लोकशाहीची हत्या कि, नसबंदी?

बातमी शेअर करा.

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सध्या देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक ‘जंतर-मंतर’ मैदानावर उपोषणाला बसले आहेत.ते विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत न्याय मागत आहेत, पण सरकारकडून होणारे कमालीचे दुर्लक्ष हा सध्याच्या राजकीय व्यवस्थेचा सर्वात मोठा आणि धक्कादायक आरसा आहे.
दुर्दैव असे की, देशाच्या नाकाखाली दिली येथे सुरू असलेल्या या आंदोलनाची साधी दखल घ्यायलाही सरकार तयार नाही. सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाकडे सरकार ज्या निगरगट्ट भावनेने पाहत आहे, त्यावरूनच सत्ताधा-यांचा गेल्या १५ वर्षांतील कारभाराचा एक अतिशय भयंकर आणि पद्धतशीर अजेंडा उघडपणे समोर येतो. हा अजेंडा म्हणजे जनतेच्या अक्रोशाला, आंदोलनांना आणि प्रामाणिक मागण्यांना पूर्णपणे निकालात काढणे.
लोकशाहीमध्ये धरणे, मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि उपोषणे या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते; कारण हा सामान्य माणसाच्या न्यायाचा शेवटचा मार्ग असतो. परंतु, या सरकारने या सर्व लोकशाही मार्गांना अजिबात दाद द्यायची नाही, त्यांची दखल घ्यायची नाही आणि त्यांना काडीचेही महत्त्व द्यायचे नाही, अशी एक अघोषित रणनीतीच आखली आहे. सरकार कितीही बदनाम झाले, देशात किंवा राज्यात कितीही अडचणी निर्माण झाल्या, अगदी सरकारचे मंत्री आणि मोठे अधिकारी गंभीर प्रकरणात अडकले, तरी कोणाचाही राजीनामा घ्यायचा नाही, कोणालाही पदावरून दूर करायचे नाही आणि स्वतःवर नामुष्की ओढवून घ्यायची नाही, हाच एकमेव हट्टी अजेंडा सध्या राबविला जात आहे. पूर्वीच्या काळातील राजकीय नैतिकता आणि संवेदनशीलता आता पूर्णपणे संपली असून, त्याची जागा सत्तेच्या अहंकारातून आलेल्या मग्रुरीने घेतली आहे.


या नियोजनबद्ध दुर्लक्षामुळे आज समाजात एक अत्यंत घातक बदल घडत आहे. आंदोलने करूनही सरकार ढिम्म हलत नसल्याचे पाहून लोकांचा धरणे, मोर्चे आणि उपोषणांवरचा विश्वासच हळूहळू उडू लागला आहे. सामाजिक चळवळींची ही धारदार हत्यारे निष्प्रभ करणे, त्यांची धार घालवून टाकणे आणि त्यांचे महत्त्व पूर्णपणे संपवून टाकणे, हाच यामागील सुप्त हेतू आहे. जनता कितीही विरोधात गेली तरी तिच्या मताला आणि भावनांना कवडीचीही किंमत द्यायची नाही, लोकांनी कितीही विरोध केला तरी त्यांना अजिबात जुमानायचे नाही आणि शेवटी ईडी, सीबीआय, पोलीस दल किंवा सैन्य दलाचा वापर करून सर्व आंदोलने व निदर्शने मोडून काढायची, हाच या सरकारचा मार्ग बनला आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी व्यक्ती सोनम वांगचुक यांच्यासारखी समाजात कितीही आदराचे स्थान असणारी असो किंवा तिचे कर्तृत्व कितीही मोठे असो, अशा व्यक्तीला मान द्यायाचा नाही आणि तिच्या मागण्यांना भीक घालायची नाही, हाच पॅटर्न सतत राबवला जात आहे.
जर नागरिकांच्या मनात ही भावना अशीच सतत निर्माण होत राहिली, तर भविष्यात लोकशाहीचा श्वासच गुदमरेल. लोकांना वाटू लागेल की रस्त्यावर उतरून आणि संघर्ष करून काहीच साध्य होत नाही, ज्यामुळे पुढे कोणीही अन्यायाविरुद्ध मोर्चे काढायला किंवा उपोषणाला बसणारच नाही. ज्या दिवशी देशातील जनता हताश होऊन रस्त्यावर उतरणे बंद करेल, त्याच दिवशी लोकशाहीचा अधिकृत हत्या होईल आणि एका मूक, लाचार समाजाची निर्मिती होईल. म्हणूनच, सोनम वांगचुक यांच्या निमित्ताने दिल्लीच्या जंतर-मंतरवरून समोर आलेल्या, आंदोलनांची धार बोथट करणाऱ्या या भयानक अजेंड्याविरोधात वेळीच सावध होऊन आपला आवाज अधिक बुलंद करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे

लेखन – पत्रकार महेंद्र सोनावणे 9822250493(जादूगार एस्.महेंद्रा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *