
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात्मक जीवनाला साथ देणाऱ्या महमाता त्यागमुर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचा त्याग संघर्ष व समर्पणाची जाणिव ठेऊन बोधीपर्ण प्रकाशनच्या वतीने रमाई धम्मसृष्टी स्मारक समितीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आंबेडकरी चळवळीतील अनुयायांचा एकमेकांशी संवाद साधून आंबेडकरी चळवळ व धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी लवकरच छत्रपती संभाजी नगर येथे ऐतिहासीक रमाई बौध्द धम्म संगिती चे आयोजन करण्यात येत आहे.तथागत गौतम बुद्ध जीवंत असे पर्यंत त्यांच्या अनुयायांचे शंका निसरण वेळीच होत असे.मात्र बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्षूंमध्ये तात्विक मतभेद वाढले.त्यांचे निराकरण करण्यासाठी संगितींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विचार मंथन घडून आले.बुद्धाने सांगितलेले धार्मिक तत्त्वज्ञान,आचार,विहाराबाबतची नियमावली यांचे संकलन करणाऱ्या चार बौध्द धम्म परिषदा (संगिती) राजगृह,वैशाली, पाटीलपुत्र,आणि काश्मीरातील कुंडलवन येथे भरल्या त्या मधून बौध्द धम्माच्या सुत्त पिटक,विनय पिटक,अभिधम्म पिटक या तिन्ही ग्रंथांना मिळून बौध्द धम्माचे सार सांगणारा “त्रिपिटक” हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ निर्माण झाला.बौध्द धम्म संगिती मुळे त्रिपिटक निर्मिती बरोबरच धम्म प्रसाराला चालना मिळाली आपल्या देशात आणि विदेशात बौध्द धम्म प्रसारासाठी बौध्द भिक्खू गेले.शिवाय बौध्द धम्माच्या तत्त्वांचा उद्घोष करणारे स्तंभ लेख,शिलालेख व ताम्रपट ठीक ठिकाणी लावण्याची योजना कार्यान्वित झाली.संगितीच्या वेळी किर्तीमान भदंतांचे विद्वत्ता पूर्ण संवाद झाले.बौध्द भिक्खू मधील तीव्र मतभेद आणि बदलत्या परिनिवेशात बौध्द धम्माची बांधणी हेही कारण धम्म संगिती,धम्म परिषद करण्यामागे होते.हाच धागा पकडून आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आंबेडकरी चळवळीतील संवाद उजागर करण्यासाठी आप आपसातील वैचारिक मतभेद सावरण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांच्या स्वप्नातील समाज निर्मितीसाठी ही धडपड आहे.महामानवाच्या संघर्षाचे स्मरण करून “रमाई बौध्द धम्म संगीती” चे आयोजन आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक बौध्द धम्म दीक्षा समारंभाला सत्तर वर्ष होत आहेत.या निमित्ताने धर्मांतराचे सिंहावलोकन केले असता.धर्मांतराच्या सत्तर वर्षांच्या कालखंडाचे मूल्यमापन होणे अत्यंत महत्वाचे आहे. या साठी रमाई बौध्द धम्मसंगिती मध्ये धम्मदेसना,धम्म प्रवचन,धम्म संवाद,धम्म कवी संमेलन,धम्म पुरस्कार,मानपत्र,हृदय सत्कार,धम्म जीवन गौरव पुरस्कार देऊन आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.अधिक माहिती साठी प्रा.देवानंद पवार यांच्या ९१२८३५९६२८ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे रमाई धम्मसृष्टी स्मारक समिती व बोधीपर्ण प्रकाशनच्या करूणा खरात पवार,सुगंधा पाटील,चंद्रकला इंगळे,प्रज्ञा येलकर यांनी कळविले आहे.
प्रा.देवानंद पवार
संवाद : 9158359628
कवी तथा समीक्षक
छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद
