
विशेष प्रतिनिधी मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना आणि इतर महत्त्वाच्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा १३ जुलै २०२६ चा शासन निर्णय अन्यायकारक असून, या योजना पूर्ववत सुरू ठेवाव्यात, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी राज्याचे कामगार मंत्री श्री. अॅड.आकाश फुंडकर यांच्याकडे केली. यासंदर्भात मंत्रालय मुंबई येथे त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात काशीनाथ नखाते यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी इयत्ता पहिलीपासून पदवीपर्यंत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत होती. तसेच गृहअनुदान, गृहकर्जावरील व्याज अनुदान, मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य अशा अनेक योजना कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत होत्या. मात्र या योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
काशीनाथ नखाते यांनी सांगितले की, शासनाने इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक वस्तूंचा संच देण्याचे नियोजन केले असले, तरी त्यासाठी होणारा खर्च लक्षात घेता त्याऐवजी शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून ती योजना कायम ठेवणे अधिक उपयुक्त ठरेल. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला थेट आर्थिक आधार मिळतो. ही योजना बंद झाल्यास अनेक कामगार नोंदणी व नूतनीकरण करण्यापासूनही दूर राहू शकतात, ज्याचा परिणाम कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर होईल.
या बैठकीत कंत्राटी कामगारांचे किमान वेतन, नवीन श्रम संहिता, घरेलू कामगार मंडळाची नोंदणी, विविध सामाजिक सुरक्षा योजना तसेच कामगार कल्याणाशी संबंधित इतर प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक लाला राठोड आणि विजय कदम उपस्थित होते.
यावर कामगार मंत्री श्री.अॅड.आकाश फुंडकर यांनी शिष्यवृत्ती योजना, विवाह अनुदान तसेच नवीन श्रम संहितेनुसार कामगारांसाठी आवश्यक योजनांचा समावेश करण्यासह सर्व मागण्यांचा संबंधित बैठकीत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री महोदयांनी दिले.असे असंघटित कष्टकरी इमारत बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते काशिनाथ नखाते अध्यक्ष कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांनी सागर लाटा न्यूज पोर्टल प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.


