
धार्मिक कर्मकांडांचे अनावश्यक खर्चाविषयी समाजातील कर्मठ धार्मिक नेते व समाज बांधव यांना थेट प्रश्न विचारणारा तसेच भारतीय संविधान ओबीसी,आरक्षण,आंदोलन, सामाजिक न्यायाची जाणीव समाजात रुजविणारा वैचारिक प्रवास करत करत प्रमोद दादा सुर्यवंशी हे आज सुतार समाजात वंचित,शोषित,पिडीत,मागास,गरीब यांच्यासाठी आज सामाजिक वैचारिक हत्यार तयार झाले आहे.समाज परिवर्तनाची सुरुवात नेहमी मोठ्या विचार पीठावरून होत नाही. कधी कधी ती एका सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेल्या एका प्रश्नापासून होते.त्या प्रश्नाचे रूपांतर विचारात झाले, विचार लेखणीत उतरले आणि लेखणीने समाजातील वंचित,उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना आवाज दिला,तर तो विचार सामाजिक परिवर्तनाचे साधन बनतो.श्री.प्रमोद सूर्यवंशी यांचा वैचारिक प्रवास याच प्रक्रियेचे एक उत्तम उदाहरण म्हणून नक्कीच पाहता येईल.
विश्वकर्मीय सुतार समाजाच्या सामाजिक जीवनात रूढ झालेल्या अनेक धार्मिक आणि सामाजिक प्रथांप्रकांडे याकडे आज नव्या दृष्टीने पाहण्याची नितांत गरज आहे‘’शादिराम घरजोडे’’ व्यवस्था ही त्याच चर्चेतीलच एक महत्त्वाची बाब आहे.डोक्याची केस-मुंज,खांद्यावरील दोरा-जानवे,धार्मिक सप्ताह,विविध धार्मिक विधी आणि खर्चिक सण-समारंभ यावर होणाऱ्या मोठ्या खर्चाबाबत सामाजाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे.मात्र श्रद्धेच्या नावाखाली होणारा अनावश्यक समाजाचा आर्थिक खर्च, जाती प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून निर्माण होणारा ताण आणि समाजातील गरीब कुटुंबांवर पडणारे आर्थिक ओझे यावर प्रश्न उपस्थित करणे हे श्रद्धेविरोधी नसून सामाजिक विवेकाचा भाग आहे.याच ठिकाणी प्रमोद दादा सूर्यवंशी यांच्या लेखणीचे महत्त्व अधोरेखित होते.
कधीकाळी स्वतःच्याच समाजातील काही श्रीमंत किंवा,प्रभावशाली नेतृत्व वर्गाने ज्या प्रमोद दादांना“अडाणी,कमी शिकलेला”म्हणून हिणवले,त्याच प्रमोद दादा व्यक्तीने परिस्थिती समोर हार न मानता स्वतःचा वैचारिक प्रवास सुरू केला.भारतीय संविधानाचा अभ्यास,सामाजिक न्यायाची संकल्पना,ओबीसी सुतार समाजाचा प्रश्न,आरक्षणाचे महत्त्व आणि वंचित घटकांच्या हक्कांचा विचार यांचा त्यांनी सातत्याने वेध घेतला.
शिक्षण म्हणजे केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र नव्हे.समाजात समजून घेण्याची क्षमता तसेच प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि अन्याया विरुद्ध आवाज उठविण्याची जिद्द ही देखील शिक्षणाचीच एक व्यापक प्रक्रिया आहे.जेंव्हा एखादा सामान्य माणूस आपल्या अनुभवातून सामाजिक प्रश्न समजून घेतो आणि त्याला संविधानिक विचारांची जोड देतो,तेंव्हा त्याचा आवाज व्यक्तिगत राहत नाही.तो आवाज समाजातील त्या असंख्य लोकांचा आवाज होतो.ज्यांना स्वतःच्या प्रश्नांना शब्द देता येत नाही नेमके प्रमोद सूर्यवंशी त्यांच्या लेखनात याच वंचित वर्गाच्या प्रश्नांना जाहीर आवाज देण्याचा विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून प्रयत्न दिसून येतो.

