
अलीकडे काही शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि संघटित क्षेत्रातील मित्रांशी चर्चा करत होतो. त्या चर्चेतून एक प्रश्न सतत मनात घोळत राहिला.आजची पिढी आणि कालची पिढी यांच्यामध्ये एवढी मोठी दरी का निर्माण झाली आहे?
आज अनेक शिक्षक, सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि संघटित क्षेत्रातील कामगार यांनी आयुष्यभर कष्ट करून घरे बांधली, जमीन घेतली, संसार उभा केला, मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांना नियमित वेतन मिळाले, नोकरीची सुरक्षितता मिळाली, भविष्य निर्वाह निधी मिळाला, पेन्शन मिळाली आणि सामाजिक सुरक्षा मिळाली.पण आज त्यांच्या मुलांची परिस्थिती काय आहे?
वास्तव हे आहे की अनेकांची मुले-मुली आपल्या आई-वडिलांपेक्षा जास्त शिकलेली आहेत. बी.एड., एम.एड., इंजिनिअरिंग, एमबीए, एमएससी, पीएचडीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुण आज कंत्राटी नोकऱ्यांमध्ये, तात्पुरत्या सेवेत, मानधनावर किंवा बेरोजगारीच्या छायेत जगत आहेत.कित्येक खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणांना ७ ते १० हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. अनेक ठिकाणी PF नाही, पेन्शन नाही, सामाजिक सुरक्षा नाही. नोकरीची हमी नाही.एक कठोर प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.ज्या पिढीला कमी शिक्षणात स्थिर नोकऱ्या मिळाल्या, त्या पिढीची अधिक शिकलेली मुले आज असुरक्षित रोजगारात का अडकली आहेत
आज आणखी एक वास्तव समोर उभे आहे.

पेन्शन व्यवस्थेत बदल होत आहेत. कायमस्वरूपी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. कंत्राटीकरण वाढत आहे. सामाजिक सुरक्षा कमकुवत होत आहे.अशा परिस्थितीत प्रश्न फक्त कामगारांचा किंवा बेरोजगारांचा राहिलेला नाही.
प्रश्न आपल्या स्वतःच्या घरात येऊन उभा ठाकला आहे.आज अनेक शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि संघटित क्षेत्रातील कर्मचारी आपल्या हक्कांसाठी लढले म्हणून त्यांना पेन्शन, PF, वेतन आयोग आणि सामाजिक सुरक्षा मिळाली. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया “सर, तुम्हाला पेन्शन मिळेल. पण तुमच्या मुलाला पेन्शन मिळणार आहे का?
“तुम्हाला नोकरीची हमी मिळाली. पण तुमच्या मुलाला मिळणार आहे का?”
“तुम्हाला सामाजिक सुरक्षा मिळाली. पण तुमच्या मुलाला मिळणार आहे का?”
जर या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ असतील, तर हा फक्त तरुणांचा प्रश्न नाही. हा आपल्या संपूर्ण समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे.
आज तुम्ही आयुष्यभराच्या कष्टातून घर बांधले असेल, मालमत्ता उभी केली असेल, वृद्धापकाळासाठी काही सुरक्षितता निर्माण केली असेल. पण उद्या तुमच्या मुलांकडे स्थिर रोजगार नसेल, सामाजिक सुरक्षा नसेल, नियमित उत्पन्न नसेल, तर ते स्वतःचे कुटुंब सांभाळतील की वृद्ध होत चाललेल्या आई-वडिलांची जबाबदारी पेलतील? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. पण तो टाळून चालणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते “शिका, चेतवा आणि संघटित व्हा.” आपण आपल्या मुलांना शिकवले. पण त्यांच्या भविष्याच्या प्रश्नांवर संघटित होण्याची गरज त्यांना आणि स्वतःला समजावून सांगितली का?
आज बेरोजगारी, कंत्राटीकरण, खासगीकरण, सामाजिक सुरक्षेचा अभाव आणि शिक्षणाचे व्यापारीकरण हे फक्त गरीबांचे प्रश्न राहिलेले नाहीत. ते शिक्षकांच्या, सरकारी कर्मचाऱ्यांच्या, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याचे प्रश्न बनले आहेत.म्हणूनच आज शोषित, वंचित, कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि कष्टकरी यांच्या प्रश्नांपासून आपण स्वतःला वेगळे ठेवू शकत नाही.कारण इतिहासाचा एक साधा नियम आहे “जेव्हा समाजातील बहुसंख्य लोक असुरक्षित होतात, तेव्हा कोणाचीही सुरक्षितता कायम राहत नाही.” आणि जेव्हा पुढच्या पिढीचे भविष्य धोक्यात येते, तेव्हा शांत राहणे हा पर्याय उरत नाही.

कालच्या माझ्या “आपल्या मुलांचे भविष्य आणि आपली शांतता” या लेखावर प्रकाश जाधव, मु. कोकरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.त्यांचे म्हणणे होते की, व्यवस्था कामगार संघटनांचा आवाज दाबत आहे. अधिक बोललात तर मान्यता रद्द होण्याची भीती निर्माण केली जाते. त्यामुळे अनेक कामगार संघटना मौन बाळगत आहेत.या चर्चेतून माझ्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहतो.आपण संघटित होतो, हे खरे आहे. पण आपण नेमके कोणत्या मुद्द्यांसाठी संघटित होतो?
कोकणात संघटित होण्याची परंपरा आजही मजबूत आहे. भावकीसाठी, लग्नसमारंभासाठी, सण-उत्सवांसाठी, देवस्थानाच्या प्रश्नांसाठी, गावातील विविध विषयांसाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात.म्हणजेच समाजात एकत्र येण्याची आणि संघटित होण्याची क्षमता अजूनही जिवंत आहे.पण मग एक प्रश्न पडतो.याच ताकदीने आपण बेरोजगारी, कंत्राटीकरण, शिक्षणाचा वाढता खर्च, सामाजिक सुरक्षा, श्रमकायद्यांतील बदल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आपल्या मुलांच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी किती वेळा एकत्र येतो?
आज अनेक कुटुंबांमध्ये उच्चशिक्षित तरुण असुरक्षित रोजगारात आहेत. ४४ श्रमकायद्यांचे चार श्रमसंहितांमध्ये रूपांतर झाले. रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पण या बदलांचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे, याबाबत समाजात किती चर्चा झाली? हे विषय आपल्या भावकीच्या चर्चेत किती वेळा येतात?.समाजातील महिला, तरुण, विद्यार्थी आणि पालक यांना हे प्रश्न स्वतःचे वाटतात का? हा प्रश्न कोणालाही दोष देण्यासाठी नाही.उलट, आपल्या समाजाच्या सामर्थ्याकडे लक्ष वेधण्यासाठी आहे.कारण आपण संघटित होऊ शकत नाही, असा प्रश्न नाही.
आपण सहज संघटित होतो.प्रश्न एवढाच आहे की आपण संघटित होतो, पण नेमके कोणत्या मुद्द्यासाठी संघटित होतो? आणि म्हणूनच प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही.
प्रश्न आपल्या सामाजिक प्राधान्यक्रम यांची आहे.मला वाटते, ज्या दिवशी हा प्रश्न कोकणातील प्रत्येक भावकी, प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंबात गंभीरपणे विचारला जाईल, त्या दिवशी व्यापक परिवर्तनाच्या चर्चेला खरी सुरुवात होईल.
संदीप तुकाराम पवार-९९३०१०४१०३,चिपळूण.
सरचिटणीस, रत्नागिरी जिल्हा जनरल कामगार युनियन

