
ओबीसींच्या हक्कांच्या मंडल आयोगासाठी देशात लढा उभा करणारे माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात आता भिवंडीचे आगरी ओबीसी खासदार सुरेश म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच,त्याला माजी खासदार दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला ताकद देण्यासाठी आज भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.सुरवातीस उरण पनवेल या लोकनेते दि बा पाटील यांच्या कर्मभूमीतून सुरू झालेले आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार यांचे आंदोलन आता ठाणे जिल्ह्यातून सुरू झाले आहे.ही अत्यंत अभिनंदनीय घटना ठरत आहे.लोकनेते दि बा पाटील यांचा विचार हा हिंदू धर्माने गुलाम,शोषित,वेठबिगार,भूमिहीन कुळे यांच्या जमीन,पाणी,जंगल,शिक्षण आरक्षण यांच्या अधिकारांचा विचार आहे.मुंबई ठाणे रायगड पालघर परिसरात वाढत असलेल्या उच्चवर्णीय हिंदुत्वाचा पराभव करण्याची शक्ती आगरी कोळी ओबीसी आंदोलनात आहे.दोन दिवसापूर्वी जसखार उरण येथे घेतलेल्या आगरी कोळी कराडी ओबीसी बांधवांच्या आरक्षण जागृती सभेत उत्तम प्रतिसाद मला मिळाला.
लोकांना ओबीसी आरक्षण हे हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्याच्या शूद्र शोषणास उत्तर,म्हणून ओबीसी जातींना न्याय देण्याचे धोरण आहे.ओबीसी आरक्षण म्हणजे सामाजिक न्यायाचे ओबीसी प्रतिनिधित्व धोरण आहे.हे समजविण्यात ओबीसी नेतृत्व कमी पडले आहे.हिंदुत्ववादी प्रचारकांनी तुमचे शत्रु हे मुस्लिम आहेत.उच्चवर्णीय हिदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाहीत.असे आगरी कोळी कराडी ओबीसींच्या मनावर ठसविले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण लढाईस आर्थिक मदत ओबीसींकडून मिळत नाही.ओबीसी जागृतीची सभा उरण मध्ये होतेय याची नोंद पोलिस प्रशासनाने तत्काळ घेतली.बेताल वक्तव्य करणाऱ्या जरांगे सारख्या आरक्षणाचा “आ” न कळणाऱ्या मराठा आंदोलनास मुंबईत परवानगी नसताना,सरकार कडून सर्व पद्धतीने समर्थन देण्यात आले.मुंबईची वाहतूक अर्थ व्यवस्था अडचणीत आणणारे,संविधान विरोधी, मराठा आरक्षणाची मागणी करणारे,हे बेकायदेशीर आंदोलन मुंबई बाहेर रोखणे गरजेचे होते.
लोकनेते दि बा पाटील यांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरणास खरा विरोध आगरी कोळी कराडी ओबीसी बांधवांच्या ठाणे जिल्ह्यातून झाला आहे.साताऱ्यातून आलेल्या मराठा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून मोठे होत आगरी कोळी ओबीसींवर सत्ता गाजविण्यास कशी सुरुवात केली? हे येथील विद्यमान वनमंत्री गणेश नाईक यांना कळले नाही.आज ते एकनाथ शिंदे यांचा गर्व उतरविण्याचा संकल्प करीत आहेत.तोच मनुस्मृतीने उभा केलेला उच्चवर्णीय भयंकर राजकीय चक्रव्यूह आहे.ओबीसी त्यात जगतोय की मरतोय अशी आजची स्थिती आहे.वनमंत्री गणेश नाईक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अर्थात फडणवीस शिंदे लोढा या मनुवादी शत्रूंनी घेरले गेले आहेत.यात ओबीसी विचार म्हणजेच फुले शाहू आंबेडकर हेच त्यांना वाचवू शकतात.
एकनाथ शिंदे यांनी आपली सरंजामी मराठा सत्ता शिवसेनेतून ठाण्यात लादताना, कुटनितीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नवी मुंबई विमानतळास देण्याचा ठराव घेतला.एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील,नगर विकास खात्याच्या अंकित असणाऱ्या सिडको हीच आगरी कोळी गावठाणांचा शत्रू आहे.जागृत आगरी कोळी कराडी बांधवांनी ही मराठा अरेरावी रोखत याला विरोध केला.सत्तेच्या शेवटच्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वडिलांचे नाव,(हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे) यांचे नाव मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या घटनेचा साक्षीदार मी स्वतः होतो.त्यासाठी शिवसेनेचे नेते.(आगरी नेते) सन्माननीय बबन दादा पाटील यांना मी कायम धन्यवाद देईन.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पास मा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय हा,शिवसेनेच्या स्थापनेत पायाचे भक्कम चिरे असलेल्या,आगरी कोळी कराडी भंडारी शाखाप्रमुख विभागप्रमुख,ओबीसींच्या विरोधी असल्याचे सत्य मां उद्धवजीनी समजून घेतले.ही फार मोठी गोष्ट आहे.महाराष्ट्राच्या कोणत्याही राजकीय पक्षात सत्ताधारी मराठा ब्राह्मण वैश्य हे ८५ टक्के ओबीसी एससी एसटी यांच्या विरोधात असतात.हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (ब्राह्मण) आणि नारायण राव राणे,(मराठा) यांनी उद्धवजींच्या चांगलेच लक्षात आणून दिले आहे.याच उच्चवर्णीय सत्ताधारी जातींनी शिवसेना चोरली,फोडली,उध्वस्त केली.खऱ्या शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांचे नाव मागे घेऊन विमानतळाच्या सातबाऱ्यावर एकनाथ शिंदे यांनी चढविलेल्या बाळासाहेबांच्या नावाची नोंद हक्क सोड पत्र देऊन काढली.
महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे यांचा हा निर्णय आगरी कोळी ओबीसी लोकांच्या अधिकारातील लोकनेते दि बा पाटील या आमच्या नेतृत्वासाठी महत्वाचा निर्णय होता.ओबीसींच्या विचारात हिंदुत्वाचा पराभव करण्याची ताकद आहे.महाराष्ट्रातील ओबीसींच्या नेतृत्वाने नोंद घ्यावी.असा हा निर्णय आहे.सुरवातीस नामकरण आंदोलनास भाजपतील आगरी कोळी कराडी नेतृत्वाने उचलून धरले होते.परंतु ते आंदोलन उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वडिलांचे नाव मागे घेतल्याने,आता भाजपाच्या अंगलट आले आहे. “नाव आम्हीच देऊ” या भाजपाच्या आश्वासनावर विश्वास ठेवायला आक्रमक आगरी कोळी कराडी ओबीसी तयार नाहीत.
सरकार म्हणून लोकनेते दि बा पाटील यांच्या सिडको प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या साडे बारा टक्के आणि विमानतळाच्या पुनर्वसनाचे अधिकार देण्यात उद्धवजींचे आणि फडणविसांचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.कारण सिडको नगर विकास खाते ओबीसी विरोधी मराठा एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिले आहे.नगरविकास खात्याच्या माध्यमातून महानगर पालिका सिडको येथे लूट मुंबई ठाणे रायगडाची होतेय. भाजपाने लोकसभा,विधानसभा निवडणुका जिंकूनही लोकनेते दि बा पाटील यांचे नाव का मिळत नाही?.म्हणून प्रकल्पग्रस्त तरुण नेते ॲड.विकास पाटील हे उच्च न्यायालयात गेले आहेत.
आज ओबीसी नेते दि बा पाटील. जगन्नाथ कोठेकर,ॲड जनार्दन पाटील यांनी लढून मिळविलेल्या मंडल आयोगाच्या ओबीसी आरक्षणात मराठा घुसखोरी,कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून सुरू आहे.शिंदे पवार फडणवीस या ब्राह्मण क्षत्रिय सत्तेतून हा ओबीसी आरक्षण संपविण्याचा हा डाव आजच्या आंदोलन कर्त्या ओबीसींना समजत नाही.वर्तमान आगरी कोळी कराडी तरुणाईची दिशाभूल करण्यात मराठा ब्राह्मण यांची मनुनिती यशस्वी झाली.तशीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन बामसेफ च्या वामन मेश्राम यांचेही योगदान आहे.मराठा कुणबी एकच आहेत.मराठा क्षत्रिय नव्हे शूद्र आहेत. हा प्रचार कोकणातल्या आगरी कुणबी लोकात करण्यात अनेक तरूण वक्ते घुसविण्यात आले.
आज सत्ताधारी मराठे कुणबी दाखले घेऊन इथल्या महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी मधून सत्ता हाती घेतील.तेव्हा आगरी कोळी कराडी भंडारी यांचे राजकीय अस्तित्व संपलेले असेल.या प्रश्नात लोकनेते दि बा पाटील यांचा विचार हा बुद्ध चार्वाक महावीर यांनी सांगितलेला २५०० वर्षे जुना समतेचा विचार आहे.ते महात्मा जोतिबा फुले.राजर्षी शाहू महाराज यांना तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानीत.प्रचंड ऊर्जा असलेल्या आगरी कोळी कराडी ओबीसी बांधवांची कोकणातील भूमिका कुणबी आणि मराठा वेगळे आहेत.अशी असली पाहिजे.सामाजिक मागास नसलेल्या मराठा समाजाला सर्व महाराष्ट्राची सत्ता,प्रतिंधित्व असताना? ओबीसी मध्ये आरक्षण कोणत्याही पद्धतीने देणे.हा देशाच्या समता, सामाजिक न्याय आणि संविधानाला धोका आहे.हे आगरी कोळी ओबीसींना समजावणे गरजेचे आहे.
ओबीसी आरक्षणाच्या या तत्वद्न्यानाला राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची जबाबदारी चारशेहून अधिक असलेल्या समस्त ओबीसी जातींच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.मां मंत्री महोदय छगन भुजबळ,ओबीसी नेते विजय वडेट्टीवार,प्रा लक्ष्मण हाके.ॲड मंगेश ससाणे.मृणाल ढोले पाटील या सर्वांप्रमाणे ओबीसी तरुणांनी पुढे आले पाहिजे.लोकनेते दि बा पाटील यांच्या आगरी कोळी कराडी भंडारी समाजाची जबाबदारी कुणबी समाजासोबत राहून रस्त्यावर आणि न्यायालयात लढून मराठा घूसखोरी थांबविण्याची आहे.
मी मां उच्च न्यायालयात ओबीसी मधील मराठा घुसखोरी थांबविन्यायासाठी,पुढील आठवड्यात याचिका टाकत आहे.या अगोदर शासनाने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या GR ला आगरी समाजाचा विरोध असल्याचे निवेदन मा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.त्यांनी आगरी समाजाची विनंती मान्य करीत ते आदेश प्रशासनाला आमच्यासमोर दिले आहेत.आपणही अशी निवेदने दिली पाहिजेत.लोकनेते दि बा पाटील यांच्या ओबीसी आरक्षणाचा लढा,पुढे चालविण्यासाठी,आपणा सर्वांचे सहकार्य,सहभाग,मला प्रार्थनीय आहे.

