
एक विचारतो तुम्हाला थोडं ध्यान द्याल काय…?
खरोखरच दादा आज कामगार दिन हाय….??
हाताला काम नाही, खिशात छदाम नाही..
जीवनात राम नाही,जीवाला आराम नाही..
कालच बरं का औषधा वाचून मेली माझी माय …
खरोखरच दादा आज कामगार दिन हाय..?
उन्हा तान्हात राबताना अंगाची होते लाही..
तळहाताचा फोड फुटता जीव मुठीत येई …
कुणा सांगू व्यथा माझी, कोण समजिल तरी काय?…
खरोखरच दादा आज कामगार दिन हाय….?
कुणी म्हणतं महाराष्ट्र हा आमच्या मुळे तरतो…
बाहेरच्यांना इथे यायला वाट कोण करतो…
मराठी अमराठीच्या वादा मुळं हे पोट भरत नाय…
खरोखरच दादा आज कामगार दिन हाय….?
कितीही वाटली करावी जिंदगीची मजा…
पण नाही मिळाली आज वर भर पगारी रजा…
सुट्टी मागता शेठ, मुकादम दात ओठ खाय…
खरोखरच दादा आज कामगार दिन हाय..
कवी- रुपेश अनिल साखरे८१६९४५७६७६,
दिंडेगांव (तुळजापूर)

