
डॉ.भदंत विनय वात्सायन महास्थवीर त्रिपिटकाचार्य ह्यांच्या आज, ३१ ऑगस्ट रोजी, ८५ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. त्यांच्या महान जिवन कार्याची थोडक्यात उजळणी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
१. भन्तेजींचा जन्म,गाव बेलूरा (जवळा बाजार) ता.नांदुरा जी. बुलढाणा येथे 31/8/1941 रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव काशीराम होते. त्यांचे बाबा उमाजी आणि आई जनाबाई होते. तीन भाऊ आणि दोन बहिणी नामे जानकीराम, सोमाजी, काशीराम, भिकाबाई,सुभद्राबाई असा हा परिवार होता. त्यांचे वडील उमाजी इंगळे हे बेलूरा गावाचे आधीचे वतनदार, नाथपंथी साधु, सोमवंशी टोपकर महार,धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे देवपूजा नियमित होती. घराच्या समोर मातीपाण्याचा देव, शादलबुवा चे ठाणे होते. घरासमोर एक विहीर होती. डोंबेगिऱ्हाणं ची वारी नियमित होत होती. साधु संतांचा नियमित राबता असायचा.
२. त्यांचे जेष्ठ बंधु जानकीराम हे शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी काशीराम च्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होते. काशीराम मराठी मॅट्रिक परीक्षा पास झाले आणि शिक्षक म्हणुन सरकारी सेवेत दाखल झाले.त्यांचे लग्न होऊन दोन मुली आणि एक मुलगा झाला
३.काशीराम बालपणापासून बंडखोर प्रवृत्तीचे होते. 1956 च्या धर्मांतरानंतर त्याची बंडखोरी खूपच तीव्र झाली. उमाजी बाबांचे सगळे देव, घराच्या समोरीत विहिरीत फेकून दिले. मातीपाण्याच्या देवाला खोदून बुद्ध विहाराची पाया भरणी केली आणि विहार बांधून पूर्ण केले. सारनाथ येथून अशोक चिन्ह आणुन विहाराच्या कळसावर विराजमान केले. विहारातील बुद्ध मूर्ती स्वतः बनविली. समाजाच्या सेवेसाठी आणि धम्म प्रचार प्रसारासाठी नोकरीची आडकाठी येत होती. नोकरीचा राजीनामा देऊन संसारातून गृहत्याग करून बौध्द भिक्षु चे जिवण जगावे अशी तीव्र इच्छा मनात घेऊन ते सारनाथ ला निघून गेले. घरच्या लोकांनी गृहत्यागाची परवानगी द्यावी असा हट्ट त्यानी धरला. घरून विरोध होताच. त्यांची पत्नी आणि बाबांनी परवानगी दिली नाहीतर “आत्महत्या ” करीन अशी धमकी त्यांच्या बोलण्यातून वारंवार येत होती. जेष्ठ बंधु जानकीराम यांनी त्यांच्या कुटुंबाची व आई बापाची पूर्ण जबाबदारी घेण्याची शाश्वती देऊन त्यांना गृहत्यागाची परवानगी दिली. जिवंतपणी मेल्यावर करतात ती तेरवी करून काशीराम घर सोडून निघून गेले अशी आठवण बेलूरा येथील जुने रहिवाशी सांगायचे.
४. दरम्यानच्या काळात त्यांची शिक्षकांची ड्युटी मौजे कोलारा, जी. बुलाढाणा येथे होती तेव्हाच तिथेही बुद्ध विहार बांधून पूर्ण केले होते.
५. दिनांक 22/3/1972 रोजी त्यांनी प्रवज्जा घेतली. भन्ते धर्मरक्षित ह्यांनी त्यांना दिक्षा दिली होती. काशीराम चे विनय वात्सायन नावाच्या एका भिक्षुच्या जीवनाला प्रारंभ झाला आणि त्यांचे धम्म प्रसार व प्रचाराचे काम सुरु झाले.
६. बौध्द धम्मच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना श्रीलंकेला जायचे होते. त्यांनी पासपोर्ट साठी अर्ज केला. त्या काळात पासपोर्ट मिळायला भरपूर वेळ लागायचा. पासपोर्ट लवकर मिळण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठली. त्यावेळी सरदार बुटासिंग काँग्रेस मधील बडे प्रस्थ होते. त्यांची भेट घेतली. सरदार बुटासिंग यांनी त्यांना भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा जी गांधी ह्याची भेट घडवून दिली. पंतप्रधान कार्यालयातून शिफारस पत्र मिळविले व पासपोर्ट मिळवीला.
७. डॉ भदंत एन. आनंद महाथेरो ह्यांनी अशी माहिती दिली कि, 1973 साली भन्ते विनय वात्सायन हे श्रीलंकेला आले. त्यांनी भन्ते विनय वात्सायन यांना भदन्त बी. विमलवन्स नायक महाथेरो ह्याच्या कडे पाठविले. पण ते त्यांच्याकडे टिकले नाही. आनंद भंतेजिंनी त्यांना 27/2/1974 रोजी त्यांच्या घरी नेले त्यावेळी ची आठवण सांगीतली ती अशी. दुसऱ्या दिवसी कोलंबो येथे जायचे होते. त्यांचे आणखी एक मित्र भन्ते पी. रतन पण तेथे गेले होते. पावसाळी वातावरण होते. त्यांच्या घराच्या अंगणात हे तिघे भन्ते एकत्र चर्चा करील बसले असतांना वीज पडली ती नेमकी भन्ते पी. रतन ह्यांच्यावर पडली आणि त्यातच ते जागीच वारले. मात्र ह्या दोघांना काहीही झाले नाही. ह्या प्रसंगाला फक्त एक योगायोग म्हणता येईल कि आणखी काही!
८. भन्ते विनय वात्सायन यांनी श्रीलंका विद्यालय, विद्यालंकार युनिव्हर्सिटी, केलण्या कॅम्पस, श्रीलंका येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. कँडी युनिव्हर्सिटी मधे ही त्यांचे शिक्षण झाले होते. श्रीलंकेत असतांना त्यांना एका श्रीलंकन परिवाराने खुप मदत केली होती, म्हणजे त्यांना दत्तक घेतल्या सारखेच सांभाळ केला होता असे भन्ते विनय वात्सायन सांगायचे. श्रीलंकेत बौध्द साहित्य हे सिंहली भाषेत आहे. ते शिकण्यासाठी त्यानी सिंहली भाषा शिकली. पाली आणि सिंहली भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. “ध्यान भावना” ह्या बौध्द ज्ञानाचा अभ्यास आणि सराव त्यांनी केला होता. मुख्यत्वे त्रिपीटकाचा अभ्यास पूर्ण करून श्रीलंकेतून परत येतांना त्यांच्या हातात DBS ही पदवी होती.
९. भन्ते विनय वात्सायन हे 1976 साली भारतात परत आले. त्यांच्या सोबत भन्ते प्रज्ञासार थेरो (श्रीलंका ) आणि भन्ते गुणघोष थेरो (नेपाळ ) हे सुद्धा आले होते. ते त्यांच्या जन्मगावी, बेलूरा येथे आले. तिथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. तिथूनच त्यांनी महाराष्ट्रात धम्म प्रचार आणि प्रसारचे कार्य सुरु केले. बहुतेक वेळी पायी प्रवास किंवा बैल गाडीतून प्रवास होत होता. दर दिवसी वेगवेगळ्या गावात प्रवचन असायचे. बुलढाणा, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव, जळगांव जामोद ह्या भागात धम्म चळवळीला बऱ्यापैकी वेग आला. अखिल भारतीय भिक्षु महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यानी बरीच वर्षे कार्य केले होते. त्यांनी महाराष्ट्रात सर्वदूर भ्रमंती केली होती. बौध्द धम्माच्या प्रचारला एकंदरीतच आलेली मरगड पाहून भंतेजी उद्वेगाने म्हणायचे कि, “अलीकडे बुध्दाचा, *चरथ भिक्कवे चारिकमं….* हा संदेश न पाळता आजचे भिक्षु *चरत भिक्कवे चारिकमं…..* करतात. ह्याच काळात भन्तेजींच्या पुढाकाराने डिघी येथील विनयालंकर बुध्द विहारांची निर्मिती झाली.
१०. भन्ते विनय वात्सायन यांनी बौध्द धम्म प्रचार प्रसार केंद्र मोताळा (फाटा ) ह्या संस्थेची स्थापना 1977 साली केली. त्या संस्थेचे मुलांचे वसतिगृह सरकार मान्य झाले. तेथे नेहमी धम्म शिबिर व्हायला लागली. अल्पकालीन श्रामणेर शिबीर व्हायला लागली. एकेवेळी जवळपास 50 मुलांची सोय असलेले हे त्या विभागातील एकमेव वसतिगृह असल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे येऊ लागले. मी स्वतः इयत्ता आठवी मधे असतांना ह्या हॉस्टेल मधे राहून मोताळ्याच्या शाळेत शिकलो आहे. येथेच भंतेजिंनी साहित्य निर्मितीला सुरुवात केली होती. त्यांच्या साहित्यात महाराष्ट्राचा बौध्द इतिहास, त्रिपीटकाचे भाषांतर हे अतिशय महत्वाचे विषय हाताळण्यास सुरुवात झाली होती. पण, हे कार्य पूर्णत्वास येणे नियतीला मान्य नसावे कदाचित.
११. वसतिगृहाला सरकारी ग्रांट मिळत होती. त्याच प्रमाणे समाजातील दानशूर व्यक्ती यथाशक्ती ह्या उत्तम उपक्रमाला दान देत होती. अश्याप्रकारे संस्थेत पैसा यायला लागला. संस्थेतील पदाधिकारी भ्रष्टाचार करू लागले. हळु हळु संस्था आणि वसतिगृह रसातळाला गेले आणि बंद पडले अशी माहिती आद.पी. एस. अहिरे साहेब , ग्रामविकास अधिकारी (सेवानिवृत्त) रा. संगळद ता. मलकापूर (आताचा तालुका मोताळा )जिल्हा बुलाढाणा ह्यांनी दिली आहे. तिथे एक लायब्ररी होती. त्या लायब्ररीत खुप सारे फोटो, वर्तमाणपत्रांची कात्रणे,अनेक ग्रंथ, अनेक पुस्तके होती. ही सगळी लायब्ररी नंतर गहाळ झाली. त्या वासतिगृहाची ओसाड पडलेली जागा अजूनही तशीच पडून आहे. त्या जागेवर ना कुणी अतिक्रमण केले ना कुणी मालकी सांगितली ना कुणी सदुपयोग केला…..
१२. बौद्धांच्या सवलती साठी भन्तेजींचे योगदान :- धर्मांतरानंतर अनुसूचित जाती मधून बौध्द धर्मांतरित महारांचे आरक्षण संपुष्ठात आले. ते आरक्षण पुन्हा सुरु व्हावे ह्यासाठी बरेच प्रयत्न समाजाची नेते मंडळी चळवळीच्या रूपाने करीत होती. 1978 साली मोरारजी देसाई पंतप्रधान होते. तेव्हा बौद्धांच्या सवलतीसाठी जेष्ठ नेते पा. ना. राजभोज ह्यांच्या सोबत भंतेजिंनी दिल्लीत आमरण उपोषण केले होते. त्यांच्या उपोषण स्थळाला श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी भेट दिली होती.
१३. नामांतराच्या लढाईतील योगदान :-1979 साली मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याचे नाव द्यावे ह्या साठी लॉन्गमार्च निघाला होता. नामांतराचा लॉन्ग मार्च, प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वात नागपूर वरून सुरू झाला होता. त्या लॉन्गमार्च मधे भन्ते विनय वात्सायन ह्यांच्या नेतृत्वाखाली मोताळा येथून मार्च सुरु होऊन पुढे त्या मुख्य लॉन्गमार्च मधे सामील झाला होता. लॉन्गमार्च जालना येथे अडविण्यात आला होता. मराठवाड्यात जमावबंदी आदेश लागू झाला होता. जातीय दंगलीत मराठवडा होर पडत होता. कसे कुणास ठाऊक पण, भन्ते विनय वात्सायन आणि आणखी दोन भन्ते विद्यापीठाच्या मुख्य कामानिपाशी पोहोचले आणि तिथे आमरण उपोषण सुरु केले. भंतेजीची तबियत बिघडली होती म्हणुन तिथे सुरु असलेलं तीन भिक्कूचे आमरण उपोषण पोलिसांनी जबरदस्तीने थांबवून त्या भिक्षुना घाटी हॉस्पिटल मधे भरती केले होते. नामांतराचा लढा बरेच वर्षे सुरु होता. जेलभरो आंदोलन झाली होती. त्यात भन्तेजी चा सक्रिय सहभाग होता.
१४. भन्तेजी च्या जीवनाचा उत्तरार्ध :- साधारण 1985 च्या जवळपास मोताळ्यातील होस्टेल बंद पडले. त्या नंतर भन्तेजी ची तब्येत बिघडत गेली. भन्तेजींच्या त्यागाची जाणीव असलेले उपासक आजूबाजूला होते त्यांनी भन्तेजी ची सेवा सुश्रुषा केली. अश्याही अवस्थेत भन्तेजींचे प्रवचन मुद्देसूद आणि प्रेरणादायी असायचे. संपूर्ण विधी आणि गाथा तोंडपाठ असल्याने त्यांना विविध कार्यक्रमांची आमंत्रणे सतत येते होती.
१५. दिनांक १४ मार्च २००० रोजी गाव वडनेर भोलजी ता. नांदुरा जी. बुलाढाणा येथील कार्यक्रमात सायंकाळी भंतेजींचे प्रवचन संपले आणि त्याच जागेवर, तिथेच बसल्या बसल्या त्यांची प्राणज्योत शांतपणे मालवली. हा प्रसंग तिथे उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे.
१६. भन्तेजी च्या निर्वाणाची बातमी पंचक्रोशीत पसरली आणि हजारोंचा जनसमुदाय वडनेर ला पोहोचून त्यांचा अंत्यविधी पार पडला. त्या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि आर्थिक नियोजन वडनेरच्या बौद्ध बांधवांनी केल्याचे ऐकिवात आहे. भन्तेजींचा स्मृतिदिन दरवर्षी वडनेर येथे स्थानिक मंडळी आयोजित करीत असतात आणि पंचक्रोशीतील जनसमुदाय भन्तेजींच्या स्मृतिन्ना अभिवादन करण्यासाठी येथे येतात..
भन्ते विनय वात्सायन जी अमर रहे.

जयप्रकाश इंगळे –९८६९४१३८८२,बेलूरा (जवळा बाजार)
ता.नांदुरा जिल्हा-बुलढाणा / हल्ली मुक्काम मुंबई
