“बौद्ध समाजातील युवकांचे भवितव्य आणि आजच्या बौद्ध समाजाची कृती..?”

बातमी शेअर करा.

सध्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा विषय जोरदारपणे चर्चेला येत आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील लोकांना शासकीय नोकऱ्यांचा फायदा कोणाला किती झाला? आणि कोणाला नाही झाला?, तसेच सरकार आता सर्व अनुसूचित जातींमध्ये कसा न्याय करणार आहे?, याची मोठी चर्चा उफाळून आली आहे. पण या चर्चेच्या पलीकडे जाऊन एक कटू प्रश्न विचारण्याची गरज आहे.हा सगळा प्रवास खरोखरच सामाजिक न्यायाच्या दिशेने झाला का..?
  खरंतर अनुसूचित जातींमधील लोकांना अजूनही डबक्यात कसे ठेवता येईल,याचे षडयंत्र अनेक दशकांपासून सुरू आहे,असे वाटण्यास भाग पाडणारी परिस्थिती आहे. १९५० ला आरक्षण लागू झाले,पण झाडू खात्याच्या चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्या सोडल्या तर इतर विभागांमध्ये अनुसूचित जातींना फारसा वाव मिळालाच नाही.त्या काळात जे थोडे लोक शिकले होते, त्यांनाच काही प्रमाणात संधी मिळाली.बाकी समाज मात्र त्याच ठिकाणी उभा राहिला.१९७०–७५ नंतर बौद्ध समाजातील एक पिढी शिक्षणाकडे वळली,साधारण ३० टक्के जागृती निर्माण झाली. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात हा बदल दिसून आला.पण महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आजही तीच तीव्रता दिसत नाही, हे वास्तव आहे. हा प्रश्न केवळ शिक्षणाचा नाही,तर संधींच्या असमान वाटपाचा आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळीमुळे शिक्षणाची ज्योत पेटली. सतत प्रबोधन झाले,जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. तरीही ही जागृती सर्व घटकांपर्यंत पोहोचली नाही.आज महाराष्ट्रातील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजातील लोक राहतात,हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. हे चित्र आपल्याला अस्वस्थ करत असेल, तर ते योग्यच आहे.आज एक मोठा भ्रम पसरवला जात आहे. “आरक्षणाचा सर्वाधिक फायदा बौद्धांनी घेतला.” हा दावा जितका मोठा आहे, तितकाच तो अपूर्ण माहितीवर आधारलेला आहे. कारण शासन, प्रशासन आणि न्यायपालिकेत अनुसूचित जातींच्या आतल्या घटकांनुसार कोणाला किती फायदा झाला, याचा स्पष्ट आणि पारदर्शक डेटा उपलब्धच नाही. मग हा निष्कर्ष कशावर आधारित आहे..? हा प्रश्न आपण विचारायलाच हवा.बॅकलॉगच्या जागा किती आहेत..? त्या का भरल्या जात नाहीत? आरक्षणाचा प्रचार आणि प्रसार नेमका कधी आणि कसा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही अंधारात आहेत. उपवर्गीकरणाच्या चर्चेत या गोष्टींचा प्रामाणिक विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा न्यायाच्या नावाखाली पुन्हा अन्याय होण्याची भीती नाकारता येत नाही.आजची आणखी एक गंभीर बाब म्हणजे खाजगीकरणाचा वाढता वेग. सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होत आहे. आरक्षणाची प्रभावीता हळूहळू कमी होत आहे. पुढील १०–१५ वर्षांत आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते. हा केवळ अंदाज नाही; धोरणात्मक बदलांकडे पाहिले तर ही दिशा स्पष्ट दिसते. मग आपण आजच विचार करायला नको का..? त्या दिवसासाठी आपण तयार आहोत का..?
   बौद्ध समाजातील युवक आणि युवतींमध्ये शिक्षणाची ओढ वाढली आहे, हे नक्कीच सकारात्मक आहे. पण केवळ पदवी मिळवून चालणार नाही. गुणवत्ता, कौशल्य, स्पर्धात्मकता आणि आत्मनिर्भरता या गोष्टी अत्यावश्यक आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात काही संस्था प्रयत्न करत आहेत, पण संपूर्ण समाज म्हणून आपण एकत्रितपणे काही ठोस कार्यक्रम आखले आहेत का..? हा प्रश्न मनाला भिडणारा आहे.आज बौद्ध समाजात इव्हेंटवादी विचारधारा वाढताना दिसते.कार्यक्रम,जयंती,पोस्टर, सोशल मीडिया या सगळ्यांमध्ये आपण अडकून पडलो आहोत का..? क्रांती आता मोबाईलच्या स्क्रीनवर होते, पण जमिनीवर काम करणारे हात कमी होत चालले आहेत. फिल्डवर्क करणारा वर्ग हळूहळू नाहीसा होत आहे. ही स्थिती चिंताजनक आहे.इतरांना कमी लेखून स्वतःला मोठे दाखवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. “ते नालायक आणि आम्ही लायक” हा सूर अधिक ठळक होत आहे. कधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व,तर कधी भीमा कोरेगावच्या शूरवीरांचे उदाहरण पुढे करून आपण स्वतःला महान ठरवण्याचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. महानता उधार घेतली जात नाही, ती निर्माण करावी लागते.

“बापाचं क्रेडिट कार्ड वापरून महान होता येत नाही,” ही साधी पण थेट गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली महानता स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध केली. त्यांनी दिलेली प्रेरणा आपण आपल्या आयुष्यात उतरवली पाहिजे.
  मी या लेखातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येकाला आपला मार्ग निवडण्याचा अधिकार आहे.पण एक विचार मात्र मनात रुजवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय करत आहोत? त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपण काय योगदान देत आहोत..? समाजात काही लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत. पण त्यांना आपण किती साथ देतो? की आपण फक्त टाळ्या वाजवतो आणि पुढे निघून जातो..? समाज बदलण्यासाठी केवळ भावना पुरेशा नसतात; त्यासाठी कृती लागते, सातत्य लागते आणि एकमेकांप्रती बांधिलकी लागते.बंधुभाव, सहकार्य आणि परस्पर मदतीची भावना जोपर्यंत आपल्या समाजात रुजत नाही, तोपर्यंत बौद्ध समाजातील युवक आणि युवतींचे भवितव्य धोक्यात राहील. ही केवळ भीती नाही,तर वास्तवाची जाणीव आहे.शेवटी एकच विनंती  हा लेख वाचून तुम्हाला काय वाटले..? तुम्ही समाजातील युवकांसाठी काही उपक्रम राबवत आहात का..? नसाल, तर आजपासून काहीतरी सुरू करण्याचा विचार कराल का..? कारण प्रश्न केवळ भवितव्याचा नाही…! प्रश्न आहे..आपण ते घडवणार आहोत की गमावणार आहोत..?

लेखन :- किरण रामी बाबुराव मोहिते-9561883549,नाशिक.
मोटिवेशनल ट्रेनर,व्याख्याता,मानसशास्त्र आणि संविधान अभ्यासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *