
सोमनाथ पाटील यांचा लेख वाचला आणि त्यावर व्यक्त व्हावसं वाटलं,लेख वाचताना मन सुन्न होतं.कारण हा लेख केवळ आठवणींचा नाही,तर एका आत्मस्वीकाराचा प्रवास आहे.साधारणपणे जेव्हा आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलतो, तेव्हा लक्ष जातं की त्यांनी दलित,बहुजन,वंचित समाजाला माणुसकी दिली,त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली.पण पाटील यांचा ठाम दावा आहे की बाबासाहेबांनी दलितांना नव्हे,तर सवर्णांना माणसात आणलं.दलित मुळात माणूस होतेच,पण सवर्ण वागणुकीतून माणसात नव्हते.ही गोष्ट स्पष्ट,कठोर आणि अस्वस्थ करणारी आहे.पण याच ठिकाणी सत्य दडलं आहे.
गावगाड्याचा खोटा रोमॅंटिसिझम.
गाव म्हणजे गोडवा,निरागसता,आपुलकी-अशी प्रतिमा आपल्यासमोर मांडली जाते. कवी आणि लेखक गावाचं कौतुक करतात.पण पाटील गावगाड्याच्या या गोंडस प्रतिमेला धक्का देतात.त्यांना कळतं की गावगाडा हा शोषणाच्या संस्कृतीवर उभारलेला होता. वाडे, माड्या,देवळं-ही केवळ वास्तू नव्हती,ती दलितांच्या श्रमांचं रक्त शोषून उभी राहिलेली स्मारकं होती.महारवाड्यातले पुरुष,स्त्रिया,मुलं जनावरांसारखे राबले.त्यांच्या पायांवर फोड आले,खांदे वाकडे झाले,केस गेले,पण बदल्यात मिळाली ती फक्त शेरभर ज्वारी,कळणा कोंडा किंवा ताकाचं तपीलं.आज गावाची आठवण काढताना बहुतांश सवर्ण समाजाला अभिमान वाटतो,पण पाटील यांना अपराधीपणाची जाणीव होते.कारण त्यांना समजलं की त्यांच्या पिढ्या ज्या वैभवात राहिल्या,त्यामागे दलितांच्या घामाचं,रक्ताचं,अपमानाचा इतिहास दडलेला आहे.
अपराधाची कबुली
सोमनाथ पाटील यांच्या लेखातील सर्वात प्रभावी भाग म्हणजे त्यांचा आत्मस्वीकार.-शाळेत दलित मुलांना वेगळी रांग लावली जायची.बाबासाहेबांच्या चित्राला मिशा काढून विद्रुप करायचो.जातिव्यवस्थेचा दोष फक्त ब्राह्मणांवर ढकलून आम्ही निर्धास्त राहत होतो.ही सगळी कबुली एका अपराधी भावनेतून आलेली आहे.कारण खऱ्या अर्थाने दलितांच्या दुःखाला जबाबदार फक्त ब्राह्मण नव्हते,तर सवर्ण समाजातील प्रत्येक पाटील,वाडकरी,शेतकरी होता.व्यवस्थेची चौकट ब्राह्मणांनी आखली असली तरी तिचा भोग आणि उपभोग इतरांनी केला.ही सत्यकबुली फार कमी लोक देतात.
बाबासाहेबांचं खरं योगदान.
बहुतेक वेळा आपण म्हणतो की बाबासाहेबांनी दलितांना माणसात आणलं. पण पाटील यांची ठाम धारणा आहे की दलित आधीपासून माणूसच होते. शोषण करणारा वर्ग मात्र माणुसकी हरवून बसला होता.बाबासाहेबांनी दलितांना स्वतंत्र उभं केलं, त्यांना शिक्षण,हक्क,कायदे दिले. पण त्याचवेळी शोषकांना देखील आरसा दाखवला. त्यांना समज दिली की माणसासारखं वागणं म्हणजे काय?.दलितांना नव्हे तर सवर्णांना माणुसकी शिकवणं-हे बाबासाहेबांचं मोठं कार्य आहे.कारण जर दलितांना वेगळं करून स्वतंत्र मार्ग दिला नसता,तर सवर्ण समाज अजूनही त्यांचं रक्त शोषत राहिला असता.म्हणूनच पाटील भावनिकपणे लिहितात की “बाबासाहेबांचं ऋण आमच्या कातडीचा जोडा शिवूनही फिटणार नाही.”
माणसात येण्याचा प्रवास.
सोमनाथ पाटील स्वतः मान्य करतात की माणसात येणं ही सोपी प्रक्रिया नाही.हजारो वर्षांची जातिव्यवस्था DNA मध्ये भरलेली असते.नकळत विकृती प्रकट होत राहते.पण बाबासाहेबांचं बोट धरून एक एक पाऊल टाकताना माणुसकीची खरी चव समजते. त्यातून अपराधीपणाचा निचरा होतो,नवी ओळख मिळते.ही कबुली केवळ वैयक्तिक नाही,तर सामाजिक आहे.कारण आजही असंख्य गावे,वाडे,वस्त्या हाच इतिहास घेऊन उभ्या आहेत.अनेक घरांच्या वैभवामागे दलितांचे श्रम दडलेले आहेत.ते मान्य करणं, त्याची लाज वाटणं आणि बदलासाठी पाऊल उचलणं-ही खरी क्रांती आहे.
आजच्या समाजासाठी धडा.
आजही आपण पाहतो की जातीय भिंती पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. अस्पृश्यतेच्या उघड स्वरूपापेक्षा सूक्ष्म स्वरूपं समाजात जिवंत आहेत.शिक्षण, नोकरी,राजकारणात संधी मिळाल्या तरी सामाजिक वर्चस्व संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पाटील यांचा लेख आरसा दाखवतो.जातिव्यवस्थेचा दोष फक्त “त्यांनी” लादला,असं म्हणणं सोपं आहे.पण त्यात “आमचा” सहभाग होता हे कबूल करणं कठीण आहे.हाच आत्मस्वीकार आज प्रत्येकाला करावा लागेल.तेव्हाच बाबासाहेबांचं कार्य खरं समजेल.
बाबासाहेबांचे चिरंतन महत्त्व पाटील यांची शेवटची ओळ “आम्ही खातो त्या भाकरीवरबी बाबासाहेबांची सही हाय रं” ही थरारून टाकणारी आहे. कारण बाबासाहेबांच्या कार्याशिवाय आज आपल्याला मिळालेली लोकशाही,समानतेचं भान, शिक्षणाची दारे,सामाजिक प्रतिष्ठा-हे काहीच अस्तित्वात नसतं.आज प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे!-आपण अजूनही नकळत जातिवादी आहोत का?. आपण बाबासाहेबांना केवळ प्रतीक म्हणून वापरतो का, की त्यांचा संदेश अंगीकारतो? दलित, वंचितांना समानतेने वागवणं हे खरं प्रायश्चित्त आहे का?
सोमनाथ पाटील यांनी उघड केलेल्या सत्याने आपल्या अंतर्मनाला हादरवायला हवं. कारण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली शिकवण फक्त दलितांची मुक्ती नाही, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या मानवतेची पुनर्स्थापना आहे.सोमनाथ पाटील यांचा हा लेख वाचताना वाटतं-आपल्या समाजाला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे.पण सुरुवात महत्त्वाची असते. दोष मान्य करणं,अपराधाची कबुली देणं,आणि बाबासाहेबांच्या विचारांकडे चालत राहणं-ही खरी माणुसकीची वाट आहे.आपण आज जे अन्न खातो,जे श्वास घेतो, जी लोकशाही उपभोगतो,त्या सगळ्यावर बाबासाहेबांची सही आहे. म्हणूनच त्यांना केवळ स्मारकांत बंदिस्त न ठेवता, आपल्या जीवनात जिवंत ठेवणं ही खरी कृतज्ञता ठरेल.
रतनकुमार साळवे-9923502320
संपादक- दैनिक, “निळे प्रतीक”छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

