विचाराचं नातं हे रक्ताचा नात्यापेक्षाही अतूट असतं – प्रा. उत्तम भगत

बातमी शेअर करा.

मिरा-भाईंदरमध्ये ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
धम्मरॅली, प्रबोधन कार्यक्रम व धम्माधारित मॉडेल मेकिंग स्पर्धेने वेधले लक्ष

विशेष प्रतिनिधी भाईंदर : “आपल्याच रक्ताच्या नात्यातील दोनशे- अडीचशे वर्षापूर्वीच्या पूर्वजांचे नाव आपण विसरतो पण अडीच हजार वर्षापूर्वी जन्मलेल्या तथागत बुद्धाचे नाव आजही जगाच्या ओठावर आहे. याचं कारण म्हणजे विचारांच नातं हे रक्ताचा नात्यापेक्षाही अटूट असतं” असे  प्रतिपादन प्रा. उत्तम भगत यांनी केले.  
धम्म सम्राट अशोक बुद्धविहार व्यवस्थापन समिती, मिरा-भाईंदर यांच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोका विजयादशमी सोहळा मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी धम्मसम्राट अशोक बुद्धविहार, मुख्य सभागृह, रामदेव पार्क, मिरा रोड येथे विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी ते  बोलत होते.  
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता सामूहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर धम्माधारित मॉडेल मेकिंग स्पर्धेतील आकर्षक कलाकृतींचे दिवसभर प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला उपासक-उपासिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सायंकाळी ४ वाजता रामभाऊ म्हाळगी गार्डन चौक ते धम्मसम्राट अशोक बुद्धविहार,रामदेव पार्क या मार्गावर भव्य धम्मरॅली काढण्यात आली. बुद्ध,धम्म आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करत मोठ्या संख्येने धम्म अनुयायी या रॅलीत सहभागी झाले.
यानंतर झालेल्या प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मसम्राट अशोक बुद्धविहार व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष आयु.राजेश बडेकर होते. यावेळी प्रा. उत्तम भगत यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर वंदनीय भन्ते प्रज्ञावंत यांनी उपस्थितांना धम्मदेसना देऊन धम्ममार्गाचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव आयु. विलास जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन सकपाळ यांनी केले.

धम्म सम्राट अशोक बुद्ध विहारच्या सांस्कृतिक विभागातर्फे आंबेडकरी चळवळीवरील प्रेरणादायी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.या कार्यक्रमाला मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता, मिरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती,प्रबुद्ध विचार मंच,आदर्श सेवा सेवाभावी संस्था, सम्यक विचार सामाजिक संस्था,मिरा भाईंदर बुद्धिस्ट पीपल्स फाऊंडेशन, संबोधी महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ  आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच परिसरातील अनेक धम्म उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील ठाण्याचे कर्मवीर सुनील खांबे यांच्या दुःखद निधनाबद्दल सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने सुरू केलेल्या मिरा-भाईंदर महापौर सहायता निधीस धम्म सम्राट अशोक बुद्धविहार व्यवस्थापन समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदतीचा धनादेश आमदार नरेंद्र मेहता व स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
“धम्माधारित मॉडेल मेकिंग स्पर्धेचे निकाल”
धम्माधारित मॉडेल मेकिंग स्पर्धेत सरिता सचिन शिंदे व परिवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला असून तो पराग दवाळे व परिवार तसेच समीक्षा लोखंडे व परिवार यांनी मिळविला. तृतीय क्रमांक ज्योती प्रदीप कांबळे व परिवार यांनी पटकावला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सुनील धापसे, प्रा. डॉ. विवेक वानखेडे, सीए. लदिका रुके व राजेश कणेरी यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रज्ञा रामटेके, सांची क्रिएशन, आम्रपाली घाडगे, धनश्री मोहिते,  
सतेज जावळे, मीना गायकवाड, संजय तायडे, सिद्धार्थ खंडेराव, विवेक सोनावणे, सुनील जाधव, लदिका रुके, किरण सोनतोडे, शकुन गायकवाड, ॲड. शाम सहारे, माया लहुजी तायडे, हरिश्चंद्र शिंदे, अशोक साळवे व रवि अहिरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला वंदनीय भन्ते कीर्तीपियो  नागसेन महाथेरो,अनिल भगत, प्रा.भास्कर पैठणकर, विद्याधर किरतावडे, इकबाल महाडिक, अनंत शिर्के, अर्जुन तायडे, नम्रता पवार, प्रफुल्ल पुरळकर, सिध्दार्थ नगरकर, ॲड. सचिन साळवी, सिद्धार्थ इंगळे, मच्छिंद्र खरात, राजेश कणेरी, संतोष तांबे आदींची  विशेष उपस्थिती लाभली.  
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धविहार व परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मसम्राट अशोक बुद्धविहार व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सागर तायडे यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *