३१ ऑगस्ट हा भटक्या-विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन.भटक्या-विमुक्तांच्या या स्वातंत्र्याला पंच्चाहत्तरी उलटून गेली तरी त्यांना अजूनही खरी ओळख मिळालेली नसल्याने या देशातील भटके-विमुक्त आजही सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक स्वातंत्र्यापासून कोसो दूर आहेत. उलट त्यांच्या आयुष्यातला संघर्ष अधिकच गडद होत असताना दिसून येत आहे. या निमित्ताने घेतलेला आढावा…

आज आम्ही २१ व्या शतकात वास्तव्य करतो आहोत. जगाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उतुंग अशी झेप घेतलेली आहे. त्यासोबतच भारतानेही या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्याचसोबत अंतराळाच्या क्षेत्रात अमाप अशी प्रगती केलेली आहे.आज आम्ही जागतिक महासत्ता होण्याकडे मार्गस्त होत आहेत.एवढे सगळे होत असताना भारताने स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी देखील गाठलेली आहे.निश्चितच आज आम्ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत.ही आमच्या दृष्टीने निश्चितच एक गौरवाची बाब आहे.परंतु असे असताना या स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही एक समूह घटक आजही वंचित,उपेक्षित,दुर्लक्षितच जीवन जगत आहे.तो म्हणजे या देशातील भटके-विमुक्त याला काय म्हणावे.हा एक प्रश्नचिन्हच बनला आहे.
जो समाज घटक अजूनही सामाजिक विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजव्यवस्थेत सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया पारतंत्र्यातच जीवन जगत आहे.भारतीय स्वातंत्र्य लढयात ज्या समाजाचे इतके मोठे योगदान आहे, त्या समाजाची अजूनही सुरू असलेली वाताहात राज्यकर्त्यांच्या मात्र लक्षातच येत नाही.या देशातील भटक्या-विमुक्तांच्या माथी पिढ्यानपिढ्यांचे भटकंतीचे जगणे,दास्य,दारिद्र्य असून अजूनही या देशातील भटक्या-विमुक्तांच्या व्यथा,वेदना संपलेल्या दिसून येत नाहीत.ब्रिटीश काळापासून ते आजातागायत या देशातील पूर्वग्रहदुषित असलेल्या मानसिकतेपुढे वेळोवेळी कसे बळी पडावे लागले आहे याचे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.या भटकंती करणाऱ्या जमातींच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला तर भटक्या-विमुक्तांच्या जीवनातील व्यथा,वेदना,आक्रोश आणि संघर्षाची एक गाथाच डोळ्यासमोरून तरळून जाते.
या देशातील पिढ्यानपिढ्यांपासून ज्यांच्या नशीबी केवळ भटकणे आले त्या तमान भटक्या-विमुक्तांचा आज स्वातंत्र्य दिन. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही याच देशातील एक मोठा समूदाय ब्रिटिशांनी लादलेल्या जुलमी कायद्यामुळे पारतंत्र्यात जगत होता.यामुळे भटक्या-विमुक्तांच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या.भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार मिळवून दिले होते,परंतु ब्रिटिशांनी अदिवासी,भटके-विमुक्त या जमातींच्या विरोधात केलेले जुलमी कायदे मात्र त्यांचा पिच्छा सोडत नव्हते.त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही हा समूह घटक पारतंत्र्याचे जीवन जगत होता.ही गोष्ट तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि त्यांनी या समूह घटकाला न्याय मिळवून देण्याचे ठरविले.तो दिवस होता ३१ ऑगस्ट १९५२. ब्रिटीशांनी या देशातील भटक्या-विमुक्तांवर जो ‘क्रिमीनल ट्राईब्स ॲक्ट’चा गुन्हेगारीचा शिक्का मारलेला होता. त्या विषयावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत विशेष ठराव करून इंग्रजांनी मानवी हक्क नाकारणारा १२ ऑक्टोंबर १८७१ पासून केलेला ‘क्रिमीनल ट्राईब्स ॲक्ट’हा कायदा बदलला आणि त्यात बदल करून ‘हॅबिच्युअल ऑफेन्डर्स ॲक्ट’ असे ठेवले. या कायद्यामुळे गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील भटक्या-विमुक्त या घटकाला विमुक्त जमाती म्हणून ओळख मिळाली. तेव्हापासून ३१ ऑगस्ट हा दिवस या देशातील भटके-विमुक्त आपला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतात. तेव्हापासून भटक्या-विमुक्ता तील गुन्हेगार जमाती वर्गाला ‘विमुक्त’म्हणून ओळखले जाऊ लागले.

आज स्वातंत्र्याची पंच्च्याहत्तरी उलटून गेल्यानंतरही या जमातींची काय अवस्था आहे? आजही भटके-विमुक्त या देशामध्ये असुरक्षित जीवन जगत आहेत.आजही त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या कारणास्तव हल्ले होत आहेत.आज महाराष्ट्रात पेटून उटलेल्या अफवांमुळे याचा सर्वांत जास्त फटका भटक्या-विमुक्त जमातीला बसलेला दिसून येतो. एकीकडे भटकंतीशिवाय पर्याय नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी भटकंती हा एकमेव पर्याय असे सांगत असताना दुसरीकडे या अफवांचा बळी मात्र भटके-विमुक्त ठरत आहेत.आजही प्रत्येक जिल्ह्यात रस्त्याच्याकडेला, गावातील हागणदारी सारख्या ठिकाणी भटक्यांची पाले पाहायला मिळतात. याचे उत्तर आहे राजकारण्यांकडे? यातील कैक जमातींना तर स्वातंत्र्य मिळाले हे अजूनही माहितच नाही. अशीच अवस्था भटक्या-विमुक्तांची झालेली आहे. आजही स्मशानभूमीत मसणजोगी मानवाच्या अंतयात्रेचे शंख फुकून स्वागत करतो, पार्थिव देह जळे पर्यंत त्याचे रक्षण करतो, या मोबदल्यात त्याला मिळतात ५०-१०० रू. यावरच त्याचे चरितार्थ चालते. पाठीवर पोर बांधून डमरू वाजवत फिरणारे, अंगावर चाबकाचे फटके मारून भिक्षा मागणारे, चिमुकल्यांना दोरीवर चढवून जीवघेण्या कसरती करायला लावणारे, भर उन्हात दगडखाणीत, रस्त्याच्याकडेला दगड फोडणारे आणि आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचे दर्शन घडवत आपली परंपरा जतन करणारे डोंबारी, नंदीबैलवाल्यांचे जगणे अजूनही तसेच आहे. यातील असंख्य कुटुंबातील मुलांना ‘शिक्षण हक्क अधिकार’ काय आहे हे देखील माहित नाही. कोल्हाटी, मरीअम्मा वाले किंवा फासेपारधी, हरण शिकारी, कुडमुडे जोशी,डोंबारी डवरी गोसावी, वासुदेव, बेलदार, डक्कलवार, वडार, छप्परबंद, ओतारी आदी अनेक जाती या सामाजिक आणि शैक्षणिक विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासारखी कधीही सर्वेक्षण केले जात नाही. ज्या विदारक अवस्थेत हे सर्व जगतात त्याकडे जवळून पाहण्याचीही कोणाला संवेदनाच उरली नसल्यामुळे हा समाज उपेक्षेचा धनी बनला आहे.

वास्तविक पाहता भटक्या-विमुक्तांच्या स्वातंत्र्याला सात दशकांचा काळ उलटून गेला तरी त्यांना खरी ओळख मात्र अद्यापही मिळालेली नसल्याने भटका-विमुक्त घटक आजही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिकदृष्टया स्वातंत्र्यापासून बरेच दूर आहेत. वर्तमान स्थितीमध्ये पालात राहून जीवन जगणाऱ्या जमातींची स्थिती बिकट बनलेली आहे. जागतिकीकरणाने तर भटक्या-विमुक्तांच्या व्यवसायावर जणू कुऱ्हाडच कोसळली आहे. अर्थात स्वातंत्र्याचा पाऊस भटक्या-विमुक्तांच्या शिवारात आलाच नाही असे म्हटले तर वावगे होणार नाही. असे असताना भटक्या-विमुक्तांना स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरी मूलभूत सोयीसुविधांसाठीच संघर्ष करावा लागत आहे हे कशाचे द्योतक आहे?
भटक्या-विमुक्तांच्या विविध संघटना अस्तित्वात आहेत मात्र आजपर्यंत कोणतीही संघटना प्रभाव पाडू शकलेली नाही. याचे कारण जमातींमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव,रोजी रोटीचा प्रश्न यामुळे दीर्घकाळ संघटनेचा प्रभाव जाणवून येत नाही.प्रत्येक संघटना ही कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे राजकीय दबावामुळे प्रश्नांची तीव्रता जाणवत नाही.
भटक्या-विमुक्तांसाठी या देशात अनेक आयोग,कमिट्या, अहवाल आले परंतु याकडे राजकारण्यांनी दुर्लक्ष केले. म्हणून या देशातील भटक्या-विमुक्तांचे प्रश्न म्हणजे जे अश्वत्थाम्याच्या कपाळावरील भळभळत्या जखमेसारख्या आजही ताज्या आहेत.आजही असंख्य प्रश्न भटक्या-विमुक्ता समोर आ वासून उभ्या आहेत.म्हणून खरेच भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांचा या राजकारण्यांकडून गांभीर्याने विचार होणार आहे काय? भटक्या-विमुक्तांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी शासन तत्पर आहे काय? हाच प्रश्न आहे.
प्रा.श्रीकांत मुद्दे,९८२३३६०२२६,लातूर

