कर्मवीर रमेश चक्रे सर, भीमसैनिक कधीच निवृत्त होत नाही!

बातमी शेअर करा.

मराठवाड्याच्या दूर क्षितिजी,
दुर्गम गावच्या धुळीत जन्मले स्वप्न,
दारिद्र्याच्या उन्हातही
आई-वडिलांच्या संस्कारांनी
फुलवीला ज्ञानाचा चैतन्य कुसुम!

जिल्हा परिषदेच्या साध्या शाळेत
शिकली अक्षरांची पहिली ओळ,
डोळ्यांत भविष्याचे आकाश,
मनात जिद्दीचा ज्वालामुखी,
आणि पावलांत कर्माची अढळ वाटचाल!


हुशारीची चमक कपाळी,
चुणूक होती विचारांत,
नेतृत्वाची धग अंतरी,
उच्च गुणांनी गाठले
शिक्षणाच्या उत्तुंग शिखरांत!

अन्नशास्त्रातील पदव्युत्तर विद्येने
ज्ञानाला दिली नवी दिशा,
महाविद्यालयीन स्पर्धा परीक्षेच्या वातावरणाने
मनामध्ये पेटविली
अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा!


पण ध्येय केवळ पदाचे नव्हते,
होते ते समाजाच्या उन्नतीचे;
बाबासाहेबांच्या विचारदीपाने
अंधारलेल्या वाटेवर
प्रकाश पेरण्याचे!

“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा”
हा मंत्र हृदयात घेऊन,
कठोर परिश्रमांच्या घामाने
स्पर्धापरीक्षेचे शिखर सर करून
प्रशासकीय सेवेत प्रवेश केला त्यांनी!


अधिकारी झाले—
पण अधिकाराचा गर्व कधी झाला नाही;
पद मिळाले—
पण माणूसपण कधी हरवले नाही;
कर्तव्य आले—
तेव्हा जबाबदारीपासून कधी पाठ फिरविली नाही!

दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करणे,
कामात प्रामाणिकपणाची शपथ पाळणे,
1
शासकीय यंत्रणेच्या प्रत्येक पायरीवर
कर्तव्यनिष्ठेचा दीप तेवत ठेवणे—
हीच त्यांच्या जीवनाची साधना झाली!

अन्याय दिसला की
मुठ आवळली, आवाज बुलंद झाला;
अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसाठी
संघटनेच्या व्यासपीठावरही
त्यांचा संघर्ष अविरत राहिला!


पदोन्नतीच्या पायऱ्या चढत गेले,
पण पाय मात्र जमिनीवरच राहिले;
यशाच्या प्रत्येक शिखरावर
स्वतःपेक्षा समाजाला
अधिक जवळ त्यांनी धरले!


संसाराच्या वाटेवर
सहचारिणी झाली सावलीसारखी सोबती,
सुख-दुःखाच्या ऋतूंमध्ये
मनोधैर्याची ऊब देत
तिने जपली जीवनाची ज्योती!


धम्मसंस्कारांच्या पवित्र छायेत
घरात ज्ञानाचे दीप उजळले;
मुलांनी शिक्षणाच्या वाटेने
स्वतःची क्षितिजे गाठली,
आणि संस्कारांचे ऋण फेडले!


दलित, पीडित, वंचितांच्या डोळ्यांत
जेव्हा वेदनेचे मेघ दाटले,
तेव्हा चक्रे सरांचे हात
मदतीसाठी पुढे सरसावले;
अश्रूंच्या काठावर
माणुसकीचे शब्द उमलले!


दान केले—
पण दातृत्वाचा दर्प नाही;
मदत केली—
पण उपकाराची भाषा नाही;
कारण अंतरी एकच प्रश्न—
“समाजाने मला काय दिले?” नव्हे,
“मी समाजाला काय देऊ शकतो?”


प्रशासक म्हणून
शासनाच्या योजना कागदावर न राहता
गरजूंच्या दारी पोहोचाव्यात,
वंचितांच्या जीवनात
त्यांचा उजेड उतरावा—
यासाठी त्यांची धडपड अखंड राहिली!


सेवानिवृत्ती आली,
कार्यालयाचा दरवाजा मागे बंद झाला;
पण समाजसेवेचा दरवाजा
कधीच बंद झाला नाही!


कारण—

नोकरीतून निवृत्ती मिळते,
कर्तव्यभावनेतून नाही;
पदाचा शेवट होतो,
पण संघर्षाचा नाही;
वय पुढे सरकते,
पण विचार वृद्ध होत नाही!


भीमाच्या विचारांची मशाल
हाती घेतलेला सैनिक
कधीच निवृत्त होत नसतो;
तो अन्यायाच्या अंधारात
नव्या पिढीच्या हातात
प्रकाश देत राहतो!


म्हणूनच, रमेश चक्रे सर,
आपला जीवनप्रवास
केवळ एका अधिकाऱ्याची कहाणी नाही;
तो आहे—


दारिद्र्यावर मात करणाऱ्या जिद्दीचा,
शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या पिढीचा,
प्रामाणिक प्रशासनाचा,
संघर्षशील चळवळीचा,
आणि माणुसकीच्या अखंड प्रवाहाचा!


आपल्या कर्मदीपाची ज्योत
अशीच पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहो;
आपल्या विचारांची पाऊलवाट
असंख्य तरुणांना दिशा देवो;
वंचितांच्या अंधारलेल्या जीवनात
आपल्या कार्याची पहाट उगवो!


कर्मवीरा,
आपल्या जीवनाला
आज मनःपूर्वक त्रिवार अभिवादन!


एकदा—
आपल्या संघर्षाला!


दुसऱ्यांदा—
आपल्या कर्तव्यनिष्ठेला!

आणि तिसऱ्यांदा—
समाजासाठी अखंड धगधगणाऱ्या
आपल्या भीमसैनिक वृत्तीला!

“पद निवृत्त होते—

पण विचार कधीच निवृत्त होत नाहीत;
भीमसैनिक थांबत नाही,
तो पुढच्या पिढीला
संघर्षाची मशाल देत राहतो!”

(कर्मवीर रमेश चक्रे सर- ९८१९९९२५१८,)


    कवी -डॉ.अरुण क्षिरसागर,9870195600,चारकोप,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *