
भारतीय बौध्द महासभेचे दिनांक 04-03-2026 चे आवाहन वाचण्यात आले. हेच आवाहन महासभेने जनगणना सुरू होण्यापूर्वीच २०२० मध्ये महासभेचे एकमेव सल्लागार अच्युत भोईटे अनुसूचित जात क्रमांक ११ चांभार यांच्या अमुल्य सल्ल्यानुसार महासभेने धर्माच्या रकान्यात बौध्द व अनुसूचित जात रकान्यात महार व अवगत भाषा पाली असे जनगणनेत लिहावे. बौध्दजनास केलेले होते.भारतीय बौध्द महासभेची दिनदर्शिका धम्मयाममध्ये २०२१ पासून २०२६ पर्यंत ह्याच आशयाची तळटीप टाकलेली आहे.
जनगणनेतील धर्म व जात ह्या रकान्यात काय लिहावे? ह्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु, ह्या आवाहनाच्या निमित्ताने एका गंभीर गोष्टीकडे मी बौध्दजनांचे लक्ष वेधू इच्छितो.पाली भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.आपण सर्वजन सूत्रपठन,विधी संस्कार सर्व काही पाली भाषेत संपन्न करीत असतो.म्हणजे आपणास पाली भाषा अवगत आहे. म्हणून पाली भाषेच्या संवर्धनासाठी,आपण सर्वांनी अवगत भाषा या रकान्यात येणाऱ्या भाषांसोबत पाली भाषा अवश्य लिहावी.
पंचशीलांतील दुसर्याच शीलात तथागत भगवान बुध्द म्हणतात…
मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी खोटे बोलण्यापासून (असत्य भाषण) अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते.
भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ अन्वये, न्यायालयात खोटे बोलणे—ज्याला शपथभंग किंवा खोटी साक्ष देणे म्हणून ओळखले जाते—हा कलम २२७-२२९ अंतर्गत एक गंभीर गुन्हा आहे. न्यायालयीन कार्यवाहीत हेतुपुरस्सर खोटी साक्ष देणे किंवा खोटी साक्ष तयार करणे यासाठी दंडासह सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तर इतर परिस्थितीत खोटी साक्ष दिल्यास तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
आपण मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील मजकूर वाचू शकतो,त्या भाषेत मजकूर लिहू शकतो ह्या तीन भाषा बोलू शकतो ह्याचा अर्थ असा होतो की,ह्या भाषा आपणास अवगत आहेत.( We know Marathi,Hindi and English language)
तथापि, पाली भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.आपण सर्वजन सूत्रपठन, विधी संस्कार सर्व काही पाली भाषेत संपन्न करीत असतो. म्हणजे आपणास पाली भाषा अवगत आहे. असे म्हणणे सर्वथा चूक आहे.कारण,आपण पाली भाषेतील शिलालेख वाचू शकत नाही.आपण आपले नाव व पत्ता पाली भाषेत लिहू शकत नाही. मग,आपण बौध्दजन असे कसे काय म्हणू शकतो की, मला पाली भाषा अवगत आहे.असे म्हणणे व सांगणे म्हणजे उघडपणे पंचशील तत्त्वांचा अवमान करणे होय.
भारतीय महासभेच्या राष्ट्रीय/प्रदेश/ मुंबई स्तरांवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांना तरी पाली भाषेतील शिलालेख वाचता येतात का? एखाद्या पदाधिकाऱ्याने पाली भाषेत एखादे पुस्तक लिहिलेले आहे काय? एखाद्या पदाधिकाऱ्याने पाली भाषेत भाषण दिलेले आहे का? मग कशाच्या आधारावर महासभा असे आवाहन करते की,अवगत भाषेच्या रकान्यात पाली भाषा लिहा म्हणून???
माझ्या मते अशी खोटी माहिती देणे कायद्याने गुन्हा तर आहेच शिवाय पंचशीलांच्या चौथ्या शीलेचे व सत्य पारमितेचे उल्लंघन आहे.
“मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी”
अर्थ: मी खोटे बोलण्यापासून (असत्य भाषण) अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांतील बारावी प्रतिज्ञा
१२.मी बुद्धांनी सांगितलेल्या ‘परमितांचे’ पालन करीन.
सत्य पारमिता (सत्य) हा बौद्ध धर्मातील दहा पारमितांपैकी (परिपूर्ण गुणांपैकी) एक महत्त्वाचा गुण आहे. याचा अर्थ ‘नेहमी खरे बोलणे आणि आपल्या शब्दांशी प्रामाणिक राहणे’ असा होतो.
सत्य पारमितांचे प्रमुख पैलू:
सत्य वचन (खरे बोलणे): कोणत्याही परिस्थितीत असत्य न बोलता नेहमी सत्याचे पालन करणे.
संकल्पबध्दता: जे बोलायचे ते आचरणात आणणे आणि इतरांना दिलेले वचन पाळणे.
आत्मशुध्दी: खोटेपणापासून दूर राहिल्याने मनाची शुध्दी होते आणि आत्मबल वाढते.
बोधिसत्त्वाचा गुण: बोधिसत्त्वाला (बुध्दत्व प्राप्त करू इच्छिणाऱ्या साधकाला) पूर्णत्व मिळवण्यासाठी १० पारमिता पार कराव्या लागतात, त्यापैकी ‘सत्य’ हा सातवा गुण आहे.
यास्तव,मी एक बौध्द अनुयायी म्हणून बौध्दजनास अशी विनंती करतो की,बौध्दजनांनी अवगत भाषेच्या रकान्यात त्यांना ज्या भाषा लिहिता वाचता व बोलता येतात तेवढ्याच भाषा लिहाव्यात व पंचशीलांच्या चौथ्या शीलाचे व सत्य पारमितेचे उल्लंघन करू नये. महासभेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन अवगत भाषेच्या रकान्यात पाली भाषा लिहणे म्हणजे पंचशील व सत्य पारमितेचे उल्लंघन करणे आहे तसेच असे करणे बौध्द शिकवणुकीशी विसंगत वर्तन करणे आहे.असे माझे वैयक्तिक मत आहे.तसे प्रत्येक बौध्दास स्ववतंत्र मत आहेच.
शरद आढाव,९८३३१७६६६९,भांडुप,मुंबई ,दिनांक:२८ मे, २०२६

