शासनाचे एससी आरक्षणातील उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण विरोधच…आगरी कोळी ओबिसिनो तुम्ही कुणाच्या बाजूने जाणार?- राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

आरक्षणाचा लाभ शोषित वंचित जातीतील शेवटच्या घटकास व्हावा म्हणून एससी अस्पृश्य ठरविलेल्या ५९ जातीतील एकसंघ समूहाचे चार गट करून स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन घेत आहे.
या समूहातील धर्मांतरित बौद्ध  (पूर्वीची महार)जातीने मातंग जातीचे आरक्षण खाल्ले आहे.असा आरोप ठेऊन वर्तमान देवेंद्र फडणवीस (ब्राह्मण)एकनाथ शिंदे (मराठा) दिवंगत अजित दादा पवार   (मराठा) या मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांचे शासन अस्पृश्य जातींचा न्याय करायला निघाले आहे?.तर आरक्षणधारी जातींचे ऐक्य कायम रहावे.त्यांची विभागणी होऊ नये म्हणून आंबेडकरी विचारांचे लोक त्याला विरोध करीत आहेत.एप्रिल मे मधल्या अत्यंत तप्त उन्हात सुरू झालेली ही लढाई जून महिन्यातल्या पावसात थांबत नाही.उपवर्गी करणाच्या विरोधात बीड जिल्ह्यातील मातंग सोडून इतर जातींचा मोर्चा मातृसत्ताक आगरी कोळी भंडारी मुंबई मध्ये पोहचत आहे.या लाँग मार्चचे मी स्वागत करीत आहे.
   आपल्याला आठवत असेल.महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रात पुढे असलेल्या,पुढारी राज्यकर्त्या मराठा समाजाने आम्हाला ओबीसी आरक्षण मिळावे. यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मराठा मोर्चाला मी जाहीर विरोध केला होता.माझ्या भूमिकेस फार कमी लोकांनी पाठिंबा दिला होता.अर्थात हिंदू मनुस्मृतीचे चातुर्वर्ण्य पद्धतीने स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांचे केलेले शोषण अनेक हिंदू म्हणविलेल्या जातींतील लोकांना अजूनही पटलेले नाही.या विषयावर लिहिताना बोलताना प्रचंड शिव्या उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य या जातींकडून मला मिळत आहेत.त्यांचे गुलाम झालेले ओबीसी लोकही माझ्या विरोधात बोलत असतात.
 अर्थात सामाजिक न्याय न समजलेल्या उच्चवर्णीय हिंदू मानसिकतेच्या लोकांसाठी आरक्षण हा विरोधाचा विषय झालेला आहे.आरक्षणाने देशाची प्रगती थांबली आहे.इतका विकृत प्रचार देशात उच्च जातींकडून सुरू आहे.देशातील ८५टक्के ओबीसी एससी एसटी यांना आपली स्वतःच्या हक्कांच्या, आरक्षणातील भूमिका ठरविणे अवघड झाले आहे.तर आरक्षण विरोधक उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून स्वतःस घोषित करून ,समतेच्या संविधानास मान्य नसलेले आर्थिक दुर्बलांचे आरक्षण, केंद्रातील भाजपच्या सत्तेच्या आधारे मिळविले आहे.तरीही हे शोषक निर्लज्ज लोक हजारो वर्षे शोषित ओबीसी एससी एसटी यांच्या सामाजिक मागासलेपणाचे आरक्षणास विरोध करीत आहेत.


  आरक्षण समजून घेणे केवळ ओबीसी बांधवांसाठी नाही तर एससी समूहातील पूर्वीच्या महार आताच्या बौद्ध बांधव सोडून इतर ५८जातीना प्रचंड अन्याय अत्याचार उच्चवर्णीयांकडून,सोसूनही अवघड जात आहे.
 जंगलात राहणाऱ्या आदिवासी एसटी जातींना हा विषय उच्चवर्णीय हिंदूंच्या विरोधातला म्हणून समजविणार कोण?.मी ज्या शूद्र जातीत जन्मलो त्या आगरी ओबीसी जातींनी स्वतःस कट्टर हिंदू म्हणून घोषित केले आहे.त्यां आगरी जातीसाठी सर्वात कठीण गोष्ट स्वतःच्या जातीच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी  “प्राणवायू “असलेले ओबीसी आरक्षण समजावणे होय.मला ओबीसी आरक्षण हे आंबेडकरी चळवळीने अर्थात प्रामुख्याने बौद्ध बांधवांनी समजावले आहे.तर जन्मापासून वयाच्या पस्तीसी पर्यंत विषमतेच्या संस्कारांची पायभरणी करण्यात ,सर्व हिंदू परंपरा, हिंदुत्ववादी विचारांच्या राजकीय पक्ष,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अनेक हिंदू धर्म संप्रदाय कोकणातील स्वाध्याय परिवार, समर्थ संप्रदाय, शेकडो धार्मिक संप्रदायाचा यात वाटा आहे.रामायण महाभारत भगवत गीता,वेद उपनिषदे यांच्या समर्थकांचा यात मोठा सहभाग आहे.या छोट्याशा लेखात मला हे समजावणे गरजेचे आहे.जन्मापासूनच्या मनुस्मृतीच्या हिंदू संस्कारात वाढलेल्या आगरी ओबीसी तरुणास आरक्षण समजून सांगण्यासाठी जे कष्ट आंबेडकरी भावा बहिणींनी घेतले आहेत.ते व्यक्त करायला माझ्याकडचे शब्द कमी पडतील.त्यांच्या अनंत उपकरणाची आठवण मी ठेऊनच हे लिखाण करीत आहे.
   हिंदू धर्माच्या तेहतीस कोटी देव, वेद उपनिषदे पुराणे आणि बलवान ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विषमतेच्या विरोधातील, समता घेऊन लढणाऱ्या महापुरुषांची नावे आम्ही अभिमानाने घेतो.
तथागत बुद्ध ,चार्वाक,महावीर महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर आगरी समाजातील नारायण नागू पाटील.ॲड दत्ता पाटील,ओबीसी नेते दि बा पाटील अशी अनेक नावे आहेत.परंतु या फार मोठ्या विचारवंताना आजही अपार प्रेमाने माझ्या पर्यंत आणणाऱ्या आंबेडकरी बंधू भगिनीचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही.आरक्षणात उपवर्गीकरण करून न्याय मिळेल. असे सांगून भांडणे लावणाऱ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चजातीय लोकांवर विश्वास ठेवू नये.हा त्यांचा शोषक म्हणून असलेला इतिहास आम्ही शोषित ओबीसी एससी एसटी यांनी कायम लक्षात ठेवला पाहिजे.
आम्ही शोषित आहोत.आमचे शोषण वैदिक हिंदू धर्माचे लाभार्थी ब्राह्मण क्षत्रिय मराठा वैश्य यांनी केले आहे.स्वतःच्या अनुभवाने हे मागासवर्गीय बांधवांनी समजून घ्यावे.”माझे तेच खरे मानावे” हा माझा आग्रह नाही.
मुळात आरक्षण हा सामाजिक न्याय आहे.ही गोष्ट प्रत्येक मागास जातीतील त्यांच्या पुढाऱ्यांनी मोठ्या  मनाने आपापल्या जात बांधवांना समजावणे गरजेचे आहे.उच्चवर्णीय धार्मिक राजकीय सामाजिक नेतृत्व मागासवर्गीय जातींचे हजारो वर्षे शत्रू आणि शोषक राहिले आहेत.ओबीसी एससी एसटी यांच्या गुलामीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.आगरी समाजात ॲड जनार्दन पाटील,जनार्दन कोठेकर ,ॲड दत्ता पाटील,ॲड दी बा पाटील यांनी आरक्षण समजाविण्याचे प्रयत्न केले.अर्थात हा हिंदू धर्म चिकित्सेचा विषय असल्याने त्यांना प्रचंड विरोध हिंदू धर्मीय लोकांकडून झाला.आगरी नेत्यांना अंधश्रद्धाळू आगरी समाजाचा पाठिंबा मिळत नाही .हे ऐतिहासिक सत्य म्हणजे ब्राह्मणी हिंदू धर्माचा ओबीसी लोकांवर असलेला हिंदू विचारांचा प्रभाव होय.विषमतेचे खंडन करण्यासाठी आपापल्या जातींची वैचारिक गुलामी उघड करून महा दयाळू बुद्धांच्या नव्या विज्ञानवादी, तर्कनिष्ठ विचारांचा परिचय करून देणे हे सर्वांचे काम आहे.आंबेडकरी बौद्ध बांधवांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन हे राष्ट्रीय कार्य म्हणजे साविधानिक राष्ट्रनिर्माण आपल्या देशात कष्टाने घडविले आहे.त्यांच्या त्यागाची,संघर्षाची प्रबोधनाची तुलना कुणाबरोबर होऊच शकत नाही.कोणत्याही मागास जातीस आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल? तर त्यास विरोध करणाऱ्या उच्चवर्णीय जातीबरोबर संघर्ष अटल आहे.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या १५टक्के लोकांकडे धर्म अर्थ काम म्हणजेच धार्मिक सत्ता, राजकीय सत्ता,व्यापार यांची सर्व शक्ती केंद्रित झाली आहे.या संपत्तीचे वाटप मागास ओबीसी एससी एसटी यांना करणे सरकारचे काम होते..सरकार ब्राह्मण मराठा वैश्य यांचे असताना हे काम जीवघेणे झाले आहे.असे असताना ?ओबीसी एससी एसटी यांनी एकत्र येऊन लढलो तरच सामाजिक न्याय म्हणजे आरक्षण मिळू.शकते.
एससी आरक्षणात विभाजन हे आरक्षणासाठी लढणाऱ्या आमच्या आंबेडकरी विचारांवर मनुवादी हिंदुत्ववादी लोकांचा सरकार पुरस्कृत हल्ला आहे.यावेळी आंबेडकरी बौद्ध बांधवांच्या सामाजिक नेतृत्वास आम्ही साथ देणे.आर्थिक राजकीय सामाजिक सहाय्य करणे हे स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांचे काम आहे.या चळवळीस आर्थिक सहकार्य करावे. ही नम्र विनंती मी ओबीसी बांधवास  करीत आहे.
   आमच्या गुलामिस कारण जर विषमतावादी वैदिक धर्म असेल ?तर ती गुलामी समजून घ्या.पुन्हा पुन्हा सांगतो माझे तेच खरे मानू नका.
स्वतःच्या विवेक बुद्धीस विचारा.मी माझे अनुभव सांगत आहे.पुस्तकी पाठांतर नाही.आपल्याला जमीन जंगल समुद्र शिक्षण आरक्षण यांना विरोध हिंदू विचारांचा आहे.माझा हा अनुभव आहे.हा अनुभव तुम्हास होत नाही त्याचे कारण आमचे मन बुद्धीवर त्याचा प्रभाव आहे.आंबेडकरी विचार,सभा,साहित्य ,वक्तृत्व हे भारतातले वेगळ्या विचारांचे ,समतेचे ,मानव मुक्तीचे जग आहे.तेही पाहून घ्या. मग ठरवा.याच मातीत गाडलेला आपलाच समतेचा बंधुतेचा न्यायाचा विचार मातृसत्ताक आई एकविरेचा सुपुत्र भगवान बुद्ध यांनी मांडला.जो आजही आपल्या घरात ,मनात लपला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तो सर्वासाठी सांगितला.अगदी उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अल्पसंख्यांक ,ओबीसी एससी एसटी यांच्या साठी,साऱ्या  जगासाठी.त्याच विचारांनी बौद्ध बांधवांची प्रगती झाली.फक्त आरक्षणाने नाही.आरक्षण घेण्यासाठी उच्च शिक्षण गरजेचे आहे.मुंबई विद्यापीठ आगरी कोळी भंडारी लोकांच्या जागेत असूनही आगरी समाजात एकही IAS नाही.हेच दुःख मातंग बांधवांचे आहे.आरक्षण बौद्ध बांधवांनी मिळविले कारण त्यांनी चुकीच्या चालीरीती,मनुस्मृती सोडून ,हिंदू धर्म सोडून डॉ बाबासाहे आंबेडकर बुद्ध फुले यांचा विचार स्वीकारला.ज्यांनी सर्वच आरक्षण आणि अख्खा भारत लुटला. ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या शोषणकर्त्या लोकांशी समतेच्या.,मार्गाने, अहिंसक लोकशाही लढाई लढायची आहे.मागास जातींनी आपल्याच भावांशी लढून कसे चालेल.? विचार करा.सोबत या.मी नम्रपणे समजावितो तुम्हाला.स्त्री शूद्र अतिशूद्र यांची गुलामी नष्ट करण्यासाठी आपल्या जातीसाठी गाव गावात शाळा कॉलेज विद्यापीठे काढू.खूप शिकू.महात्मा फुले सावित्री माई यांचा वसा घेऊ. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सारा भारत एकवीरा पुत्र बुद्धांचा करू.शोषण संपवून समतेचा भारत घडवू .आम्हास हिंदुराष्ट्र नको.संविधानिक राष्ट्र हवे.
जय भारत.

जय भीम.जय एकवीरा.

राजाराम पाटील.उरण रायगड.८२८६०३१४६३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *