हा लेख धर्माविरुद्ध नव्हे,तर धर्माच्या नावावर विवेक गहाण ठेवणाऱ्या अंधभक्तीविरुद्ध असा आहे.

“धर्म श्रद्धेत सुंदर दिसतो; पण तो विवेकावर बसला की माणसाला अंध करतो.”
आज प्रश्न हिंदू कोण,मुस्लिम कोण,राष्ट्रवादी कोण, देशद्रोही कोण हा नाही.आजचा खरा प्रश्न आहे.आपण विचार करणारे नागरिक आहोत की कोणाच्या तरी नावावर जगणारे अनुयायी?.कारण गेल्या काही वर्षांत आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात एक विचित्र बदल दिसतो आहे.वर्तमान जळत आहे,भविष्य धूसर होत आहे; पण चर्चा मात्र सतत भूतकाळाच्या राखेतून पेटवली जाते.इतिहासाचा अभ्यास जरूर करा.रामाचा आदर करा.धर्मावर श्रद्धा ठेवा. देशावर प्रेम करा.पण एकदा स्वतःच्या मुलाच्या डोळ्यांत पाहून विचारा. “उद्याचा भारत त्याच्यासाठी नेमका कसा असणार आहे?” हा प्रश्न जर पडत नसेल,तर भक्तीपेक्षा आधी विवेकाची गरज आहे.भूतकाळाच्या राखेत भविष्याचा दिवा शोधता येत नाही!.
भूतकाळ महत्त्वाचा असतो.पण भूतकाळातच कायम तोंड खुपसून बसणारा समाज भविष्य घडवत नाही.घरात आज चूल पेटत नसेल तर पणजोबांनी किती सुंदर घर बांधले होते याची कथा सांगून पोट भरत नाही.मुलगा बेरोजगार असेल तर हजार वर्षांपूर्वी कोण जिंकले आणि कोण हरले याने त्याची नोकरी लागत नाही.शिक्षण व्यवस्था ढासळत असेल तर जुन्या वैभवाच्या गोष्टी मुलाच्या हातात पदवी देत नाहीत.रुपयाची किंमत घसरत असेल तर घोषणांनी बाजारभाव कमी होत नाही.आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर कर्जाचे ओझे वाढत असेल तर “आपण विश्वगुरू होणार” एवढे म्हणाल्याने जग आपल्याला विश्वगुरू मानत नाही.राष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नव्हे, कामगिरीने निर्माण होते.पण विचित्र काय आहे माहिती आहे?.
भारताच्या आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक आणि मानवी विकासाच्या निर्देशांकांवर चर्चा करण्यापेक्षा काहींना सतत हिंदू कोण?, पाकिस्तान काय करतो?,कोण रामाचा भक्त?,कोण राष्ट्रवादी?,कोण विरोधक? यातच रस असतो. का? कारण हे प्रश्न भावनिक आहेत.आणि भावनिक माणूस प्रश्न विचारण्याऐवजी प्रतिक्रिया देतो.जिथे विवेक कमी पडतो, तिथे भावनेचा बाजार भरतो.अंधभक्तीची खरी अडचण धर्म नाही- विवेकाचा अभाव आहे.हिंदू धर्म महान आहे असे म्हणण्यासाठी दुसऱ्याला लहान करण्याची गरज नाही.राम महान आहेत हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानची निंदा करण्याची गरज नाही.भारत महान आहे हे सांगण्यासाठी शेजाऱ्याला कमी लेखण्याची गरज नाही.स्वतःची उंची सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची उंची कापावी लागत असेल, तर आपल्या उंचीवरच संशय घ्यावा लागतो.पण आज परिस्थिती अशी झाली आहे की-नेत्यावर प्रश्न विचारला की धर्म धोक्यात येतो.सरकारवर टीका केली की राष्ट्र धोक्यात येते.आकडे विचारले की देशद्रोह आठवतो.बेरोजगारीचा प्रश्न विचारला की विरोधक आठवतो.महागाई विचारली की पाकिस्तान आठवतो.शिक्षण विचारले की इतिहास आठवतो.आणि भविष्याचा प्रश्न विचारला की ‘दिमागी नक्षल’ आठवतो! ही अवस्था चिंताजनक नाही का? तरुण प्रश्न विचारतो म्हणून ‘दिमागी नक्षल’?.

तरुणाच्या डोक्यात विचार आहेत.त्याला स्वतःच्या आयुष्याचा हिशेब हवा आहे.त्याला चांगले शिक्षण हवे आहे.त्याला रोजगार हवा आहे.त्याला सुरक्षित भविष्य हवे आहे.त्याला जगाशी स्पर्धा करायची आहे.तो विचारतो-“मी कुठे उभा आहे?” आणि जर या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्याच्या कपाळावर एखादा शिक्का मारला गेला, तर प्रश्न त्या तरुणाचा नाही.प्रश्न आपल्या लोकशाहीच्या मानसिकतेचा आहे.विरोध म्हणजे देशद्रोह नाही.प्रश्न म्हणजे बंड नाही.आंदोलन म्हणजे अतिरेकीपणा नाही.आणि सरकारवर टीका म्हणजे राष्ट्राचा अपमान नाही.लोकशाहीत सत्तेला प्रश्न विचारणारा नागरिक हा शत्रू नसतो; तो सत्तेला आरसा दाखवणारा पहारेकरी असतो.लाठीचा आवाज मोठा असतो; पण विचाराचा प्रतिध्वनी त्याहून मोठा असतो.आंदोलन झाले तर संवाद करा.प्रश्न पडले तर उत्तर द्या.असंतोष असेल तर कारण शोधा. युवक रस्त्यावर आला तर त्याच्या हातात दगड पाहण्यापूर्वी त्याच्या मनातली निराशा वाचा.कारण प्रत्येक आंदोलनाच्या मागे देशद्रोह नसतो.कधी त्यामागे असतो.अन्याय,असुरक्षितता,बेरोजगारी,अवमान,भविष्याची भीती.लोकशाहीची ताकद पोलिसांच्या लाठीत नसते.ती संवादाच्या टेबलावर असते.आता आपल्या मुलांकडे पाहा! तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, यापेक्षा तुमचा मुलगा कोणत्या दर्जाचे शिक्षण घेणार आहे हा प्रश्न मोठा नाही का? तुम्ही कोणाला मत देता, यापेक्षा तुमच्या मुलाला नोकरी मिळणार आहे का हा प्रश्न मोठा नाही का?.तुम्ही पाकिस्तानबद्दल काय बोलता, यापेक्षा तुमचा मुलगा जगातील तरुणांशी स्पर्धा करू शकेल का हा प्रश्न मोठा नाही का?.आज जग ज्ञान, संशोधन, AI, robotics, biotechnology, advanced manufacturing, clean energy आणि innovation मध्ये पुढे जात आहे.आणि आपण अजूनही मुलांच्या डोक्यात-“तू कोणत्या धर्माचा?” हा पहिला प्रश्न भरत असू तर उद्याचा भारत कोण घडवणार? विदेशात जाणारा तरुण देशद्रोही नसतो; तो संधी शोधत असतो.

भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात.हा प्रश्न विद्यार्थ्यांचा देशद्रोह नाही.हा प्रश्न आपल्या शिक्षणव्यवस्थेने स्वतःला विचारायचा आहे. “माझी मुले मला सोडून बाहेर का जात आहेत?” जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये आपली मुले शिकायला जात असतील तर अभिमान आहे.पण जर त्यांना इथे दर्जेदार संशोधन, रोजगार, प्रयोगशाळा, उद्योग-संलग्न शिक्षण आणि भविष्य दिसत नसेल तर- ही केवळ मुलांची समस्या नाही; ही राष्ट्राच्या दिशेची समस्या आहे.गोबर-मूत्राच्या पलीकडेही एक जग आहे!.ही भाषा कुणाच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्यासाठी नाही.गोमाता बद्दल श्रद्धा असू शकते.गोमूत्राबद्दल धार्मिक समज असू शकतो.पण राष्ट्राची संपूर्ण वैज्ञानिक,आर्थिक आणि बौद्धिक दिशा एवढ्यापुरती मर्यादित करता येत नाही.आज जग quantum computing कडे धावत आहे.ए आय मध्ये क्रांती होत आहे.अवकाश संशोधन पुढे जात आहे.नवीन औषधे तयार होत आहेत.
रोबोटिक्स वाढत आहे.नवीन ऊर्जा तंत्रज्ञान विकसित होत आहे.आणि आपण जर अजूनही-“आमचा धर्म मोठा की तुमचा?” या वादात अडकून बसलो तर जग आपल्याकडे पाहून हसेल. धर्म ठेवा; पण विज्ञान गमावू नका.श्रद्धा ठेवा; पण विवेक विकू नका.अंधभक्तीचा सर्वांत मोठा तोटा कोणाचा? सरकारचा नाही.नेत्याचा नाही.पक्षाचा नाही.तुमच्या स्वतःच्या मुलाचा! कारण आज तुम्ही प्रश्न विचारला नाही तर उद्या त्याला उत्तर मिळणार नाही.आज तुम्ही शिक्षणाचा प्रश्न विचारला नाही तर उद्या त्याची संधी कमी होईल.आज तुम्ही रोजगाराचा प्रश्न विचारला नाही तर उद्या त्याचा आत्मविश्वास तुटेल.आज तुम्ही लोकशाहीच्या संस्थांबद्दल प्रश्न विचारला नाही तर उद्या त्याच्या मताची किंमत कमी होऊ शकते.म्हणून अंधभक्ती ही फक्त राजकीय भूमिका नाही.ती पुढच्या पिढीवर टाकलेली मानसिक जबाबदारी आहे.
एक अभंग विचारासाठी
देव माझा हृदयी । विवेक माझ्या मनी ।
नेता चुकला तरी । प्रश्न राहो ओठी ॥
देश मोठा पक्षाहुनी । संविधान श्रेष्ठ सत्तेहूनि ।
डोळे उघडे ठेवुनी । चालावे भारतभूवनी ॥
देशप्रेमाचा अर्थ बदलायला हवा.देशप्रेम म्हणजे झेंडा हातात घेणे-हो.पण देशप्रेम म्हणजे कर भरणेही.देशप्रेम म्हणजे सैनिकाचा सन्मान-हो.पण शेतकऱ्याचा सन्मानही.देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत – हो.पण संविधानाचा आदरही.देशप्रेम म्हणजे सीमा सुरक्षित ठेवणे-हो.पण देशातील नागरिकाला सुरक्षित भविष्य देणेही.देशप्रेम म्हणजे पाकिस्तानवर राग-असेलही.पण त्यापेक्षा भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवण्याची जिद्द अधिक महत्त्वाची.भक्ती व्यक्तीवर नको; मूल्यांवर असावी.व्यक्ती आज आहे, उद्या नसेल.पक्ष आज सत्तेत आहे, उद्या नसेल.सरकारे येतील-जातील.पण देश राहणार आहे.संविधान राहणार आहे.आणि आपल्या मुलांची पिढी राहणार आहे.म्हणून-नेत्यावर प्रेम करा, पण विवेक गहाण ठेवू नका.धर्मावर श्रद्धा ठेवा, पण माणुसकी विसरू नका.देशावर प्रेम करा, पण देशाच्या नावाने प्रश्न विचारणे थांबवू नका.कारण खरा देशभक्त तोच-जो देशाला आरसा दाखवण्याचे धैर्य ठेवतो.शेवटचा प्रश्न-फक्त स्वतःला विचारा.उद्या तुमचा मुलगा तुमच्यासमोर उभा राहून विचारेल- “बाबा, तुम्ही आमच्यासाठी काय ठेवून गेलात?” तेव्हा तुम्ही त्याला काय सांगणार?
एक धर्म? एक जात? एक नेता? काही घोषणा? काही व्हिडिओ? काही जयघोष? की एक मजबूत शिक्षणव्यवस्था,एक सक्षम अर्थव्यवस्था,एक सुरक्षित लोकशाही,एक स्वाभिमानी देश आणि प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य? उत्तर आज द्यायचे आहे.कारण उद्याची पिढी आपल्याला माफ करेलच असे नाही.“आज डोळे मिटले तर उद्या अंधार आपला नसतो; तो आपल्या लेकरांच्या वाट्याला येतो.” म्हणून आता तरी-धर्माच्या पगडीखालून विवेक बाहेर काढा.नेत्याच्या सावलीतून स्वतःचे डोके बाहेर काढा.भूतकाळाच्या राखेतून वर्तमान उचला.आणि भविष्याच्या दिशेने चालायला सुरुवात करा. कारण भारताला अंधभक्तांची गर्दी नको; भारताला जागे, विचार करणारे आणि प्रश्न विचारणारे नागरिक हवेत.देश कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठा आहे. आणि भारताचा उद्या-आजच्या आपल्या विवेकावर अवलंबून आहे
बाबाजी हुले ९८२०६४७८१४,कामोठे नवी मुंबई

