“कामगार संघटनेच्या ८ प्रमुख मागण्या; कायम नोकरी,घरे,जुनी पेन्शन व सुरक्षा साधनांवर भर”

बातमी शेअर करा.

 घन कचरा विभागातील कंत्राटीकरण धोरणाविरोधात कामगार संघटनेचे निवेदन‌.

बृहनमुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात राबविल्या जाणाऱ्या कंत्राटीकरण धोरणाविरोधात ‘स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन’ने १८ ऑगस्ट २०२५ रोजी ईमेलद्वारे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात काही मुद्द्यांवर आक्षेप नोंदवून कामगारांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी संघटनेने केली आहे.  

संघटनेच्या मते,२८ जुलै २०२५ रोजी महापालिका प्रशासन आणि काही कामगार संघटनांदरम्यान झालेल्या करारातील बाबींबद्दल घन कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती.त्यामुळे कामगारांना विश्वासात न घेता झालेल्या या कराराला संघटनेने देखील विरोध दर्शविला आहे.  

संघटनेच्या प्रमुख मागण्या :  

– खाडा बदली कामगारांना त्यांच्या रुजू दिनांकापासून कायमस्वरूपी सेवेत सामावून, आर्थिक व सेवाज्येष्ठतेचे हक्क द्यावेत.  

– कंत्राटदारांच्या वाहनांवरही महापालिकेचे कायमस्वरूपी कामगार ठेवावेत.  

– सफाई कामगारांना परवडणारी घरे मुंबईतच मिळावीत.म्हाडा आणि एसआरए (SRA) प्रकल्पांतील वसाहतींमध्ये सवलतीच्या दरात घरे उपलब्ध करून द्यावीत.  

– बायोमेट्रिक हजेरीतील दोषांमुळे होणाऱ्या वेतन कपातीचा प्रश्न त्वरित सोडवावा.  

– मूळ वेतनाच्या किमान १० टक्के “धोकादायक काम भत्ता” लागू करावा.  

– हातमोजे, मास्क, गमबूट यांसह आवश्यक सुरक्षासाधने नियमित व दर्जेदार पुरवावीत.  

– सफाई कामगारांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी.  

– जानेवारी २००८ पूर्वी वारसा हक्क प्रकरणे सुरू असली तरी विलंबामुळे ज्यांची नियुक्ती १ मे २००८ नंतर झाली, त्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी.  

– कामगारांसाठीची विद्यमान पाच लाख रुपयांची विमा योजना वाढवून १५ लाख रुपयांपर्यंत करावी.  

संघटनेने नमूद केले आहे की, शहराची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेचे सध्याचे कामगार सक्षम आहेत. प्रशासनाला अतिरिक्त मनुष्यबळ वा वाहनांची गरज असल्यास, ती कंत्राटाऐवजी महापालिकेच्या मालकीची वाहने घेऊन आणि कायमस्वरूपी कामगार नियुक्त करून भागवावी,असेही निवेदनात म्हटले आहे.  

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कामगार आयुक्त तसेच आमदार उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आली आहे.या गंभीर प्रश्नात हस्तक्षेप करून न्याय्य तोडगा काढण्यात यावा,अशी अपेक्षाही युनियनने व्यक्त केली आहे.

आपला नम्र, 

श्री.रविंद्र सुर्यवंशी (सरचिटणीस) स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *