काँक्रीटचे जंगल बनत चाललेल्या राजराजेश्वर नगरीला हरित शहर बनवा!

बातमी शेअर करा.

समाजसेवक गजानन हरणे यांची मागणी.

अकोला :-एकेकाळी बाग-बगीचे,हिरवळ,थंड दवबिंदूंनी भरलेल्या पहाट आणि आल्हाददायक संध्याकाळ यासाठी प्रसिद्ध असलेले अकोला शहर आज अक्षरशः आग ओकत आहे.विदर्भाच्या मध्यभागी वसलेली राजराजेश्वर नगरी म्हणून ओळख असलेले हे शहर आता उष्णतेच्या भयंकर विळख्यात सापडले असून,दिवसा सोबतच रात्रीही उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळेनासा झाला आहे.४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचणारा तापमानाचा पारा यंदा अनेक दशकांचे विक्रम मोडताना दिसत आहे.‘हरित अकोला’ योजना फक्त कागदोपत्री राबवल्या जात आहे.तर प्रत्यक्षात मात्र हरितपणाचा गळा घोटून काँक्रीटचे साम्राज्य उभे राहत असल्याची तीव्र टीका राष्ट्रीय लोक आंदोलन व निर्भय बनो जन आंदोलनाच्या वतीने समाजसेवक गजानन हरणे यांनी केली आहे.विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल,मोकळ्या जागांवर सिमेंटची चादर,रस्ते-नाल्यांचे अंधाधुंद काँक्रीटीकरण आणि बगीच्यांच्या जागी उभ्या राहत असलेल्या इमारतींमुळे अकोल्याचे नैसर्गिक संतुलन बिघडत चालल्याचे सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
बाग-बगीच्यांचे शहर की,सिमेंटचे साम्राज्य?
एकेकाळी अकोला शहर बाग-बगीच्यांसाठी ओळखले जात होते.हिरवीगार झाडे, प्रशस्त मोकळी मैदाने,सावली देणारे वटवृक्ष आणि नागरिकांना श्वास देणारी बगीचे ही अकोल्याची खरी ओळख होती.अनेक जिल्ह्यांतून लोक हे शहर पाहण्यासाठी येत असत.अकोल्याच्या हवेत एक वेगळीच प्रसन्नता होती.मात्र आजच्या तथाकथित विकासाच्या रेट्यात शहराचा आत्माच हरवत चालला आहे. मोकळ्या जागेतील ग्राउंड सुद्धा सिमेंटचे झाले आहेत.रस्ते,नाल्या,पदपथ सर्वत्र काँक्रीटीकरण झाले असून मातीचा स्पर्शच जणू शहरातून हद्दपार झाला आहे. जिथे वृक्ष असायला हवे होते,तिथे आता काँक्रीटच्या भिंती उभ्या राहत आहेत.हा विकास की विनाश? हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे यांनी केला आहे.“विकास हा आवश्यक आहेच; परंतु तो पर्यावरणाच्या किंमतीवर होऊ नये.शहराच्या श्वासाचा गळा घोटून उभा राहणारा विकास म्हणजे विकास नव्हे,तर विनाशाचा महामार्ग आहे,” असे समाजसेवक गजानन हरणे यांनी स्पष्ट केले.अकोला महानगरपालिकेच्या नियोजनात हरित दृष्टिकोनाचा अभाव स्पष्टपणे जाणवत असल्याचे सांगत त्यांनी नद्यांचे नाल्यांचे नैसर्गिक स्वरूप बदलणे,रस्त्यांचे अंधाधुंद काँक्रीटीकरण, शेकडो वर्षे उभ्या असलेल्या वृक्षांची निर्दयी कटाई हे प्रशासनाच्या शून्य नियोजनाचे प्रतीक असल्याचे नमूद केले.
   ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्याऐवजी काँक्रीट पार्क उभे करण्याला प्राधान्य दिले जात असल्याने भविष्यात शहर अधिक उष्ण होण्याचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले.शहराचे फुफ्फुसे छिन्नविछिन्न,गेल्या काही वर्षांत हजारो झाडांची झालेली कत्तल आता स्पष्टपणे परिणाम दाखवू लागली आहे.रस्त्याचे रुंदीकरण,उंच इमारतींची वाढ आणि मोकळ्या जागांचा नाश यामुळे शहराची ‘फुफ्फुसे’च जणू छिन्नविछिन्न झाली आहेत.झाडे ही केवळ सौंदर्य नसून ती शहराची जीवनवाहिनी आहेत. ती उष्णतेशी लढतात, प्रदूषण कमी करतात,पावसाला आमंत्रण देतात आणि नागरिकांना श्वास देतात. मात्र अकोल्यात झाडांपेक्षा सिमेंटचां जंगलाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
   आज अकोल्यातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे.पूर्वीचे हिरवेगार,सुंदर, बगीच्यांचे शहर पुन्हा मिळणार का? राजराजेश्वर नगरीचे नैसर्गिक वैभव पुन्हा फुलवण्यासाठी प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र येणार का? की ‘हरित अकोला’ ही योजना केवळ कागदावरच हिरवी राहणार?.प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याची, प्रत्येक सिमेंटच्या भिंतीसोबत हरित पट्टा उभारण्याची आणि विकासाच्या आराखड्यात पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवण्याची गरज असल्याचे मत समाजसेवक गजानन हरणे यांनी व्यक्त केले आहे.व आंदोलनाचा इशारा दिला आहे.“जर आजही प्रशासन जागे झाले नाही, तर उद्या अकोल्यात श्वास घेण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागेल. येणाऱ्या पिढ्यांना बगीचांचे शहर द्यायचे की काँक्रीटचे वाळवंट, हा निर्णय आजच घ्यावा लागेल,” असा इशारा देत अकोला महानगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेऊन राजराजेश्वर नगरीला हरित शहर बनवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे यांनी केली आहे.अन्यथा राष्ट्रीय लोक आंदोलन,निर्भय बनो जन आंदोलन तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गजानन हरणे-९८२२९४२६२३,समाजसेवक तथा पत्रकार अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *