“माणूस” म्हणून जगण्याची लायकी नसलेल्यांनी “फुले” चित्रपट बघूच नये!

बातमी शेअर करा.

काल नाशिकच्या दिव्या ॲडलॅब्समध्ये ‘फुले’ हा चित्रपट पाहिला.खरंतर पहिल्याच दिवशी पाहायचा निर्धार होता.पण शनिवारी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नाशिकच्या कालिदास कलामंदिरात विद्यार्थ्यांसाठी मोफत “लाइफ चेंजिंग सेमिनार” भारतीय हितरक्षक सभा,भारत या सामाजिक संघटनेच्या वतीने घेतला होता.म्हणून रविवारी,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत एकत्र येऊन हा सिनेमा पाहिला.

    रविवार असल्याने तिकीट मिळेल का..? याची शंका होती,पण सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शिंदे यांनी जवळपास ४० लोकांसाठी बुकिंग करून ठेवलं होतं. सिनेमागृहात पोहचलो,तेव्हा जवळपास १०० ते १५० प्रेक्षक हजर होते.मनात प्रचंड वेदना आणि संवेदनाशून्य होत चाललेल्या भारतीय समाजावर संताप येत होता.मध्यंतरी आलेला ‘पुष्पा’ सिनेमा दीड ते दोन महिने हाऊसफुल्ल चालला.त्याने भारतीय सिनेमा जगतातील पैशांचे सर्व रेकॉर्ड मोडले.पण ज्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक भारतीय घरात “शिक्षणाचा दिवा” प्रज्वलित करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक श्वास खर्च केला,त्या महानायकाच्या जीवनावर आधारित “फुले” पाहायला भारतीय प्रेक्षक फारसा फिरकत नाही,हे बघून भारतीय समाजाच्या मानसिक आणि बौद्धिक गुलामीची “किव” करावीशी वाटली…!

“पैशांचा प्रश्नच नाही….!” फुल्यांच्या कार्याला कधीच पैशाने मोजता येणार नाही. पण (१८४८ पासून २०२५) ..१७७ वर्षं उलटूनही भारतीय समाज आजही जुनाट, कुजकट रुढी-परंपरांच्या दलदलीत रुतलेला आहे.वरवर शिक्षित झाल्यासारखं भासतं, पण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारा “सुशिक्षितपणा” अजूनही त्यांच्या मेंदूत जन्मलेलाच नाही.खरा सुशिक्षितपणा असता,तर ‘फुले’ चित्रपटाला विरोध झाला नसता,आणि भारतीय समाजाने दुर्लक्षही केलं नसतं.गेल्या ३५ वर्षांपासून मी सामाजिक क्षेत्रात काम करताना भारतीय समाजाची मानसिकता जवळून अनुभवली आहे. हजारो वर्षांची गुलामगिरी,मानसिक गुलामी,आत्मगौरवाचा अभाव आजही ठळक दिसतो.महात्मा फुल्यांनी “सत्यशोधक समाज” निर्माण केला तो सत्यासाठी. पण आजही भारतीय माणूस सत्याला सामोरं जायला तयार नाही.त्याला वाटतं,एखादा अवतार येईल आणि त्याचं आयुष्य बदलेल…! 

   पुष्पा,टायगर,मर्द यांच्या अवास्तव कथा डोक्यावर घेतल्या जातात.पण त्या “काल्पनिक” नायकांनी तुमचं-आमचं काय भलं केलं? समाजाची परिस्थिती बदलली का? नाही…! पुष्पा चित्रपटात काय दाखवलं? एक अडाणी,अशिक्षित माणूस स्वाभिमानासाठी गुन्हेगारी मार्ग स्वीकारतो. सत्ता-संपत्ती आणि मवाली लोकांचा कळप गोळा करतो. अशा चित्रपटांतून समाजाला काय संदेश मिळतो? गैरवर्तनाचा,बेशिस्तीचा, अपशिष्टतेचा! “किती अक्कलशून्य झालाय भारतीय समाज…!”

   समाजहिताचा गंध नसलेल्या कथांना जयजयकार,आणि ज्यांनी प्राणपणाला लावून शिक्षणाचा झरा वाहिला त्या फुल्यांचा चित्रपट बघायला नकार…! या देशात ज्या महापुरुषांनी आणि महानस्त्रियांनी समाज उद्धारासाठी आपलं आयुष्यपणाला लावलं, त्यांच्या विचारांना आजही झिडकारलं जातं. आणि ज्या पाखंडी,लुटारू,अत्याचार करणाऱ्यांनी हा समाज पिळवटला त्यांच्या नावाचा गजर आजही केला जातो…! हा आहे भारतीय समाजाचा आजचा “दयनीय, लाजीरवाणा” चेहरा..! जोपर्यंत खरे नायक-नायिका ओळखले जात नाहीत,तोपर्यंत हा समाज “माणूस” म्हणून जगण्याच्या लायकीचाच नाही!. म्हणूनच,”माणूस” म्हणून जगायची लायकी नसलेल्यांनी ‘फुले’ चित्रपट पाहू नये…! अंधारातच भरकटत जगा..भूरट्या-भारट्यांचा जयजयकार करत जगा..!

 लेखन – किरण रामी बाबुराव (मोहिते)

संपर्क क्रमांक -9561883549,नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *