बुद्धांचे तत्त्वज्ञान म्हणजे मानवतेचा मार्ग!- भंते विशुद्धानंद बोधी महास्थवीर

बातमी शेअर करा.

पुनर्वसित टाकळी वतपाळ मध्ये बुद्ध विहार व भिक्खू निवासाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न!
अंजली दीदी भारती यांचा बुद्ध-भीम गीतांचा दणदणाट!

विशेष प्रतिनिधी-नांदुरा:- बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पुनर्वसित टाकळी वतपाळ येथील नवीन गावठाणात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भव्य बुद्ध विहार व भिक्खू निवास बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. विशेष म्हणजे, मातोश्री यशोदाबाई सोनाजी तायडे यांच्या स्मरणार्थ भिक्खू निवासाची निर्मिती करण्यात येणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर भंते विशुद्धानंद बोधी महास्थवीर व भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत बुद्ध विहार आणि भिक्खू निवास बांधकामाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यानंतर उपस्थितांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दुपारच्या सत्रात भंते विशुद्धानंद बोधी महास्थवीर व भिक्खू संघाचे  धम्मप्रवचन झाले, तर रात्री प्रसिद्ध बौद्ध गायिका अंजली दीदी भारती यांच्या बहारदार बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी धम्म प्रवचनातून भंते विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांनी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, बुद्धांचा धम्म हा अंधश्रद्धा, कर्मकांड आणि भेदभावाला थारा न देणारा विवेकाचा व मानवतेचा मार्ग आहे. बुद्धांनी जगाला प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश दिला. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक द्यावी, असा बुद्धांचा मूलभूत विचार आहे. केवळ बुद्धांना वंदन करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात केले पाहिजे. शिक्षण, संघटन, विवेक आणि समता यांच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

या भूमिपूजन सोहळ्याला भंते विशुद्धानंद बोधी महास्थवीर, भिक्खू संघ,आमदार चैनसुख संचेती, भाई अशांत वानखेडे, डॉ. विजय तायडे, अभियंता हिवाळे, राम पांडव, आकाश वतपाळ, महेंद्र वतपाळ, ग्रामविकास अधिकारी शुभम महाकाळ,सूर्यभान तायडे,अनिल गोरे यांच्यासह विश्वशांती बुद्ध विहार स्मारक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील व परिसरातील हजारो उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.पुनर्वसित गावठाणात उभारण्यात येणारे भव्य बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ न राहता बुद्ध विचारांच्या प्रचार-प्रसाराचे, धम्म संस्कारांचे आणि सामाजिक एकतेचे केंद्र ठरणार आहे. तर मातोश्री यशोदाबाई सोनाजी तायडे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारा भिक्खू निवास हा त्यांच्या स्मृतींना समर्पित आदरांजली ठरणार आहे.बुद्ध वंदना,भूमिपूजन,भोजनदान,धम्मप्रवचन आणि अंजली दीदी भारती यांच्या बुद्ध-भीम गीतांच्या सुरेल मेजवानीने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. संपूर्ण परिसरात बुद्धमय आणि भीममय वातावरण निर्माण झाले होते.
महेंद्र वानखडे -97668 67670, चांदुर बिस्वा,नांदुरा.यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *