आम्ही शूद्र आहोत.हे ओबीसी स्वीकारतात का?

बातमी शेअर करा.

“काँग्रेसच्या सत्ताकाळात जातिनिहाय जनगणना झाली नाही ही चूक होती.तेव्हा मला ओबीसींचे प्रश्न कळले नव्हते.” अशी कबुली लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिली.या अगोदर “पंडितांनी शूद्रांना लुटले”…याची माफी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मागितली.देशाची सत्ता आळीपाळीने उपभोगणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही विषमतावादी विचारधारा आहेत.हे यातून स्पष्ट होते.याच बरोबर स्वातंत्र्या पूर्वी आणि स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्या नंतरही सत्ता ही उच्च जातीय लोकांकडे आजही आहे.

  समतेच्या विचारा विरोधातली मनुस्मृती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली ती त्यांच्या जीवनातल्या प्रत्यक्ष अनुभवानुसार केलेली कृती होती.महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या चळवळीबद्दल उच्चवर्णीय विचारवंत सातत्याने हेटाळणी करणाऱ्या प्रतिक्रिया देत असतात.यातून सर्वात दिशाभूल होते ती ओबीसी बांधवांची.ओबीसी मानसिक दृष्ट्या आजही तळ्यात मळ्यात आहेत.भारतात शूद्र असणे म्हणजे काय ? हे अनुभवावे लागते.

  ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे शूद्रावर अन्याय करणे हाच हिंदू वैदिक धर्म आहे असे मानतात. त्यामुळे एखादा शूद्र या शोषणात,अत्याचारात चिरडला गेला तर ते त्याच्या पूर्व जन्मातले पाप आहे.असे सांगून धर्माने दिलेल्या शोषणाच्या अधिकारातून या अत्याचारांचे जाहीर समर्थन करतात.अन्यायकारक देव आणि धर्मास विरोध करण्याचे धाडस ओबीसी मध्ये नाही.किंबहुना धर्म चिकित्सा करणे आजच्या कोणत्याही ओबीसी नेतृत्वास किंवा सामान्य कार्यकर्त्यास मान्य नाही.उच्च जातीय लोकांच्या फायद्यासाठीच देव आणि धर्म आहे.अलीकडे त्यात “हिंदू राष्ट्रवादाची” निर्मिती केल्याचे आपण पहात आहोत.

भारतात संविधानाची सत्ता आल्यानंतरही काँग्रेसला ओबीसी शूद्रांचे दुःख का कळले नाही? आजही उच्च जातीय राज्यकर्त्यांची मानसिकता ही सरंजामी जमीनदारी, पुरोहितशाही,भांडवलदारी आहे.याच पद्धतीने ओबीसींवर गुलामीचा संस्कार पारंपरिक हिदू धर्म रोजच करत असतो.हिदू धर्म ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना इतरांवर वर्चस्व गाजविण्याचा धर्मसंस्कार देतो.त्याच पद्धतीने शूद्र ओबीसींना गुलामी स्वीकारण्यास भाग पाडतो.हिदू धर्माच्या अंतर्गत गुलामीचे दुःख समजणे अवघड काम आहे.आधुनिक शिक्षणा शिवाय ही गोष्ट समजतच नाही.

  आजची भारताची शिक्षण व्यवस्था सहजपणे मनुस्मृतीच्या गुलामीचे समर्थन करते. सोबतीस हजारो बुवा बापू नाना दादा आणि उच्चवर्णीय साहित्यिक कवी पत्रकार वर्ण वर्चस्व सातत्याने सांगत आहेत.रामायण महाभारत वेद उपनिषदे यातला हाच संस्कार ही ग्रंथ संपदा बुद्ध चार्वाक यांच्या तर्क बुद्धीने वाचल्यावर समजते.अगोदर शूद्रांना शिक्षण वाचन लेखन यांचे अधिकार नाकारण्यात आले.त्यामुळं बुद्ध चार्वाक ओबीसी वाचणार कसे? त्यामुळे ब्राम्हणांनी शूद्रांचे शोषण केले याची क्षमा भागवतांनी मागितली तरी शोषित ओबीसींना त्याचा अर्थ समजत नाही.

  शूद्रांची गुलामी हाच हिंदू धर्म आहे.हा त्याच्या मानगुटीवर बसलेला धर्म संस्कार पुसणार कोण?भाजपाच्या वर्तमानातील घोडचुकामुळे काँग्रेसची सत्ता आली,त्यांनी जातनीयहाय जनगणना केलीही.तरी आम्ही ओबीसी आहोत म्हणजे काय? हे समजू नये अशी प्रचार यंत्रणा हिंदुत्व वादी करताहेत.अर्थात काँग्रेस भाजपा आणि इतर उजवे डावे “शूद्र म्हणजे काय ?.” हे कधीच सांगणार नाहीत.कारण या शोषणास सारे उच्च जातीय जबाबदार आहेत.ज्या दिवशी ओबीसींना त्यांचे शोषण स्वतःच्या अनुभवातून समजेल? त्या क्षणी ते विषमता वादी देव धर्म सोडून देतील.भारतीय संविधान डोक्यावर घेतील.आज देशाला विषमता वादी धर्म चिकित्सेची गरज आहे.जमीन जंगल पाणी समुद्र शिक्षण आरक्षण यांच्या जमिनीवरच्या रस्त्यावरच्या लोक लढ्याची गरज आहे.

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरचे लढे अगोदर लढतात.पाणी हक्क चवदार तळे, कुळ कायदा जमीनहक्क,मनुस्मृती दहन,जंगल हक्क,या साऱ्यातून ओबीसींना उच्च जातींनी लादलेल्या गुलामीचा प्रत्यक्ष अनुभव समजून सांगतात.या आंदोलन,लढे यांचा अभ्यास करून मी जेव्हा प्रत्यक्ष लढलो.तेव्हा मी विषमता समजून घेतली.शालेय शिक्षणात ही गुलामी समजत नाही.गुलामी समजल्यानंतर आपला परिवार,गाव, समाज,राष्ट्र यांच्या न्यायासाठी लढण्याची प्रेरणा आपोआप मिळते.अर्थात आम्ही शूद्र नशिबाने प्रारब्ध यातून झालो नाही.उच्च जातींच्या सुखासाठी सत्तेसाठी ,वर्चस्वासाठी रचलेले ही सुनियोजित खेळी आहे.हा या देशातील अन्यायच आहे.म्हणूनच उच्चवर्णीय जातींनी या समतेच्या लढ्यात ओबीसींच्या न्यायासाठी उतरले पाहिजे.निसर्ग न्याय अटल आहे.देशाने हा निर्णय लवकर घ्यावा.समतेची क्रांती अटल आहे.

जय ओबीसी.

राजाराम पाटील ८२८६०३१४६३.उरण,जिल्हा ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *