
भारत हा भावनांचा देश आहे, असे आपण नेहमी म्हणतो. पण अलीकडे लक्षात येते की या देशात भावनाही दर्जानुसार विभागल्या गेल्या आहेत. काही भावना व्हीआयपी आहेत, तर काही सर्वसामान्य. काही भावनांना पोलीस बंदोबस्त मिळतो, काहींना प्राइम-टाइम चर्चा मिळते, तर काही भावना अंत्यसंस्काराच्या धुराबरोबर हवेत विरून जातात.सध्या देशात एक मोठे संकट उभे राहिले आहे. कोणीतरी “पॉ-पॉ”ला शिवी दिली म्हणे! मग काय, संतापाच्या लाटा उसळल्या. सोशल मीडियावर देशभक्तीचा पूर आला. टीव्ही स्टुडिओंमध्ये आवाजाची स्पर्धा सुरू झाली. जणू अर्थव्यवस्था कोसळली, सीमा भेदल्या किंवा संविधान रद्द झाले. कारण विषय होता—”पॉ-पॉ”चा सन्मान!. मात्र याच देशात नीट परीक्षेतील पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रश्नचिन्हात आले.
अनेक विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली गेले. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याच्या बातम्याही समोर आल्या. त्यावेळी याच संतापवीरांची जीभ कुठे हरवली होती? की त्या दिवशी राष्ट्रप्रेमा ला सुट्टी होती?.बहुधा आता आपल्या देशात अश्रूंनाही आरक्षण मिळाले असावे. नेत्यासाठी वाहणारा अश्रू राष्ट्रीय कर्तव्य समजला जातो, पण विद्यार्थ्यांसाठी वाहणारा अश्रू फक्त वैयक्तिक दुःख मानले जाते. प्रतिमेला धक्का लागला की देश हादरतो; पण विद्यार्थ्यांच्या भविष्याला धक्का लागला तर फक्त पालक हादरतात.कल्पना करा, “राष्ट्रीय भावना संरक्षण प्राधिकरण” नावाची एखादी संस्था स्थापन झाली. तिच्या नियमावलीत पहिल्याच कलमात लिहिलेले असेल “नेत्याचा अपमान हा राष्ट्रीय आपत्ती समजला जाईल.” दुसऱ्या कलमात असेल “परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ, बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न यांचा विचार वेळ मिळाल्यास केला जाईल.”
आजकाल काही लोकांची निष्ठा अशी आहे की त्यांना प्रश्नपत्रिका फुटली तरी चालते, पण प्रतिमेवर ओरखडा पडता कामा नये. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ झाला तरी हरकत नाही; पण घोषणांवर आणि व्यक्तिपूजेवर टीका झाली तर लोकशाही धोक्यात आली, अशी आरोळी ठोकली जाते.टीव्ही चॅनेलही कमाल आहेत. “विद्यार्थ्यांच्या भविष्यावर संकट” या विषयावर पंधरा मिनिटांचा कार्यक्रम. पण “पॉ-पॉला कोणी काय म्हटले?” यावर तीन तासांची महासंग्राम मालिका! अँकरचा आवाज, पॅनेलिस्ट ची आरडाओरडा आणि स्क्रीन वरील लाल अक्षरातील ‘ब्रेकिंग न्यूज’ पाहून वाटते, जणू देशाचे भवितव्य त्या एका शब्दावर अवलंबून आहे.इतिहासाचे पुस्तक ही बहुधा बदलावे लागेल. एका प्रकरणाचे शीर्षक असेल—”पॉ-पॉचा अपमान आणि राष्ट्राचे रक्षण.” आणि तळटीपेत छोट्या अक्षरात लिहिले जाईल—”दरम्यान काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून जीव गमावला; हा भाग अभ्यासक्रमाबाहेर आहे.” व्यवस्थेवर प्रश्न विचारणारा संशयित ठरतो, पण व्यवस्थेतील त्रुटींवर मौन धारण करणारा देशभक्त ठरतो. हा आपल्या काळातील सर्वात मोठा विनोद आहे. कारण आता प्रश्न विचारण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अधिक सोपे झाले आहे.विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा फक्त एक जीव जात नाही. एका आईची ममता, वडिलांचे आयुष्यभराचे कष्ट, कुटुंबाची स्वप्ने आणि समाजाचा विश्वास ही त्याच्याबरोबर मरतो. पण या मृत्यूला ना घोषणा मिळतात, ना मोर्चे, ना स्टुडिओतील अश्रू. कारण या वेदनेत राजकीय फायदा कमी असतो.
खरे तर लोकशाहीत कोणत्याही नेत्यावर टीका होऊ शकते, उपरोध होऊ शकतो, व्यंगचित्रे येऊ शकतात. व्यक्तिपूजा ही लोकशाहीची ओळख नसते; उत्तरदायित्व हीच लोकशाहीची खरी ओळख असते. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की व्यक्ती मोठी आणि व्यवस्था लहान झाली आहे. प्रश्न मोठा नसतो; प्रश्न कोणाबद्दल विचारला जातो, हे मोठे झाले आहे.आजची खरी शोकांतिका म्हणजे आपण संवेदनशील राहिलो नाही, तर निवडक संवेदनशील झालो आहोत. काही घटनांवर आपण रात्रभर जागतो, तर काही घटनांवर कायमचे डोळे मिटतो. विद्यार्थ्यांच्या चितेची राख थंड होण्याआधीच आपण प्रतिमांच्या राजकारणात रंगून जातो.व्यंग्याचा उद्देश कोणाला दुखावणे नसतो; तो समाजाला आरसा दाखवण्याचा असतो. आणि हा आरसा आज एकच प्रश्न विचारतो—देशासाठी अधिक महत्त्वाचे काय?.
एखाद्या नेत्यावरील उपरोध की लाखो विद्यार्थ्यांचा न्याय्य भविष्याचा हक्क?.ज्या दिवशी या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर आपण देऊ, त्या दिवशी कदाचित परीक्षा व्यवस्थेवरही तितक्याच ताकदीने चर्चा होईल, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व मिळेल आणि प्रत्येक पालकाला वाटेल की त्याच्या मुलाच्या स्वप्नाची किंमत कोणत्याही राजकीय प्रतिमेपेक्षा मोठी आहे.तोपर्यंत मात्र दृश्य बदलणार नाही. पडद्यावर आरडाओरडा सुरूच राहील, घोषणांचा गजर सुरूच राहील, प्रतिमांचे संरक्षण सुरूच राहील.आणि कुठेतरी एखादा विद्यार्थी आपल्या स्वप्नांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल. मग पुन्हा कोणी तरी विचारेल—”विद्यार्थी का हरले?” आणि उत्तर येईल—”अहो, आधी पॉ-पॉचा अपमान थांबवा!” कारण या काळात काहींच्या मते राष्ट्राची प्रतिष्ठा विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा प्रतिमांच्या संरक्षणातच अधिक सुरक्षित आहे. आणि हाच आपल्या लोकशाहीतील सर्वात मोठा, सर्वात कडू आणि सर्वात वेदनादायी उपरोध आहे.
प्रा.संध्या राजूरकर 9422860648,नागपूर निवासी संपादक दैनिक बहुजन सौरभ.

