
भारताचा इतिहास फार विचित्र घटनांनी भरलेला आहे.आपल्या भारत देशावर अनेक परकीय देशांनी आक्रमण केले.भयंकर लूट केली,आया बहिणींची इज्जत लुटली,अनेक घराची राख रांगोळी केली,हे सर्व आम्ही भारतीय प्रजा तसेच राजे महाराजे उघड्या डोळ्यांनी पाहत होतो.काही प्रमाणात प्रतिकार होत होता,परंतु ज्याप्रमाणे शत्रू ताकतवान आहे त्या प्रमाणात आम्ही भारतीयांनी तेवढ्याच ताकदीने प्रति हल्ला केला नाही.याचे मुख्य कारण असे होते की येथे अलग अलग जाती,अलग अलग धर्म व पंथाचे लोक राहत होते आणि ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असत व दुसऱ्या लोकांना नीच समजत होते.या गोष्टीमुळे आम्ही भारतीय लोक एकत्र येऊ शकलो नाही.दुसऱ्याला मदत करू शकलो नाही.त्याच वेळेस जर सर्व प्रजा व राजे महाराजे एकत्र आले असते तर एकाही परकीय देशाची डाळ आपल्यासमोर शिजली नसती.असा प्रयत्न फक्त सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्याच काळात झाला.परंतु या महान राजाचे राज्य त्यांच्या निधनानंतर पोरके झाले.त्यानंतर भारतात असा राजा झालाच नाही.या सर्व गोष्टींचा विचार परकीय लोकांनी केला व भारतावर आक्रमण सुरू झाले.हुण,कुशान, मोगल,पोर्तुगीज,डच,फ्रेंच व इंग्रज इत्यादी देशांनी आपल्या भारत देशावर आक्रमण करून देश लुटून नेला.आपल्याला कंगाल बनविले.अशी आमच्या भारतीयांची मानसिकता या लुटीस कारणीभूत ठरली हे आपणास सर्वांना माहीत आहे. एवढे सर्व माहित असूनही आम्ही बहुजन अजूनही एक होत नाही.
पूर्वी इंग्रज गोरे आले व देश लुटून गेले. परंतु आता काळे लोक आपल्याच बांधवांचे शोषण व लूट करीत आहेत.दिवसा ढवळ्या आपल्याच आया बहिणीची इज्जत लूटीत आहेत.हे सर्व अन्याय,अत्याचार आपण बहुजन लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहो, परंतु काहीही प्रतिकार करीत नाही.यामुळे या काळ्या इंग्रज लोकांचे फार फावते व ते अधिक प्रमाणात अन्याय,अत्याचार,शोषण करण्यात मागेपुढे पाहत नाहीत.त्यांना आपल्या लोकांची दया माया येत नाही.आपण आपल्याच भावाला लुटतो,फसवितो याची त्यांना कधीही लाज वाटत नाही.आज बहुजन गुलामीचे जीवन जगत आहे,याची बहुजन समाजाला जाणीव होऊ नये अशा पद्धतीने हे काळे इंग्रज आपल्या बहुजनासोबत वागत आहेत.मग प्रश्न असा पडतो की आम्ही बहुजन खरंच स्वतंत्र झालो का ? तर उत्तर आहे – नाही.आम्ही बहूजन अजूनही स्वतंत्र झालो नाही,फक्त नावाला गोरे इंग्रज देश लुटून गेले व काळे इंग्रज येथेच देश लूटत आहेत.ही लूट कधीही थांबणार नाही.हे काळे इंग्रज अजूनही बहुजनाला आपले बंधू मानीत नाहीत.परंतु आम्ही बहुजन मात्र या काळ्या इंग्रजांना भाऊ मानतो.येथेच बहुदा आम्ही बहुजन फार मोठी चूक करीत आहोत आणि त्या चुकीचे फार वाईट परिणाम सुद्धा भोगत आहोत. परंतु हे अजूनही आम्हा बहुजनांना कळत नाही हे आमची फार मोठी शोकांतिका आहे.
आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण द्यायला सुरुवात केली. महात्मा फुलेंना वाटले की बहूजन जर शिकला तर त्यांच्यामध्ये जागृतता येईल आणि तो विवेकशील होऊन जगाला प्रश्न विचारेल की मी असा का लुटला जातो? मला इतर लोकाप्रमाणे वागणूक का मिळत नाही? राजश्री शाहू महाराजांनी महात्मा फुलेंचा वारसा पुढे चालवून सर्व समाजातील लोकांना अलग अलग वसतीगृह काढून शिक्षणाची द्वारे खुली केली.त्यांनी कडक नियम काढला की जर आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठविले नाही तर एक आणा दंड आकारण्यात येईल. शाहू महाराज 27/12/1917 रोजी खामगाव येथे भरलेल्या शिक्षण परिषदेत सांगतात की “शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही,असे इतिहास सांगतो.अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सदी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत.म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्तानला अत्यंत आवश्यकता आहे.” या अगोदर महात्मा फुले 1882 मध्ये हंटर कमिशन समोर साक्ष देताना मागणी करतात की 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले पाहिजे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील समाज रचनेचा,समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला होता.त्यांनी यावर गहन चिंतन व मनन केले होते. खऱ्या अर्थाने भारतातील लोकांच्या समस्या त्यांना कळून आल्या होत्या.त्यावर तोडगा काढताना त्यांनी बरेच उपाय सुचविले परंतु त्यावर अजूनही अंमल सुरू झाला नाही.जे जे महात्मा फुले यांना अभिप्रेत होते, जे शाहू महाराजांना अभिप्रेत होते तेच डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत होते.बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानले म्हणजे महात्मा फुले यांचे कार्य किती महान होते हे यावरून आपल्याला कळून येते. महात्मा फुले,शाहू छत्रपती महाराज यांनी समाज परिवर्तनाचा पाया रचला व बाबासाहेबांनी त्यावर कळस रचला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.बाबासाहेबांना घटना समितीवर येऊ न देण्यासाठी काँग्रेसने जंग-जंग पछाडले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले की बाबासाहेबांना घटना समितीचे दरवाजे काय तर आम्ही खिडक्या सुद्धा बंद केलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाले तर त्या काँग्रेसवाल्यांनी मी घटना समितीवर जाऊ नये म्हणून भोके सुद्धा बुजवून टाकलेली आहेत.बघा या काँग्रेसच्या लोकांना बाबासाहेबांविषयी किती ऍलर्जी होती.कारण फार सोपे आहे,काँग्रेसला जी सत्ता पाहिजे होती ती फक्त सुवर्ण लोकांकरता पाहिजे होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जर घटना समितीवर निवडून आले तर आपले काही चालणार नाही अशी त्यांना भीती होती.आम जनतेसाठी त्यांना काहीही करायचे नव्हते आणि आजपर्यंतचा इतिहास आहे त्यांनी काहीही केले नाही. थोडेफार केले हे आम्हाला मान्यच करावे लागेल.थोडे फारच केले,कारण आजही आमचा माणूस पालाच्या (कपड्याच्या) घरात राहत आहे.कपड्याच्या घरात राहून तो थंडी,ऊन,वारा पाऊस यापासून कसे संरक्षण करत असेल हे एक फार मोठे कोडे आहे.या लोकांना अजूनही शिक्षण मिळत नाही.अजूनही हे लोक भटकंती करीत आहेत.त्यांच्या वाट्याला भटकंतीचे जीवन आलेले आहे.आमच्या शासनाला किंवा प्रशासनाला ७५ वर्षे झाली परंतु अजूनही त्यांनी या प्रश्नाची उकल केलेली नाही हे प्रश्न सोडविलेले नाहीत.उच्च वर्णीय लोकांची मानसिकता अशी आहे की बहुजनांनी शिकू नये,संपत्ती जमा करू नये.बहुजनांनी फक्त आणि फक्त उच्चवर्णीय लोकांची सेवा करीत रहावे.जर बहुजन शिकले तर ते प्रश्न विचारतील या भीतीपोटी बहुजनांचे शिक्षण बंद करण्यात येत आहे.बहुजन लोक जसे आहे तशा परिस्थितीत जीवन जगण्यात धन्यता मानतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास येथे 24 सप्टेंबर 1944 रोजी आपल्या भाषणात सांगितले की “बहुजनांनो जा तुमच्या घराच्या भिंतीवर कोरून ठेवा की तुम्हाला या देशाची शासक जमात बनायची आहे.” या अगोदर 1938 साली चिपळूण येथे शेतकऱ्यांच्या सभेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की मला तुमच्यापैकी या देशाचे पंतप्रधान झालेले पाहायला आवडेल.बाबासाहेबांनी भारताची घटना लिहिली त्यामध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत सुवर्ण लोक राज्यघटनेचा अभ्यास करून सर्व प्रकारचे फायदे लाटण्याचा प्रयत्न करतात.परंतु आम्ही बहुजन लोक अजूनही अज्ञानी आहोत.शेकडो वर्षापासून बहुजन लोक गुलामी करत आलेले आहेत,आताही बहुजन लोक गुलामीच करीत आहेत व यापुढेही बहुजन लोकांना गुलामीचे जीवन जगावे लागणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजनांना 1950 पासूनच जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपण मात्र तो संदेश मान्य केला नाही व बहुजनांनी बहुजनांची फजिती चालूच ठेवलेली आहे. याकरता आपण स्वतः जबाबदार आहोत.सुवर्ण लोक आमच्या भरोशावर सत्ता काबीज करतात व आमच्यावरच सत्ता गाजवितात हे आता बदलले पाहिजे. आपण सर्व SC,ST,OBC and MINORITIES झाडून एकत्र आले पाहिजे व येणाऱ्या काळात सत्ता संपादन केली पाहिजे.जर आपण बहुजन सत्ता हाती घेणार नसाल तर मग आपणच आपला सत्यानाश करून घेणार आहोत.अजूनही मोठ्या प्रमाणात बहुजनांचे शोषण होणार आहे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मार्ग दाखविलेला आहे. त्या मार्गाने आपण जायला पाहिजे, तेव्हाच बहुजनांचा विकास,उन्नती,प्रगती व्हायला मदत होऊ शकते. ज्या व्यक्तीची आज जगात जयंती साजरी केली जाते,ज्या व्यक्तीचे आज सर्वात जास्त पुतळे उभारले गेलेले आहेत,ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त गीत लिहिलेली व गायलेली आहेत,ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त लोकांनी पी.एच.डी.केलेली आहे अशा या महान व्यक्तीचे म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपण विचार मानत नसलो तर काहीही फायदा नाही. सवर्ण लोक बाबासाहेबांच्या विचाराचा फायदा घेत आहेत. परंतु तो फायदा आम्हाला मिळू देत नाहीत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला “एक मत एक मूल्य” हा फार मोठा अधिकार दिला आहे.ही एक फार मोठी शक्ती आहे. त्या शक्तीचा आपण अजूनही उपयोग केलेला नाही.परंतु आता मात्र ती वेळ येऊन ठेपलेली आहे.आता बहुजनांची सहनशक्ती संपलेली आहे.बाबासाहेबांनी सांगितले की सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे.बहुजनाला जर सत्ता मिळाली तर त्या किल्ली मुळे आर्थिक दरवाजे, सामाजिक दरवाजे,सांस्कृतिक दरवाजे, शैक्षणिक दरवाजे बहुजनांना उघडता येतील. जेव्हा बहुजनांची सत्ता येईल तेव्हाच कुठे भारताच्या खऱ्या विकासाला सुरुवात होईल.
आपल्या देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले पण ते स्वातंत्र्य भारतीय जनतेला मिळाले नसून फक्त सवर्ण जनतेला मिळालेले आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारत हा प्रजासत्ताक देश बनला व त्या दिवसापासून भारताची राज्यघटना अमलात आली. परंतु भारताची राज्यघटना खऱ्या अर्थाने अमलात आणल्या गेली नाही. ती फक्त कागदावरच आहे. बहुजनांना अजूनही भारतीय राज्यघटनेचे फायदे मिळालेले नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली व राज्यघटना अमलात येऊन ७५ वर्षे झाली तरीही आम्हा बहुजनांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे कारण :
1. शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे.2. आमचे काही बहुजन अजूनही पालाच्या घरात राहतात.3. आमच्या बहुजनांची मुले अजूनही कुपोषणाने मरण पावतात.4. आमच्या बहुजन महिला व पुरुष यांना कथा वाचन करता येत नाही. त्यांना धमक्या मिळतात की बहुजन कथा वाचन करू शकत नाही. तो आमचा अधिकार आहे.5. बहुजनांचे शिक्षण फार मोठ्या हुशारीने बंद करण्यात येत आहे.
महात्मा फुलेचा संघर्ष आता वाया जात आहे की काय अशी भीती वाटायला लागली आहे.छत्रपती शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी बहुजनांना आरक्षण सुरू केले ते बहुजनांचे आरक्षण आता समाप्त करण्यात येत आहे.म्हणजे फुले- शाहू -आंबेडकरी विचारधारा मनुवाद्यांनी समाप्त करून टाकण्याचा चंग बांधलेला आहे.म्हणून आपण बहुजनांनी आता जागृत होऊन सत्तेची किल्ली आपल्या हातात घ्यायची आहे.
बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होते. तेव्हा बहुजनांनो आपले आपसातील सर्व मतभेद विसरून जा,अहंकार थोडा बाजूला ठेवा,एक व्हा.भारतातील लोक बहुजन शक्ती कधी एक होते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.जेव्हा आमची बहुजनांची सत्ता येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानतो हे सिद्ध होईल.तोपर्यंत नाही.
महादेव डांबरे- 9665047153
छत्रपती संभाजी नगर

