
एकवीरा आई मंदिरात ७ जुलै २०२५ पासून ड्रेसकोड संदर्भात नवी नियमावली सुरू केल्याचे जाहीर झाले.९० टक्क्यांहून अधिक आगरी कोळी कराडी भंडारी सागरपुत्र लोक येथे २००० वर्षा पासून सातत्याने येत असतात.नव्याने जन्म झालेल्या मुलाचे जावळ काढण्याचा धार्मिक विधी येथे होतो.तो केवळ एकवीरा मंदिराचा विधी नाही.तर कार्ले लेण्यातील चैत्य स्तूपा भोवती प्रदक्षिणा घालून केला जातो.भारतातल्या कोणत्याही हिंदू मंदिरात अशी बौद्ध स्तूपातील डोक्यावरील पूर्ण केस काढण्याची विधी नाही.शेंडी राखणे ही हिंदू प्रथा आहे.येथे पूर्ण जावळ काढले जाते.यावर समाज बांधवांनी,सशोधकांनी संशोधन करावे.
आई एकवीरा ही आमची फक्त आई आहे.अत्यंत डोळस अशी ही भावना आहे.सर्वत्र चमत्कारिक देवी देवतांचा बोलबाला असताना.आईची प्रामाणिक भावना जपणारे आगरी कोळी एकवीरा आईकडे ज्या नजरेने पाहतात.ती विचारत घेणे गरजेचे आहे. प्रत्येक वाक्यात “च्या आयला” च्या मायला” करणाऱ्या पुरुषसत्ताक स्वभावाच्या लोकांना आई एकवीरा ही स्त्रीसत्ता,मातृसत्ता “एकवीरा आई”या अखंड अभेद्य शब्दातून समजते.देव आणि देवी यापेक्षा “आई” हा शब्द जमीन आकाश समुद्र यांची भव्यता,खोली, विशालता सांगणारा आहे.
देशातल्या सर्व मंदिरांची संपत्ती ही आपल्या अर्थव्यवस्थेच्या चाळीसपट असल्याचे गुगल सांगते.अर्थात कोणतेही धर्म याला अपवाद नाहीत.माणसाच्या जीवनात धर्माला अनन्यसाधारण महत्व आहे.धर्म आणि देवळे गरीब श्रद्धाळू लोकांची लूट करतात.तेव्हा शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी धर्माची देवळे लोकांची कशी लूट करतात यावर पुस्तक लिहितात.जगात असे अनेक सुधारक झाले. धर्मातही लोकशाही हवी असे लोकांचे प्रामाणिक मत आहे.अनेक मंदिरात ब्राह्मण पुजारी मालक झालेत.जे नोकर आहेत.जे पगार घेतात ते मालक कसे? मंदिराला भेट देणारे, जे दान देतात. त्यावर मंदिर ट्रस्ट चालत असेल.तर मंदिरात जाणाऱ्या प्रत्येकास तेथील व्यवस्थे बद्दल बोलण्याचा अधिकार आहे.आम्ही मतदान करतो त्यातून पंतप्रधान मंत्रीमंडळ, प्रशासन,न्यायव्यवस्था उभी राहते.मग मंदिराना वेगळा न्याय का?.आमच्या देशात पूजेचा मान प्रथमतः ब्राह्मण पुरुषांनाच धर्माने दिला.स्त्रियांना नाही.मनुस्मृतीचे तसे म्हणणे आहे.
देशात लोकशाही आहे.मग आमदार खासदार जसे निवडून येतात.तशी घटना आणि निवडणूक धार्मिक ट्रस्ट वर होते का? एकवीरा ट्रस्ट ची घटना लोकांना छापील स्वरूपात विद्यमान ट्रस्टी आणि धर्मादाय आयुक्त,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपलब्ध करून देतील काय?. एकवीरा मंदिरात येणाऱ्या लोकांना अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यावर बंदी. असा निर्णय ट्रस्ट ने घेतला.यासाठी दान देणाऱ्या लोकांची जाहीर सभा घेतली होती का? मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ही बंदी घातली आहे. अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ सर्वांचे लाडके बाल्या मामा यांनी सागितले.
लोकसभेचे खासदार असलेल्या आदरणीय सुरेश म्हात्रे यांना “पावित्र्य” या शब्दाला केवढा मोठा आशय आहे हे समजू शकते.लोकसभेच्या जुन्या वास्तूला मी भेट दिली आहे.तेथील स्वच्छता,शिस्त,देशासाठी नवे कायदे करण्यासाठी घेतले जाणारे निर्णय, त्यासाठी होणारी जाहीर चर्चा,सर्व जात धर्म,स्त्री पुरुष यांची लोकाभिमुख भाषणे.या सर्व लोकशाहीच्या सवयी एकवीरा ट्रस्ट साठी आवश्यक आहेत.असे झाले तर? येथे येणाऱ्या आमच्या आई बहिणी,मावश्या आज्या,छोट्या बाळ एकवीरा यांना पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,प्रसाधनगृहे,निवारा,अगदी वस्ती करण्याइतपत सुविधा देता येऊ शकतील? जर साध्या सुरक्षा,स्वच्छता ट्रस्ट देत नसेल.तर पैसे दान पेटीत टाकण्या एवजी आई एकवीरा सारखीच असलेली सावित्रीमाई सांगते तो पैसा मुलींच्या स्त्रियांचे शिक्षण संगोपन यासाठी आम्ही खर्च केला पाहिजे.स्त्री शिक्षण हाच एकवीरा धर्म आहे.

आजची स्थिती काय आहे?सन्मानीय खासदारांची येथे येण्यापूर्वीची स्वच्छता गृहाची स्थिती ,नाक डोळे बंद करायला लावणारी होती.स्वच्छता हा पवित्रता या शब्दाचा विरुद्धार्थ नक्कीच नाही.तो समानार्थी शब्द आहे.जे स्वच्छ नाही ते पवित्र कसे? या मंदिरात मोठ्या प्रमाणात आगरी कोळी महिला येतात.जगातले मातृसत्ताक विचारांचे एकमेव मंदिर आई एकवीरा मंदिर आहे.ते स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.या महिला लग्नात हुंडा घेत नाहीत.देत नाहीत.ज्यांच्या घरात मुलींच्या जन्माचे स्वागत होते.जेथे स्त्री भ्रूण हत्या होत नाही.ज्या स्त्रियांना दोन हजार वर्षापासून विधवा असूनही महिला पुरोहितांचा सन्मान याच एकवीरा विचारांनी दिलाय.घरची गावाची कोळीवाड्याची, मुंबईची मासळी मार्केट रात्री तीन ते दुपारी तीन वाजेपर्यंत अखंड चालविण्याची क्षमता या स्त्री शक्तित आहे.पती,पिता,पुत्र यांच्या तथाकथित मनुस्मृतीच्या पुरुषसत्ताक संरक्षण व्यवस्थेची गरज ज्यांना कधीच लागली नाही.अशा या आगरी कोळी महिला आहेत.
सीता,द्रौपदी,तारा,मंदोदरी या सुप्रसिद्ध स्त्रियांपेक्षा ज्या बलवान आहेत.त्या आगरी कोळी महिलाना आपले शील पावित्र्य स्वतःच्या मनगटातील ताकदीने कसे जपावे? हे कळते.वरील सारी मूल्ये ही आई एकवीरा या ऐतिहासिक मूल्यव्यवस्था जगणाऱ्या आगरी कोळी संस्कृतीचे नाव आहे.मुंबई ठाणे रायगड पालघर इथल्या सागर किनाऱ्यावरून, जागतिक बंदरातून व्यापार करणाऱ्या मातृसत्ताक लोकांची ही जागतिक संस्कृती आहे.समुद्र मार्गे हा व्यापार श्रीलंका, रोम,इजिप्त मुंबई घारापुरी ,ते कार्ला असा होत होता.हे जागतिक इतिहास कार सांगतात.संदर्भ मुंबई ठाणे रायगडचे सरकारी गॅझेट.
छत्रपती शिवरायांच्या आरमारात समुद्रात अहोरात्र काम करणाऱ्या आरमारीआगरी कोळी भंडारी कराडी मावळ्यांच्या वीरमाता आमच्या आगरी कोळी महिला आहेत. पुरुष घरात नसताना.खवळलेल्या समुद्रात असताना. काती,कोयते,बर्ची भाले घेऊन,लहान मुले, वृद्ध यांचे रक्षण करणाऱ्या या कोळी स्त्रिया महामाया एकवीरा त्या आहेत.हा अनुभव उधार नाही.माझ्या अलिबागला राहणाऱ्या,सख्ख्या आईचे लढवय्ये, शौर्याचे संसारी चरित्र आहे.तेच धाडस माझ्या पत्नीत,बहिणीत,मावशीत मी या क्षणी अनुभवतोय.यात कोणतीही कवी कल्पना अतिशोक्ती अलंकार नाही. आगरी कोळी घरे गावठाणे असे जीवन जगत असतील?. तर त्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.लोकांनी कोणते कपडे घालावे? हा आदर्श कोळी आगरी महिलांनी अगोदरच दिलाय.अंगभर कपडे घालून,मुक्तपणे नाचताना,वाकड्या नजरा ओळखून,त्यांचे डोळे काढण्याची हिंमत असणाऱ्या या वीरांगना आहेत.विद्यमान लोकशाहीत,संविधानाच्या या युगात त्यांना तुम्ही ट्रस्ट वर कधी घेतले आहे का?
मामा म्हणजे आईचा भाऊ.किती गोड शब्द आहे.मामा हा शब्द भाच्याचे आईचे लाड करणारा,कौतुक करणारा शब्द आहे.बालगीतला चांदोमामा,मामाच्या गावाला जाऊ या..ही गाणी आठवा.ज्या मनुस्मृतीने भारतातल्या तमाम स्त्रीयांना अधिकार,प्रतिनिधित्व नाकारले ? ते आमच्या आई एकवीरा मातृ संकृतीने हजारो वर्षे अगोदर दिलेत.रामायण महाभारत वेद उपनिषदे यात एकवीरा शब्द का नाही?. आई एकवीरा ही एक माऊली स्त्री आहे.तिच्या सेवेला एकही स्त्री पुजारी मिळू शकत नाही?. आईचे पवित्र कपडे एका स्त्रीनेच घातले पाहिजेत.हा निसर्ग न्याय का कळत नाही धर्म, पुरोहिताना?.
सन्माननीय अनंत तरे अध्यक्ष असताना मला गाभाऱ्यात पूजा करण्याचा मान त्यांनी दिला होता.मला प्रश्न आहे. कोळीवाड्यात आगरी वाड्यात प्रथम देवालये ही मातृदेवतांची आहेत.पुरुष देवतांची नाहीत.गावकी,ग्रामसभेत शपथ आईचीच घेतली जाते.बाबांची नाही.पुरुष देव,राम कृष्ण हनुमान यांची नाही.मातृसत्ता रक्तात,जगण्यात असलेला हा छत्रपती शिवरायांचाआरमारी सागरपुत्र समाज एकवीरा आईसमोर उघडेबंब उच्चजातीय पुरुष पुजारी स्वीकारतो कसे?.आगरी कोळी शूद्र स्त्री पुरुषांना अंगभर कपडे घालण्याचे आदेश कसे काढू शकतो?.माझे तर म्हणणे आहे हुंडा घेणाऱ्या स्त्री विरोधी लोकांचा एकवीरा आई ट्रस्टशी संबंध काय?.सन्माननीय अनंत तरे अध्यक्ष असताना,मी एकवीरा मंदिर गाभाऱ्यात प्रवेश करून पूजा केली.तेव्हा माझे सदरा लेंगा काढून पुजाऱ्यांनी मला सोवळे म्हणजे पिवळे धोतर, अंग उघडे ठेऊन पूजा करण्याचा आदेश दिला.मी विरोध केला,हा उघडे होऊन आईची पूजा करण्याचा,हा कोणता “ड्रेसकोड?.”
आगरी कोळी स्त्रीयांना प्रत्यक्ष,एकवीरा आईला स्पर्श करून पूजा करण्याचा अधिकार नाकारला कोणी.हे मनुस्मृतीचे तत्व नाही ना?एकवीरा परिसर हा स्त्रियांना धर्मात समान अधिकार देणाऱ्या आई एकविरेची बहीण जोगेश्वरी किंवा महाप्रजापती आईचा आहे.ती या देशातील पहिली महिला धर्मप्रमुख आहे.तिचे दर्शन आमच्या महिलाना कधी होत नाही.कारण ती समोरून दिसत नाही.त्यासाठी आत गाभाऱ्यात जावे लागते.कार्ला मंदिर हे २००० वर्षापूर्वीच्या सम्राट अशोकाच्या,पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गावर आहे.येथे महिला आजही गाणे गातात.आई तुझा भरियेला बाजारू. मागील दोन हजार वर्षांच्या इतिहासाच्या खुणा आगरी कोळी महिलांच्या मौखिक साहित्यात,कोळी गीतात आहेत.लग्नात “धवला” गाणाऱ्या या महिला सोशल मीडियावर आजही पहायला मिळतात.
देशात प्रत्येक मंदिरावर आम्हीच ब्राह्मण पुजारी,आमचीच मालकी तिजोरीवर दानपेटीवर असावी? असे सांगणारे, खऱ्या अर्थाने मातृसत्ताक विचारांचे नाहीत.मंदिरांच्या दान पेटीत पडणाऱ्या “संपत्तीचे “पुजारी आहेत.एकवीरा मंदिर हे आगरी कोळी कराडी भंडारी महिलांच्या ताब्यात हवे.असे स्त्री पुरुष समानता मानणाऱ्या संविधानवादी चळवळीचे ध्येय असावे.कार्ला एकवीरा मंदिर येथून, केवळ पैशाच्या पेटीसाठी बदनाम करुन,अनंत तरे या कोळी नेत्यास दूर करण्याचे षडयंत्र ही उच्चवर्णीय लोकांच्या स्वार्थी ट्रस्टची,राजकीय खेळी होती.ती ओबीसी विरोधी ब्राह्मण मराठा राजकारणाची नांदी होती.आजही ट्रस्ट ही आगरी कोळी ओबीसींची असावी.हीच लोकशाही आहे.त्यासाठी संघर्ष अटल आहे.खासदार साहेब या गोष्टी समजून घेतील ही अपेक्षा ठेवतो.दानपेटीत पैसे टाकतो कोण? त्याला कोणते अधिकार आहेत?.पार्किंग स्वच्छता, सुरक्षा,सावली..अगदी सुरक्षित पायऱ्या नसतील?.तर लोकांच्या दानाचा पैसा जातो कुठे?.हा प्रश्न विचारण्याचा संविधानिक अधिकार ओबीसी लोकांना मिळेल का?
मुंबई ठाणे रायगड पालघर येथील आगरी कोळी भंडारी कराडी यांच्या मौल्यवान शेतजमिनी लुटणारे,कोळीवाडे गावठाणे अनधिकृत ठरवून तोडणारे वर्तमान ब्राह्मण मराठा राज्यकर्ते आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत.ज्यांनी नवी मुंबई विमानतळात आमची अस्मिता लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाला विरोध केला.करीत आहेत.ते सारे आमचे मनुस्मृती नुसार विरोधकच आहेत.एकवीरा ट्रस्ट ही आमचीच आहे. आईवरील खरे प्रेम,पेटीतील दान.जीवनाचे धार्मिक मातृसत्ताक आचरण ही आमची संस्कृती आहे.ती आमची रहावी.मुंबई ही आमची म्हणजे आगरी कोळी लोकांची आहे. अदानीची नाही.हासंघर्ष,जमीन,जागा,समुद्र,जंगले, आकाश.विमानतळ,येथे सर्वत्र आहे.कुळ कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकर,नारायण नागू पाटील,सेझ भाई दत्ता पाटील,सिडको लोकनेते दि बा पाटील.या आई एकविरपुत्रांनी तो लढला आहे.
आई एकवीरा ही हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक लोकांची आहे.ड्रेस कोडच नाही. आगरी कोळी मातृसत्ताक जीवन मूल्ये ही स्त्री पुरुष समानतेची असतील? तर हुंड्यासाठी वैष्णवी या आमच्या निरागस बहिणीला ठार करणाऱ्या पुरुष सत्ता जपणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रास ती,आम्ही देण्यास तयार आहोत.महाराष्ट्राने देशाने समजून घ्यावी ही एकवीरा संस्कृती.जी मंदिरातल्या ड्रेस कोड पेक्षा मोठी आहे.एकवीरा ट्रस्ट मोठ्या मनाने आमच्या आई बहिणींच्या हाती द्या मामा.त्या पवित्र आहेत.पावित्र्य राखतील.आमच्या आई एकविरेच !आणि या अखंड भारत राष्ट्राचे.!भारत मातेचे.
जय आई एकवीरा.
राजाराम पाटील – ८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.
