्यांनी राष्ट्र स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मावर आलेले ब्रिटीशरूपी संकट दूर करण्यासाठी हाती शस्त्र घेवून मैदानात उतरले. हे अलिकडचे उदाहारण. मौर्यांच्या सैन्य दलात सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंगाने राजा बृहद्रथ याना कपटकारस्थान करून ठार मारले आणि सत्ता आपल्या हातात घेतली. हयू-एन-त्सँग हे राजा शशांक याने बोधीवृक्षाचे नुकसान केल्याचे सांगतात.याचा अर्थ 6 व्या शतकात होवून गेलेला राजा शशांक हा ब्राम्हणी धर्माचा समर्थक होता.पण त्याला बौध्द धम्माचा र्हास करता आला नाही. मात्र पुष्यमित्र शुंग त्याचा बाप निघाला.या पृथ्वीतलावर एक बौध्दच काय पण भिक्खूही दिसता कामा नये यासाठी भिक्खूंची मुंडकी तोडून आणणार्यांना घसघशीत रोख इनाम जाहीर केले. त्याने शस्त्राच्या धाकानेच बौध्दांना आपल्या धर्मात ओढले. जे कट्टरवादी होते त्याना ठार मारले, तर काहींना आपल्या धर्मात गुलाम केले.जे आज अस्पृश्य,भटके,आदिवासी,बलुतेदार म्हणून जगत आहेत. ज्यांची वस्ती आजही गावकुसाबाहेर आहे. शुंगाच्या काळातच ब्राम्हणी धर्माचे शंकराचार्य पीठ निर्माण झाले. सम्राट अशोक राजा यानी धम्म प्रसारासाठी चार धम्म पीठांची स्थापना केली,तसे जम्बुद्विप भारतात चार शंकराचार्य पीठ उभारलीत.चार शंकराचार्य पीठानी आपल्या धर्माचे देवालयं उभारणीसाठी बौध्द स्तूपांचा वापर केला.आजही बहुतांशी प्राचीन हिंदू देवालयं आहेत,ती बौध्द विहारं असल्याचे दिसते.त्यातील बुध्द मुर्तींचे स्त्री देविकामध्येही रूपांतरित केल्याचे दिसते. अन्यथा 84 हजार बौध्द स्तूपांपैकी बहुतांशी स्तूपं कुठे गेली? जमीनीत तर गाडली नाहीत.
आजच्या विषयाकडे जावूया,वरील वाचन केले तर महाबोधी महाविहार हे बौध्द धम्मीयांच्य मालकीचे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही.पण शंकराचार्याच्या पीठानंतर महाबोधी विहार विदेशी आर्यांनी म्हणजेच ब्रामहवृंदांनी आपल्या ताब्यात घेतले. महाविहारात जगभरातील बौध्द आदरपुर्ती पूजासाठी येत होते हे आठराशे वर्षापुर्वी ह्यू-एन-त्सँग सांगत असतील तर त्या बौध्द उपासकांकडून महाविहारात मोठ्या प्रमाणात दान केले जात असावे.आजही महाबोधी विहारात देश-विदेशातील बौध्द मोठ्या प्रमाणात दान करतात.बौध्द धम्मात दहा पारमितामध्ये दान पारमिता असल्याने बौध्द अनुयायी दान पारमिताला अन्ययसाधारण महत्व देतात. ‘दान जेथे ब्राम्हण तेथे’ हे सूत्र आजही हिंदू देवालयामध्ये दिसून येते.पंढरपुरातील विठ्ठल मंदिर असो,आंध्रातील तिरूपती मंदिर असो अथवा ओडिसा राज्याच्या पुरीतील जगन्नाथ मंदिर असो अथवा उत्तराखंडातील केदारनाथ मंदिर असो ही सारी मंदिर बौध्द विहार म्हणून प्रसिध्द होती.तेथे हजारोच्या संख्येने बौध्द वंदनासाठी येत होते.दान करत होते.त्या विहाराचं मंदिरात रूपांतर केल्याचे पुरावे बौध्द असतात.
भारतात ब्रिटीश साम्राज्य होते तेव्हा काही ब्रिटीश अधिकार्यांनी धम्माच्या संस्कृतीची ओळख असलेल्या अनेक विहार,स्तूप, शिलालेखांची खोज केली.त्यापैकीच एक अजंठा वेरूळची लेणींचा शोध घेतला.ब्रिटीश अधिकारी अलेक्झांडर कलिंघम यानी महाबोधी महाविहार हे बौध्दांचे असल्याचे सांगितले.कलिंंघमच्या काळी बिहार राज्यासह बहुतांशी भारत हा बौध्द धम्माच्या दृष्टीने शून्यवत होता.त्यामुळेच महाबोधी विहाराच्या मालकीसाठी संघर्ष करण्यासाठी बौध्द कमी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी 1956 ला धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या बरोबर लाखो बहुजनांनी धम्म दीक्षा घेतली आणि त्यानंतर आजपर्यंत भारतात रोज कुठे ना कुठे धम्म दीक्षा समारंभ होताना दिसतात.भिक्खूंच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे भिक्खू व बौध्दांना भारतातच नव्हे,तर जम्बुद्विप भारतात धम्माची वारसास्थळं असून ती आपणासकडे यावीत अशी मागणी करत आहेत.त्यापैकीच एक असलेले महाबोधी महाविहार.
स्वतंत्र भारत झाल्यानंतर महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात दिले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.संविधान लिहिले बौध्द महाउपासकाने.पण बौध्दांच्या हाती सत्ता नसल्याने संविधानाची अंमलबजावणी करणारे निघाले कर्मठ सनातनी.बुध्दगया मंदिर कायदा-1949 कायदा झाला.त्या कायद्यामध्ये महाबोधी महाविहाराल मंदिर असे संबोधले.तसेच त्या कायद्यानुसार महाबोधी महाविहाराच्या देखभालीसाठी एका समिती असण्याची तरतूद केली.त्या समितीमध्ये एकूण 9 सदस्यांपैकी पाच सदस्य हिंदू व चार बौध्द असतील. म्हणजे सर्वाधिक सदस्य हिंदूच असल्याने तेच संख्येच्या जोरावर निर्णय घेणार.चार बौध्द देखील त्यांचीच आहेत. ते केवळ नावालाच बौध्द आहेत. हे लक्षात घेवून भिक्खू संघाने गेल्या काही दिवसापुर्वी महाविहाराच्या आवारातच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू केले.17 दिवस आंदोलन सुरू राहिल्यानंतर बिहार पोलीसांनी रात्री अपरात्री येवून आंदोलन करणार्या भिक्खूंना जबदरस्तीने उचलून गाडीत घालून अज्ञातस्थळी नेले.बिहार राज्यातील सत्तेत भाजपचीही भागिदारी आहे.सद्या भाजपला या देशाला हिंदु राष्ट्र करायचा आहे.मग बिहारमधील भाजप सत्ताधीश महाबोधी विहार बौध्दांकडे देणे शक्य नाही.कारण ब्राम्हण्यवादी लोक एखाद्याचा धर्म कसा हायजॅक करण्यात, इतर धर्म कसे नालायक आणि आपलाच धर्म कसा लायक हे सांगण्यात पटाईत आहेत.
बौध्द धम्माला संपविण्यासाठी नानाविध षडयंत्र केलीत. पहिल्यांदा त्यानी बौध्द धम्मातील उत्सवावर आघात केला. धम्मातील उत्सव जेव्ह आहेत तेव्हा आपले उत्सव सुरू केले. दोन्ही उत्सवामध्ये 180 अंशाचा फरक राहणार नाही याची काळजी घेतली.त्यानंतर त्यानी बुध्दांना ब्रम्हदेव विष्णूचा नववा अवतार केला.अवतार पॅटर्न हा ब्राम्हण्यवाद्यांचाच. बौध्द स्तूप व विहारांचे मंदिरात रूपांतर केले.बौध्द लेण्याना पांडव लेणी करून टाकले व त्या ठिकणी पिंड बसवून शंकराचं ध्यानस्थ ठिकाण केले. ब्राम्हण्यवाद्यांनी जरा देखील बौध्द धम्माबद्दल सहानुभूती दाखवली नाही. परकीय मुस्लीमांना बुध्द मुर्ती फोडण्यास प्रोत्साहन दिले. सम्राट अशोक काळातही ते कुरघुड्या करत होते. पण सम्राट अशोक राजा यानी त्याना आसरा दिला. त्यांना बरोबरची स्थान दिले. त्याना संरक्षण दिले. हेच अंगलट आले. आजच्या राजकारणातीलही उदाहरण घेतले, तर काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता येत होती. तेव्हा काँग्रेस सत्ताधार्यांनी आपल्या धर्माचे म्हणून आरएसएसने स्थापन केलेल्या भाजप,विश्व हिंदू परिषदच्या लोकांना जवळ केले.पण आता भाजपची सत्ता येताच भाजप नेत्यांकडून ‘काँग्रेसमुक्त भारत’ ची घोषणा केली आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात ईडी,सीबीआय, इन्कम टॅक्स लावून त्याची तोंडे बंद केली जात आहे. विरोधकांची ताकद कमी करायची हाच नियम सर्व क्षेत्राासठी लागू आहे. सम्राट अशोक राजा यानी सम्यक ऐवजी टोकाचा मानवतावाद दाखवला. दि. 6 जून 1950 रोजी श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथील कार्यक्रमात बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सम्राट अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. यामुळे मी त्याला दोष देत आहे.सम्राट अशोकांने आपल्या कारकिर्दीत बौध्द धर्माशिवाय अशा अनेक धर्माना प्रचाराची मुभा देवून ठेवली होती की,जे बौध्द धर्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौध्द धर्माच्या विरूध्द असणार्या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौध्द धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते.’ पुंद्रवर्धन या जैन साधकाने महावीर समोर भगवान बुध्द नतमस्तक झालेले चित्र काढले होते ते सम्राट अशोक राजा याना समजल्यावर त्यानी पुंद्रवर्धनला पकडण्याचा हुकूम काढला. इतकेच नव्हे तर त्याच्या पंथातील सुमारे 18 हजार आजीवकांना ठार करण्यचे फर्मान काढले. काही काळाने पाटलीपूत्र येथे आणखीन एका जैन साधकाने असेच चित्र काढल्यानंतर त्या साधकाला व त्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याची आज्ञा केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यात तथ्थ असेल, तर हाच कठोरपणा सम्राट अशेक राजा यानी ब्राम्हण्यवाद्याबद्दल ठेवला असता तर आज एससी,एसटी एनटी, व्हीजेएनटी,ओबीसी, एसबीसी या प्रवर्गात जितक्याही जाती आहेत त्या जातीचे लोक बौध्द असते. त्याना सनातनी धर्मात जाण्याचा प्रसंगच उदभवला नसता,त्यांच्या डोक्यात काल्पनिक व अवतारी देव नावाची कल्पनाच मान्य झाली नसती,असे म्हणावे लागेल.सम्राट अशोक राजाशिवाय इतर बौध्द राजा म्हणजेच 6-7 शतकापर्यंत राजा हर्षवर्धन पर्यंत राजांनी देखील विदेशी आर्यांचे लाड केले असावेत तसेच त्यांच्या सनातनी धर्माला आश्रय दिला असावा.त्याशिवाय त्यांचे बळ वाढले नसावे.
गेल्या दहा वर्षापासून देशात पुन्हा ब्राम्हण्यवादाने उचल घेतली आहे. महाबोधी विहार हे बौध्दांचे आहे आणि राहणार आहे.आयोध्यातील राम मंदिराची देखभाल करण्यासाठी जसा हिंदूंना जैन,मुस्लीम,ख्रिश्चन, शीख,बौध्द चालत नाही,तर मग महाबोधी विहारात ब्राम्हण कसे? विहाराच्या आवारात श्राध्दपक्ष, होमहवन विधी का केला जात आहे? याला काँग्रेस पक्षाचे सरकार जबाबदार आहे. सन 2014 पुर्वीपर्यंत 1999 व 1977 चे काँगे्रसत्तर सरकार वगळता स्वतंत्र भारतात काँग्रेस पक्षाचेच सरकार केंद्रात होते. काँग्रेसचे सरकार असतानाही बौध्द भिक्खूंनी महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी केली.पण काँग्रेसमध्येही ब्राम्हण्यवादी होते. आता तर ब्राम्हण्यवाद्यांचीच सत्ता केंद्रात आहे. ते कदापीही महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देणार नाहीत. त्यासाठी बौध्दांनीच एकजूठ होवून महाबोधी विहारमुक्तीचे आंदोलन हाती घेतले पाहिजे. प्रसंगी सरकारवर ‘चल हल्ला बोल’ चा नारा दिला पाहिजे. टिळक,गोडसे,आपटे,सावरकर अशी कित्येक नाव सांगता येतात की त्यानी आपल्या देव व धर्मासाठी प्राणाची तमा केली नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी बौध्द धम्म का दिला याचा प्रत्येकांनी निट विचार केला पाहिजे.जर बौध्दच असू तर घरात धम्माचेच संस्कार घडवून पाहिजे.सर्व घरांतील धम्म संस्काराची मिळून संस्कृती होते आणि त्या संस्कृतीचा समाज होतो.अर्थात बौध्द समाज.डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मारणार्या वस्तीच्या दर्शनी बाजूला बौध्दवाडी,बौध्द समाज डॉ.आंबेडकर नगर भीमनगर,बुध्द नगर,सिध्दार्थनगर,पंचशील नगर वगैरे पाट्या वाचायला मिळतात, पण त्या वस्त्यां खर्याच बौध्द संस्कारमय झाल्या आहेत का? नसतील तर महाबोधी महाविहार ब्राम्हण्यवाद्यांच्या ताब्यातून मुक्त होण्याचेही कोणी स्वप्न पाहू नये.वल्गना करू नये.बौध्द पध्दतीने केवळ लग्न,गृहप्रवेश,मरणोत्तर विधी वगैरे घरातील समारंभ केले आणि इतरवेळी हिंदू धर्मातील सणवार,रूढी, परंपरा जपण्याने म्हणजे कोणी बौध्द होवू शकते का?
देवदास बानकर ९२२५८०६९९०,संपादक दैनिक मुक्तनायक
मधील ‘जे आहे ते’ या सदरातील संपादकीय लेख.कोल्हापुरातून गेले 17 वर्षे अखंडपणे नियमित सुरू असलेले पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सर्वाधिक खपाचे व लोकप्रिय दैनिक मुक्तनायक.
