
पंढरपूर:ग्रामीण भागातील इमारत व इतर बांधकाम मजुरांना ग्रामपंचायत स्तरावरून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (दाखला) मिळण्याचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला आहे. जिद्द बांधकाम कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण कायदेशीर पाठपुराव्यामुळे आणि पंचायत समिती पंढरपूरच्या कडक आदेशानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधून बांधकाम कामगारांना अधिकृत दाखले मिळणे प्रत्यक्षात सुरू झाले असून कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ग्रामसेवक युनियनने घेतलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण स्तरावर ९० दिवसांचे दाखले देणे बंद होते. मजुरांच्या हक्कासाठी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री.मोनेश्वर आप्पासाहेब सुतार यांनी २५ सप्टेंबर २०२४ रोजी पंचायत समिती पंढरपूर कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यानंतर माहिती अधिकाराच्या माध्यमातून तब्बल ३१ पानांचा प्रशासकीय पुरावा गोळा करून शासन निर्णय (जीआर) आणि परिपत्रकांची काटेकोर मांडणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आली.या पाठपुराव्याची दखल घेत पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी यांनी जा.क्र. ६९९१/२०२६, दि. १८.०८.२०२६ अन्वये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ देण्याचे लेखी आदेश पारित केले.या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली असून,वाखरीसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसेवकांमार्फत कामगारांच्या अर्जावर योग्य पडताळणी करून,आवक-जावक नोंदीसह आणि फोटोवर रीतसर सही-शिक्का देऊन दाखले वितरित केले जात आहेत.
“हा विजय तालुक्यातील कष्टकरी मजुरांच्या एकजुटीचा आणि कष्टाचा आहे. कामगारांनी कोणत्याही एजंट किंवा दलालाच्या आहारी न जाता स्वतः संबंधित ग्रामपंचायतीत अधिकृत अर्ज करावा. अर्जावर घरमालक/ठेकेदाराची सही,आधार कार्ड झेरॉक्स आणि योग्य पुरावे जोडूनच दाखला प्राप्त करून घ्यावा.कोणत्याही ग्रामपंचायतीत दाखला देण्यास टाळाटाळ किंवा अडवणूक केल्यास कामगारांनी थेट मोनेश्वर सुतार ९३०९७१२८९६ यांच्याशी संपर्क साधावा. कामगार संघटनेशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
श्री. मोनेश्वर आप्पासाहेब सुतार सोलापूर जिल्हाध्यक्ष – जिद्द बांधकाम कामगार संघटना