संविधानाचा विचार म्हणजेच समाजासाठी परिवर्तनाचा विचार होय.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे.सामाजिक न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता ही संविधानाची मूलभूत मूल्ये आहेत. त्यामुळे समाजातील कोणतीही रूढी,परंपरा किंवा व्यवस्था ह्या समाज प्रश्नांच्या हिताच्या पलीकडे असू शकत नाही.“ही प्रथा किती जुनी आहे ?” यापेक्षा “ती आजच्या समाजासाठी किती उपयुक्त आहे?”हा प्रश्न विचारणे अधिक महत्त्वाचे आहे.
ओबीसी समाजाच्या संदर्भातही हीच वैचारिक भूमिका आवश्यक आहे.. ओबीसी आरक्षण हा केवळ काही जागांचा विषय नसून सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायाच्या व प्रतिनिधित्व चा हक्क अधिकार प्रक्रियेचा भाग आहे.त्यामुळे ओबीसी समाजाने आपल्या संविधानिक अधिकारांचा,सामाजिक इतिहासाचा आणि आरक्षणाच्या भूमिकेचा अभ्यास करणे आवश्यक आहे..या जाणिवेतून निर्माण होणारी सामाजिक जागृती ही कोणत्याही व्यक्ती विरोधातील चळवळ नसून अज्ञान,अन्याय आणि सामाजिक विरुद्धची वैचारिक चळवळ ठरते.
खर्चिक धार्मिक प्रथा पेक्षा समाजात शिक्षणाला प्राधान्य द्यावे..आज गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर अनेक आर्थिक प्रश्न आहेत.मुलांचे शिक्षण,उच्च शिक्षण,रोजगार निर्मिती,आरोग्य,घर आणि भविष्यासाठी बचत या गरजा महत्त्वाच्या आहेत.अशा परिस्थितीत केवळ सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा“लोक काय म्हणतील?” या दबावामुळे होणारा अनावश्यक खर्च समाजाने विचारात घ्यायला हवा.धार्मिक कार्यक्रम करायचे की नाही,कोणत्या पद्धतीने करायचे,याचा निर्णय प्रत्येक कुटुंबाचा असू शकतो.परंतु,धार्मिक खर्चापेक्षा शिक्षण,कौशल्य,रोजगार आणि सामाजिक प्रबोधनाला प्राधान्य देता येईल का?हा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे.याच प्रश्नातून समाजात सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होते.
वंचितांच्या आवाजाला वैचारिक धार देण्याचे काम प्रमोददादा सूर्यवंशी सतत करत असतात.दादांचा संघर्ष केवळ एखाद्या धार्मिक प्रथे विरोधातील संघर्ष म्हणून पाहणे अपुरे ठरेल.त्यांच्या लेखणीने वंचित,उपेक्षित,गरीब आणि मागास समाज घटकांच्या प्रश्नांना वैचारिक चौकट देण्याचा प्रयत्न केला आहे.ज्या व्यक्तीला कधीकाळी कमी लेखले गेले,त्याच व्यक्तीने जेव्हा संविधानाचा विचार आत्मसात केला,ओबीसी समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास केला आणि त्या विचारांना निर्भीडपणे समाजा समोर मांडले,तेव्हा त्याची लेखणी एका व्यापक सामाजिक संवादाचे माध्यम बनते गेली.
विचारांचा संघर्ष हा व्यक्तींचा संघर्ष नसतो. तो जुन्या रूढ कल्पना आणि नव्या सामाजिक जाणिवांमधील संवाद असतो.त्यामुळे मतभेद असतील,टीका होईल,विरोध होईल पण प्रश्न विचारण्याची प्रक्रिया मात्र थांबता कामा नये.
“शादिराम-घरजोडे”व्यवस्थेसमोरील वैचारिक आव्हान उभे करण्याचे काम प्रमोददादा सुर्यवंशी यांनी केले आहे.”शादिराम घरजोडे’ ही व्यवस्था जर धार्मिक परंपरा आणि सामाजिक रूढींचे प्रतीक मानली,तर तिच्यासमोर उभे राहणारे सर्वात मोठे आव्हान कोणत्याही व्यक्तीचे नाव नसून वैचारिक जागृतीचे आहे.जेव्हा समाजातील सामान्य माणूस प्रश्न विचारू लागतो,संविधान वाचू लागतो,आपल्या हक्कांची माहिती करून घेऊ लागतो.धार्मिक रूढींकडे चिकित्सक दृष्टीने पाहू लागतो आणि मुलांच्या शिक्षणाला सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्त्व देऊ लागतो,तेंव्हा कोणतीही कालबाह्य व्यवस्था आपोआपच प्रश्नांच्या भोवऱ्यात येते.म्हणूनच प्रमोद सूर्यवंशी यांची लेखणी ही केवळ व्यक्तीची लेखणी न राहता प्रश्न विचारण्याचे आणि वैचारिक प्रबोधनाचे प्रतीक बनते.

समाज-परिवर्तनासाठी मोठी संपत्ती,मोठे पद किंवा मोठी राजकीय ताकदच आवश्यक असते असे नाही.तर कधी कधी एका सामान्य माणसाची जिद्द,त्याचा अभ्यास आणि निर्भीड लेखणी ही समाजात नवा वैचारिक संवाद सुरू करू शकते.आज गरज आहे ती व्यक्ति पूजेची नव्हे,तर विचारांच्या चिकित्सेची.गरज आहे ती अंधानुकरणाची नव्हे,तर संविधानिक जाणिवेची.गरज आहे ती अनावश्यक खर्चाच्या सामाजिक प्रतिष्ठेची नव्हे,तर शिक्षण आणि प्रगतीच्या प्रतिष्ठेची.आणि म्हणूनच ज्याला कधीकाळी“अडाणी” म्हणून हिणवले गेले,त्याच माणसाची लेखणी जेंव्हा संविधान,सामाजिक न्याय आणि ओबीसी हक्कांची भाषा बोलू लागते,तेव्हा ती लेखणी केवळ शाईने लिहित नाही,ती समाजाच्या जखमांवर बोट ठेवते,प्रश्न उपस्थित करते आणि परिवर्तनाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करते.
विश्वकर्मीय सुतार समाजात धार्मिक शादिराम व्यवस्थेला हादरा देणारे खरे हत्यार कोणते असेल,तर ते तलवार नाही तर ते आहे यांचे जागृत विचार,संविधानिक जाणीव आणि निर्भीड लेखणी.आणि त्या लेखणीचे नाव आहे प्रमोद सूर्यवंशी.भूतकाळात नेते बोलत समाज ऐकत असे.अगदी नेते चुकले तरी समाज गप्प ऐकत असे.यात अनेको वर्ष समाजाची गेली.समाज ससदीचा वापर कधी योग्य,अयोग्य झाला पण परिणाम,बदल ,व्यवस्थेत हिस्सेदारी समाजाला मिळाली नाही.समाजाची साधने संसाधने खर्च झाली तरीही समाजात ना परिवर्तन झाले ना समाज हिस्सेदारी निर्माण झाली.समाजावर जात नेते यांचा नेहमी दबाव राहिला.पण काळ बदलला समाजात सामाजिक विचारांची माणसे तयार होऊ लागली.
त्यातच प्रमोद सुर्यवंशी यांचा सहभाग सामाजिक विचारातून मग बोलते सुधारकांकडून कर्ते सुधारक म्हणून होऊ लागला.मग या नेत्यांना थेट जाब विचारणारी संस्कृती प्रमोद सुर्यवंशी यांनी निर्माण केली.समाज चळवळींच्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांनी जात नेत्यांना थेट ३०/४० वर्तमानपत्रातून थेट जाहीर आवाहन,आव्हान देत समाजात खळबळ मात्र उडवून दिलेली आहे.
यातून मग थेट स्वयंघोषित नेतेगिरीलाच चाप लावणारे म्हणून प्रमोद सुर्यवंशी यांची सामाजिक दादागिरी समाजात लोकप्रिय झाली.समाजातील सर्वसामान्य कार्यकर्ता यांना प्रगत सामाजिक विचार,भारतीय संविधान,ओबीसी विचारधारा यांची गोडी लावणारा व समाजातील थेट जात नेत्यांना जाब विचारण्यासाठी प्रमोद दादा सूर्यवंशी यांचे थेट लिखाण सामान्य कार्यकर्ता यांच्याकडून एक”वैचारिक हत्यार”म्हणून होऊ लागला.यामुळे समाजात काम करण्यासाठी आदर्श विचारधारा पुढे येऊ लागली.प्रमोद सुर्यवंशी यांचे वैचारिक हत्यार हे विश्वकर्मा सुतार समाजाच्या प्रगतीसाठी निश्चितच बहुमोल उपयोग ठरेल यात मात्र शंकाच नाही.
लेखक-अनिल सोमवंशी,९६२३६५७३४२,मार्शल सुतार ग्रुप.

