भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगरी कोळी ओबीसी समाज.-राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

मागील महिना आंबेडकर जयंती आणि बुद्ध,सम्राट अशोक,छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सर्व महापुरुषांच्या संयुक्ती जयंती महोत्सवाचा महिना ठरला.२००५ सालापासून मी आंबेडकर जयंती महोत्सवात सहभागी होत आहे.हळू हळू मी महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या विचारांवर बोलत आहे.शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर नव नव्या विषयावर लिहिणे,बोलणे केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक चळवळी मुळे मला शक्य झाले.
  मी हिंदू आगरी ओबीसी समाजातला तरुण आहे.माझे मागील आयुष्य हनुमान जयंती, श्रीराम जयंती,कृष्ण जयंती,श्री गणेश जयंती,जत्रा यात्रा यात गेले आहे.नेहमीच देवी देवतांच्या जयंत्या आरत्या पालख्या या उत्सवी यंत्रातून माझे मन पूर्णपणे दैववादी झाले होते.”देवापुढे माणूस पाला पाचोळा” या एका गाण्यातील ओळींप्रमाणे धर्म श्रद्धाळू माणूस अत्यंत भाऊक होऊन जातो.माझ्या जीवनात हवे ते बदल फक्त देवच घडवू शकतो?. हा धर्माने देवाने दिलेला संस्कार माझ्या प्रमाणे माझ्या सोबतच्या सर्व ओबीसी बांधवांचा अनुभव आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना देवाचे मोठेपण आणि आपले माणूसपण यात मोठी महा चर्चा मनातल्या मनात घडते.ते द्वंद्व मी आपल्या सोबत मुद्दाम सादर करीत आहे.
   देवाचे अवकाश छेदून आपण आपल्यातील मानवी मनापर्यंत पोहचणे खूप अवघड काम आहे.देवाच्या मोठेपणा विषय बालपणापासून कोरलेले संस्कार ओलांडून माणसापर्यंतचा प्रवास खूप अवघड आहे.सोपा नाही.माणूस देवापेक्षा मोठा कसा ?आपण असा विचार मनातल्या मनात केला आणि तो देवाला कळला तर?  देवाविषयी भीती हीच भक्तीची प्रेरणा आहे का? हिंदू धर्मातील देव स्वर्ग चमत्कार नरक आत्मा भुते पुजारी ब्राह्मण यांचे ओझे मनावर एक दडपण निर्माण करते.छोट्या निरागस मुला मुलींना देव बाप्पाची भीती आपण निर्माण करतो.ही भीती मरेपर्यंत कायम राहते.”अरे देवा?” हे उद्गार सहज आपल्या ओठावर येत असतात.
   हिंदू ओबीसी माणसाला, जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मधली वैचारिक भाषणे ऐकतात त्यांना ही गोष्ट अगोदर माहीत नसते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देव धर्म स्वर्ग चमत्कार आत्मा भूत नर्क नाकारला आहे.तरीही ते शाळा कॉलेज उच्च शिक्षण नोकरी वकिली यात प्रचंड यशस्वी झाले.आंबेडकर जयंतीत सहभागी होत नसलेल्या सर्व हिंदू ओबीसी बांधवांना तथागत बुद्ध,सम्राट अशोक,छत्रपती शिवराय,महात्मा फुले,सावित्री माई,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सारे महापुरुष केवळ देवामुळेच यशस्वी झालेत असे वाटते.प्रत्यक्षात तसे नाही.या महापुरुषांच्या जीवन संघर्षात सर्व सामान्य माणसांच्या जीवनात येणारी संकटे तशीच आली आहेत.जशी आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या कुटुंबियांच्या जीवनात जन्म तरुणपण म्हातारपण आजार अपघात मृत्यू हे ही कायम आहेतच.परंतु केवळ स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहण्यात वेळ न घालवता आपला गाव समाज देश अखिल विश्व त्यातील मानवता करुणा न्याय यासाठी त्यांनी जे असामान्य कार्य केले आहे.ते देवास ही लाजवेल असेच दिसते त्यामुळं विभूती पूजा मानणारे लोक त्यांना देवासारखे मानू लागतात.माणसाला माणूस म्हणून स्वीकारायचे शिक्षण आंबेडकरी जयंती देते.देवाची निर्मिती कुणी कशी कोणासाठी कोणत्या स्वार्थासाठी केली हे सत्य समजून घ्यायचे असेल तर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात आवर्जून सहभागी व्हा.
   आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी या कष्टकरी कोकणी माणसांनी जेवढी मनापासून वेग वेगळ्या देव देवतांची सेवा केली.आरत्या पूजा पालख्या केल्यात हे पाहता देवाने न्याय केला असता तर खरोखर कोकणचा कॅलिफोर्निया झाला असता. कोकणातल्या ओबीसी शेतकरी कुळ बेदखल कुळ यांना गुलाम का व्हावे लागले?कुणाचे गुलाम व्हावे लागले? देव,धर्म,स्वर्ग नर्क चमत्कार यांचे समर्थक बुवा बाबा नाना ब्राह्मण जमीनदार सावकार खोत याचे उत्तर देतील का?. देव धर्म यांना कोकणातल्या ओबीसी कुळाच्या गुलामीचे कारण समजायला कधीच जमले नाही.किंबहुना देव आणि त्यांचे लाडके ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याचे सारे सुख शूद्र शेतकरी शेतमजूर यांच्या मनुस्मृती नुसार फुकटचे नोकर चाकर गुलाम झालेल्या आगरी कोळी भंडारी कुणबी यांच्या मानसिक गुलामीत होते.जे ओबीसी आंबेडकर जयंती मधली भाषणे ऐकतील, पुस्तके वाचतील त्यांना वेद उपनिषदे कथा पुराणे रामायण महाभारत यांचे आतापर्यंत न समजलेले अर्थही कळतील.मी ते समजून घेत आहे.
  कुळ कायदा हा आमच्या नारायण नागू पाटील या आगरी,सी के बोले या भंडारी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या बौद्ध माणसाने केला.तोही देव चातुर्वर्ण्य धर्म मनुस्मृती वेद उपनिषदे रामायण महाभारत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात जाऊन केला.कुळ कायदा,चवदार तळे पाणी हक्क आंदोलन,चिरनेर जंगल सत्याग्रहाचा विचार हा हिंदू धर्माने आमच्या ओबीसींवर लादलेल्या गुलामिस जाळून, भस्म करणारा विचार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्ध संत कबीर महात्मा जोतिबा फुले यांना गुरु मानून जे तेहतीस कोटी देवांना जमले नाही.या देशातील तथाकथित उच्च जातीच्या ब्राह्मण क्षत्रीय वैश्य पुढाऱ्यांना जमले नाही ते करून दाखवले आहे.त्यांच्या नंतरच्या काळात.सिडको विरोधात लढणारे ओबीसी नेते दि बा पाटील.सेझ विरोधी लढणारे ॲड.दत्ता पाटील यांनीही देव नाकारूनच हे आमच्या न्यायाचे काम केले आहे. कानावर विश्वास बसणार नाही.मनाला पटणार नाही.परंतु हे ओबीसी जीवनाचे कटू सत्य आहे.
    आज आंबेडकरी समाज स्वतःच्या कष्टाच्या पैशातून आम्हास मिळालेला न्यायाबद्दल सर्व महामानवांची भारतीय संविधानाची कृतज्ञता व्यक्त करतोय.आम्ही आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन समस्त ओबीसी या आमच्या बौद्ध आंबेडकरी भावाकडून काही शिकणार की नाही.आमच्या जमीन पाणी शिक्षण आरक्षण मानवी हक्क यांचे अधिकार संपविणारे मनुवादी सत्तेत बसलेत.लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास का मिळत नाही.अर्थात ज्या महापुरुषांमुळे आम्हास आतापर्यंत जे अधिकार मिळाले ते नव्या पिढीस भाषणे लेख पुस्तके गाणी पोवाडे चित्र सोशल मिडिया यातून सांगितले नाही तर जमिनी गेल्या,आता घरे गावठाणे तुटत आहेत.उद्या आपल्यावर अत्याचार अन्याय सुरू झाले तर जो देव आमचा कधीच नव्हता तो येणार नाहीच.परंतु बुद्ध शिवराय फुले आंबेडकर नारायण नागू पाटील सी के बोले दि बा पाटील दत्ता पाटील या माणसांचा विचारच आम्हास वाचविणार आहे.चळवळी चालवा.त्यासाठी आपला पैसा साधणे आणि मेहनत लावा.भावा बहिणींना हात जोडून विनंती करतो.

आपला भाऊ.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण जिल्हा – रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *