
महाराष्ट्राचं नाव घेतलं की,डोळ्यासमोर उभी राहते ती आपली मुंबई. मुंबई हे देशातील एक असं शहर आहे,ज्याचा विस्तार आणि विकास वेगाने झाल्याने प्रत्येकाला ती आपलीशी वाटू लागली. महाराष्ट्राच्या खेड्यातून अनेक लोक उदरनिर्वाहासाठी, मुंबईकडे धाव घेऊ लागले त्याच पध्दतीने देशाच्या विविध भागांतूनही मुंबईकडे लोकांनी स्थलांतर केलं. कारण,त्यांच्या स्वतःच्या राज्यात नोकरीच्या संधी कमी होत्या आणि उद्योगधंदे सुरू करण्यासाठी योग्य परिस्थिती देखील त्यांच्या राज्यात नव्हती. अशा परिस्थितीत, प्रगतीच्या वाटेवर असलेल्या मुंबई शहराकडे येण्याशिवाय परप्रांतीयाना पर्याय नव्हता.
मुंबईमध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या संधींबरोबरच स्थायीक होण्यासाठी अजून एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे इथला मराठी माणूस.मराठी माणूस हा सर्वांना आदर देणारा आणि परस्त्रीकडे वाईट नजरेने न पाहणारा असल्यामुळे, परप्रांतीय लोकांना आपल्या कुटुंबासोबत इथे राहणं सुरक्षित वाटलं. खरं तर, हा महाराष्ट्र आणि इथली प्रत्येक महिला सुरक्षित असण्याचं मूळ कारण, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर व्यक्तींचे विचार आणि आचार इथल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेले असल्याने इथला मराठी माणूस सर्वांशी आदराने वागतो.सगळं काही मुंबईत मिळत असल्याने,परप्रांतीय लोक मोठ्या संख्येने इथे आले. त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला,आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आणि मुंबईमधील जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली.
परप्रांतीय लोकांनी पुढे जाऊन फक्त स्वतःचा व्यवसाय वाढवला नाही,तर त्यांनी त्यांच्या राज्यात राहिलेल्या आपल्या इतर नातेवाईकांना देखील मुंबईमध्ये घेऊन आले.त्यांना सुरुवातीला स्वतःसोबत कामाला घेतले, मुंबईमध्ये उद्योगधंदे आणि नोकरी करताना येणारे अनुभव शिकू दिले.त्यांना सर्व गोष्टींची माहिती झाल्यानंतर नवीन उद्योगधंदा निर्माण करून दिला.त्यामुळे परप्रांतीय फक्त स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही तर स्वतःच्या नातेवाईकांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले.याउलट,मराठी माणसाला मात्र तेच जमले नाही.मराठी माणसाने मुंबईमध्ये येऊन फक्त स्वतःलाच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले,परंतु आपल्या स्वतःच्या नातेवाईकांना मुंबईमध्ये आणून त्यांना स्वतःप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हातभार दिला नाही. त्याचबरोबर मराठी माणसाने वडिलोपार्जित दहा बाय दहाची खोलीची वाटणी कशी होईल हेच पाहिले.

मराठी माणसाने त्या खोलीचा मुंबईमध्येच विस्तार करण्याचा प्रयत्नच केला नाही.सुरूवातीला मुंबईमध्ये दोन मराठी भाऊ गुण्यागोविंदाने नांदत होते,तेच कालांतराने एकमेकांचे वैरी झाले आणि वडिलोपार्जित संपत्ती विकून मुंबईबाहेर पडले. हीच संधी परप्रांतीय लोकांनी साधली आणि स्वतःचा स्वार्थ साधला.या अशा अनेक कारणांमुळे मराठी माणूस आपल्याच मुंबईतून हद्दपार होताना दिसत आहे.
यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा,एक दिवस असा येईल, जेव्हा या मुंबईत हातावर मोजण्याइतकेच मराठी माणसं राहतील.ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे,परंतु हे सर्व करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि महाराजांनी मराठी भाषिकांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी मराठी मुलखात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने एकसंघ केले, त्याच पद्धतीने मराठी म्हणून आपल्याला आता एकत्रित येण्याची गरज आहे. तेव्हाच कुठेतरी ही मुंबई महाराष्ट्रात राहिल अन्यथा एकदिवस मुंबई फक्त नावापुरती महाराष्ट्रात राहिल आणि ह्या मुंबईवर हक्क मात्र परप्रांतीय लोकांचा असेल…
गितेश सरिता गंगाराम पवार…मुंबई.