पँथर म्हणजे नुस्ता राडा नव्हे!

बातमी शेअर करा.

असं म्हणतात राडे करणाऱ्यांचा वरचा मजला रिकामा असतो.पण पँथर्स याला एकमात्र अपवाद होते आणि आहेत. भाई संगारे,मनोहर अंकुश,नामदेव ढसाळ, राजाभाऊ ढाले हे फक्त डॅशिंग नेते नव्हते तर ते वैचारिक डॅशिंग नेते होते. या साऱ्यांची भाषणे म्हणजे प्रत्येक पँथर्स साठी एक वैचारिक डोस असायचा. आणि या नेत्यांना आदर्श मानून प्रत्येक पँथर हा जरी डॅशिंग असला तरी त्याच्या प्रत्येक कृतीला एक वैचारिक धार होती आणि आहे. गौतम जाधवही त्यातलाच एक बुध्दिमान पँथर. महालक्ष्मी रेसकोर्स समोर जी म्युनिसिपल कामगार वसाहत आहे तेथे दोन पँथर्स रहायचे. एक जयवंत कांबळे आणि त्याच्या खांद्याला खांदा देऊन सोबत असायचा गौतम जाधव. पँथरच्या प्रत्येक आंदोलनात ही जोडगोळी सर्वांच्या पुढे असायची. महानगर पालिका वसाहतीमधील प्रत्येक मुलांचे आईवडील हे सफाई कामगार असत. त्याच्यानंतर घर टिकवण्यासाठी ही मुलेही आपल्या पालकानंतर महापालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला लागत. पण गौतम ह्याला अपवाद होता. शिकलेला असल्याने त्याला म्युनिसिपल बँकेत लिपिकाची नोकरी मिळाली. मग हळू, हळू आपल्या स्वतःच्या हुषारीवर गौतम त्या बँकेचा मॅनेजर झाला. मॅनेजर झाल्यावर मात्र त्याने आमच्या उठावच्या पहिल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ माकडवाल्या सावकारांवर बँकेच्या परिसरात प्रवेश करण्यावर कायदेशीर बंदी आणली. त्यामुळे अनेक गुंड सोबत बाळगणारे माकडवाले सावकार गौतमवर डुख धरुन होते. पण असल्या सावकारांना गौतमने अजिबात भिक घातली नाही. यातच त्याचं डॅशिंग पँथरपण अधोरेखित झालं होतं. जसं आमच्या चार चाळीला पूर्वी लोक ‘म्हार चाळ’ म्हणायचे तसेच गौतमच्या या वसाहतीला इतर लोकं पूर्वी ‘कचरपट्टी’ किंवा ‘भंगीवाडा’ म्हणत. पण पँथर जन्माला आली आणि या वसाहतीला लोकं ‘गौतम नगर’ म्हणू लागले. याचं एकमेव श्रेय पँथरला अर्थात पर्यायाने गौतम व जयवंत सारख्या हरेक पँथर्सना जातं. जसा जयवंत कांबळे कुणापुढे लाचार न होता मरेपर्यंत ताठ मानेने पँथर राहिला. तसाच गौतम जाधवही ‘भारतीय दलित पँथर’ न बनता फक्त दलित पँथरचाच पँथर बनून राहिला. अशा या स्वाभिमानी पँथरची पुण्यानुमोदन व शोकसभा बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे RTO ऑफिस जवळील ताडदेव येथील जनता केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. या पँथरला निळा सॅल्युट द्यायला आपण सगळे येणारच आहात ही खात्री आहेच. जयभीम!

               – विवेक मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *