
एखाद्या महापुरुषाच्या प्रतिमेची जेव्हा आपण आपल्या गावातून मिरवणूक काढत असतो तेव्हा त्या मिरवणुकीतुन समाजाला एक संदेश मिळायला हवा असते.आणि त्याच उद्देशाने ती प्रतिमा एका व्यक्तीची नसून एका फार मोठ्या गहन विचाराची समाजाला ओळख व्हावी आणि ती कायम समाजाच्या मनात रुजावी आणि त्यातूनच एक आदर्श गाव निर्माण व्हावे अशा प्रकारचा निश्चितच विचार व्हायला हवा असतो. त्यातल्या त्यात भीम जयंती उत्सव अर्थात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाची प्रतिमा घेऊन जर आपण निघालो म्हणजे निश्चितच आपण लोक अतिशय विचाराने प्रगल्भ,आचाराने परिशुद्ध व समाजाला दिशा देणारे असे आदर्शभूत वाटणारे असायला पाहिजेत!
मी तरी माझ्या बालपणात काही वेळ बोट धरून चालताना किंवा माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसून पाहिलेल्या मिरवणुका ह्या अतिशय सुंदर आणि आदर्शभुत ठरणाऱ्या असत.असे मला वाटते. त्याचे कारण काय? तर त्याचे कारण असे होते की, त्यावेळचे मिरवणुकीचे स्वरूप हे अशा प्रकारचे असायचे की,एखाद्या व्यक्तीच्या हस्तकलेतुन साकारलेल्या हत्तीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची खूपच आकर्षक प्रतिमा अंबारी मध्ये असायची. आणि त्या सजलेल्या हत्ती समोर तरुण मुलं,मुली खूप छान प्रकारे लेझीम खेळत.तसेच मुलं मुली लाठी काठी,ढाल तलवारी,दांडपट्टा वगैरे, वगैरे याचे प्रात्यक्षिक चालत असे नंतर संथ गतीने मिरवणूक पुढे-पुढे सरकत असताना हत्तीच्या मागो-माग साधारण वयस्कर महिला व पुरुषांचा फार मोठा तांडा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करीत चालायचा. त्यावेळच्या त्या आकाश पाताळ दुमदुमून टाकणाऱ्या काही घोषणा होत्या. त्या संपल्या म्हणजे नंतर महिला वर्ग हा भीम राजाचा पाळणा म्हणत चालत असत ती संथ चाल आणि ते मधुर सूर समाजात दूरपर्यंत एक संदेश देत होते.की,बघा! याच महापुरुषाने एकूणच भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची ओळख करून दिली आहे. समाज व्यवस्थेतील असमानता दूर करण्यासाठी भयंकर असा संघर्ष केलेला आहे.मग आता समाजात ही मूल्य रुजवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे.ही शिकवण त्या मिरवणुकीतून दिल्या जात होती.आणि सारे गाव हे दृश्य अगदी मंत्रमुग्ध होऊन पाहत होते.
अशा या शिस्तबद्ध व संयमित मिरवणुकीचे माझ्या गावातील हिंदू,मुस्लिम बांधव सुद्धा गोड कौतुक करायचे.आधीचा मिरवणुकीचा रूट हा झाडीपुऱ्यातुन येत होता तेव्हा गोसावी समाजाचे पुरी कुटुंब हे दरवर्षी नित्यनेमाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अगरबत्ती,मेणबत्ती आणि फुलहाराने स्वागत करीत असत तसेच एकदा अज्ञानापोटी तणावही निर्माण झाला होता मी लहान असताना दगडफेक झाली होती याचा अर्थ मिरवणुकीला हिंदू बांधवांचा विरोध होता असा होत नाही.तर चार दोन समाजकंटक हे कुठेही निर्माण झालेले असतातच परंतु आज आमचे हिंदू बांधव जागृत झाले आहेत. त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक महान कार्याची तथा राष्ट्रसेवा केल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे आजचे आमच्या गावचे वातावरण हे सलोख्याचे व सामंजस्याचे झाले असून ते आमच्या समाज स्वास्थ्याला पोषक आहे. खास असे खेळी-मेळीचे झाले असताना मात्र आम्ही आमच्या उद्धारकर्त्याची,त्या आदर्शभूत असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान महापुरुषाची जयंती साजरी करीत असताना जो मिरवणुकीचा प्रकार आहे तो अतिशय वाईट प्रकार असल्याचे लक्षात आला.इथे त्या विशेष काही घटनांचा उल्लेख मुद्दामहून टाळावा लागेल.कारण की, दोन-चार समाजकंटकांमुळे पूर्ण समाजाला दोषी धरता येत नसते.तरीपण आजकाल त्यांचे प्रमाण व त्यांची उपद्रव्यशक्ती जास्तच वाढली आहे याची समाजाने गंभीर दखल घेतली पाहिजे! म्हणूनच लेख जनतेच्या दरबारात सादर करणे अगत्याचे वाटले आहे.नाहीतर मिरवणुकीतील प्रतिमेच्या सजावटीच्या आड कोण लोक कसे वागतात याचा यावेळी बराच अनुभव आला आहे. मिरवणूक सुरुवात झाली ती,कुठपर्यंत बरोबर आली.कोठून अनुचित प्रकार घडायला सुरुवात झाली. शरबताचे ग्लासचे ग्लास कशाप्रकारे वापरले गेले.नंतर बाजाराच्या कोपऱ्यापासून म्हणजेच स्टॅन्ड पासून कोणी कोणी आपली चामडी वाचवण्याचा कसा-कसा प्रयत्न केला. कोण कोण मिरवणुकीतून काढता पाय घेत पळून गेले. आणि कशाप्रकारे मिरवणुकीचे नियंत्रण राखणाऱ्यांना छड:यंत्र रचून अडचणीत आणल्या गेले. हा सारा प्रकार सांगायला गेलो तर तो एका सभ्य समाजाला अजिबात शोभणारा नाही. हे सारे दृश्य पाहून मला त्या महान संताच्या अर्थात संत कबीराच्या चार ओळी आठवल्या.
‘संत कबीर म्हणतात’ गांडू,भडवे,रणचढे! मर्दो के बेहाल! पतिव्रता भुकीमरे! पेढा खाये छिनाल!
अशाप्रकारे मिरवणुकीतच काय वास्तव समाजातही नुसता धांगडधिंगा चालू आहे त्यामुळे या मिरवणुकीत आंबेडकरी आचरण कुठेच नव्हते. असे म्हणावे लागते.
एकीकडे सूराय मेर मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी! शिख्खा पदम समाधी यामी. आणि दुसरीकडे त्याच पेयाचा महापुरऽ सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो! बघा! यातून आता कोणता आदर्श घ्यायचा?तरीपण समस्त बौद्ध बांधवांना शेवटास सांगू इच्छितो की,आपली वैचारिक भूमिका, आपले आचरण अर्थात नित्यक्रमातील व्यवहार हा उत्तम दर्जाचा कसा होईल! यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. कारण की,आंबेडकरी तत्व जोपर्यंत आपण अंगीकारून लोकांना त्याचा परिचय करून देणार नाही तोपर्यंत आपल्या मानवी जीवनाला कुठलीच किंमत प्राप्त होणार नाही.बाकी आजच्या मिरवणुकीतील जो काही प्रकार आहे तो सर्वश्रुत आहे.माझं ऑब्झर्वेशन जर काही चुकलं असेल तर निश्चितपणे लक्षात आणून द्याल! अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मी चूक लक्षात आणून देणाऱ्याचे आभारच मानणार आहे.मीच खरा! असा माझा अट्टहास कधीच नाही आणि पुढेही असणार नाही. मात्र या 2026 च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आंबेडकरी विचार आणि आचरण कुठेच दिसले नाही. ही मोठी शोकांतिका बनली हे विकृत वास्तव समाजाने गंभीर विचार करून लक्षात घेतले पाहिजे! ही माझी सविनय अपेक्षा आहे.
जय भीम जय भारत
जीवन बोदडे भांबेरी-8888757703,अकोला.

