पहिले राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची एकमताने निवड.

बातमी शेअर करा.

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची वैचारिक मशाल अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही घोषणा गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी सुभेदारी गेस्ट हाऊस, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत परिवर्तनवादी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली.रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे हे एकदिवसीय साहित्य संमेलन उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, उद्योजक अँड. रामेश्वर तायडे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.हे संमेलन निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रतन कुमार साळवे हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.


   परिवर्तनवादी साहित्याची समृद्ध परंपरा अधिक बळकट करणे, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा जागर करणे, संविधानिक लोकशाही, सामाजिक न्याय, बंधुता, स्त्री-पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वंचितांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे संयोजन समितीने सांगितले.साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाच्या जडणघडणीचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे परिवर्तनवादी साहित्यिक, कवी, विचारवंत, लेखक, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून वर्तमान सामाजिक वास्तवावर वैचारिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न या संमेलनातून करण्यात येणार आहे. विविध परिसंवाद, वैचारिक सत्रे, साहित्यिक चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचारांची व्यापक मांडणी करण्यात येणार आहे.संमेलनाच्या मुख्य संयोजन समितीमध्ये मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. शिवाजी वाठोरे, इंजि. राजधर दांडगे, डॉ.धनराज गोंडाने,भीमराव सरवदे, डॉ.यशवंत खडसे, प्रा.विजयकुमार गवई,
 अँड.डी.व्ही.खिल्लारे, डॉ. संगीता अंभोरे, प्रा.डॉ.प्रज्ञा साळवे, डॉ.धोंडोपंत मानवतकर,डॉ.मधुकर दिवेकर,बाबुराव बनसोडे,गंगाताई सुरडकर,रत्नाकरभाई खंडागळे, विद्या साळवे, धम्मप्रिया खरात, कांचन सदाशिवे आणि श्रावण कोळनूरकर यांचा समावेश असून संमेलन यशस्वी करण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत.परिवर्तनवादी साहित्याच्या चळवळीला नवे वैचारिक बळ देणारे आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला साहित्यिक अधिष्ठान देणारे हे संमेलन ठरेल, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला.पत्रकार परिषदेस संयोजन समितीचे पदाधिकारी, प्रा.शिवाजी वाठोरे,अँड.रामेश्वर तायडे, रतनकुमार साळवे, डॉ.धनराज गोंडाने,भीमराव सरवदे, अँड.डी. व्ही. खिल्लारे, रतनभाई खंडागळे, भीमराव गाडेकर, डॉ.मधुकर दिवेकर, कांचनताई सदाशिवे,रमेश वानखेडे आदी उपस्थित होते.

रतनकुमार साळवे,संभाजी नगर यांस कडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *