
जगातील कोणताही धर्म असो, त्या धर्मात उत्सव/सण आहेत. ज्या धर्मात देववाद आहे. त्या धर्माच्या रथाची चाके मानवनिर्मित देव आणि उत्सव ही आहेत. उत्सवामुळे देववाद पोसला जातो. उत्सव व्यक्ती व कुटुंबात आनंद व मंगलमय वातावरण निर्माण करून दुःखमुक्त जीवन बनविण्यास मदत करतो. बौध्द धम्म चा मूळ पाया हा दुःखमुक्तीवादाचा आहे. त्यामुळे बौध्द धम्मात बारमाही उत्सव आहेत. पण भारतात स्वतःला बौध्द (1956 नंतरचे) म्हणणारे बौध्द धम्मातील उत्सव साजरा करण्यास तयार नाहीत. ते घरातील विवाह, गृहप्रेवश, वाढदिवस, मरणोत्तर विधी बौध्द धम्माच्या विधीप्रमाणे करतील, पण घरात हिंदू धर्माचे सण साजरे करतील. त्या सणांसह दिवाळी सणाचे त्यांच्याकडून समर्थन केले जाते, नव्हे ते सण बौध्द धम्माचेच कसे हे सांगतात. ते सण बौध्द धम्माचे आहेत आणि ते सण उलट हिंदू लोकच साजरे करत आहेत असे त्यांना सूचवायचे आहे. मग ते ब्राम्हणासह अन्य हिंदू लोक आपल्या घरातील विवाह, गृहप्रवेश, वाढदिवस, मरणोत्तर विधी बौध्द पध्दतीने का करत नाहीत? ते बुध्द विहारात का येत नाहीत? ते आपल्या घरी बौध्द धम्मीय बुध्द, सम्राट अशोक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा का लावत नाहीत? अशा प्रश्नांची उकल विवाह, गृहप्रवेश, मरणोत्तर विधी बौध्द पध्दतीने करत असताना होत नसते. मात्र हमखास उत्सव साजरा करत असताना आपण बौध्द धम्माच्या आचरणात कुठे कमी पडतो,धम्माबाबत किती आदर आहे हे समजून येते. शिवाय बौद्ध धर्मातील सणामुळे दैववादाची अनामिक भीती निघून जाते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी संविधानाच्या माध्यमातून भारत हा बौध्दराष्ट्र केले आहे.त्यांना बौध्दमय भारत करायचा होता. मय म्हणजे आचरण किंवा वातावरण. आचरण किंवा वातावरण हे त्या देशातील व्यक्तीच्या कृतीतून दिसते. धर्मातील कोणताही उत्सव साजरा करण्यातून त्या धर्माचे आचरण किंवा वातावरण तयार होते. त्यालाच मय (उत्सवमय) म्हटले जाते. घरचे विवाह,गृहप्रवेश,वाढदिवस, मरणोत्तर विधी केल्याने बौध्दमय वातावरण होवूच शकत नाही. उत्सवातूनच बौध्दमय वातावरण निर्माण होवून ते अन्य धर्मियांना आकर्षण ठरू शकते. याबाबत खोलवर चिंतन होत नसल्यानेच गेले. 67 वर्षे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौध्दमयचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. स्वतःला बौध्द, आंबेडकरी अनुयायी म्हणणार्यांनी घरातील हिंदू धर्मातील भाऊबीज, रक्षा बंधनासह इतर सणांना तिलांजली द्यावी लागणार आहे. आपले नातेवाईक आप्तेष्ट, मित्र परिवाराला त्यापासून अलिप्त करावे लागणार आहे. अन्यथा संविधान प्रणित बौध्द राष्ट्र हे मनुस्मृती हिंदु राष्ट्र होण्याच्याच मार्गावर आहे. त्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी दिलेला धम्माचा मार्ग न स्वीकारणारे ही जबाबदार राहतील.

गेल्या शुक्रवार दि.19 ऑगस्ट 2022 च्या दै.लोकसत्तामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र माधव साठे यानी ‘हिंदू राष्ट्र सर्वसमावेशक! ‘हिंदू’ हे नाव ही राष्ट्रीय संपत्ती आहे. भारतात कायम निवास करणारा कोणीही मनुष्य त्या नावावर अधिकार सांगू शकतो.’ या शिर्षकाचा लेख लिहिला आहे. त्या लेखात साठे म्हणतात, ‘भारताच्या राष्ट्रवादाचे व सांस्कृतिक एकतेचे गमक हिंदुत्वात आहे. ते लेखात असेही धडधडीत म्हणतात, एखाद्या समाजातील घटकांत प्रदीर्घ काळापासून भूमीनिष्ठेबरेाबर एकत्वाची भावना नांदत असेल, तर त्या समाजास स्वतःस राष्ट्र म्हणवून घेता येऊ शकते. यानुसार हिंदुस्थानात हिंदू हेच राष्ट्र ठरतात. हिंदू समाज हा या राष्ट्राचा कणा आहे. या समाजानेच या भूमीला स्वतःचे जातीचे नाव देण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यास भरतभूमी म्हणा, भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा; यापैकी कोणतेही एक नाव घेतले की डोळ्यासमोर हजारो वर्षाच्या हिंदू समाजाच्याच घडामोडीचा इतिहास उभा राहतो. हिंदूंना भारत सोडून जगात अन्य कोणताही देश नाही. त्यामुळे हिंदू हा शब्द भूमिवाचक झाला आहे. हा शब्द सांप्रदायिक नाही वा त राजकीय विचारधाराही नाही. ती या देशाची ओळख आहे.’ साठेंनी हे राष्ट्र हिंदूराष्ट्रच कसे हे लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी डॉ.हेगडेवार, गोळवलकर, सावरकर, ज.द.जोगळेकर, विवेकानंद, टिळक, श्री. व्यं. केतकर या सार्या ब्राम्हण मंडळींच्या लेखनाचेही दाखले दिले आहेत. संघवाल्यांचे सन 2025 ला भारत हे हिंदू राष्ट्र करण्याचे एक स्वप्नवत मिशन आहे. त्याची पेरणी करणेसाठी साठे सारखे लोक कित्येक वर्षे माध्यमांचाही वापर करत आहेत. हिंदू सणांचेही दाखले देत आहेत. हिंदूंचे सण साजरे करणारे हे हिंदूच असू शकतात असा त्यांचा दावा आहे आणि का असू नयेत? स्वतःला बौध्द व आंबेडकरी अनुयायी म्हणणारे जर हिंदू धर्मातील एखादा जरी सण अथवा तत्सम कृती साजरी करत असतील तर ते हेगडेवार, गोलवलकर, सावकर, टिळक यांचे अनुयायी ठरू शकतात. हिंदूच असू शकतात. हिंदू राष्ट्र होणेस खतपाणी घालत आहेत.
या देशात हिंदू सांप्रदाय होता तेव्हा आपल्या वाट्याला काय आले होते हे इथल्या एससी,एसटी,ओबीसी, एनटी,्व्हीजेएनटी,एसबीसी या प्रवर्गात समावेश असलेल्या हिंदू धर्माच्या जातीच्या लोकांनी विचार करावा. रवींद साठे त्याच लेखात प्रारंभीच सांगतात, ‘बर्नार्ड जोसेफ यांनी ‘नॅशलॅलिटीजः इट्स नेचर अॅन्ड प्रॉब्लम’ हा ग्रंथ 1929 मध्ये लिहिला. त्यामध्ये एक प्रकरण भारतातील राष्ट्रीयत्वावर आहे. जोसेफ यांना भारत हे राष्ट्र, हा मुद्दा विवाद्य वाटला. तरीही त्यांनी हे मान्य केले आहे, की आधुनिक राष्ट्रीयत्वाची जी लक्षणे समजली जातात ती भारताच्या प्राचीन इतिहासात आढळतात.’ सम्राट अशोक यानी अखंड जम्बुद्विप भारत निर्माण केला होता. लोकांच्यात राष्ट्रवादाची बिजे रूजवली होती. पण हिंदू मनुस्मृती काळात धर्म वाद रूजविला गेला. राष्ट्रीयत्वाची भावना मागे पडली.इंग्लंडचे तत्कालिन प्रधानमंत्री वेस्टीन चर्चिल यानीही भारताबद्दल व्याख्या केली होती. ते म्हणाले, (In did is not Nation, Only one population)भारत हे राष्ट्र नसून केवळ एक लोकसमुह आहे. मनुस्मृती काळात गावोगावी छळछावण्या (गावकुसाबाहेरची वस्ती) उभारल्या होत्या. छळछावण्यातील लोकांवर अनंत निर्बंध लादले होते. शेवटी शेवटी तर त्यांच्या गळ्यात थुंकण्यासाठी लोटकं बांधले, ढुंगणाला खराटा बांधण्यापर्यंत पेशव्यासारख्या हिंदू राजांची मजल गेली. ही मध्ययुगीन भारतातील परिस्थिती. कदाचित सम्राट अशोकांच्या प्राचीन काळात राष्ट्रीयत्वाची रूजलेली बिजे जोसेफ याना आधुनिक राष्ट्रीयत्वात दिसत असावेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी सम्राट अशोक काळात सर्वसमावेश झालेली गणराज्य पध्दत स्वतंत्र भारताच्या संविधानातून पुन्हा रूजविली आहे. गणराज्य पध्दतीतच सर्वांचे कल्याण व मंगलम होणार आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी ओळखूनच हा देश पुन्हा बौध्दमयच व्हावा असा संकल्प केला होता.तथापि, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाती बौध्दमय भारत करायचे थोडेच होते का? लोकांनी आपल्या कृतीतून
बौध्दमय भारत करायचा आहे. त्याची सुरूवात स्वतःला बौध्द, आंबेडकरी अनुयायी म्हणवून घेतात त्यानी केली पाहिजे. त्यासाठी घरात बौध्द धम्मातील उत्सव साजरे केले पाहिजेत. त्या उत्सवामध्ये इतर समाजातील लोकांना समाविष्ट करून घेतले पाहिजे, तरच हळूहळू इतर जातींच्या लोकांना बौध्द धम्माची गोडी लागेल. उत्सवातून उत्साह निर्माण होतो. प्रबोधन व परिवर्तन होते. हेच मनुस्मृती काळापासून हिंदू मार्तंडांनी केले. जमतंय तेवढी बौध्द उत्सव बंद पाडली आणि काही उत्सवांना हिंदू सणांचा पर्याय दिला. बौध्द धम्मातील बहुजन तिकडे झुकला. म्हणूनच आमचा प्रयत्न बौध्द धम्मातील उत्सव रुजविण्याचा आहे. एकदा का बौध्द धम्मातील उत्सव लोक अंतकरणातून साजरी करू लागले, तर साठे सारख्या ब्राम्हणी तथा हिंदू धर्मियांना बौध्द राष्ट्राची दिंड खांद्यावर घ्यावी लागणार आहे. ‘राष्ट्रवादाचा प्रमुख निकष ‘एकता’ आहे. भारताच्या राष्ट्रवादाचे व सांस्कृतिक एकतेचे गमक हिंदुत्वात आहे’ असे रवींद्र साठेसारखे हिंदू लोक म्हणत असले तरी तो निकषच अर्धसत्य आहे. धर्मात केवळ एकता असून चालत नाही तर समता असावी लागते. हिंदु धर्मात एकता आहे की समता? जाती-जातीत लोक विभगाले आहेत. वर्णव्यवस्था आहे. समता तर लांबच एकता तरी आहे का? याचे उत्तर 15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी केेलेल्या भाषणातील एका मुद्दावरून समजून येईल. ते म्हणतात, ‘हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उध्दार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे. पण इतरांचे काय? ब्राम्हण बाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौध्द धर्मातच होवू शकेल.’

हिंंदू धर्मातील अस्पृश्य म्हणून सन 1917 ला प्राध्यापक असलेल्या कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मटक्यातील पाणी पिण्यास मज्जाव करण्यात आला होता. आजही 105 वर्षांनी आणि विशेषतः देशाने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली असतानाही हिंदू धर्मात विषमतेची परिस्थिती बदलली नाही. गेल्या 20 जुलै रोजी राजस्थान राज्याच्या जालोर जिल्हयाच्या सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील एससी प्रवर्गातील मेघवाल जातीतील इयत्ता तिसरीत शिकणार्या इंद्रकुमार मेघवाल याने पाण्याच्या मटक्याला शिवले म्हणून राजपूत जातीच्या छैलसिंह या शिक्षकाने बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमुळे 13 ऑगस्टला इंद्रकुमारचा प्राण गेला. साठेसारखे हिंदुत्ववादी कोणत्या एकताच्या गप्पा मारतात? अजूनही त्यांच्या जाती मटक्याच्या पाण्यात असतील तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी बौध्द धम्म स्वीकारून व बहुजनांना धम्माचा मार्ग दाखवून कोणतीच चूक केली नाही. हे मातंग समाजातील विठ्ठल साठेंनी (रा.पुणे) लक्षात ठेवावे. याच साठेंना डॉ.बाबासाहेबांचा धर्मांतराचा निर्णय पर्वताएवढी चूक वाटली. आता हे साठे महाशय जैनमय झाल्याचे समजते. जैन धर्मात धर्मांतर कार्यक्रम होत नाहीत. ते जैनच झाले असतील तर साठेंनी ‘जैन झाला मनुवादी’ हे पुस्तक लिहावे. हवे तर आमच्याकडून पुरावे, संदर्भ घ्यावेत. साठ्यांनी ‘झाला बुध्द महार’ या पुस्तकातून डॉ.बाबासाहेबांना जे सल्ले दिले तेच म्हणजे ‘दलितादलितातील भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता, दलितांमध्ये बेटीव्यवहार सुरू करण्यासाठी आंदोलन
उभारली असत तर एकवीस वर्षात बरचंस हाती असतं. धर्मांतराने जे साध्य होवू शकलं नाही ते साध्य होवू शकलं असतं.’ साठे जैन झाले नसतील तर दलित साठेंनी हे सल्ले कृतीत आणावेत. ‘साठे अजून तुम्ही जीवंत आहात. या आणि पहा आमचा सात दिवसाचा घरगुती बुध्द उत्सव, पहा आमच्या प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा, पहा घरात साजरी होत असलेली बुध्द जयंती, धम्म जयंती, संघ जयंती, धम्म विजया दसमी, सम्राट अशोक जयंती. अशा पळपुट्यांना बाबासाहेबांवर आक्षेप घेण्याची संधी देता कामा नये. हे स्वतःला बौध्द व आंबेडकरी अनुयायी म्हणणार्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. स्वतःला बौध्द म्हणवून घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी धम्मदीक्षा घेतली नाही तर ते स्वतः बौध्द धम्माचे आचरण करत होते. आपल्या घरी हिंदू धर्मातील कोणताही सण साजरा करत नव्हते. ते आणखीन काही वर्षे जगले असते, तर त्यानी सम्राट अशोक कालिन बुध्द (रथ) उत्सवाचेही स्वागत केले असते. असाो. आम्ही कशाला आहोत त्यांचे अनुयायी?
सन 2005 साली मी प्रथम माझ्या कोल्हापुरातील (नागभूमी) घरी सात दिवस बुध्द उत्सव साजरा केला. ज्याना खरंच बौध्द धम्माचे आचरण करून बाबासाहेबांचे बौध्दमय भारतचे स्वप्न साकार करायचे आहे, त्यानी आपल्या घरी बुध्द उत्सव सुरू केला. गेल्या सात वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात बुध्द उत्सवाचा प्रसार झाला आहे. हळूहळू व्याप्ती वाढू लागली आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीही घरगुती बुध्द उत्सव साजरा करणार्यांची संख्या वाढलेली असेल. धम्मातील सण व नियमित आचरण करू लागले आहेत त्यांचे स्पष्ट मत झाले आहे की लोकांनी बुध्द आणि धम्माचा वापर केवळ विवाह, गृहप्रवेश, मरणेात्तर विधीसाठी वापरू नये. देवदेवतांची पूजा करून, कोणी घुगूळ घालून बौध्द पध्दतीने विवाह करत असेल, कोणी गारवाचा नवैद्य दाखवून त्या नव्या वास्तूचा गृह्रप्रवेश बौध्द पध्दतीने करत असेल, कोणी गाईच्या तोंडी, कावळ्याच्या तोंडी ‘ठाव’ घालून, नदीला नवैद्य सोडून मरणोत्तर विधी बौध्द पध्दतीने करत असेल तर त्यानी आता हिंदू पध्दतीनेच आपल्या घरचे विधी करावेत. जेव्हा त्याना शंभर टक्के धम्माप्रमाणे आचरण करण्याचे वाटू लागेल तेव्हा त्यानी बौध्द पध्दतीने विधी करावेत. आम्ही बौध्द व आंबेडकरी अनुयायी असल्याचे ढोंग व नाटकं करण्याचे सोडून द्यावे. अशा प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. त्यांची चूक दाखवून देखील ते हिंदू धर्मातील रक्षा बंधन, भाऊबीज व अन्य सण बंद करू शकत नाहीत. त्यांचे म्हणणे आम्ही बौध्द धम्मातील सण साजरे करायचे तसेच आचरण करायचे आणि त्यानी केवळ बौध्द पध्दतीने विवाह, गृहप्रवेश, मरणोत्तर विधी करून धम्माचा सत्यानाश करायचा? हे चालणार नाही.
शेवटाकडे येतो, दिग्दर्शक पा.रंजीत यांच्या ‘धम्मम’ या तामिळ या शॉर्ट फिल्ममध्ये एक शाळकरी मुलगी बुध्दाच्या मुर्तीवर चढलेली दाखविली आहे. तेव्हा तिचे वडील ‘वेडी झालीस का’ देवाच्या अंगावर चढतेस? असे प्रश्न करतो तेव्हा मुलगी म्हणते, ‘बुध्दाने सांगितलय की देव नाही. तुम्ही बुध्दांना देव का म्हणता?’ हा संवाद देव संकल्पनेचा पराभव करणारा असला तरी मूळ प्रश्न हा आहे की ती मुलगी बुध्द मुर्तीवर चढणे योग्य आहे का? ती फिल्म रिलीज न झाल्याने त्या चित्रपटात ती मुलगी कोणत्या धर्मातील दाखविली आहे हे समजायला मार्ग नाही. जर तिचे कुटुंब बौध्द धम्मातील सण साजरे करत असेल, धम्म आचरण करत असेल तर त्या मुलगीचे बुध्दांच्या मुर्तीवर आणि तेही खांद्यावर पाय ठेवण्याचे धाडस होणार नाही असे चित्रपटातून दाखविले असते. कारण जगातील जितकेही बौध्द राष्ट्रे आहेत त्या राष्ट्रांत आजवर हजारोने बुध्दांवर चित्रपट प्रदर्शित झाली आहेत. लाखो चित्रपटात कथानकाच्या अनुषंगाने बुध्द मुर्तीचे दर्शन दिले आहे. पण त्या चित्रपटांतून धम्मम सारखा सीन दाखविलेले नाहीत. कारण त्याना बुध्द मुर्तीचे पावित्र्य ज्ञात आहे. तेव्हा आज तथागत गौतम बुध्द हे हयात नाहीत. ते विश्ववंदनीय आहेत. बुध्द मुर्तीचे पावित्र राखलेच पाहिजे. ती मुलगी मुर्तीतील बुध्दांच्या मांडीवर बसली असती तरी आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. बुध्द मुर्तीच्या खांद्यावर पाय ठेवणारे सीन मान्य केले, तर बुध्द आणि त्यांचे धम्माचे शत्रू तोच संदर्भ घेवून प्रत्यक्षात बुध्द मुर्तीच्या
डोक्यावर चढतील. मुर्त्या तोडल्या म्हणून काय झाले ते देव आहेत का? असे म्हणतील. तेव्हा त्या दिग्दर्शकाची चूक आहे. गेल्या वर्षी गणपती उत्सवाच्या काळातच म्हणजे दि. 14 सप्टेंबर 2021 रोजी प्रसारित झालेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मराठी मालिकातील एका भागामध्ये सँडी विश्वासचे पात्र साकारणार्या अभिनेत्री नैना मोघे हिला जे ब्लॉऊज दिले होते त्या ब्लॉऊजवरील अनेक ठिकाणी जगत्वंदनिय तथागत महामानव गौतम बुध्द यांची प्रतिमा असल्याचे दिसून आले. हा प्रकार म्हणजे विश्ववंदनिय तथागत महामानव गौतम बुध्दांचा घोर अवमान आहे.जनतेतून त्याचा निषेध होवू लागताच त्या मालिकाचे निर्माते महेश कोठारे यानी दिलगिरी व्यक्त केली.
सम्राट अशोक राजा हे आपले गुरू तथागत महामानव गौतम बुध्दांचा मातीच्या कणा इतकाही अवमान सहन करून घेत नव्हते. त्यांच्या काळात एका जैन चित्रकाराने जैन तिर्थणकार वंदनिय भगवान महावीर यांच्या मुर्तीसमोर तथागत गौतम बुध्द नतमस्तक झाल्याचे चित्र रेखाटले होते. भगवान महावीर व तथागत गौतम बुध्द हे तसे समकालिन महामानव. दोघांचीही उंची सारखीच. दोघांमध्ये कोण मोठा आणि कोण छोटा अशी तुलना कोणीच करत नव्हते. मात्र त्या चित्रकारांने आपल्या धर्माच्या तिर्थनकारापेक्षा तथागत गौतम बुध्द हे छोटे असल्याचे दाखविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून तथागत गौतम बुध्दांचा अवमान केला. सम्राट अशोक राजा यांच्या ते चित्र नजरेला आणून दिले. हा भगवंताचा घोर अवमान झाल्याचे त्यानी सांगून आपण हे सहनच करू शकत नाही. त्यानी केवळ त्या चित्रकारालाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाला मृत्यु दंडाची शिक्षा फर्मावली होती. जे कुटुंब, जी व्यक्ती बौध्द धम्माचे आचरण करते त्यानाच बुध्दांचे आणि धम्माचे पावित्र समजणार आहे. त्यानाच वेदना होणार आहेत. अन्यथा त्या ब्लाऊजवरील बुध्दांच्या प्रतिमाचे व धम्मम मधील त्या सीनचे समर्थन करणारे हे थोडेच बौध्द आहेत का? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानीही बुध्द आणि त्यांच्या धम्माच्या पावित्र्याबाबत अनेकवेळा उपदेश केले आहेत. ते धम्म आचरणकर्ते होते. दोन्ही दगडावर हात ठेवणारे नव्हते. सदर लेखाच्या शिर्षकातील प्रश्नाचे उत्तर आजच्य मांडणीतून मिळाले असेल असे मानण्यास हरकत नाही. सम्राट अशोक काळात प्रदेश देवता, नदी देवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वन देवता वगैरेची पूजा राजे व धनिक लोक करत असत. यज्ञपूजात प्राण्यांची आहुती दिली जात होती. सम्राट अशोक राजा यानी ते नाकारले. म्हणाले, ‘मी बुध्द धम्माच्या मार्गाने अनुसरण करीत असल्यामुळे मला दुसर्या कोणत्याही देव देवतांची पूजा करण्याची गरज नाही.’ त्यानी आपल्या प्रिय गुरूंचा अर्थात बुध्दांचा रथ उत्सव सुरू केला. बुध्द उत्सव भारतात सुमारे आठशे वर्षे सुरू होता. यंदा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर असा सात दिवस घरगुती बुध्द (रथ) उत्सव चालणार आहे. गेले 15 दिवस मी त्या कुटुंबाच्या घरी भेटी देवून उत्सवाची आठवण करून देत आहे. आज आवश्यकता आहे म्हणूनच उत्सव साजरा करणेसाठी ती कुटुंबे सज्ज झाली आहेत.
देवदास बानकर ८२७५३१९६९२,संपादक दैनिक मुक्तनायक कोल्हापूर

