
“मराठा समाजावर अन्याय झाला आहे.तो आम्हीच दूर करू.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रीमंडळ मिडिया मध्ये जोरदार प्रचार करत आहे.सध्या निवडणुका नसताना? एवढा मोठा प्रचार उच्चवर्णीय सवर्ण जातींकडून होत असताना?. स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्या चळवळी चालवणाऱ्या, जमिनीवरच्या, मागास वर्गीय, अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या,कार्यकर्त्यांना मोठा प्रश्न पडलाय.मराठा समाजावर अन्याय नक्की कुणी केला असेल?,भारतीय स्त्रिया?,शूद्र? की अतिशूद्र? यांनी.पाकिस्तान? इंग्लंड?अमेरिका? की चीन बांगलादेश यांनी?. मनुस्मृती समर्थक क्षत्रिय मराठा समाजावर अन्याय केला कुणी? महाराष्ट्रातील विचारवंत ,इतिहासकार,साहित्यिक यांना विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.देशाची साधनसंपत्ती ज्यांच्या ताब्यात आहे.राजकीय सत्ता,धर्म सत्ता,अर्थ सत्ता ,ताब्यात आहे. त्यांनी आमच्यावर अन्याय झाला.? असे आकांडतांडव करणे? ही मागास वर्गीय स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांच्या वैचारिक आकलना साठी मोठे आव्हान असलेली गोष्ट आहे.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी भारतीय समाजाची गुलामी शोधताना, प्रथम स्त्रियांची गुलामी शोधून त्यावर स्त्री शिक्षणाचा उपाय शोधून, सुरुवात स्वतःच स्वतःपासून केली.आद्य शिक्षिका सावित्रीमाई या पारंपरिक ब्राह्मणी सरस्वती देवीसाठी मानवी पर्याय ठरल्या.ओबीसी शूद्र वर्गातील सावित्री आई चे बंड हे हिंदू धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सत्ताधारी जातींच्या हुकूमशाही विरुद्ध केलेले “धार्मिक बंड” हे अजूनही आम्ही समजून घेतलेले नाही.हिंदू धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना मनुस्मृतीने दिलेल्या सर्व सत्ताधारी अधिकारांची, चिरफाड करणारी “धर्मचिकित्सा” समजून घेऊन, त्यावर उपाय शोधणारे फुले दाम्पत्य हा आजच्या ओबीसी चळवळीसाठी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी दिलेला सर्वात मोठा आदर्श आहे.आपला संसार करीत असताना, सामाजिक न्यायासाठी सर्वस्व अर्पण करणारे ओबीसी जोडपे हा आमचा आदर्श झाला असता ? तर ओबीसी चळवळीसाठी पैसा ,साधने, मनुष्यबळ कमी पडले नसते.
आजचा ओबीसी महात्मा फुले यांनी केलेले “धार्मिक बंड” समजून घेत नाही.ब्रम्ह देवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले.म्हणून ते हुशार बुद्धिमान आहेत.विराट पुरुष ब्रह्मदेव याच्या बाहुतून “भुजबळा “तून क्षत्रिय मराठे जन्मले? म्हणून ते शूर योद्धे असतात.? मांड्यातून वैश्य आजचे अदानी अंबानी जन्मले म्हणून ते यशस्वी व्यापारी ,श्रीमंत धनवान असतात.? तर ब्रह्मदेवावाच्या पायातून आम्ही सर्व.८५टक्के भारतीय स्त्रिया शूद्र अतिशूद्र जन्मलो.हा समस्त स्त्रियांच्या ओबीसींच्या एससी एसटी( अस्पृश्य जाती आणि आदिवासी जमाती)गुलामीचा हिंदू वैदिक धर्म आहे.तो झुगारून. टाकून देत. फेकून देत.सत्यापर्यंत जाण्याचा प्रवास “सत्यशोधक ओबीसींना” करायचा आहे.महात्मा जोतिबांचा हा संदेश आम्ही विसरून गेलो.आगरी कोळी माळी भंडारी तत्सम ३७५ महाराष्ट्रातील ओबीसी जातींना, जगातील आधुनिक महापुरुष मिळाला असताना ?.कोणत्याही हिंदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शंकराचार्य साधू ,बुवा बापू गुरुची गरजच नव्हती.
भारतीय संविधानाचे शिल्पकार जागतिक कीर्तीचे विचारवंत प्रकांड पंडित,थोर इतिहासकार,धर्म चिकित्सक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा जोतिबा फुले यांना आपले गुरू मानले आहे.त्याची कारणे ओबिसिनी शोधावीत.अभ्यासावीत.अर्थात साऱ्या भारताच्या गुलामीसाठी कारण परके आक्रमक असल्याचा इतिहास, आमच्या माथी मारणारे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना महात्मा जोतिबा फुले यांच्याप्रमाणेच तथागत गौतम बुद्ध यांनी हिंदू धर्म चिकित्सा करून उघडे पाडले होते.या भगवान बुद्ध आणि संत कबीर यांनाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले आहेत.सविधान लिहिणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसींची धार्मिक गुलामगिरी उघड करून त्यावर उपाय सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यात विषमता वादी मनुस्मृती वेद उपनिषदे रामायण महाभारत या हिंदू साहित्याला पर्याय, बुद्ध कबीर फुले यांचा देऊन ओबीसी शूद्र जातींच्या मुक्तीचा मार्ग सांगितला आहे.
भारतीय संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्री शुद्राती शूद्र यांच्या मुक्तीसाठी जीवन भर चाललेला वैचारिक, राजकीय ,आर्थिक,धार्मिक संघर्ष, ही ओबीसी जीवनाची नवी मार्गदर्शिका,नवी जीवन वाट आहे.ओबीसींना हे विचार आज पटणे अवघड आहे.परंतु कठीण नाही.वर्तमान परिस्थित ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणारे मराठे हे क्षत्रिय की शूद्र ? हा निर्णय वर्तमान परिस्थिती समजून घेऊन विवेकाने घेण्याचा निर्णय आहे.यासाठी प्रत्येक ओबीसींना मनुमृती वाचवीच लागेल.ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात महाड या गावी का जाळली?.याचा भौगोलिक, सांस्कृतिक,धार्मिक अर्थ समजून घ्यावा लागेल.ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या मराठ्यांना ओळखण्यात अनेक आंबेडकरी विचारवंत यांना अपयश आले.वामन मेश्राम या “बामसेफ” संघटनेच्या मोठ्या विचारवंत नेत्यांना हा मोठा संभ्रम झाला.
महाराष्ट्रातील ब्राह्मणांना साथ देणारा क्षत्रिय मराठा हाच येथील स्त्रिया ओबीसी एससी एसटी यांच्या सामाजिक न्यायातील अडथळा आहे.लाडकी बहीण योजनेसाठी मागास वर्गीय निधी पळवून क्षत्रिय सत्ता महाराष्ट्रात स्थापन करणारा “लाडका मराठा भाऊ”कोण आहे.सामाजिक न्यायाचे निधी वाटपात “नव शुक्राचार्य” झालेले आमचे मागास वर्गीय “लाडके भाऊ” कोण आहेत.? हे शूद्र ओबीसी बांधवांनी शोधावेत.अशी “विवेकबुद्धी “बुद्धीची देवता “गणेशोत्सव” काळात आम्हास फुले आंबेडकरी साहित्यातच सापडेल.संत रामदास यांच्या घालीन लोटांगण..करणाऱ्या “आरतीत” नाही. भारताचे शोषण हे कुणा आकाशातील देव राक्षस या चमत्कारिक लोकांनी केले नाही.ते भारतातील हाडे, मांस, रक्त आणि मानवी स्वार्थ यांनी बनलेल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केले आहे.हे सत्य बुद्ध ,चार्वाक, महावीर यांनी सांगून त्याविरोधात बंड केले.याच प्रमाणे महात्मा जोतिबा फुले सावित्री माई फुले राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आबेडकर यांनीही केले आहे.ते ओबिसिनी थेट वाचावे.कुणा मध्यस्थाची मदत न घेता वाचावे.नेतृत्व करणाऱ्या ओबीसींची ती फार मोठी जबाबदारी आहे.नमुन्यासाठी माननीय मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची फार मोठी जबाबदारी आहे.कारण यांच्याकडे लढण्यासाठी मोठी साधने आहेत.आमच्या आगरी नेत्यात मंत्री गणेश नाईक,माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी याचा विचार करावा
महाराष्ट्राच्या स्थापने पासून सत्ता ही दीडशेहून जास्त मराठा आमदार,मंत्री,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठा असलेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासक अधिकारी यांच्या हाती आहे.शेती,पाणी, ऊस कारखाने,उद्योग,सहकार ,बँका मराठा लोकांच्या हाती असताना.त्यांच्यावर अन्याय झाला?.हे बोलणारे फडणवीस आणि मंत्रीमंडळ हे त्यांचे ब्राह्मण भागीदार आहेत. सोबत शरद पवार मित्र अदानी, अंबानी ,लोढा हे वैश्य आहेत.हे सत्य नाकारून? मराठे शूद्र कुणबी आहेत.हे तत्वद्न्यान मांडून पुस्तके लिहिणारे पंडीत, मनुस्मृतीचे गुलामच नाहीत.क्षत्रिय मराठ्यांना घाबरणारे घरगडी आहेत.ओबीसींनी यांच्यापासून कायम सावध राहावे.ओबीसींना स्वतःचा राजकीय पक्ष नसल्यामुळे? मराठा ब्राह्मण यांच्या पक्षात, कार्यरत असूनही ?.ओबीसींना अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या ओबीसी राजकीय नेत्यांचे दुःखही समजून घ्या.जीवनाच्या अंतिम काळात “जो जन्मला तो मरणार आहे.” जगण्याचे हे सत्य ओळखून त्यांनी लढाऊ ओबीसी कार्यकर्त्यास दत्तक घेताना,जात पाहू नये.हाही महात्मा फुले यांचा ओबीसींना संदेश आहे.
क्षत्रिय मराठ्यांना न्याय देणारे फडणवीस, हे मनुस्मृती प्रमाणे सत्तेतील क्षत्रिय मराठ्यांचे स्पर्धक भाऊ आहेत.तर ओबीसींचे जन्मजात शत्रू आहेत.फडणवीस मामींनी जरांगे पाटील यांना भोजनाचे दिलेले आमंत्रण आणि शरद पवार अदानी मित्रमंडळ हा सारा “मनुस्मृती परिवार” ओबीसी समजून घेतला? तर ओबीसी जीवनातील मुक्ती लवकर मिळते.हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.”पुरोगामी महाराष्ट्र “हा देशाचे नेतृत्व करणारा “प्रदेश” महात्मा फुले आणि सावित्रीबाई मुळेच आहे.देशात ओबीसींची लोकसंख्या ही पन्नास टक्के हून अधिक आहे.तर एससी एसटी ही ओबीसींच्या रक्ताची भावंडे आहेत.आमचे सामाजिक शत्रू विषमतावादी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत.हे मानवतावादी विवेकाने मी सांगत आहे.
वर्तमान स्थिती फार भयानक आहे.ज्यांच्यावर कधीच अन्याय झाला नाही. हे सत्य डोळ्याने दिसत असताना .त्यांचे मागासलेपणाचे पुरावे शोधण्याचे आदेश महाराष्ट्र सरकार ,प्रशासनाला देत आहे.खोटे कुणबी दाखले घेऊन. क्षत्रिय मराठे ओबीसींच्या जागेवर स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडणुका लढत आहेत.यावर बोलायला ,शासन करायला कोणतंही बापट, फडणवीस ,भागवत येणार नाही.वैश्य अदानी, अंबानी, लोढा येणार नाही.स्वतःस छत्रपती शिवराय राजर्षी शाहू या क्षत्रिय कुळातील राज्यकर्ते म्हणविणारे जाणते शरद पवार,दाढीधारी एकनाथ शिंदे, राधाकृष्ण हे ओबीसी रयतेला सोडून,त्यांच्यावरील अन्याय ,अत्याचार थंड डोक्याने पाहताना.क्षत्रिय क्रूर मानसिकतेने ओबीसी आरक्षणाचे राजकीय हत्याकांड पाहत असतील तर?फुले आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, मागास वर्गीय ओबीसींची भूमिका मांडायची नाही तर कुणी मांडायची?
ओबीसी चळवळीतील एक अत्यंत साधे प्रामाणिक,मेहनती,प्रसिद्धी पासून दूर राहणारे कार्यकर्ते श्री कमलाकर दरवडे यांनी पहाटे तीन वाजता एक व्हिडिओ पाठविला.फडणवीस (ब्राह्मण मराठाक्षत्रिय) सरकार मधील आमदार मराठा प्रसाद लाड यांचा.त्यांनी कुणबी नोंदी बाबत म्हटले आहे. “पुरावे असतील? किंवा नसतील?.तुम्ही कुणबी दाखले देऊन टाका.अधिकारी सरकारपेक्षा मोठे नाहीत.” ही वर्तमान परिस्थिती सांगते.हजारो वर्षे भारताचे शोषक हे “ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य” आहेत.
संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित..क्रांती प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचा.यावर उपाय एकच आहे.महात्मा जोतिबा फुले आणि माता सावित्री यांच्याप्रमाणे आधुनिक शिक्षण, प्रबोधन ,ओबीसी चळवळीचे काम आम्ही घरातून सुरू केले पाहिजे.सोबत आपले रक्ताचे भाऊ एससी एसटी यांना घेतले पाहिजे.मी फक्त पैशे खर्च करा.असे म्हणणार नाही.आपले सर्वस्व या ओबीसी चळवळीला अर्पण करा.हीच मोक्ष, हीच मुक्ती, आहे.
आपला भाऊ .
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण,जिल्हा – रायगड.

